अनेक आज्यांपैकी, एक आज्जी… मंदिराबाहेर..!
कुणीतरी काहीतरी देईल, या आशेवर बसलेली…
भाविकही येतात अन् जातात. कुणी देवाचं दर्शन घेवुन निघुन जातं, कुणी देवापुढं दोन रुपये टाकुन बरंच काही मागुन जातं, कुणी देवापुढचाच नारळ आणि फुल घेवुन निघुन जातं..!
वाटेत निघताना भिक मागणा-या आजीचा सामना होतो…
गंमत अशी की, माणुस जेव्हा स्वतःसाठी काही मागायला येतो, तेव्हा तो हमखास वाटेत येणाऱ्या भिक्षेक-यांना काहीतरी “भिक” देतो… किंवा दानपेटीत बराच माल टाकतो !
जेव्हा त्याला स्वतःला काही नको असतं त्यावेळी, तो ही कुणाला काही “देत” नाही !
रोखठोक मामला..!
जर जास्त पैशाची भिक भिक्षेक-यांना दिली किंवा दानपेटीत मजबुत रक्कम टाकली… तर बेधडक समजुन जावं, पठ्ठ्यानं बरंच काही मागीतलं आहे आत जावुन… किंवा जे काही भरपुर मिळालं आहे, त्याचं “पचन” व्हावं, यासाठी केलेली ही धडपड आहे…
दानपेटी आणि भिक्षेक-यांना देणं हा केवळ देखावा..!
सध्याच्या गतीमान युगात सगळंच गतीमान झालंय…
पण गती साधायची असेल तर “चरण” असावे लागतात… आणि प्रगती साधायची असेल तर योग्य “आचरण” असावे लागते..!!!
गती म्हणजे कशाच्यातरी मागं मोकाट धावणं… प्रगती म्हणजे, आपल्या मागे धावणा-याला हात देत पुढं खेचणं…
गती असणारा एकटा असतो, प्रगती करणारा कधीच एकटा नसतो..!
गतिमान व्हायचं की प्रगतीमान… ज्याचं त्यानं ठरवायचं..!
तर, अशा या गतिमान जगात, मागं पडलेली एक आजी !
मुलानं बाहेर काढलं… यजमान देवाघरी… एकुलती एक मुलगी… तिचाही घटस्फोट, तीच्या पदरात एक शाळकरी मुलगी..!
नाही म्हणायला आजीची मुलगी शिवणकाम करते, पण एव्हढ्यात भागत नाही घरखर्च आणि मुलीचं शिक्षणही. कशाचाच ताळमेळ बसत नाही शिवणकामात !
म्हणुन मग आजी मुलीचं घर, आणि नातीचं शिक्षण यासाठी भिक मागते..!
नाही म्हणायला, आजीचं बालपण सुखवस्तु घरात गेलं… तीच्या वडिलांचं नाव “मल्हारी”
या मल्हारी बाबानं, हिला लाडाकोडात वाढवली, झकास लगीन लावुन दिलं… पोरगी म्हणजे मल्हारीच्या काळजाचा तुकडा..!
पोरगी पण मल्हारीवर जीव ओवाळुन टाकायची…
बाप लेकीत कमालीचं प्रेम !
लगीन लावुन मल्हारी देवाघरी गेला, तवापास्नंच उतरती कळा लागली…
बाप हुता, तवर समदं येवस्तीशीर हुतं, पन बाप गेला… आन् आयुष्याची कळाच गेली..!
“कुणाची गं तु?”, असं बापाचं नाव कुनी इच्यारलं, तर पोरगी टेचात सांगायची! “मी…? मी मल्हारीची लेक हाय..!”
आज याच मल्हारीच्या लेकीवर म्हातारपणात भिक मागायची वेळ आली…
मला ही आज्जी भेटली, तेव्हा तीच्या लाघवी बोलण्याचं मला कौतुक वाटायचं..!
माझं आणि तीचं आपसुकच नातं निर्माण झालं..!
आयुष्याचे अनंत आघात पचवुन आजी ला एक वेगळंच शहाणपण आलंय… पण लोक तीला वेडसर म्हणतात..!
जो खरंच शहाणा आहे त्याला वेडं ठरवायची रीतच आहे जगाची..!
लोक मला म्हणतात… “कशाला त्या येडीच्या नादाला लागताय डॉक्टर ?”
खरं सांगु ? नातं हे वेड्यांशीच असावं… शहाणी लोकं गरजेच्या वेळी आपापल्या व्यवहारात आणि कामात व्यस्त असतात.
आणि वेड्यांना व्यवहार काही समजतच नाहीत, म्हणुन मग ते आपल्यावर प्रेम करतात..!
बेधडक…!!!
या आजीचं आणि माझं नातं मात्र जगावेगळं..!
कारण कोणतीही आजी अथवा आजोबा असो, ते मला मुलगा मानतात, नातु मानतात…
पण या आजीला, माझ्यात दिसतो तीचा गेलेला बाप… हो मल्हारी..!!!
मी या आजीला, खरंतर आजी म्हणणं अपेक्षित आहे… पण कसा कोण जाणे, तीला माझ्यात बाप दिसतो तीचा…
ही आज्जी मला काय म्हणत असेल भेटल्यावर..?
ती मला “बाबा” म्हणते..!
तीचा “बाबा” हा शब्द ऐकल्यावर मी आतुन पिळवटतो, तुटुन जातो…
कारण… कारण…
सगळे माझे भिक्षेकरी मला ऐ बाळा, ए लेकरा, ऐ सोन्या,ए पोरा, आरं ए डाक्टरा असं एकेरी नावानंच बोलवतात…मला त्यात गैर वाटत नाही.
पण ही आज्जी मात्र मला अतिशय अदबीनं “ओ बाबा” अशी हाक मारते…!
एका आज्जीनं, अहो जा हो करत मारलेल्या हाकेचं ओझं किती असतं अनुभवलंय का तुम्ही कधी ? हे ओझं पेलवत नाही…
मला मुलगी नाही, पण रस्त्यावरची एक भिक मागणारी ७० वर्षाची आजी मला बाप समजते, तेव्हा जबाबदारीची जाणिव होते…
मी नकळत ७० वर्षाच्या मुलीचा बाप होवुन जातो…
कोणताही बाप, आपल्या मुलीची कित्ती काळजी घेतो, तीची आवड निवड जपतो, तीला हवं नको ते बघतो, कधीच कुठ्ठं एकटीला सोडत नाही…
पण मी एक करंटा बाप..!
ती मला बाप समजते… मल्हारी म्हणते… आणि मी..?
मी तीला रोज रस्त्यावरच सोडुन येतो… भिक मागायला..!
माझ्या या पोरीचं वय वर्षे ७०… हो… हे ही वय नाजुकच की… या वयात तीला एकटीला सोडणं बरं आहे का ?
पण या नाजुक वयात ती एकटी असते रस्त्यावर… आणि मी असतो, माझ्या विणलेल्या घरात…
ती असते, फुटपाथवरच्या धुळीत लोळत… आणि मी असतो माझ्या गादीवर लोळत पडलेला…
जेव्हा रात्री ती थंडीत काकडुन, अंगावर पदर पांघरुन, रात्रभर जागुन सकाळ होण्याची वाट बघत असते, तेव्हा मी साखरझोपेत असतो, गरम ब्लँकेट्स खाली, सकाळ कधी होवुच नये या अपेक्षेत..!
ती शिळे नासके भाकरीचे तुकडे मोडत असते सक्काळी सक्काळी पाण्यात बुडवुन… मी नेमका त्याचवेळी ब्रेकफास्ट करत असतो…
तीचं पोट भाजत असतं उन्हाच्या चटक्यात, आणि मी गरम भातानं बसलेल्या चटक्यामुळं बसतो भातालाच शिव्या घालत, बोटांवर फुंकर मारत…
ती असते, फाटक्या लुगड्यात लाज वाचवण्याच्या प्रयत्नात आणि मी इकडे माझ्या नविन जीन्सला भोकं पाडुन मिरवत असतो… लाज उघडी टाकुन…
ती बाबा म्हणते, तेव्हा म्हणुनच मला लाज वाटते..!
मी खरंच एक करंटा बाप..!
आयुष्याच्या खेळात सगळ्ळे आकडे मी पाहिलेत…शेकडा मोजले, हजार पाहिले, लाखातही लोळलो… पण या माझ्या ७० वर्षे वयाच्या पोरीच्या डोळ्यात पाहिलं की मला दिसतो… एक मोठ्ठा “शुन्य”..!
या शुन्यात मी हरवुन जातो आणि शेकडा, हजार आणि लाखांची होळी होवुन जाते, तीच्या जळालेल्या !स्वप्नांत..!
आणि मी फिरत राहतो, या शुन्यात गरागरा… गरागरा… आणि गरागरा..!
एके दिवशी तीनं मला माझा नंबर मागितला,
मी दिला..!
खुप दिवसांनी मला एक कॉल आला…,
पलीकडुन थकलेला, नैराश्यानं ग्रासलेला एक आवाज आला, म्हणाला, “बाबा मी बोलतीया, कोन बोलतंय..?”
मी टेचात बोलुन गेलो… “Yes, बोला, मी डॉ. अभिजीत सोनवणे बोलतोय..!”
पलीकडनं फोन कट्…
का बरं फोन कट् झाला असेल..?
पलीकडच्या थकलेल्या आवाजाला अपेक्षा असावी… “होय बाळा बोल, मी तुझा मल्हारी बोलतोय, तुझा बाबा बोलतोय..!”
तीला डॉ. अभिजीत सोनवणे नकोच होता, तीला हवा होता मल्हारी..! तीचा बाप..!!!
तीनं तीच्या बापाला फोन केला होता… फडतुस अभिजीत सोनवणेला नाही..!
मला तरी कसला माज ? का बरं मी “मल्हारी” झालो नाही तेव्हा..???
आपण लोकांबरोबर खोटं खोटं पळतो, स्वतःबरोबर प्रामाणिकपणे चालतसुद्धा नाही…!
कसला माज असतो आपल्याला..?
सगळीकडे “मीपणा” मिरवण्यात आयुष्य निघुन जातं… स्सालं कधीतरी “कमीपणा” घ्यायला हरकत आहे..?
एखाद वेळेला मल्हारी व्हायला काय हरकत आहे ?
पेनातली शाई भस्सकन् सांडली कागदावर तर त्याला “डाग” म्हणतात… पण याच पेनातनं कुणी शाईला आकार देत कागदावर मांडलं तर तो “विचार” होतो…
आपण भस्सकन् कुणाच्या कागदावर सांडुन डाग व्हायचं की एखाद्या पेनातनं नाजुकपणे पाझरत विचार व्हायचं… हे जेव्हा आणि ज्याला कळलं त्याचं आयुष्य संपन्न झालं… बाकी नुसतेच जन्मले… जगले… आणि मेले..!
असो,
एकदा झालेली ही चुक मात्र मी पुन्हा करत नाही.
मी आता जेव्हा जेव्हा तीला भेटतो, तेव्हा डॉक्टर असण्याचा मुखवटा काढुन ठेवतो… अभिजीत सोनवणे हे नाव घसाघसा पुसुन टाकतो…
आणि मग ही अक्षरं पुसल्यावर आपोआप उमटतात अक्षरं… “मल्हारी”..!!!*
ती या मल्हारीला मनापासुन स्विकारते…
अगदी घरी असल्यागत, भिकेत मिळालेल्या, फडक्यात झाकुन ठिवलेल्या भाक-या ती आल्लाद उघडते, आणि म्हणते, “बाबा, जीवुन घ्या की..!”
लेक असण्याचे सग्गळे हट्ट ती पुरवुन घेते…
आणि मी उभा असतो, मल्हारी म्हणुन..!
ती तीचं नाव सांगते… “सुबाबाय..!”
सुबाबाय म्हणजे सुभद्राबाई असेल का ?
तीलाही माहिती नाही…आणि मलाही !!!
तीचा बाप, ती जन्मल्यापासुन सुबाबायच म्हणायचा तीला…
मीही तीला आज्जी म्हणतच नाही, सुबाबायच म्हणतो… यातच ती सुखावते..!
सुबाबाय भिक मागते, तीच्या मुलीसाठी आणि नातीसाठी…
मी या ११ तारखेला सोमवारी सुबाबायच्या मुलीला बोलावलंय. तीचा व्यवसाय वाढवण्यात मदत करायचं आणि नातीच्या शिक्षणात मदत करायचं मी सुबाबायला वचन दिलंय..! जेणेकरुन सुबाबाय भिक मागणार नाही..!
मी निघतांना, माझे हात ती हातात घेते, म्हणते, “माज्या मल्हारी बाबाला कायबी कमी पडणार न्हाय…”
मी हसत म्हणतो… “हो खरं आहे, तुज्यासारकी ७० वर्षाची लेक दिली, हे काय कमी हाय का?”
“व्हय बाबा, तु माजा बाप, माज्या लेकीचा आज्जा आन् माज्या नातीचा खापर आज्जा झालास…” ती हसत हसत आधार घेवुन उठत बोलते..!
खरंच की, मी या वयातही कुणाचातरी खापर आज्जा झालो… किती भाग्यवान मी..!!! या आधी कधी हा विचारच शिवला नाही..!
“जावु मी?” तीचा निरोप घेत मी विचारतो…
“जावु का? आसं म्हनु नाय… येवु का…? आसं म्हणावं…” ती शुन्यात बघत बोलते..!
“माजा मल्हारी बाबा… जावु का? म्हणत निगुन गेला… आता तुमी तरी जावु नगा…”
ती पदराला डोळे लावते..!
मी तोच तीचा हात घट्ट धरुन सांगतो, “सुबाबाय, मी आसा सोडुन जाणार न्हाय तुला… तुझ्या सोडुन गेलेल्या बापाचा म्हणजेच मल्हारीचा जीव आडकलाय, तुज्यात, तुज्या लेकीत, आन् तुज्या नातीत..!”
“मला तुझ्या त्याच गेलेल्या मल्हारीनं परत पाठवलंय… तुज्यासाटी, तुज्या लेकीसाटी आन् तुज्या नातीसाटी…”
सुबाबाय, रडत गळ्यात पडते आणि मला विचारते, “आरे डाक्टर, तु हाईस तरी कोण…? तुजं नाव तरी काय हाय..?”
मी तीला जवळ घेत सांगतो, “आगं सुबाबाय, मी मल्हारीच की गं..!!!”
एकमेकांच्या गळ्यात पडुन रडतांना कळतच नाही… बाप लेकीच्या गळ्यात पडलाय… की लेक बापाच्या..?
Leave a Reply