ही एक आजी…
अर्थात भीक मागायची, मी हिला दर वेळेला, “काही तरी काम कर गं” असं सांगायचो…
पण काहींना काही कारणामुळे ती काम करत नव्हती…
दर वेळेला काही ना काही बहाणे सांगायची…
शेवटी एकदा तिला म्हणालो, “काम काही करु नकोस, मी देतो त्या फक्त वस्तु विक…”
यानंतर, आम्ही तयार करत असलेल्या “गुलछडी” या शोपीसचे दहा गुच्छ तिला आज आणून दिले आणि तिला म्हणालो, “तुला हे फक्त विकायचं आहे बाकी काहीही काम नाही!”
“वस्तु विकुन जे पैसे येतील, ते तुझे…”
आजीने हे शोपीस पाहिले आणि फक्त विकायचंच आहे तर काय हरकत आहे, या विचारांनी हरखली, आणि तयारही झाली…
म्हणाली: “हो रे बाबा, दे मला नुसतं बसून इकायचंच हाय ना? मग मी इकेन…”
यानंतर मग मी तिला साधारण व्यवसायाचं गणित सांगितलं आणि आजूबाजूला भीक देणाऱ्या लोकांना हात जोडुन आवाहन केलं की आजीला भीक देण्यापेक्षा या वस्तू तुम्ही विकत घ्या…
गम्मत अशी, की दोन लोक त्यातून तयार झाले आणि त्यांनी या वस्तू लगेचच विकत घेतल्या…
भीक मागणाऱ्या आजीला वस्तू विकताना पाहून मला किती आनंद झाला असेल याचं वर्णन मी शब्दांत करूच शकत नाही…
भीक मागणारी ही आजी आता ओरडून “माझ्या वस्तू घ्या हो… भारी हायत, बगा तरी… बगा… बगायला काय पैशे पडत न्हाईत…” असं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगत होती.
हा नजारा पाहून मलाही भरुन आलं…
मोरया गोसावी गणपती चिंचवड, पुणे येथे गेटवर, ही आजी हे शो पिसेस विकत आहे…
आपण कधी या बाजुला आल्यास, तीच्याकडुन या वस्तू विकत घ्याव्यात अशी मी आपणास विनंती करतो…!!!
इतर आजी आणि आजोबांनाही मी हे शोपीसेस विकायला देणार आहे, मी कळवेनच…!
भीक मागणारा एक “भिक्षेकरी” हात आता वस्तू विकतोय… “कष्टकरी” होण्याचा प्रयत्न करतोय… या हाताला मदत करा…!
कुणाला ढकलुन पाडायला खुप ताकद लागत नाही…
मात्र पडलेल्या एखाद्याला आपला हात देवुन उठवण्यासाठी “शक्ती” लागते…!
माझ्या या म्हाता-या माणसांची शक्ती व्हाल…?
नव्हे… व्हाच…!!!
गुडघे टेकुन माझी विनंती आहे आपणांस…
Leave a Reply