आज म्हणे “व्हॅलेन्टाईन्स डे”..!
आजच्या दिवशी म्हणे, आपल्या आवडत्या / जवळच्या व्यक्तीसाठी वेळ द्यायचा.
नातं कोणतंही असो, या नात्याचा मनापासुन स्विकार करायचा, आणाभाका घ्यायच्या, गिफ्ट वैगेरे द्यायचं… या व्यक्तीला आपला व्हॅलेन्टाईन म्हणुन मिरवायचं…
आणखीही बरंच काही..!
माझा असल्या “डे” वैगेरे वर विश्वास नाही खरंतर..!
तरीही…
आजच्या दिवशी मी सक्काळी लवकरच बाहेर पडलो…
आज तिघींना भेटीची वेगवेगळी वेळ दिली होती…
ट्रॅफिकमधुन मोटरसायकल दामटत चाललो…
तिघींना द्यायची गिफ्ट्स बॅगेत वारंवार चाचपुन पहात होतो..!
घड्याळाचा काटा, आज जोरात धावत होता… आणि माझीही धडधड इकडं वाढत होती…
वेळेत पोचायला हवं..!
वेळेत पोचलो नाहीतर तिघीही रागावतील, रुसवा धरतील… मला परवडणार नाही हे..!
कसाबसा धावतपळत पहिलीला भेटलो… हातात हात घेवुन तीला गिफ्ट दिलं…
मनातल्या गोष्टी मी तिच्याशी बोललो… ती ही बोलुन गेली… मी तीच्याकडनं एक “वचन” मागीतलं… तीने हळुच माझ्या गालावरुन हात फिरवला आणि मला वचन दिलं…
धावतच मग “दुसरी” कडे गेलो… ती ही बिचारी वाट पहात होती… तीला गिफ्ट दिलं… वचनासाठी मी हात पुढं केला… तीने माझा हात हाती घेतला… आणि माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं… या डोळ्यात तीचा “होकार” स्पष्ट दिसत होता… !
आता “तिसरी” लाही वेळेत गाठणं आवश्यक होतं…
मी धावतच निघालो… तर दुसरी म्हणाली… “सावकाश जा… मला तुझी काळजी वाटते..!”
“हो… गं…” गाडीला किक मारता मारता मी बेफिकिरीनं बोललो…
“परत केव्हा भेटशील..?” मागुन तीने विचारलेला भाबडा प्रश्न…
मी गाडीवरुनच बोललो… “पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी, याच वेळी..!”
ती गालात खुद्कन हसली…
कसाबसा “तिसरी” कडे पोचलो… एव्हाना, येईपर्यंत वेळ झाला होता… ती बराच वेळची वाट पहात होती…
मला पाहुन रागानं तीनं मान वळवली… मी जवळ गेलो, म्हटलं, “सॉरी गं… पुन्हा नाही वेळ करणार…”
तीनं चेहरा दुसरीकडं फिरवला…
“ऐक ना, हे बघ मी तुला काय गिफ्ट आणलंय…”
मी तीचा हात हाती घेतला…
“म्हटलं, आज तुझ्याकडनं मला एक वचन हवंय…”
तीने वाक्य पुर्ण होण्याआधीच झटक्यात माझ्या हातुन स्वतःचा हात काढुन घेतला…
उठली… आणि मानेला झटका देत निघाली सुद्धा …
हिला कसं मनवावं तेच कळेना…
मी तीच्या मागुन चालु लागलो…
शेवटी तीचा पदर हाती घेतला, आणि म्हटलं…
“म्हातारे, मला पोरगा म्हनती आन् माज्यावर येवडी चिडती व्हय गं… पोरावर एवडं कोन रागवतंय का..?” मी काकुळतीनं बोललो, आणि तीच्यातल्या आईचं मन द्रवलं..!
झट्क्यात मागं वळुन म्हणाली, “मंग तु इतका वेळ का लावला…? मी कवाधरनं वाट बगत हुती तुजी..!”
“अगं हो गं… बाकीच्या पण दोन आज्ज्या होत्या, त्यांनाही भेटुन आलो… येत येत वेळ झाला..!”
आणलेले शोपिसेस हाती ठेवले… आणि म्हटलं, “मला वचन दे…”
“आजपासुन तुला गिफ्ट म्हणुन मिळालेले हे शोपीस तु विकणार, आणि भीक नाही मागणार..!”
तिघी आज्ज्यांनी मला हात हाती घेवुन भीक न मागण्याचं आज “वचन” दिलंय…
मी आयुष्यंभर त्यांना मदत करेन अशी “शपथ” त्यांनीही माझ्याकडनं घेतलीये…
एकमेकांना वाटेत सोडुन जायचं नाही अशा आम्ही “आणाभाका” दिलेत एकमेकांना…
माझ्या या व्हॅलेन्टाईन्सना तुम्हालाही भेटायचं असेल तर साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर, पुणे, किंवा शनीमंदिर, शनिवारवाड्याजवळ, पुणे या ठिकाणी तुम्ही त्यांना भेटु शकता..!
तिघी दरिद्री नारायण भिक्षेकरी आज्ज्या, कष्टकरी व्हायला निघालेत… आजच्या दिवसापासुन..!
त्यांच्या हातात असतील काही शोपिसेस आणि एक बोर्ड…
हे शोपिसेस त्या विकणार आहेत आणि बदल्यात स्वप्नं विकत घेणार आहेत..!
ही स्वप्नं मीच दाखवलेत त्यांना..!
असे दिवस रोजच माझ्या आयुष्यात यावेत, ही “मनिषा” मनात धरुन मी परत निघालो…
गालावरनं फिरलेला सुरकुतलेल्या हातांचा तो स्पर्श अजुनही गालावर होता…
डोक्यावर ठेवलेला तो खरमरीत हात अजुन जाणवत होता…
एकमेकांना दिलेल्या आणाभाका, शपथा आणि वचनं मनात अजुन ताजीच होती…
“हळुच जा रं पोरा… गाडी नीट चालीव… तुजी बया काळजीच वाटती आमाला…” हे शब्द हृदयात नाचत होते…
आणि मी आठवणींच्या धुक्यातनं, तिघींची एक एक आठवण मनात घेवुन वा-यासह निघालो होतो… मोरपीस होवुन..!!!
व्हॅलेन्टाईन्स डे, अजुन काही वेगळा असेल काय…?
???????? ‘जगा’वेगळ्या’माणसांचा’ ‘जगा’वेगळा व्हॅलेन्टाईन्स डे ??