इनिसपेक्टर..!!!

 

या व्हिडिओत दिसणारा हा एक गोड मुलगा..!

हा, दुर्दैवानं भिका-यांच्या पोटी जन्माला आला.

भिकारी” हा शब्द मी वापरत नाही, पण याच्या आई वडिलांबाबत निश्चित वापरतो.

कारण, याचे आई आणि बाप दोघं धट्टेकट्टे..!

“काम करा रे बाबांनो” म्हणत किमान ५० व्यवसाय आणि नोकरीच्या संधी दिल्या यांना, पण, मागुन खाण्यातच यांना धन्यता वाटते..!

काही भिक्षेकरी गरजु आहेत, पण काही मुजोर आहेत, केवळ अंग मोडुन काम करायला नको आणि फुकट मिळतंय म्हणुन भीक मागणारे बरेच आहेत.

हे नवरा बायको सुद्धा त्यातलेच, फक्त चैन करतात भिकेच्या पैशात..!

त्यांचाच हा लहान मुलगा…

त्यांच्या या मुलाला त्यांनी भीक मागण्याचं साधन बनवलंय… त्याला पुढं करुन हे भीक मागतात… किंवा मुलालाच भीक मागायला मजबुर करतात, त्याची इच्छा नसतांना…

पोराकडुन मिळणाऱ्या भिकेत बापाची दारु, चिकन आणि बरंच काही भागतं… त्याची आई पण आपल्या ब-याच “गरजा” भागवते, मुलाला मिळालेल्या भिकेतुन..!

मला या मुलाचं मात्र खुप कौतुक वाटतं… हा अत्यंत समजुतदार!

मला भेटला की म्हणतो, “अंकल, मेरकु तुमारे जैसा बॅग देव ना..?”

मी म्हणतो, “बॅग घेवुन काय करशील?”

“मै इस्कुल मे जायेंगा, मेरकु पढना है… पढाई मेरकु आच्ची लगती हय… भीक मांगना अच्चा नय लगता…”

यावर मी त्याला रंगपेटी, ड्राइंग पेपर, पेन, वही आणि चित्राचं एक पुस्तक आणुन दिलं होतं… ते पाहुन तो हरखला होता…

या वस्तु घेवुन म्हणाला होता, “मेरकु इनिसपेक्टर बननेका है… पढने का हय…”

नंतर कळलं या इनिसपेक्टर च्या बापानं त्याला, मी गेल्यावर, बेदम बदडुन सगळ्या वस्तु जाळुन टाकल्या होत्या..!

मी या बापाला जाब विचारला.. दारुच्या नशेत मलाच चार शिव्या घालुन तो म्हणाला होता, “बच्चा तेरा हय क्या मेरा हय? मै कुच बी करेगा…”

मुलाच्या आईजवळ गेलो, ती म्हणाली, “रहने देव ना डाक्टर, तु दवा देके भागते जा इदरसे, हमारे लफडे में मत पड..!”

मुलाला शाळेत घालुन राहणं, खाणं, पिणं, कपडालत्ता सगळं काही सरकारी संस्थेत करुन देतो, असं सांगुन थकलोय मी या दोघांना…

पण मुलापासुन भरपुर भीक मिळते म्हणुन हे दोघेही या मुलाला दुर करण्यास तयार नाहीत… त्याला शिकवण्यास तयार नाहीत!

माझ्या पद्धतीने साम – दाम – दंड – भेद सर्व गोष्टी करुन झालेत, पण हे दोघेही मुर्दाड बधत नाहीत.

पोलीसांचा धाकही दाखवुन झालाय पण नाहीच..!

उलट मलाच दम दिलाय, “तु आबी इदर दिखेगा तो तेरकुच तोड डालेंगे..!”

आपल्या मुलाचा केवळ पैसे कमावण्यासाठी हे नवरा बायको त्या मुलाचं आयुष्य बरबाद करताहेत…

असे हे दोघंच आहेत असं नाही, आपल्या अवतीभवती मुलांचा वापर करुन जगणारे आणि मुलांचं आयुष्यं बरबाद करणारे हजारो आहेत…

*म्हणुन मायबापांनो, कुठल्याही मुलाला भीक देवु नका…*

*तुमचे पैसे मुलाच्या भवितव्यावर खर्च होत नाहीत, त्याला साधन म्हणुन वापरणारा त्याचा बाप किंवा इतर कुणीतरी मजा मारतंय तुमच्या पैशावर..!*

*तुम्ही मुलाला दिलेल्या पैशात कुणीतरी दारु पिवुन चैन करत असतं… आणि तुम्हाला वाटतं, एका मुलाला आपण मदत केली… साफ चुक आहे, हे तुमचं वाटणं…*

*तुम्ही मुलांना भीक दिलीत तर त्यांना भिकेचं साधन म्हणुन वापरणारे लोक, त्यांना शिकु देणार नाहीत, आयुष्यात उभं राहु देणार नाहीत, तुम्ही लहान मुलांना भीक देत असाल तर, इथुन पुढं लक्षात ठेवा… तुम्ही त्याचं आयुष्य जाळताय… भीक मागतच ते लहान मुल मरतं… अशी भीक देणारा प्रत्येकजण हा त्या मुलाचा अप्रत्यक्ष “खुनी” आहे..!!!*

*म्हणुन मुलांना भीक देणं बंद करा..! माझी विनंती आहे*

ब-याचवेळा भीक मागणा-या मुलांचे पालक मला म्हणतात, “बच्चेकु लेके जाव… पढाव सिखाव… सरकारी संस्थामे दाखील कराव…”

पालक असं म्हणतात, तेव्हा सारं सोपं असतं…

पण जे पालक आपल्या पोरांना भिकेसाठी सोडु इच्छित नाहीत, तीथं सारंच अवघड होतं..!

या केसमध्ये मी मुलाच्या बापाला पोलीसांची भिती दाखवली आणि म्हणालो, “उसकी सिखने की इच्छा है… तु तेरे चैन की वजहसे तेरे बच्चेकी जिंदगी बरबाद कर रहा है, तेरा बच्चा पोलीस बनना चाहता है, वो जरुर बनेगा… तुम्हारा पुरा लाईफ अच्छा जायेगा… बच्चे को ले जाने की मुझे परमिशन दे दो… नही तो, इकदिन आके मै उसको लेके जाउंगा…”

यावर अंगावर येत, त्याने मलाच धमकी दिली… “तु बच्चे को हात लगाके दिखा, फिर बच्चे चुरानेवाले इस डाक्टरने मेरा बच्चा चुराया, ऐसी मै कम्प्लेंट करेंगा..! और साले XXXXX” पुढचं न लिहीलेलं बरं…!

हसावं की रडावं मलाच कळत नाही…

हे आमचं नेहमीचंच… तरीही, आज पुन्हा धाडस करुन गेलो, बाप दारु पिवुन पडला होता, आई बसलीच होती भीक मागत…

हा मुलगा पुन्हा म्हणाला, “अंकल, मुजे इनिसपेक्टर बनना है, भीक नही मांगनी… मै भागके आयेंगा तेरे साथ अंकल..!”

हे ऐकुन मीच पिळवटुन जातो…

सारं करायची इच्छा असुनही, केवळ आईबापाच्या मर्जीविरुद्ध एखाद्या पाच -सहा वर्षाच्या अल्प वयीन मुलाला कसं उचलुन आणणार..?

बघु, या बाबतीत माझ्या ओळखीतल्या सरकारी अधिका-यांचे सल्ले घेवुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन मी या मुलाला या गटारगंगेतुन “उचलणारच” आहे… !

मुलाला योग्य त्या ठिकाणी दाखल केल्यावर या दारुड्या बापानं माझं नंतर काही केलं तरी मग बेहत्तर..! पण आधी या मुलाला इथुन बाहेर काढणं गरजेचं..!

आता ही पोस्ट वाचल्यावर, नेहमीप्रमाणे लोक मला विचारतील, “डॉक्टर; आम्ही काय मदत करु या कामात तुम्हाला..?”

सांगु..? तुम्ही फक्त एव्हढंच करायचं… कुठल्याही भिक्षेक-याला, खास करुन *लहान मुलामुलींना* भीक द्यायची नाही..!

मुलांना भिकेला लावणाऱ्या लोकांचं यामुळे कंबरडं मोडेल – मुलांपासुन काहीच फायदा न झाल्याने – त्यांच्या जीवावर जगणारे लोक त्यांना सहजपणे सोडायला तयार होतील – शिवाय नवीन मुलं कुणी पळवुन आणणार नाहीत भिकेसाठी..!

करणारच असाल, तर सध्या एव्हढीच मदत करा..!!!

वर वर्णन केलेल्या मुलाचं नाव आहे करण… आजुबाजुचे लोक त्याला यश म्हणतात..!

त्याला पोलीसमध्ये जायचं आहे… त्याच्या या स्वप्नाला “यश” मिळो, निसर्गानं मला तेव्हढी ताकद देवो ही प्रार्थना..!

आज निघतांना, मला त्याने विचारलं, “अंकल वापीस आवोगे ना..?”

मी म्हटलं, “अगले मंगलवार वापस आउंगा…”

तर कानाजवळ येवुन म्हणाला, “मेरकु वापस वही और पेन देव अगले मंगल कु…”

मी म्हटलं, “तेरे पिताजीने वापस सब जलाया तो? तुम्हें वापस मारा तो?”

तो म्हणाला… “मै मार खावुंगा… पर इस बार वही पेन जलाने नही दुंगा..!”

त्याच्या या दुर्दम्य इच्छा शक्तीला, भविष्यातल्या या माझ्या इनिसपेक्टर ला मी मनातुनच सॅल्युट ठोकला..!

मोटरसायकल वर बसल्यावर, माझ्याजवळ परत धावत आला…

मला म्हणाला… “अभी तो मेरा बाप सोयेला है, अगले मंगल को आवोगे और मेरे बापने तुमकु यहां देख लिया तो..?”

माझ्याबद्दलची त्याची काळजी त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती…

मी त्याला म्हटलं… “तेरा बाप मेरकु देखेगा तो देखने दो… मै नही डरुंगा…”

“क्युं..?”

“क्युंकी… ये मेरा इनिसपेक्टर मेरे साथ रहेगा ना..?”, त्याचा हात हातात घेत मी म्हटलं…

यावर तो गोड हसला; आणि इन्स्पेक्टर व्हायचं एक स्वप्नं डोळ्यात घेवुन पुन्हा “भीक” मागायला पळत गेला…

येताना त्याचे ते स्वप्नाळु डोळे मी बरोबर घेवुन आलोय…

त्याचं स्वप्नं आता मी माझ्या उरात घेवुन फिरतोय…

रोज फिरणार… त्याच्या या स्वप्नाचा पाठपुरावा करणार…

तोपर्यंत, जोपर्यंत तो “इनिसपेक्टर” व्हायच्या मार्गाला लागत नाही…!

ओम् शुभम् भवतु..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*