हि एक आज्जी! दोन मोठे मुलगे!
एकाचं लग्न झालं, सुन आली… त्यांना मुलं झाली..!
दुसरा मुलगा दारुच्या आहारी गेला… अट्टल पिणारा… पहाटे सहापासुनच याला प्यायला लागते! कुचकामी!
पण लग्न झालेला थोरला भाऊ दिलदार..!
त्याला छान नोकरी होती… बायको पण साजेशी होती, सासु अन् दिराला अगदी प्रेमानं बघायची…
दोघं नवरा बायको मिळुन, सगळ्यांचं सगळं करायचे..!
एकुण सुखी होते सर्वजण..!
पण नियतीला पहावलं नाही…
हा बिचारा मुलगा अन् सुन अपघातामध्ये अचानक गेले…
देव का परिक्षा पाहतो कळत नाही…
कमावता मुलगा गेला, प्रेमळ सुन गेली…
हातात राहीली कच्ची बच्ची गोंडस नातवंडं… आणि एक दारुडा पोरगा..!
म्हातारीनं दुःख्खं पचवलं आणि नातवंडं आणि दारुड्या पोराचं पालनपोषण करायचं ठरवलं..!
मला तीच्याशी बोलतांना, महाराजांच्या काळातली “हिरकणी” आठवली… पोरांच्या ओढीनं कडा उतरणारी…
फरक इतकाच, की ही या वयात आयुष्याचा कडा चढण्याचा प्रयत्न करत होती..! पोरांसाठी…
हिनं ठरवलं… भाजीपाला विकु… पोरांची पोटं भरु… पण भांडवल नव्हतं..!
पाच – सात वर्षांपुर्वी शे – पाचशे रुपयांत ती भाजीपाल्याचा व्यवसाय टाकु शकली असती…
तीने लाज सोडुन १० जणांकडे ५०० रुपये मागीतले… भाजीपाला व्यवसायासाठी…
सर्वांनी अपमानित करुन हाकलुन दिलं…
दोन मित्र चहा आणि नाष्टा करायला गेले तरी २०० रुपये सहज होतात…
पण उभं राहु पाहणाऱ्या, कुटुंब चालवु पाहणाऱ्या म्हातारीला कुणीही ५०० रुपये त्यावेळी दिले नाहीत…
लोकं नवरात्रात देवीला हजाराच्या साड्या नेसवतात… पण खरी देवी रस्त्यात बेरात्री एकटी दिसल्यावर तीची साडी फेडतात..!
लोकं महाशिवरात्रीला पिंडिवरच्या नागावर हजारो लीटर दुधाचा अभिषेक करतात… पण खरा नाग दिसल्यावर ठेचुन मारतात…
लोकं लायनीत उभं राहतात देवीच्या दर्शनाला…
वेश्या व्यवसाय करणा-या माझ्या बहिणींसाठीही मी पुर्वी काम केलंय… तीथंही लाईन लागलेली मी पाह्यल्येय..!
एका देवीला नमस्कार करायचा आन् दुसरीला नागवी करायची..!
लोकं दुटप्पी वागतात..!
असो..!
रोज हजाराची दारु पिणा-या, रोज २००० ची देवाला फुलं वाहणाऱ्या, रोज ५०० चं तेल चढवणा-या एकाही श्रीमंताकडे (?) या आजीला पायावर उभं राहण्यासाठी द्यायला ५०० रुपये नव्हते..!
हि असली थेरं पाहुन… देवानं मंदिर सोडलंय भावानु… त्यो आता मंदिरात बी न्हायी… आणि मशीदीत बी न्हाई… चर्चमदी पण न्हाई आन् गुरुद्वा-यात पन न्हाई…
भावानु… भयणींनु… त्यो द्येव आता मानसातच आलाय… त्येला पुजा…
भीक नको, त्याला मदत करा..! पायावर उभं रहायला..!
ही आजी सगळ्यांकडे मदत मागुन थकली… आणि चांगल्या घरातली ही माऊली शेवटी नाईलाजाने भीक मागायला बसली…
हिला भिकारी कुणी केलं…?
आपण… समाजानं..!
असो, आजीला मी आता विचारलं, “माऊली, झालं ते झालं, पण, आता तुला भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यास मदत केली तर करशील व्यवसाय?”
ती हो म्हणालीय…
भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु करायला तीला ४००० – ५००० इतकंच भांडवल लागेल सुरुवातीला…
मी मंगळवार दि. १२ मार्चला तुला व्यवसाय टाकुन देईन असा तीला वायदा केलाय..!
ही माऊली, १३ मार्चपासुन भीक मागायची बंद होईल..!
मी गीता वाचली नाही, मला उर्दु येत नाही म्हणुन कुराण सुद्धा मी वाचलं नाही, इंग्लिश शी माझा संबंध नाही… मी बायबलही वाचलं नाही… देव, अल्लाह, येशु मला माफ करा..!
पण… हां… मी माणसांची मनं वाचायला शिकलोय… मला तीच भाषा कळते…
ज्ञानेश्वरी वाचायची माझी पात्रता नाहीच…लायकी नाही म्हणा हवं तर…
पण तरी मला “माऊली” भेटली… चालती बोलती..!
शिर्डीला न जाता मला साई भेटला…
हिमालयात न जाता मला १२ ज्योतिर्लिंग पावलीत…
मक्का मशीद न पाहताही मला दुवा मिळाला…
चर्चमध्ये न जाताही, येशुने मला क्रॉस दिलाय, स्वतःच्या हातानं…
आणि शिखांचे गुरु ग्रंथसाहिब मला रोज “वाहे गुरु की फतेह” म्हणत स्वप्नात येतात आणि आशिर्वाद देतात…
मला आता कोणत्याही मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वा-यात जायची गरज नाही!
या आजीला सोमवारी ५००० चा भाजीपाला आणुन दिला तर, ही पुर्णपणे कष्टकरी होईल, आपलं कुटुंबं सांभाळु शकेल…
तीला मी सांगितलंय, “आपण मंगळवारी जावु… तुला लागेल तो भाजीपाला घे… होतील ते पैसे होवु देत, पण तु मला भिक्षेक-यांच्या लायनीत दिसायचं नाहीस पुन्हा… क्काय?”
ती डोळ्यात पाणी आणुन म्हणाली… “बाबा, तु कोन हायस रं..! माजा गेलेला पोरगा, तुज्या रुपानं परत घावला..!”
मी म्हनलं… “तुजा पोरगा कुठं गेलाच नाही… नीट बघ माझ्याकडं… मी तोच आहे..!”
ती खरंच डोळ्यात माझ्या पहात राहिली… आणि मी तीच्या..!
ती म्हणाली, “तु आलास पण सुन कुठाय माजी…?”
मी म्हनलं, “तु आदी भाजीपाला विकायला सुरुवात तर कर… ती सैपाक करुन ठिवील तुझ्यासाटी..!”
“तु कामाला लागलीस की तुला तुजी सुन बी दाकवतो…”
यावर हुंदका तीला आवरला नाही… गळ्यात पडत रडत म्हणाली…
“सुनेचं नाव “मनिषा” ठिवलंय काय…?”
मी ही म्हटलं… “हो… मनिषाच की गं..!”
तीनं आणखी घट्ट मिठी मारत माझ्या डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवला…
खरबरीत झालेला हात तो, मला मखमलीप्रमाणं वाटला…
तेव्हढ्यात एका मंदिरात पुजा सुरु झाल्याने लोक प्रार्थनेसाठी पळाले मंदिरात… याच वेळी अल्लाह हु अकबर ची अजान स्पिकरमधुन ऐकु आली… काही लोक धावले मशिदीत… नमाजासाठी..!
मला कुठलीच घाई नव्हती…
मी हिच्या पायाजवळच बसुन राहिलो…
मंदिरात न जाता माझी पुजाही झाली… आणि मस्जिद मध्ये न जाताही मी नमाजही अदा केला..!!!
Leave a Reply