केवळ माहितीस्तव…

आज मंगळवार १२ मार्च…

रोज घडतात तशा लहान सहान घटना आजही घडल्या.

त्यातल्या मुख्य दोन :

१. पिंडावरचा कावळा या शीर्षकाखाली लिहीलेल्या ब्लॉगमधील आजी, तीच्या लहान नातवंडांसाठी भीक मागायची.

बाल कल्याण समिती ला मी विनंती केली होती… आणि समितीने या नातवंडांना सहानुभुतीपुर्वक हात दिलाय… या प्रकल्पामार्फत दोन्ही नातवंडांची सोय झाली आहे. आजी आता भीक मागायची नाही आणि या लहानग्यांचं भविष्यही सुधारेल.

समितीच्या अधिकारी वर्गातील बिना हिरेकर, संस्कृती भोसले या दोन्ही मॅडमचा आयुष्यंभर ऋणी राहीन. यांच्या पुढाकाराशिवाय हे मुळीच शक्य नव्हतं..!

२. हिरकणी शीर्षकाखाली लिहीलेल्या आजीला भाजीविक्रीसाठी तीन टप्प्यात रु. ६०००/- द्यायचे ठरले आहेत.

त्यापैकी आधी म्हटल्याप्रमाणे आज मंगळवारी पहिल्या टप्प्यातील निधी तीला सुपुर्त करुन भाजी घेवुन दिली आहे.

नेहरु चौक, महात्मा फुले मंडई येथे ही उद्यापासुन भाजी विक्री करेल.

हे सर्व आपणांस कळविण्याचं कारण असं की या दोन्ही आज्यांना मदत करण्यासाठी सरकारी, बिगरसरकारी तसेच वैयक्तिक रित्या खुप हात पुढे आले.

आज त्यांच्याच मदतीने या आज्ज्यांची कायमस्वरुपी सोय झाली आहे.

मला म्हणजेच या भिक्षेक-यांना खरी मदत या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे !

खरंतर हे श्रेय या सर्व सहृदांचं, ज्यांनी मदत केलीय..!

लोक नेहमी माझं आणि मनिषाचं कौतुक करतात… पण ख-या कौतुकाचे धनी ही न दिसणारी पडद्या आडील मंडळी आहेत..!

माझा किंवा मनिषाचा रोल हा नाममात्र होता…

या मंडळींना सलाम करावा… किमान माझ्या होणाऱ्या कौतुकात त्यांना वाटेकरी करुन घ्यावं हा एक हेतु !

आणि या आज्ज्यांसाठी, नातवंडांसाठी काहीतरी करावं असं वाटतंय, पण काहीच करता येत नाही… असं वाटणाऱ्या खुप सहृदांचा जीव तीळतीळ तुटत होता… मला अक्षरशः रडुन या सर्वांचे फोन येत होते… त्या सर्वांपर्यंत आज्ज्या व या नातवंडांची खुशाली पोचावी, त्यांचाही जीव भांड्यात पडावा हा दुसरा हेतु..!

समाजात अजुनही माणुसकी टिकुन आहे, याचं हे जीवंत उदाहरण…

एके दिवशी देणा-याचे हातच घ्यावेत असं म्हणतात…

या हातांना आमचा सादर प्रणाम, आणि तुम्हां सर्वांतील माणसांना साष्टांग नमस्कार !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*