अभिजीत सोनवणे… आमचा बालमित्र!
याला आम्ही शाळेत असल्यापासुन बघतोय…
अभ्यास सोडुन हे पोरगं बाकी सगळ्यात हुशार…
वर्गात दंगामस्ती, उनाडक्या हे त्याचे आवडते छंद..!
पण त्याच्या या दंगामस्तीने आणि उनाडक्यांनी कुणाला त्रास नाही झाला… उलट फायदाच व्हायचा कुणाचातरी..!
गाणी म्हणणे, कविता करणे, काहीतरी लेखन करणं हे अगदी तेव्हापासुनच…
आम्ही वर्गात मास्तरांबरोबर टाळ कुटत बसलेले असु तर हे महाशय चार टाळकी घेवुन वर्गाबाहेर..!
आम्ही भुमितीचे फॉर्म्युले आणि सनावळ्या पाठ करायचो, त्यावेळी हा रस्त्यावरची भटकी कुत्री, डुकरं आणि गाढवं यांची कायम खाण्यापिण्याची काय व्यवस्था करता येईल का याचा विचार करायचा.
तसं म्हटलं तर हे “म्याडपणाचं” लक्षण…
आम्ही त्याला आभ्या म्हणायचो, कुणी आडनावावरुन त्याला सोन्या म्हणायचे..!
तर या आभ्याचा, केव्हा काय करेल याचा काहीच नेम नसायचा, याच्याबाबतीत बांधलेले सर्व अनुमान हा खोटे ठरवायचा!
आम्हाला वाटलं, आभ्या शाळा शिकणार नाही… पण शिकला..!
भले दहावीत नापास झाला पण नंतर ज्या विषयांत नापास झाला, त्याचविषयांत जिल्ह्यात “पयला” पण आला..!
याचे वडिल डॉक्टर… आता डॉक्टरचं पोरगं डॉक्टरच… पण आभ्या आयुष्यात डॉक्टर होवु शकत नाही हा आमचा ठाम विश्वास..!
पण त्याने आम्हाला चकवलं… तो डॉक्टर झाला…
म्हटलं ना… त्याचा काहीच नेम नाही..!
गाणी कवितात रमणारं… उनाडक्या करत बोंबलत फिरणारं हे पोरगं आयुष्यात पुढे काहीच करणार नाही, यावर आमचा दांडगा विश्वास..!
पण त्याने आम्हाला इथेही चकवलं… तो एका विदेशी कंपनीत महाराष्ट्र प्रमुख झाला…
म्हटलं ना… त्याचा काहीच नेम नाही..!
मी हुश्शार होतो ना… मी क्लास वन ऑफिसर झालो.
पण त्यावेळेला माझ्या तिप्पट याचा पगार… मला हेवा वाटायचा साल्याचा!
एक विदेशी कंपनी आसल्या म्याड लोकांना कशी बरं घेते..? माझ्यासारखी हुश्शार मंडळी असतांनाही..? जावु दे!
या मुर्खाने १० वर्षे नोकरी केली, आणि फट्कन् सोडली सुद्धा!
आयुष्याच्या एका वळणावर म्हणे याला भिक्षेक-यांनी मदत केली होती… आणि आता त्यांचं ऋण फेडायचं होतं याला…
पटलं ना म्याड आहे ते..!
त्यासाठी रस्त्यावर फिरुन मोफत वैद्यकीय सेवा देवुन भिक्षेक-यांचं पुनर्वसन करायचं म्हणत होता…
आम्ही म्हटलं, “येड लागलंय याला… याचा काहीच नेम नाही!”
आधी कुत्र्या डुकरांचा विचार करायचा आता भिका-यांचा..!
बरं हा एकटाच असा येडा असता तरी आमची हरकत नव्हती… पण याची बायको, मनिषा तीनं तरी शहाण्यासारखं वागावं ना?
“हो, आम्ही भिका-यांचे डॉक्टर म्हणुनच काम करणार आहोत…” असं मला ठणकावुन सांगीतलं…
मुर्ख लेकाचे ..!
बसा बोंबलत, आमच्या बापाचं काय जातंय..!
हे दोघे येडछाप लोकं उन्हातान्हात किमान ४० – ४५ किलोच्या बॅगा घेवुन भिका-यांत रस्त्यावर बसलेले असतात त्यावेळी मी मस्त AC मध्ये गरीबांसाठी काय योजना राबवता येतील याचा ऑफिसात गहन विचार करत असतो…
दिवसभर वडापाव किंवा एक मिसळ दोघांत खाऊन हे भिका-यांची सेवा करत असतात तेव्हा नुकताच मी लंच करुन पान खायला शतपावली करायला निघालेलो असतो…
येताना माझ्याही डोक्यात गरीबांसाठी काय करता येईल हा विचार असतोच… पण जेवण झाल्यावर आपल्याला एक डुलकी लागतेच बाबा… डुलकी झाल्यावर बघु मग चारच्या चहावेळी काही सुचतंय का..!
आपलं काम म्हणजे कसं परफेक्ट, व्यवस्थित वेळ घेवुन केलेलं, कागदावर सुवाच्च मांडलेलं… लॅपटॉपवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलेलं…
ह्या आभ्या आणि मनीसारख्या बेअक्कल लोकांसारखं नाही..!
रस्त्यावर या लोकांत बसत, त्यांची घाणेरडी तोंडं हुंगत… श्शी..!
मस्त पगार घ्यायचा, लाईफ एन्जॉय करायचं…
कसलं आलंय हे भिका-यांचं पुनर्वसन..? भिकार डोहाळे..!!!
करेलच की कुणीतरी… कुठं पळुन चाललेत ते? काय मरणार आहेत का उद्या? आणि गेले पळुन तर जावु दे नायतर मरुदे… हवेत कशाला हे..???
पण या साल्यांनी चकवलंच ना पुन्हा… म्हटलं ना याचा काही नेम नाही..!
मी बँकेत पैसे साठवत गेलो… यांनी पुण्य जमा केलं…
मी इन्क्रिमेंटच्या नादी लागलो… हे आशिर्वादाच्या…
मी पगाराचे आकडे मोजतो… ते दोघे धन्यवादाचे…
मी बँकेत बायकोच्या नावावर एफड्या करत गेलो… आणि इकडे मनिषाने भिका-यांसाठी अंगावरचं सोनं गहाण ठेवलं…
आयुष्याच्या भर रस्त्यावर आल्यावर मागं वळुन आता पाहतोय… मी काय कमावलं..?
कुजत चाललेला माझा पैसा… ज्याचा उपभोग घेण्यासाठीही मला वेळ नाही… पैसे कमावण्याच्या नादात तोंडाला आलेला फेस, प्रमोशन च्या नादाने दुखावलेले सहकारी, लोकांनी मोडलेली बोटं आणि पाठीमागे दिलेल्या शिव्या…
याचवेळी या दोघांच्या झोळीत काय होतं..?
सुरकुतलेल्या चेह-यावरचं हसु, त्याच सुरकुतलेल्या हातांनी दिलेले आशिर्वाद, निर्जीव डोळ्यात आलेला एक प्रखर आशावाद!
लटपटणा-या पायांची हे दोघे काठी झाले होते…
झिजलेल्या, म्हाता-या टाचांसाठी हे पायताण झाले होते…
डोळे गेलेल्यांचे हे नजर झाले होते…
अनाथ, पोरक्या भिका-यांचे हे “आईबाप” झाले होते..!
आभ्या, साल्या तु पुन्हा चकवलंस… तुझा खरंच काही नेम नाही… तु लई श्रीमंत झालास!
पैसा, हुशारी असुन मी भिकारीच राहीलो…
तु मागं राहुन जिंकलास… मी पुढं येवुन हरलो…
आणि हे कळायला आयुष्याची पंचेचाळीस वर्षे गेली रे..!
असो..!
भिका-यांत राहुन
माझ्या या दोस्ताचं आणि त्याची बायको मनिषा या दोघांचंही काम “मिलाप” नावाच्या संस्थेच्या सहकार्याने एका छोट्या व्हिडिओत आम्ही रेकॉर्ड केलंय आणि लिखित स्वरुपात दोघांविषयी एक स्टोरी मांडलीय…
भिका-यांच्या या “श्रीमंत” डॉक्टर पती पत्नीची भिक्षेक-यांसंदर्भात खुप मोठी स्वप्नं आहेत…
त्यांचं हे काम सध्या रस्त्यावरच चालतं… आणि रस्त्यात पडलेल्या भिक्षेक-यांसाठी त्यांना एक Shelter Home बांधायचंय…
पण नोकरी धंदा सोडलेल्या, एका छोट्या क्लिनिकच्या भरवशावर हातातोंडाची गाठ पडली तरी पुरे… अशा या भणंग माणसांची तेव्हढी ऐपत नाही..!
या कामी त्यांना काही आर्थिक मदत करु इच्छित असाल तर खालील डोनेशन लिंकवर क्लिक करुन आपण डोनेशन देवु शकतो.
आपल्याला शक्य नसेल तर इतरांना आवाहन करु शकतो..!
इतके दिवस आयुष्यं नुसतंच भोगलं… चला जमलं तर आता जगुया..!!!
अगदीच काही नाही तर या आभ्या उर्फ सोन्या उर्फ “भिक्षेक-यांच्या डॉक्टर” ला शुभेच्छा तरी देवु या…
“तु लढ बाप्पु, आम्ही आहोत पाठीमागे” असं म्हणायला, यांना पुढं ढकलायला पैसे पडत नाहीत…
चला ही पताका तरी हाती घेवुया… फडकवुया ..!!!
त्याचा नंबर आहे ९८२२२ ६७३५७ आणि ईमेल abhisoham17@gmail.com
आभ्या, माझ्या सोन्या… एक विनंती करु का रे..?
मी साठवलेले सगळे पैशे तुला घे रे… पण साल्या तुझ्या झोळीतला एकतरी… फक्त एकच आशिर्वाद मला देशील का रे..?
देना… यार..!
तु भिका-यांचा डॉक्टर ना रे..?
मी ही भिकारीच राहिलो बघ…
भिका-यांच्या सर्व इच्छा पुर्ण करतोस… माझी नाही करणार का रे..???
प्लिज..!!!
तुझाच
एक अभागी मित्र..!!!
Leave a Reply