हॅप्पी जर्नी..!!!

ओरिसातले हे एक बाबा..! यांच्याबद्दलही लिहिलं होतं..!

पायाने अधु होते, सरकारी आणि प्रायव्हेट मला जमेल त्या सर्व दवाखान्यातुन प्रयत्न करुन यांना उभं केलं..!

त्यांनीही वचन दिलं होतं… “मै पैडोंपे खडा हुँगा तो पक्का काम कडेगा…”

आज ती वेळ आली..!

महाबळेश्वर सारख्या ठिकाणी माझ्या मित्राच्या एका पॉश रेसॉर्टमध्ये यांची शेफ म्हणुन नियुक्ती करुन दिलेली आहे..!

आज भेटायला बोलावलेल्या ठिकाणी, सांगितलेल्या वेळी ते बरोब्बर हजर होते…

माझ्या बुलेटवर त्यांचं सामान, माझं सामान घेवुन, एका बाजुने त्यांना बसवलं… आणि थेट स्वारगेट गाठलं..!

महाबळेश्वरच्या एशियाड मध्ये बसवुन दिलं… कुठं उतरायचं, कुणाला भेटायचं सर्व लिहुन दिलं… वदवुन घेतलं…

कंडक्टर येईपर्यंत शेजारच्या सीटवर बसुन गप्पा मारता मारता, तिकिट आणि वाटेत काही खाण्यासाठी मी पैसे दिले..!

का कोण जाणे, हे पैसे घेतांना ते संकोचले..! त्यांनी हात मागे घेतले..!

गेली ३ वर्षे हे भीक मागत होते…

मी स्वतःहुन १००० देत असतांना… आज त्यांना संकोच का बरं वाटावा..??? हात का मागे जावेत..???

भिक्षेक-यापासुन पुन्हा कष्टकरी म्हणुन रुपांतर झाल्यामुळे हा संकोच निर्माण झाला असेल का?

हो..!

१००० घेताना त्यांचे हात लटपटले, मला याचा मनस्वी खुप आनंद झाला…

कारण आता आपण भिक्षेकरी नाही… कष्टकरी झाले आहोत, याचा त्यांनी मनापासुन स्विकार केला होता… आणि कष्टकरी कुणाच्या मिंध्यात रहात नाही, ही भावना त्यांच्यात जागृत झाली होती…

त्यांना वाटणारा हा संकोच म्हणजेच मी माझा… आणि आपणां सर्वांचा विजय… “जीत” समजतो..!

एक भिक्षेकरी आज मनानेही कष्टकरी झाला…

स्वत्वाची, आत्मसन्मानाची भावना त्यांच्यात निर्माण झाली, अजुन काय हवं..?

चेह-यावर ते दिसत होतं…

बळंबळं पैसे दिल्यावर कानाजवळ येवुन ते म्हणाले, “आजतक मेडे उपड किटना खडचा हुआ..?”

मी हसत हा प्रश्न टाळला… पण त्यांनी पिच्छा पुरवला…

शेवटी मी म्हटलं सगळे धरुन अंदाजे ३७००० रुपये “खडचा” झाला…

अक्षरशः किंचाळत ते बोलले, “ओ डी बाबा… सैत्त्तीस हज्जार रुप्पय्या..??? इतना खडचा..? मडने देते मुझे… क्या फडक पडता..???”

ते विचारमग्न झाले… चेहरा चिंताक्रांत झाला… मान खाली गेली…

हे सर्व पाहुन, मला यातही आनंदच वाटला…

दुस-याच्या पैशाची किंमत आणि त्याचं मुल्य कळायला सुरुवात झाली तर..!

भिक्षेक-याचा मुखवटा फेकुन, “माणसांत” येण्याचं हे दुसरं लक्षण..!!!

कोणत्याही भिक्षेक-याला तो भीक मागत असतांना दुस-यांच्या पैशाचे मोल कळत नाही..! यांना कळलं… कळायला लागलं होतं..!

ऍडमिट असलेला, बेशुद्ध असणारा पेशंट शुद्धीत येत असतांना, प्रत्येक डॉक्टरला मनापासुन आनंद होत असतो…

माझंही तसंच झालं होतं…

भिक्षेक-याचं आमुलाग्र रुपांतर माणसांत होत असतांना मी ही अनुभवत होतो…

एक “बेशुद्ध” व्यक्ती शुद्धीवर येत होती..!

कंडक्टर साहेब आले, मी जाण्यासाठी उठलो… शेवटच्या क्षणी, यांनी मागुन माझा शर्ट ओढला… इन केलेला शर्ट पुर्ण बाहेर आला… मी झर्रकन वळुन मागं पाहीलं…

या बाबांनी घट्ट पकडलेला शर्ट आणि डोळ्यांत पाणी..!

आईचा पदर धरणे म्हणजे काय आजपर्यंत पुस्तकांत वाचलं होतं… आज प्रत्यक्ष अनुभवलं…

खरंतर ते वयाने माझ्यापेक्षा मोठे… पण आज ते लहान झाले होते… भीक मागतांना माणुस निर्ढावतो, पण याच निर्ढावलेल्या डोळ्यात मी माया पाहिली, ममत्व पाहिलं..!

माझ्याकडे आशेनं पहात म्हणाले, “टुम आओगे ना उधड मिलनेको..? मै आपको…”

त्यांना खुप बोलायचं असावं .. पण शब्द ओठात राहीले… गाडी सुटली…

मी पाठमो-या गाडीकडे पहात राहिलो…

आणि एका खिडकीत मला टाटा करणारा एक हात हलत असलेला दिसला…

निःशब्द ..!!!

आता गाडीचा प्रवास सुरु झाला होता… भिक्षेक-याकडुन ते कष्टक-यापर्यंत… व्हाया… भिक्षेक-यांचा डॉक्टर..!!!

मी मनोमन टाटा करणा-या त्या हातांना सलाम करत म्हटलं, “हॅप्पी जर्नी मेरे दोस्त… बस्स दुवाओंमे याद रखना..!!!”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*