एक खेडेगांव… त्यात एक चिमणा आणि चिमणी रहायचे…
घर तसं शेणामेणाचं, काडीकाडीनं रचलेलं…
चिमणा चिमणी… बाहेर जायचे… पोटापुरतं कमवायचे…पुन्हा संध्याकाळी परत घरट्याकडे…
या चिमणा चिमणीच्या घरट्यात एके दिवशी एक चिमुकलं पिल्लु चिवचिवलं…
चिमणा अन् चिमणी दोघेही खुष होते…
पण… पण… या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाला मनगटापुढे हातच नव्हते..!
आता याला उडायला शिकवायचं कसं..? जगाच्या या बाजारात पिल्लाचा निभाव लागायचा कसा?
चिमणा चिमणी एकमेकांच्या गळ्यात पडुन खुप रडायचे…
शेजारी पाजारी, सख्खे सोयरे, पिल्लाला पाहुन कुत्सितपणे हसायचे, चिमणा चिमणीला चिडवायचे…
काहीवेळा कसं असतं ना..?
ज्या दिव्यांना वा-यापासुन, विझण्यापासुन, आपण बाजुला ओंजळ धरुन वाचवतो… त्याच दिव्याची ज्योत वा-यानं जरा भरकटली की आपली बोटं भाजायलाही कमी करत नाही…
हा वारा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली परिस्थिती!
काहीवेळा सख्खेही असेच वागतात… भरकटलेल्या दिव्यांसारखे!
आपण ओंजळीत पाणी घेवु शकतो, पण टिकवुन नाही धरु शकत…
नातीही तशीच… म्हटलं तर आपल्या ओंजळीतच असतात, पण आपली आपली म्हणत असतांनाच बोटांच्या सांदीतुन कधी घरंगळुन जातात ते कळतच नाही,
आणि शेवटी उरतो फक्त ओलसरपणा… नावापुरता!
पिल्लाला वाढवत असतांनाच चिमण्याच्या किडन्या खराब झाल्या… डोळ्यादेखत एकदिवस चिमणा रातोरात सगळ्यांना सोडुन निघुन गेला…
मागं उरली एक असहाय चिमणी… आणि तीचं हातच नसलेलं पिल्लु..!
चिमणी आपल्या परीनं, पिल्लाचा सांभाळ करायची… दोघांचं पोट भरायची…
पण पोट भरलं तरी काळीज भरत नाही… काळीज भरायला सुखाचे दोन शब्दच लागतात…
मापानं लिटरभर दुध मोजुन घेतलं तरी, पळीभर वर जे मिळतं, त्यात जास्त समाधान..!
भाजीच्या चार पेंढ्या विकत घेवुनही, भाजीवाल्यानं कोतमिरीच्या नाहितर कढीपत्त्याच्या वर टाकलेल्या चार काड्यांचं कवतिक जास्त असतं..!
चिमणी, चिमण्याच्या आधाराशिवाय एकाकी झाली…
मधल्या काळात तीला टि.बी. झाला… पिल्लु लहानच… जीव जाईपर्यंत खोकतांना आईकडे नुसतं कासावीस होवुन पहात राहायचं… भेदरुन जायचं… पदराखाली गप गप पडुन रहायचं..!
काय एकेकांचं नशीब असतं ना?
तळहातावरल्या रेषा म्हणे नशीब सांगतात…
या पिल्लाला तर तळहातच नव्हते…
एके दिवशी तर खोकता खोकता चिमणीही न सांगता निघुन गेली… आणि शेणामेणाच्या त्या घरात हे पिल्लु एकटंच उरलं… आभाळातुन आई परत येईल या आशेवर..!
आजपावेतो या पिल्लाचे डोळे पुसायला चिमणा चिमणी होते… आता मात्र डोळे पुसायला ना चिमणा ना चिमणी,… आणि ना स्वतःचे हात!
स्वतःचे डोळे पुसायला स्वतःचे हातही नसावेत, यापेक्षा दुर्दैव काय वेगळं असतं..?
अशात स्वतःच्या जिद्दीवर १२ वी पर्यंतचं शिक्षण घेतलं…
एके दिवशी पिल्लु उठलं… जगण्यासाठी मुंबई गाठली…
लोकांकडे काम मागीतलं… तुटक्या हातांकडे पाहुन सगळ्यांनी थट्टा केली…
होते कुरुप वेडे “पिल्लु” तयांत एक..!
हाताच्या या व्यंगानं लोकांनी त्याला पुरतं बेजार केलं…
उशीत तोंड खुपसुन, रडता रडता पिल्लु; नसलेल्या हातांकडे पहात राहायचं…
माणुस किती इच्छा बाळगुन असतो ना? जिवंतपणी तर इच्छा असतातच, पण माणुस मेल्यावरही स्वर्ग मागतो..!
या पिल्लानं देवाकडे फक्त हात मागितले होते… पण ती ही इच्छा अपुर्णच..!
शेवटी या पिल्लानं, मनगटापुढे नसलेल्या आपल्या हातांनाच ताकद द्यायचं ठरवलं…
रात्र रात्र धुमसत रहायचा… पेन आणि कागद घेवुन…
आधी मनगटानं लिहायला शिकला… मग त्यात तरबेज झाला.
आता कोणत्याही हात असणाऱ्या व्यक्तीपेक्षा तो वेगानं लिहु शकतो…
अर्थात् आयुष्यात वेग नाही, दिशा महत्वाची असते… आणि तीच तर इथं हरवली होती..!
यानंतर या पिल्लानं, मनगटानं चित्रं काढायला सुरुवात केली…
बघता बघता तो उत्तम चित्रकार झाला… त्याने काढलेली चित्रं पाहुन कुणाचा विश्वास बसत नाही, की हि चित्रं एका हात नसलेल्या परमेश्वरी कारागीराची आहेत…
चित्रांचीही गंमत असते… मनासारखं झालं तर “तसवीर” नाहीच झालं तर “तकदिर” काय करणार? सगळंच बेभरवशाचं ..!
निसर्गानं या चित्रकाराच्या डोळ्यात रंग भरले होते, पण हात काढुन घेतले होते… केव्हढी थट्टा!
तरी या बहाद्दरानं ते ही साध्य करुन दाखवलं..!
यानंतरही, स्वतःला जोखण्यासाठी तो भांडी घासायला शिकला, कपडे धुवायला शिकला, झेरॉक्स काढायला शिकला, ऑफिसात आवश्यक असणारी सर्व कौशल्ये शिकला, आणखीही बरंच काही…
कारण जगाच्या बाजारात त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं…
पण, जगाच्या बाजारात याला कुणी किंमत दिली नाही.
प्रत्येकाने या पिल्लाला वापरुन शेवटी तुटलेल्या चपलीगत उकिरड्यात फेकलं… उसाच्या चोयटीगत रस काढुन चोथा म्हणुन गटारात टाकलं..!
शेवटी आयुष्याला कंटाळुन सर्व मार्ग थकल्यावर बांद्रा पुर्व येथील रेल्वे स्टेशनबाहेर भीक मागण्याचा याने मार्ग (?) पत्करला…
खरंच, एक भिक्षेकरी तयार व्हायला इथं जबाबदार कोण..?
भीक मागता मागता हे पिल्लु आपल्या नसलेल्या हातांकडे पहायचं… मनातल्या मनात त्याच्यातलं चित्रकार मन आपल्या मनगटापुढे हात जोडायचं..!
भीक मागतांना त्याच्यातला चित्रकार आभाळाकडं पहायचा आणि ढगांच्या चित्रात त्याला त्याचा गेलेला हताश चिमणा दिसायचा… आणि बाजुलाच खोकणारी त्याची ती चिमणी..!
दोघांनाही आभाळात हा पहात रहायचा… आणि ते आभाळातुन याच्याकडे… दोघेही असहाय..!
तीन वर्षे याने स्टेशनबाहेर भीक मागीतली आणि कसाबसा जगला..!
एके दिवशी हेमंत भोये, या माझ्याच विचारानं प्रेरीत झालेल्या माझ्या मित्रानं त्याला स्टेशनवर भीक मागताना पाहीलं आणि या पिल्लाच्या मनात आशेचा एक दिप पेटवला!
आम्ही एकमेकांबरोबर चर्चा करत पिल्लाच्या भविष्याचा आराखडा मांडायला सुरुवात केली…
आणि बघता बघता, या पिल्लाचा कायापालट झाला…
भिक्षेकरी ते कष्टकरी हा प्रवास सुरु झाला..!
आज हे पिल्लु २९ वर्षाचं तरुण युवक आहे…
याच्या चित्रकलेचं प्रदर्शन पुण्यात भरवणार आहोत, जेणेकरुन, ज्यांनी याला हात तुटका म्हणुन झिडकारलं त्यांना या हातांची किंमत कळावी, मुल्य कळावं..!
आता याला भीक मागणं सोडायला लावलंय, विरार ला एका ठिकाणी आश्रीत म्हणुन हा राहतोय..! पण खाण्या पिण्याची भ्रांत आहेच!
फोनवर त्याच्याशी या विषयावर बोलतांना त्याचाही गळा दाटुन येतो आणि माझाही…
काल फोनवर त्याच्याशी बोलता बोलता, सहज लक्ष गेलं… बाजुला रस्त्यावर दोन पक्षी बसलेले दिसले…
मला आश्चर्य वाटलं… आमच्या पिल्लाचं पुढं काय झालं हे पहायला आभाळातनं ते चिमणा चिमणी तर उतरले नसतील जमिनीवर..?
फिरुन पुन्हा जन्म घेवुन तेच तर आले नसतील..? हात नसलेल्या त्यांच्या पिल्लासाठी..!!!
आमच्या या पिल्लाला आता भीक नकोय… ऑफिसबॉय, शिपाई अथवा तत्सम काही काम हवंय मुंबईत..!
एक हात मी दिलाय… दुसरा हात तुमचा द्याल का..???
आम्ही वाट पाहतोय…
आम्ही म्हणजे… मी, ते पिल्लु आणि आभाळातले चिमणा चिमणी..!!!
Leave a Reply