भीक नको बाई शीक..!!!

आपणांस हे माहितीच आहे की मी नी मनिषा आम्ही वृद्ध भिक्षेक-यांसाठी काम करत आहोत.

वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच त्यांना या ही वयात पायावर उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला ते प्रतिसाद देत आहेत, हे आमचंच नशीब!

पण इतकं करुनही आम्ही समाधानी नाही आहोत, त्याचं कारण म्हणजे, भिकेच्या धंद्यात दरडोई (per person) उत्पन्न असतं.

म्हणजे एका व्यक्तीला रोज १०० रु. सरासरी भीक मिळत असेल तर त्याच्याच घरातल्या इतर चार जणांना तो घेवुन आला तर ही भीक एका घरात १०० रुपये प्रत्येकी धरुन ५ जणांसाठी ५०० रु होते. (एका घरातले जेव्हढे जास्त लोक भीक मागतील, तितकंच उत्पन्न जास्त…)

म्हणजे आपल्या घरातले जेव्हढे जास्त लोक, तेव्हढी भीक जास्त…

खरंतर ही परिस्थिती चांगली नाही..!

फुकट मिळणाऱ्या भिकेमुळं, चांगले चांगले लोक सुद्धा भीक मागणे याकडे व्यवसाय म्हणुन पाहतात आणि भीक मागतात, यातुन खरे गरजु बाजुला राहतात आणि Professional भिकारी तयार होतात. (आपण ते तयार करतो…)

काही लोकांनी तर, पैसे जास्त मिळावेत म्हणुन आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेतनं काढुन भीक मागायला लावलंय, जेणेकरुन घरात पैसे जास्त येतील.

तेव्हा मायबापहो, मुलांना बघुन तुम्हाला कितीही वाईट वाटलं तरी भीक देवु नका…

कारण तुम्हाला दया येवुन जेव्हढी जास्त भीक द्याल, तेव्हढी जास्त निष्पाप मुलं यात ओढली जाणार आहेत. (आपण काय करतोय, याचा आपल्या पुढील आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, हे त्या बिचाऱ्या लहानग्यांना कळत नाही, कळायचं त्यांचं वयही नाही…)

लहानपणी शाळा कुणालाच नको असते… मस्त रस्त्यात हुंदडायचं, पैसे मिळतात, खाऊ मिळतो यात ही पोरं खुष असतात..! म्हणुन हे स्वच्छंदी Life ते Enjoy करत असतात..!

मला हे संपवायचं आहे, तुमच्या साथीनं…

अन्यथा आपली भावी पिढी भीक मागतांना दिसेल…

यावर मी आणि मनिषाने *भीक नको बाई शिक…* हा नविन प्रकल्प सुरु करायचे ठरवले आहे :

  • भिक्षेक-यांबरोबर आमची जी नाती तयार झालीत, त्या बळावर आम्ही भिक्षेक-यांच्या पाया पडुन, मुलांना भीक मागण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत.
  • भिक्षेक-यांच्या ज्या मुलामुलींनी शाळा सोडली आहे त्यांना परत शाळेत घालणार आहोत. (Re admission to school dropout children)
  • भिक्षेक-यांची ही मुलं सज्ञान होईपर्यंत अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत त्यांच्या शाळा कॉलेजची फी भरणार आहोत.
  • युनिफॉर्म, वह्या पुस्तकांपासुन, दुपारच्या जेवणाच्या डब्यापर्यंत काळजी घेणार आहोत.
  • या सर्व प्रकल्पांत मुलींवर जास्त फोकस करणार आहोत… (“भीक नको बाई शिक…” ही संकल्पना इथुनच जन्माला आली..! )

कारण, एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती सुधारते … पण एक मुलगी शिकली तर एक कुटुंब सुधारते यावर आमचा विश्वास आहे!

  • रोजच्या कामात हे वाढीव काम करण्यासाठी… खरंतर आम्हाला स्वतःला अजुन पिळुन घ्यावं लागणार आहे.

पण हरकत नाही… सोहमच्या वयाच्या मुलांना भिकेपासुन परावृत्त करण्यासाठी आम्ही स्वतःला उसाच्या चरख्यात पिळुन घ्यायला तयार आहोत..!

रस गोड निघाला तर कुणाची तरी तृष्णा तरी भागवेल..!

आजची भीक मागणारी ही लहान पोरं उद्या शिकुन मोठ्ठी होतील, तेव्हा आमच्या हातात काठ्या असतील, तोंडात कदाचीत दातही नसतील, कदाचीत डोळ्यांना ओळखु येणार नाहीत आम्हाला ते, कदाचित म्हातारपणामुळं बोलुही शकत नसु आम्ही… कदाचीत आम्ही जिवंत नसुही… पण…

पण… ही आम्ही तयार केलेली पिल्लं असतील… निधड्या छातीनं वावरणारी, ज्या प्रत्येकात आम्हांला सोहमच दिसेल..!

या सर्व प्रकल्पाची आयडियाची कल्पना डॉ. मनिषा हीची..! या संपुर्ण प्रकल्पाची प्रमुख तीच असणार आहे..!!!

तुम्ही आता आमच्यासाठी एव्हढंच करायचं,..

भीक द्यायचीच नाही कुणाला…

आणि जिथं पोरं भीक मागतांना दिसतील, तीथं जमलं तर थांबुन त्यांच्या पालकांशी बोला…

ते तयार असतील पोरांना शिकवण्यासाठी तर आम्हाला कळवा…

आम्ही पुर्ण जबाबदारी निभावण्याचा आयुष्यंभर प्रयत्न करु…

मला त्यासाठी स्वतःला विकुन घ्यावं लागलं तरी मग बेहत्तर..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*