ती..!!!

भिक्षेक-यांसाठी आमचं चालु असलेलं हे काम – शेवटी त्यांनी आत्मनिर्भर व्हावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं, सन्मानानं जगावं याभोवतीच फिरत आहे.

डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर आम्ही विचारतो, “बाबा / आज्ज्जी… आता दिसायला लागलंय बसुन काही काम कराल का? भांडवल आम्ही घालु..!”

कुणाला कृत्रिम पाय बसवला तर आमचा तोच प्रश्न, “आता चालायला यायला लागलंय, बसुन काही काम कराल का? भांडवल आम्ही घालु..!”

कुठलं आजारपण बरं केलं की शेवटी पुन्हा आमचा तोच ठरलेला प्रश्न…

कुणाला काठी, वॉल्कर, कुबड्या, व्हिलचेअर दिली तरी आमचा आपला हात जोडुन तोच प्रश्न, “काम कराल का…? आम्ही मदत करु तुमच्या कामात!”

एकुण काय, आम्ही जे काही करतोय भिक्षेक-यांसाठी, त्या सर्वाचं अंतिम ध्येय हेच, की त्यांनी काम करावं..!

अर्थात् “आम्ही मदत करु” हे वाक्य बोलतांना इथे “आम्ही” म्हणजे मी आणि मनिषा हे अभिप्रेत नसतं… या “आम्ही” मध्ये आपण आहातच..!

कारण, आपण सर्वजण आम्हाला जमेल त्या स्वरुपात आणि आर्थिक रुपात मदत करता आहात… “आम्ही” या शब्दांत “आपणां सर्वांनाच” मी गृहित धरतो… कारण तुम्हां सर्वांशिवाय मी आणि मनिषा भला मोठा शुन्य आहोत..!

जेव्हा माझ्या तोंडी “आम्ही” हा शब्द येतो… त्या “आम्ही” शब्दांत “आपण” आहातच..!

तर, आमच्या या प्रश्नानंतर बरेच लोक ऐकुन न ऐकल्यासारखं करतात…

आणि काही लोक या प्रश्नाला आम्हाला प्रतिसादही देतात…

इथं कुठलीही जोरजबरदस्ती / सक्ती नाही.

वस्तु दिलेत, तुमच्यासाठी इतकं केलंय आम्ही, आता काम करावंच लागेल तुम्हाला, हे असं भावनिक ब्लॅकमेल नाही…

जे असेल ते प्रेमानं, हात जोडुन, त्यांच्या मर्जीनं..!

मला एक कळलंय, प्रेमानं, हात जोडुन गोष्टी साध्य होतात, वेळ लागतो जरा, पण जे साध्य होतं ते कायम टिकतं…

जबरदस्तीने गोष्टी झट्कन् साध्य होतात, पण त्या टिकत नाहीत..!

तर आमच्या या हात जोडण्याला, पाया पडण्याला डावलुन जाणारेही आहेत.

काय उपकार नाय करत वो तुमी असं म्हणणारेही आहेत.

एखादवेळेला मनाविरुद्ध काही घडलं तर तोंडावर शब्दशः थुंकणारेही भेटतात.

आईवरनं शिव्या देणारेही भेटतात..!

आम्ही नाही लक्षात ठेवत यांना..!

काहीजण मात्र आमचे जोडलेले हात हात घेतात, डोळ्यात पाणी घेवुन, छातीवर डोकं ठेवतात…

यांना काय बोलावं सुचत नसतं… “ल्येकरा” म्हणत एखादा हुंदका मात्र सुटतो…

हे हुंदके मात्र कायम लक्षात ठेवतो आम्ही..!

कुणाच्यातरी हृदयातनं आलेला हा हुंकार आम्हाला ओमकाराप्रमाणेच भासतो!

काही लोक मग काम करायला तयारही होतात… आणि म्हणतात, “करु रं ल्येकरा काम … पण… पण…?”

पण..!

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात येणारा हा पण… दोनच अक्षरांचा हा शब्द: “पण..!”

हा दोन अक्षरी शब्द मात्र भल्याभल्यांची वाट लावतो…

आणि या “पण” ला हरवण्यासाठी आमचा चालु होतो प्रवास…

भिक्षेक-यांच्या वाटेत येणारा प्रत्येक “पण” मोडुन काढणे, एव्हढंच आमचं काम..!

तर, अशाच एका अपंग व्यक्तीने खुप महिन्यांपुर्वी मला व्हिलचेअर मागितली होती…

अर्थातच मी विचारलं, “व्हिलचेअर देतो, काम कराल..?”

आणि मग सुरु होतो, “पण” चा खेळ..!

पण मी अपंग, काम काय करणार?”

“अहो काका, व्हिलचेअरवर बसुन वस्तु विका!”

पण, लोकं घेतील का माझ्याकडनं..?”

“का तुम्हाला काय कुष्ठरोग झालाय, वस्तु न घ्यायला?”

पण भांडवल कोण घालील?”

“मी घालेन…”

पण रस्त्यावर आसं व्हिलचेअर वर बसुन विकताना पोलीस / कार्पोरेशन यांनी काई त्रास दिला तर?”

“पुढचं पुढं बघु, सध्या सुरु तरी करा…”

पण जमंल का मला?”

“मी आहे ना सोबत…”

पण तुमी काय रोज येनार हाय का माज्यासंगट?”

“तुम्ही म्हणालात तर सुरुवातीला येईन सुद्धा, बघु सुरुवात तरी करा…”

“तुम्ही व्हिलचेअरवर वस्तु विकायच्या म्हनता, पण उनाचं पावसाचं काय करायचं…?”

“तुमच्या व्हिलचेअर ला रिक्षाला असतं तसं छप्पर (Hood) लावुन घेवु…”

पण सामान कुटं ठेवायचं?”

“व्हिलचेअरला आजुबाजुला लोखंडी रॅक करु… या रॅकलाच हुक मारुन घेवु, वस्तु अडकवण्यासाठी.”

पण कोण करंल एव्हढं…? मला न्हाय जमायचं…”

“म्हटलं ना मी करेन काका…”

हुश्श..!

काकांच्या सगळ्या “पण” ला “औषधं” शोधली आणि मला हवी होती तशी गाडी दिली त्यांना एकदाची…

माझ्याकडे तेव्हा जास्त पैसे नव्हते, म्हणुन एक सेकंड हँड व्हिलचेअर घेतली होती, लोखंडी काम करणा-या वर्कशॉपवाल्यांकडुन छप्पर करुन घेतलं, बाजुला रॉड लावले, आतमध्ये हुक लावले… आणि तयार झाला एक मस्त “रथ!”

हो माझ्यासाठी रथच तो!

बीन मुकुटाचा माझा एक भिक्षेकरी, कष्टकरी होणार… राजा होणार!

या रथाला पाहुन रस्त्यावरची प्रजा या रथावर काही फुलं उधळणार नाही…

पण आम्ही मात्र मनातल्या मनात निश्चित रथाला नक्कीच प्रणाम करु…

कारण भिक्षेकरी ते कष्टकरी या प्रवासातला हा रथच तर या काकांचा जोडीदार असणार आहे!

तर, गेल्या दोन वर्षांपासुन हे काका अविरत काम करतात या व्हिलचेअर वर बसुन …

सायकल कॉलनी, रास्ता पेठ, पुणे” इथे आमचा हा रथ उभा असतो!

काका, किरकोळ ब-याच गोष्टी विकतात या व्हिलचेअरवर बसुन…

परवा मला एका मावशीने ५० बिस्किटचे पुडे भिक्षेक-यांना वाटण्यासाठी दिले…

यातलेच काही पुडे मी काकांना विकायला ठेवण्यासाठी आज देवुन आलो.

काका खुष होते..!

मी म्हटलं, “काका, व्यवस्थित ना? काही अडचण नाही ना?”

“आता ही बिस्किटं विका… १० रु. छापील किंमत आहे… पुढल्या आठवड्यात अजुन आणतो!”

ते म्हणाले, “सगळं येवस्तीशीर हाय, पण आपला ह्यो रथ कुरकुरायला लागलाय…”

पुन्हा आलाच का हा “पण..?”

पण, यावेळी या “पण” मध्ये विशेष दम नव्हता..!

मी पाहीलं… सेकंडहँड व्हिलचेअर ती…
खुप साथ दिली “तीने”, आता मात्र खरंच “बुजुर्ग” झाली होती… एका जागी स्वस्थ बसुन आराम करण्याची “तीची” ही वेळ आली…

ही सायकल मोडकळीस आली, फेकुन द्यावी, असं खरंच म्हणवत नाही…

जीनं एखाद्या अपंगाला साथ दिली, उभं रहायला मदत केली, मेलेल्या मनाला जगायला शिकवलं… ती सायकल मोडकळीस कशी येईल?

“ती” नंच तर मोडकळीला आलेलं एका जीवाचं आयुष्य सावरलं… आईप्रमाणे!

निर्जीव असुनही “ती” ख-या अर्थानं जगली..!

“ती” ला आता म्हातारपणात फेकुन देण्याचा नमकहरामपणा मी कसा करु?

काम झाल्यावर आईबापाला हाकलुन देणारे आणि काम झाल्यावर व्हिलचेअर फेकुन देणारा मी…

मग दोघांत काय फरक राहीला…?

जपुन ठेवु आम्ही तीच्याही स्मृती..!

काकांच्या या “पण” चं उत्तर देताना म्हटलं…

पुढच्या पंधरा दिवसात नविन व्हिलचेअर घेवुन बनवायला टाकु…

पण हिचं काय करायचं…?” तीच्या हँडलवर हात ठेवत ते खालमानेनं बोलले..!

“हिला जपुन ठेवायचं…”

पण कुठं…?”

“तुमच्या आणि माझ्या मनात काका..!”

“ती” आपल्यासाठी उन्हातान्हात गरागरा फिरली…

“ती” आपल्याला हवी तशी सजली…

आपण तीच्यावर ठेवलेलं प्रत्येक ओझं, “ती” नं अलंकार म्हणुन स्विकारला…

समाजानं टाकुन दिलेल्या एका भिक्षेक-याला, रात न् दिस “ती” पोटाशी घेवुन फिरली…

तुमच्या सा-या कळा “ती” नं सोसल्या… भोगल्या…

“ती” तुमची मायच झाली..!

काकांचे डोळे पाणावले…

मी बोलता बोलता व्हिलचेअर च्या हँडलवर हात ठेवला…

म्हात्ता-या झालेल्या आईचा सुरकुतलेला, थकला भागला हात मी हाती घेतलाय असाच मला भास झाला त्यावेळी…

घासलेले, झिजुन गेलेले टायर पाहुन मला “ती” च्या फुटलेल्या टाचांची आठवण आली…

“ती” च्या आठवणीतच गाडीला किक मारुन मी निघालो…

कानावर “ती” चे शब्द आले, “जपुन जा रं बाळा..!”

मी चमकुन मागं पाहिलं…

मागं काकांशिवाय कुणीच नव्हतं…

मग कोण बोललं असावं हे???

मी नीट पाहिलं…

झिजुन गेलेली, जीर्ण झालेली, सुरकुत्या पडलेली, निष्प्राण डोळ्यांनी पहात असलेली, टायर झिजलेली खुद्द “ती”, “ती” च उभी होती तीथं, मान टाकुन!

निर्जीव असुनही आईपण मिरवलं “ती”नं, शेवटपर्यंत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*