आपण हे जाणताच की, भिक्षेक-यांच्या डोळ्यांच्या तपासण्या व ऑपरेशन आमच्या माध्यमातुन आणि आपल्या सहकार्यातुन करीत आहोत.
आज सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की, मागील दिड वर्षांत आजपावेतो २०० भिक्षेकरी आजी आजोबांना ऑपरेशन च्या सहाय्याने आपण सर्वजण मिळुन दृष्टी देवु शकलो.
१०० लोकांना, त्यांना आवडतील अशा फ्रेमचे चष्मे दिले आहेत.
किमान ३०० आजीआजोबांना दिसण्यासाठी आवश्यक अशा औषधी दिल्या आहेत.
६०० भिक्षेकरी आजीआजोबा आज स्वच्छ नजरेने जग पाहताहेत, त्यापैकी काही काम करताहेत.
६०० आकडा गाठतांना दमछाक नक्कीच झाली, पण आपल्या सहयोगामुळे कुठेही कसलाही त्रास जाणवला नाही!
मी आणि मनिषा ऋणी आहोत आपले !
यापुढच्या टप्प्याचा विचार करताना असं जाणवलं की, वैद्यकीय क्षेत्रात, विशेषतः डोळ्यांच्या बाबतीत खुप नविन मशीन्स आली आहेत, खुप उच्चतम तंत्रज्ञान विकसीत झालं आहे, हे तंत्रज्ञान महाग आहे पण तरीही भिक्षेकरी आजीआजोबांना त्याचाही लाभ आपणांस देता यावा, हे खुप दिवस मनात होतं.
पण आर्थिक बाबींचा विचार करता आवाक्यात येत नव्हतं.
या पार्श्वभुमीवर सांगायला आनंद होतोय की आपणां सर्वांना माहित असलेली, १०० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारी रेडक्रॉस सोसायटी या संस्थेने आपल्याला या कामी हात द्यायचं ठरवलं आहे !
सर्व उच्चतम आणि डोळ्यांच्या क्षेत्रांतलं प्रगत झालेलं तंत्रज्ञान या संस्थेनं माझ्या या भिक्षेक-यांसाठी खुलं करायचं ठरवलं आहे.
सेवाभावी कार्य म्हणुन या सुविधा अल्प दरात रेडक्रॉस सोसायटी ने भिक्षेक-यांना अर्पण करायचे ठरवले आहे.
आज १७ एप्रिल, माझा जन्मदिवस !
व्यावहारिक दृष्ट्या मी तो पाळत नाही, तरीही आजच्या दिवशी एक जगप्रसिद्ध संस्था आपल्या सेवा भिक्षेक-यांसाठी आजपासुन खुल्या करीत आहे, आपलं औदार्य दाखवत आहे, माझ्यासारख्या “भिका-यांच्या डॉक्टर” वर मनापासुन विश्वास ठेवत आहे, यापेक्षा मोठं आणि मानाचं गिफ्ट माझ्यासाठी काय असु शकतं ?
चांगल्या कामाला मुळीच वेळ नको म्हणुन, लगेचच उद्या चिंचवड येथुन १० आज्ज्यांना या तपासण्यांसाठी घेवुन जावुन या प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहोत.
उद्या सकाळी १० वाजता आम्ही मोरया गोसावी गणपती मंदिरापासुन १० आज्ज्यांची ने आण करण्यासाठी, गाडीत बसवुन देण्यासाठी हजर असणारच आहोत.
आज्ज्यांसाठी भातंब्रेकर या वडिलधा-या सहृदांनी १७ सीटर गाडी ठरवली आहे. यासोबत महेश म्हैंदरकर हे माझे मित्र गाडी घेवुन स्वतःही उपस्थित असणार आहेत, यांचे आभार मानुन ऋणातुन मुक्त व्हायचं नाही मला !
आज्ज्यांना रिक्षा /बस ने पाठवा असे खुप सल्ले मिळाले… पण या उन्हातान्हात रिक्षा / बस ने कँपात येता येता या माझ्या म्हाता-या माणसांची दमछाक झाली असती, बरं त्यांनी कँप एरिया उभ्या जन्मात पाहिलेला नाही, या माझ्या विचारांच्या पार्श्वभुमीवर भातंब्रेकर बाबा अथवा म्हैंदरकर साहेबांनी केलेली गाडीची सोय खुप मोलाची आहे !
{## १० आज्ज्या सोडुन गाडीतील उर्वरीत ७ जागा रिकाम्या आहेत, कुणाला आज्ज्यांना भेटायचं असेल, संवाद साधायचा असेल, हजर राहुन प्रत्यक्ष सेवा या स्वरुपात मदत करायची असेल, तरी आपले स्वागत आहे ( “क्काय डॉक्टर, अहो आधी सांगायचं ना, आम्ही आलो असतो की मदत करायला!” अशांसाठी या डिटेल्स!!!)##}
रेडक्रॉस सोसायटी, दुसरा मजला, कॅनरा बँकेच्यावर, बुधानी वेफर्स समोर, एम. जी. रोड, पुणे कँप, पुणे
या पत्त्यावर आम्ही सर्वचजण १ वाजेपर्यंत असु…!
आणखी एक पाऊल पुढे सरकायला आम्हाला मदत केल्याबद्दल मी रेडक्रॉस सोसायटी च्या पदाधिका-यांना मनापासुन अभिवादन करतो, आणि आपणां सर्वांनाही प्रणाम !
Leave a Reply