सेवाव्रती डॉक्टर

डॉ. मनिषा सोनवणे, यांना काव्यमित्र या राष्ट्रीय संस्थेतर्फे सेवाव्रती डॉक्टर हा पुरस्कार जाहिर झाला.

या पुरस्काराच्या वतीने एक सांगावंसं वाटतं, समाजासाठी कुणीतरी काम करत असतं, आणि समाज या लोकांच्या पाठीवर हात ठेवत असतो..! निःशब्द दाद देत असतो…

माझ्या दृष्टीकोनातुन दोघेही मोठे असतात…

एखादा गायक अत्यंत कष्टाने कमावलेल्या गळ्यातुन, गातांना एखादी जागा घेतो, तान घेतो, मुरकी घेतो… हे त्या कलाकाराचं कसब!

याच तान आणि मुरकीवर प्रेक्षकांतुन झट्कन्, “व्वाह क्या बात है… शाब्बास रे पठ्ठ्या…” अशी दाद मिळते..!

अवघड तान घेणारा गायक निर्विवाद मोठा असतोच, पण ही अवघड तान घेतलीये, इथे दाद द्यायची आहे हे प्रेक्षकांतुन बसुन ओळखणाराही तितकाच मोठा असतो..!

गातांना अवघड तान घेणं यासाठी मेहनत लागते, आणि अवघड तान घेतलीये हे ओळखण्यासाठीही मेहनत असतेच ना..!

गायक गीत गातो… रसिक दाद देतो..!

गायक गळ्यातुन गात असतो… दाद हृदयातुन येते..!

गाणं शब्दांच्या माध्यमातुन रसिकांपर्यंत पोचतं…
रसिक निःशब्द व्यक्त होत असतो… गायकाचे शब्द जेव्हढे इथं परिणामकारक तितकीच ही निःशब्दता ही भेदक असते..!

सासरी असणाऱ्या पोरीला बाप भेटाया जातो, आणि पोरीला विचारतो, “बाळा कशी आहेस..?”

पोरगी उत्तरादाखल पदराशी चाळा करते, उजव्या पायाच्या अंगठ्याने जमिन कुरतडत, एकदा बापाकडे बघते, मग जमिनीकडं बघते आणि हळुच स्वयंपाकघरात जाते… ही निःशब्दता बापाला सारं काही सांगुन जाते…

पोरीचं हे निःशब्द गाणं फक्त एक बापच समजु शकतो..!

आम्हीही गाणं गातोय… पण तुमची निःशब्द दाद मिळाली की ती कविता होते… निःशब्द!

पुरस्काराच्या निमित्तानं तुमच्याकडनं अशीच मिळालेली ही निःशब्द दाद…

हिच आमची कविता… हेच आमचं गाणं..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*