गाठ..!!!

असंच एक नेहमीचं मंदिर… पुर्वी ही इथं भीक मागायची, आता तीला फुलं विकायला लावलीत.

आता ती भीक नाही मागत, फुलंच विकते!

फुलांचीही गंमत असते… जोवर ताजी असतात तोपर्यंत सुगंध देतात, सुकली की कुणी ढुंकुनही पहात नाही… जळुन गेली की राख होते… या राखेला ना सौंदर्य ना सुवास..!

आयुष्याचंही असंच… उमेद आहे तोपर्यंतच सारं काही..!

असो!

तर, ही आजी फुलं विकते, स्वभावानं मिश्किल..!

आम्ही एकमेकांना भेटलो कि एकमेकांची थट्टा करतो… खुप हसतो एकमेकांवर…

मी तीला म्हणतो, “म्हातारे, उन्हाळा लय वाढलाय ना…?”

“का? मला बघुन उन्हाळ्याची का आटवन आली डाक्टर?”

“आगं मागल्या वेळेपेक्षा आजुन काळी पडलीस, म्हणुन म्हटलं…”

यावर ती खुल्या दिलानं हसते…

पण उत्तरही देते…

“डाक्टर, तुमचा काळा बुट लय भारी हाय बरं का…”

“का गं? एकदम बुट कसा आठवला तुला…?”

“आवो, आत्ता तुमाला काळा बुट शोभतो, आपल्या रंगाची वस्तु आपल्याला शोभती… न्हाय का…?”

पदराआड खुसुखुसु हसत, कसा टोला लगावला या आनंदात ती असते…

मी पण तीचा हा टोला हसत स्विकारतो…

तीच्या टॅलेंटेड जोकवर म्हातारे, “लय हुशार तु” म्हणत टाळी देतो…

एक दिलं तर एक घ्यावंही ही लागतं..! या देण्या अन् घेण्यात प्रेम, माया असेल तरच मज्जा..!

१५ दिवसांपुर्वी गेलो, मी असंच थट्टेनं काहीतरी बोललो, तीनं माझ्याकडं फक्त बघितलं आणि खोटंखोटं हसली…

ती खोटं हसत्येय हे मला खरंच कळलं…

मी मुद्दाम अजुन गंमत म्हणुन काहीबाही बोललो, तीने यावर प्रतिसाद दिला नाही…

मला जाणवलं… काहीतरी बिनसलंय..!

ती शांत होती..!

कुणी शब्दांत बोलतं… कुणी शांत राहुन डोलतं..!

कुणी शब्दांत व्यक्त होतं… कुणी शांत राहुनही भक्त होतं…

चिडल्यावर माणसं जोरजोरात खेकसुन बोलतात… बोलावंच लागतं, कारण भांडतांना दोघांचीही मनं दुर गेलेली असतात..!

प्रेम करणारी माणसं अत्यंत हळुवार खुसपुस करत बोलत असतात… ओरडण्याची गरजच नसते… कारण प्रेमात, मायेत मनं खुप जवळ आलेली असतात..!

परक्यांच्या शिव्या काहीवेळा टोचत नाहीत, पण आपल्या माणसाची शांतता बोचते…

कुणाची शांतता बोचली, कुणाचा अबोला टोचला तर जरुर समजावं… हे आपलं आहे कुणीतरी!

ती माझ्याशी काही बोलत नाही, हे मलाही जाणवलं…

मी तीच्याकडे जावुन अगदी मायेनं विचारलं, “काय झालंय? मला सांगणार नाहीस?”

तीने आजुबाजुला पाहिलं, गि-हाईक नव्हतंच त्या रणरणत्या दुपारी…

तरीही मला हात धरुन बाजुला नेलं… आणि तीची गाथा सांगितली…

एकुलती एक गोड पोरगी, तीचं लगीन लावुन दिलं, ऐपत नसतांना हुंडाही दिला कर्ज काढुन. तीला दोन पोरं झाली एक मुलगा आणि एक मुलगी… (आमच्या डॉक्टरांच्या भाषेत याला Complete Family असं आम्ही म्हणतो… म्हणजे आईवडिल, एक मुलगा – एक मुलगी…)

मुलीचा नवरा पक्का दारुबाज, अशिक्षित आहे पण स्वतःचा व्यवसाय आहे, पैसा ठिकठाक आहे पण बराचसा संशयी!

मावशीच्या मुलीला, म्हणजे त्याच्या बायकोला मागच्या महीन्यात छातीमध्ये गाठ आली, हा भडकला…

“गाठ आली? कशी…?”

अशिक्षित असल्याने, त्याहुन जास्त संशयी असल्याने त्याने हिला घराबाहेर काढलं…

आईबापाला म्हणाला, “तुमच्या मुलीने कुठेतरी शेण खाल्लंय म्हणुन ही गाठ आली, शिवाय तुम्ही पण मला फसवलंत… गाठ आहे हे मला आधी सांगीतलं नाही…”

“पोरगी परत घ्या… मला नको ही..! पोरीची गाठ काढा, तरच घरात घेईन…”

दोन पोरांची ही आई, अंगावरच्या साडीनिशी माहेरी आली…

पोरीचं घर टिकावं म्हणुन आयबापांनी चार डॉक्टरांचे उंबरे झिजवले… कुणी सांगीतलं कॅन्सरची गाठ, कुणी काय आणि कुणी काय…

तपासण्या आणि ऑपरेशन एकुण खर्च लाख – दोन लाख सांगीतला..!

कोण करेल? कुठुन? कसा?

आयबापानी हाय खाल्ली..!

पोरगी बिचारी निष्पाप… पोरांच्या आठवणीनं व्याकुळ!

“पोरीचा संसार छातीतल्या गाठीपायी उध्वस्त होईल वो डॉक्टर..! तीला दोन ल्हान ल्येकरं हायेत वो डॉक्टर…” कळवळुन ती बोलली…

मी सारं ऐकलं, साठवलं..!

छातीतल्या एका गाठीनं, लग्नाची एक गाठ तोडली होती!

“डाक्टर, तुमी तीला हितं तपासा, मी घेवुन येते…”

“मावशी तीला रस्त्यात कसं तपासणार? आणि असं तपासुन काहीच कळत नसतं…! आपण तपासण्या करु तीच्या..! मला जे जमेल ते मी करतो…”

ती माऊली हसली, समाधान पावली, डोक्यावर हात ठेवुन भरभरुन आशिर्वाद दिले..!

त्या रात्री मला झोप नाही आली… शब्द तर दिलाय मावशीला भावनेच्या भरात… पण एव्हढा खर्च कराय कुठुन?

झेपणार आहे का आपल्याला? न झेपणारी गोष्ट आपण का स्विकारली? का आशेला लावलं त्या माऊलीला?

उद्या उठुन पाया पडुन सांगु, “नाही जमणार गं मला..! माफ कर!”

माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहु लागलं… उन्हाळ्यातल्या या एव्हढ्या गरमीत, माझ्याच थंड अश्रुंनी मला त्या रात्री हुडहुडी भरवली!

दुस-या दिवशी अनोळखी नंबरहुन एक कॉल आला, मावशीचाच होता तो… “डॉक्टर, तीला आणु का आज तपासणीला?”

मी हो… “हो आण म्हटलं…” आणि फोन ठेवला…

अरेच्या, काल रात्री तर मी ठरवलं होतं, ही केस घ्यायची नाही… जमणार नाही आपल्याला…मग “हो.. हो.. आण”, कोण म्हणालं माझ्या तोंडुन…?

मलाही कळेना… स्वतःवरच मी चरफडलो…

तरीही एका दवाखान्यात गेलो, तीथं ती होती आणि मावशीही… मला बघुन त्या हरखल्या आणि त्यांना बघुन मी हिरमुसलो!

दबकत तपासण्यांना घेवुन गेलो, माझ्याही नकळत..! तपासण्या सुरुही झाल्या…

मी बोर्डावर पाहीलं, हिला लागणाऱ्या तपासण्यांचा खर्च जवळपास ५५००० होता…

बापरे… हा खर्च किती, मी कसा भागवेन? मी का आलो इथं? हात दाखवुन अवलक्षण..!

जे झेपत नाही ते करायचं कशाला? मी स्वतःला दोष देवु लागलो…

पण, आता अर्ध्यातुन सोडुन जावुही शकत नव्हतो…

तपासण्या झाल्या… बिल हातात आलं… थरथरणा-या हातांनी बील घेतलं… तसंच उघडलं… बीलावरची रक्कम पाहीली, बिलावर चक्कं लिहीलं होतं ५००० रुपये फक्त..!

मला कळेना, मी थरथरत काउंटरवर विचारलं, “म.. म.. मॅडम बिल चुकीचं दिलंय का मला तुम्ही? कि Printing Mistake आहे? प… प… पंच्चावन्न ऐवजी पाच हजार लिहीलंय..! एक पाच लिहायचा राहुन गेलाय का?”

काउंटरवरची पोरगी गोड हसत इंग्लिश मध्ये बोलली, “सर, आज आमचा वर्धापन दिन आहे, आज कोणतीही / कितीही हजारांची तपासणी केली तरी पहिल्या पाच जणांच्या तपासण्या ५००० मध्येच होणार! Wish you good day sir!!!”

थोडंफार इंग्लिश कळत असल्याचा आज पहिल्यांदा अभिमान वाटला…

याक्षणी मला काय वाटलं असेल, शब्दांत कसं मांडु?

एक खरं… कोणती तरी अज्ञात शक्ती माझ्या मागं होती, नाहीतर कुठलं हे मोठं हॉस्पिटल? आजच याचा वर्धापन दिन कसा? ५५००० च्या बिलात ५०००० वजा केल्याचं कुणी ऐकलंय का? यायचं नाहीच म्हणत असतांना पहिल्या पाचात आम्हाला इथं कुणी आणलं..? हा दवाखाना कुणी ठरवला? मला कुणी आणलंय इथं?

सगळंच अतर्क्य!

तपासण्या झाल्या, या क्षेत्रातला कोणत्या तज्ञ डॉक्टरला दाखवु… कोण ऑपरेशन करेल हिचं…? या विवंचनेत घरी आलो…

डोक्यात फक्त एकच… त्या पोरीची गाठ..! आणि या गाठीशी पडली होती नेमकी माझीच गाठ!

रात्री विचार करत असतांनाच, माझा जीवश्च मित्र, प्रथितयश स्त्रीरोगतज्ञ डॉ. मंदार रानडे याचा फोन यावा… हा योगायोग म्हणु की त्या अज्ञात शक्तीचा प्रताप मला माहीत नाही…

डॉ. मंदार रानडे, एक उमदं व्यक्तीमत्व! माझा अरे तुरे चा दोस्त! एरव्ही याची भेट घ्यायला, अपॉइंटमेंट मिळायला १५ / १५ दिवस वाट बघावी लागते… त्यात हा अनेकानेक संस्थांवर उच्चपदस्थ आहे…

या माणसाचा फोन कायम बिझी… आज याचा मला फोन यावा…?

का बरं…? एव्हढ्या मोठ्या माणसाचा फोन माझ्यासारख्या भिका-यांच्या डॉक्टरला यावा?

मी दबकत फोन घेतला, “काय रे मंदार…?”

“आरे आभ्या काय करतोयस? साल्या काय चाललंय…? काम लईच जोरात चालु आहे तुझं , माझ्यालायक काय असेल तर सांग की, साल्या, एकट्यानं पुण्य मिळवायचा काय मक्ता घेतलायस का? xxxxx xxxxx” इत्यादी अतीप्रेमाच्या चर्चा झाल्यावर मग मी त्याला दबकत नुकत्याच घडलेल्या केसविषयी बोललो…

दाणकन् म्हणाला, “आभ्या उद्या दाखव मला तीला…”

“अरे पण उद्या पुण्यातलं मतदान आहे, सुट्टी असेल ना?”

“कायेका छुट्टी रे… साला अपना काम आपन करनेका… डॉक्टर को कायेका छुट्टी?”

मजेत असला की तो कायम गावठी हिंदीत बोलतो, थट्टा करतो… आख्ख्या पुणे युनिव्हर्सिटीत हा कायम टॉपर… त्याच्या नोट्स आम्हाला मिळाव्यात म्हणुन कॉलेजात आम्ही याच्या मागे मागे असायचो, तेव्हा तो आम्हाला भाव पण द्यायचा नाही…!

मी मनाशीच हसलो… पण पुन्हा प्रश्न पडला… आज अचानक मंदारचा काही विशेष कारण नसतांना फोन का यावा? मला फोन करायला याला कुणी लावलं असेल?

मतदानाच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असतांना, हा का येतोय? याला कुणी यायला सांगितलंय?

आम्ही दुस-या दिवशी गेलो, मंदार ने व्यवस्थित तपासलं… म्हणाला, “ऑपरेशन करावं लागेल…”

म्हटलं, “खर्च किती?”

तर म्हणाला, “अजुन काही तपासण्या लागतील त्या कर, मग खर्च सांगतो…”

झालं, त्याही तपासण्या केल्या…

रिपोर्ट बघुन म्हणाला, “हे बघ ऑपरेशन तर करावं लागेल, त्यात रक्त कमी आहे, रक्ताच्या बाटल्या चढवाव्या लागतील, हॉस्पिटलचा खर्च एव्हढा, बाहेरच्या औषधांचा खर्च एव्हढा आणि माझी ऑपरेशनची फी एव्हढी..!”

मला तोंडी गणित जमेना… मी मोबाईल काढुन बेरीज केली…

बापरे!

“मंदार… मी… मला… माझं…”

हाच बहाद्दर पुन्हा गडगडाटी हसत बोलला, “मै हुँ ना… परसु जुम्मा है… शुक्रवार को पेशंट को ऍडमिट कर रे… मै देखता हुँ रे.. क्या मुँह बनाया बंदर के जैसे? तेरेसे इतना पैसा लुँगा तो सारे भिक्षेकरी मिलके मुझे मारेंगे ना रे भाई…”

तो उठला आणि निघुनही गेला… त्याच्या पाठमो-या आकृतीत मला देव दिसला, अल्लाह दिसला..!

शुक्रवारी मी हिला ऍडमिट केलं… आता रक्त चढवायचं म्हणजे ब्लड गृप कोणता हे ठरवणं आलं… तीचा ब्लड गृप B Negative!

निगेटिव्ह रक्त मिळणं महामुश्कील..! “हाय रे दुर्दैवा” म्हणत मी खाली बसलो.

अपेक्षेप्रमाणे हॉस्पिटलच्या केरळी सिस्टरने सांगितलं, “सर निगेटिव्ह ब्लड है, कहीपे भी available नही है..!”

काय करावं या विवंचनेत असतांनाच, ऑपरेशन पुढं ढकलण्याच्या विचारात असतानाच मी हॉस्पिटलमधुन जड पायाने निघालो… लिफ्टचं बटन दाबणार तोवर, तीच नर्स पळत आली, आणि म्हणाली, “सर निगेटिव्ह ब्लड गृप मॅनेज हो गया है, dont worry!”

कुणी मॅनेज केला हा ब्लड गृप…? कोण म्हटलं हे dont worry? ती केरळी सिस्टर की तीच अज्ञात शक्ती?

एक संसार जुळवण्यासाठी मी आटापिटा करत होतो, ही गाठ काढली तर आईबापाच्या जीवाचा घोर कमी होणार होता, एका आईला मुलं मिळणार होती, दोन मुलांना एक आई मिळणार होती, एक संसार पुन्हा सावरणार होता..!

पण… एव्हढं करुनही तीचा हेकेखोर नवरा ऐकेल का? एक मोठं प्रश्नचिन्ह..!

मी लिफ्टमधुन विचार करतच बाहेर पडलो… पुन्हा फोन वाजला… मी उचलला, “हॅलो, मी बोलतोय, तीचा नवरा…”

मी गोंधळलो… माझा नंबर याच्याकडे कसा?

मी त्याला हॉस्पिटलला बोलावलं…

सकाळपासुन मी काही न् काही कामं करत बाहेरच होतो, सकाळच्या एका चहावर..!

तो आला, गुर्मीतच! लालेलाल डोळे, आकडेबाज मिशा… सोबत दोन पोरं!

पोरांना आईला भेटायला पाठवुन दिलं, याला बाहेर घेवुन बसलो…

म्हटलं, “तुमची बायको रक्तानं माझी कुणीच नाही, पण आता बहिण झालीय ती माझी…”

“सख्ख्या भावाहुन जास्त, मला जमेल झेपेल ते केलंय मी!”

“एका छातीच्या गाठीमुळं लग्नाची गाठ मोडायला चाललाय तुम्ही? ते हे केवळ माहिती नाही म्हणुन?”

“राजे, श्वास संपला की आयुष्य संपतं, पण विश्वास संपला की मग उरतं काय?”

मी बराच वेळ बडबड करत राहिलो… आभाळाकडं बघत…

जेव्हा माझं संपलं, तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं… लालेलाल डोळे आता निवळले होते… आणि त्यात पाणी भरलं होतं…

त्याने माझे हात हाती घेतले… इतका वेळ दाबुन धरलेल्या त्या राकट डोळ्यातुन अश्रुंचा अभिषेक सुरु झाला!

भर उकाड्यात धो धो पाउस कोसळु लागला… यांत तो चिंब भिजुन गेला आणि मी ही!

मी निघालो… दुस-या दिवशी शनिवार होता, म्हटलं, “उद्या ऑपरेशन आहे तीचं, मी उद्या मारतोच चक्कर…”

तो हसत म्हणाला, “लवकरच या डॉक्टर, ऑपरेशन झालं की मी तीला माझ्या घरी घेवुन जाणार आहे!”

“माझ्या घरी…” या शब्दावर जोर देत तो बोलला..! मी हसलो!!!

मी घरी निघालो… पुन्हा एकच विचार, हिचा नवरा इकडे कसा? माझा नंबर याला कुणी दिला? कोण घडवतंय हे सारं…?

अज्ञात शक्तीला अज्ञात कसं म्हणावं? या शक्तीला तर सारंच माहीत होतं… मग ती अज्ञात कशी…?

आज शनीवार, ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं एकदाचं…

ऍडमिट केलं तेव्हा ती एकटीच होती… आज ऑपरेशन झालं तेव्हा आजुबाजुला दोन मुलं आणि डोक्याशी नवरा उभा होता… सगळे तीला घेवुन जायला आले होते…

डिस्चार्ज ची वेळ आली… मी निघालो, जातांना ती म्हणाली, “घरी या डॉक्टर…” मी तिरकस बघत म्हणालो, “घरी कुणाच्या तुझ्या आईच्या की…?”

झट्कन् पुढे येत त्याने तीचा हात हाती घेतला आणि म्हणाला, “आमच्या घरी यायचं तुमी डॉक्टर…”

तीनं नकळत आलेल्या हुंदक्याला वाट करुन दिली… आई रडत्येय म्हटल्यावर पोरांच्याही डोळा पाणी आलं…

या हृद्य सोहळ्याच्या फ्रेममधुन आता मी बाहेर पडणं गरजेचं होतं…

मी पुन्हा तिथुन निघालो, ती म्हणाली, “जेवुन घ्या दादा आता”, मी हसलो, तीनं भरल्या डोळ्यानं हात जोडले… मी ही हात जोडले त्या अज्ञात शक्तीला!

लिफ्ट कडे जात असतांना मावशी मागंमागं आली, हात जोडलेले, डोळ्यांत पाणी… आली तशी गळ्यात पडली, रडत म्हणाली, “माज्या पोरीचा संसार वाचीवला डाक्टर तुमी!”

मी खरंच काही केलं नव्हतं… कुणीतरी अज्ञात शक्तीनं हे माझ्याकडुन करवुन घेतलं होतं..! मी फक्त नाममात्र!!!

त्यातुनही मी गंभीरपणा कमी करण्यासाठी मावशीला म्हटलं, “म्हातारे रडु नको, आजुन काळी पडशील”, यावर ती म्हणाली, “पडुदे काळी तर काळी… माझ्या ल्येकासारखीच काळी हुयीन मी… तु काळा… मी बी काळी… तुजा रंग मला मिळाला..!”

खरंच आमचे रंग एक झाले होते आज… कुठल्या अज्ञात शक्तीनं हे घडवलं असेल…???

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*