दोन म्हातारे जीव आणि एक तरणा संसार…

मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे रस्त्यावरच भिक्षेक-यांना चेक करत असतांना विविध ठिकाणी राहणाऱ्या ४ जणांची अवस्था काहीतरी वेगळी आहे आणि रस्त्यावर मी काही करणं माझ्या आवाक्यात नाही असं जाणवलं.

शनिवारी २७ तारखेलाच सकाळी या तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांना गाडीत बसवुन त्वरीत ICU सेट अप असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेवुन आलो.

१५ मिनिटांच्या आंत चौघांच्या सर्वच्या सर्व तपासण्या केल्या.

त्यापैकी दोघांना दिवसभर उपचार करुन सोडुन दिले.

मात्र इतर दोन आज्यांना ICU मध्ये ऍडमिट करावे लागले.

इथले डॉक्टर म्हणाले, दोघींनाही हलका हार्ट अटॅक येवुन गेलाय, आणखी वेळ गेला असता तर अडचणी वाढुन जीवावर बेतलं असतं.

पण आता जीवाला धोका नाही… हे ऐकुन मला स्वतःलाच हायसं वाटलं..!

या दोन्ही आज्ज्यांना मुलं, सुना, नातवंडं आहेत, तरीही भिक मागण्याची यांच्यावर पाळी आहे.

आख्खा दिवस यांची ही औषधे आणा, हे करा ते करा यांत गेला..!

माझी आणि मनिषाची धावपळ!

इकडे या दोघी ICU मध्ये ऍडमिट आणि तिकडे “गाठ” नावाने लिहिलेल्या ब्लॉगमधील त्या ताईचे ऑपरेशन, दोन्ही एकाच दिवशी…

दोन्ही हॉस्पिटल पुण्याच्या वेगवेगळ्या भागात… दोन्ही हॉस्पिटल मधलं अंतरही ब-यापैकी..!

इकडे जावं कि तिकडे थांबावं..?

एका हॉस्पिटल मधुन फोन यायचा … डॉक्टर “हे” आणुन द्या पट्कन्… तिकडे जावुस्तोवर वाटेतच दुस-या हॉस्पिटलमधुन फोन डॉक्टर “ते” आणा लवकरात लवकर…

एका हॉस्पिटलला पोचेपर्यंत, दुस-या हॉस्पिटलमधुन फोन… दुस-या हॉस्पिटलला पोचण्याआधी पहिल्या हॉस्पिटलमधुन फोन..!

फुटबॉलप्रमाणे आजचा शनिवार उडवत होता आम्हाला, त्यात उन्हं प्रचंड… सुर्यदेव कुठला राग काढत होता कोण जाणे..!

या तीव्र उन्हात दोन्ही हॉस्पिटल मध्ये मिळुन पंधरा चकरा झाल्या…

भयानक थकवा जाणवत होता, दोन चार लीटर पाणी सोडुन पोटात काही नाही…

शेवटी संध्याकाळी ICU वाल्या हॉस्पिटल मध्ये पोचलो.

मी ऍडमिट केलेल्या दोन आज्ज्यांशेजारची ICU मधली एक कॉट रिकामी दिसली…

क्षणभर वाटलं, बहुधा ही माझ्यासाठीच आता रिकामी झाली असेल… तिसरा पेशंट कदाचीत मीच असेन आजचा… कुणी सांगावं?

मनात आलं, याच खाटेवर आडवं पडावं! जरावेळ झोपावं का, असा बालीश विचारही आला.

मी खरोखरच त्या कॉटवर बसलो, आणि सहज दोघींकडे पाहिलं… दोघी व्हेन्टिलेटर वर होत्या… सकाळची तगमग पुर्ण थांबली होती, शांतपणे, निश्चल झोपुन होत्या.

मी हळुच दोघींचे श्वास चालु आहेत की नाही पाहिलं, डोक्यावरच्या मॉनीटर वर जीवनरेखा सुरु आहे कि नाही ते पाहिलं… सर्व काही व्यवस्थित होतं…

एवढ्या थकव्यातही, हे सर्व पाहुन मनाला खुप उभारी आली!

आज जर यांना आणलं नसतं तर..? जावुदे कशाला अभद्र विचार..?

मी तिथुन बाहेर पडणार, एव्हढ्यात एक आजी बोटांची काही हालचाल करतेय असं जाणवलं, मी तीच्याजवळ गेलो, ती तोंडावरचा मास्क चक्कं काढत हळु आवाजात मला म्हणाली, “जेवलास का रं बाबा..?”

मी म्हटलं, “हो, जेवुनच आलो आत्ता..!”

तेव्हढ्यातुनही सुरकतलेले हात तीचे माझ्या गालाजवळ आले… आणि म्हणाली, “तु पन आता खोटं बोलाया चांगलंच शीकलास की..!”

एव्हढं बोलुन ती कळवळुन रडायला लागली…

या आवाजानं दुसरी आजी उठली, तीच्याजवळ गेलो… तीने ओठ गच्च दाबुन धरले होते. कधी बांध फुटेल माहीत नाही… आणि तो फुटलाच!

रडत म्हणाली, “माज्या पोटी जलम का नाय घेतलास?”

म्हटलं, “पोटी नसेल घेतला तरी तुझ्या “ओठी” जन्म घेतलाच कि मी..! तु तोंडानं बोललीस, मुलगा समजलीस यातच आलं सारं काही!”

मी दोघींच्या तोंडावर पुन्हा मास्क लावला आणि “झोपा शांत” असं दोघींना खुणेनं सांगितलं… यावर त्यांनीही “तु जेव” असं खुणेनंच सांगत डोळे पुसले..!

कसं असतं..? माया, प्रेम शोधुन आणि मागुनही मिळत नाही, ते नशिबातच असावं लागतं..!

या आज्ज्यांनाही मुलं सुना आहेतच की, पण त्यांचं प्रेम यांच्या नशिबी नाही, आणि यांचं प्रेम त्यांच्या…

दाने दाने पे लिख्खा है, खानेवालेका नाम… खरांय!

मी मुलगा कुणाचा? कुणासाठी करतोय…

ती आई कुणाची? कुणासाठी झुरत्येय..

विचार करत मी ICU बाहेर बसलो… डोळ्यावर पेंग, प्रचंड थकवा…

एस टी स्टँडच्या बाकड्यावरही, माणसांना इतकी सुखाची झोप कशी लागत असेल आत्ता कळलं..!

पुन्हा फोन वाजला, तिकडच्या हॉस्पिटल मधला होता तो, डॉक्टर: “ऑपरेशन व्यवस्थित झालंय, पेशंटला बघायला येताय?”

मी विचारलं, “आत्ता पेशंटसोबत कोण आहे?”

पलीकडुन आवाज आला, “तीचा नवरा आणि दोन्ही मुलं सोबत आहेत…”

आनंदानं माझेच डोळे भरुन आले…

नवरा आहे सोबत तीच्या… म्हणजे ऑपरेशन बरोबर संसारही सुरळीत झाला तर..!

मी आता तिकडे निघणार, इतक्यात ICU इनचार्ज जवळ आले, म्हणाले, “दोन्ही आज्ज्या पुर्णपणे धोक्याच्या बाहेर आहेत, तु निर्धास्त रहा…बिनधास्त जा!”

आनंदाचा हा बोनस होता माझ्यासाठी..!

दिवसभर झालेल्या धावपळीचं चीज झालं..!

दोन्ही बातम्या ऐकुन थकवा दुर पळाला, मला पुन्हा उभारी आली. मी पार्कींगमधनं गडबडीनं गाडी काढली…

दिवसभरांत कितव्यांदा या पार्कींगमधनं गाडी काढत होतो आठवत नाही, पण पार्कींगवाला जाताना म्हणाला, “ओ डॉक्टर, आवो किती येळा ये जा करनार हाय अजुन? कसली धावपळ ही? आन् कशासाटी?”

कशासाठी..?

म्हटलं, “आरे येड्या दोन म्हातारे जीव आणि एक तरणा संसार वाचवण्यासाठी..!”

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*