ती – उत्तरार्ध

काही दिवसांपुर्वी “ती” या नावाने ब्लॉग लिहीला होता. पायाने पुर्ण अपंग असलेल्या एका व्यक्तीला व्हिलचेअर दिली होती, या व्हिलचेअर वर बसुन ते व्यवसाय करतात, आता ही व्हिलचेअर तुटली, म्हणुन व्यवसाय बंद पडला… आणि पुन्हा भीक मागण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीची ही कथा नव्हे व्यथा !

आपणां सर्वांच्या मदतीने मग नवीन व्हिलचेअर घेतली, उन वारा पाउस लागु नये, आतलं सामान भिजु नये यासाठी या चेअरला ऑटो रिक्षाप्रमाणे छप्पर आणि आजुबाजुला भिंती केलेत.

आतल्या भिंतीला, आपल्या घराला असते तसं छोटं कपाट केलंय, शिवाय सर्व बाजुंनी हुक्स / हँगर लावले आहेत.

या कपाटात ते विक्रीयोग्य वस्तु ठेवु शकतात आणि हुक्स / हँगर ला अडकवुन वस्तु विकु शकतात.

असला “येडछापपणा” माझ्याच डोक्यातला..! (हो, काही लोक बोलले मला… तोच शब्द लिहिलाय )

तर, ही चेअर तयार आहे आणि या कष्टक-याला आपण ही चेअर सन्मानाने *गुरुवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ०६:३० वाजता* हस्तांतरीत करणार आहोत.

याचवेळी, विक्रीयोग्य वस्तु उदा. बिस्किटचे पुडे आणि तत्सम साहित्य त्यांना विक्रीसाठी देणार आहोत.

“डॉक्टर, ही लोकं खरंच काम करतात का? तुम्ही लिहीता त्या “ष्टो-या” खरंच असतात का? का आपलं… आसंच कायतरी… ही… ही… ही..! भिकारी कसं काम करतात? मग आम्ही सांगतो तेव्हा का नाही करत काम हे लोक? आपण काही दिलं तर हे लोक जपुन ठेवतात का? नीट वापरतात का वस्तु? त्यांना त्याची किंमत असते का?”

असे हजारो प्रश्न लोक मला रोज विचारतात !

या सर्व प्रश्नांची ऊत्तरं हवी असतील तर वर सांगितलेल्या दिवशी *सायकल कॉलनी, क्वार्टर गेट जवळ, पुणे* या ठिकाणी यावे. (पत्ता नाही सापडल्यास बेशक फोन करावा )

आपल्या उपस्थितीमुळे, भिक्षेकरी म्हणुन पुर्वी आयुष्य जगत असलेल्या “त्याला” ही छान वाटेल, आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या या व्यक्तीचा पालक म्हणुन मलाही छान वाटेल…!!!

हो… मुलानं व्यवसाय टाकलाय… कुठल्या आई बापाला आनंद होणार नाही?

आमच्याही आनंदात सामील व्हायला या…

आज खरंतर मदर्स डे…! असं काही असतं हे व्हाट्सऍप्प तज्ञांमुळे आजच समजलं…!!!

असले Days आम्ही पाळत नाही… आमच्यासाठी रोजच मदर आणि फादर डे असतो… !

कधी भिक्षेकरी आमचे “आयबाप” होतात कधी आम्ही त्यांचे “आयबाप” होतो…

हे असंच चालायचं…!!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*