दि. १६ मे सायंकाळी ६:३०
माझ्या कुटुंबातील दोन अपंग व्यक्तींना व्यवसाय करण्यास उपयुक्त होतील अशा व्हिलचेअर सुधारित करुन दिल्या.
या व्हिलचेअर मध्ये विक्रीयोग्य सामान ठेवण्याची आणि लोकांना दिसतील अशा (Display) अडकवण्याची सोय आहे.
शेंगदाणे, फुटाणे, वेफर्स, बडिशेप इ. अनेक वस्तु विक्रीसाठी दिल्या आहेत.
दोघेही कष्टकरी झाले..!!!
या माझ्या कामात श्री. किरण सणस, श्री. भातंब्रेकर बाबा, श्री. विश्वास देशपांडे, श्री. कोठारी, डॉ. राहुल गोंधणे, श्री. किसन ताकमोडे, श्री. आदित्य दुधाट, श्री. लुणावत, भावना जुन्नरकर, ऍग्रीकल्चर कॉलेज स्टुडंट्स आणि श्री. व सौ. भुवड यांचा सक्रीय सहभाग लाभला.
मी आणि मनिषा या सर्वांचे ऋणी आहोत!
आपण प्रत्यक्ष या वेळी उपस्थित नव्हतात तरीही, आपण माझ्याबरोबर आहातच याची मला पुर्ण जाणीव आहे.
मी ऋणी आहे सर्वांचा..!
२०,००० रुपयांना एक याप्रमाणे ४०,००० च्या दोन सुधारणा केलेल्या व्हिलचेअर देणं हे आमचं एकट्याचं काम असुच शकत नाही!
आपणांमुळे हे शक्य झालं, त्याची पावती द्यावी म्हणुन हा लेखनप्रपंच!
लोक म्हणतात, “डॉक्टर तुम्ही हे केलं, ते केलं वैगेरे वैगेरे…” खरंतर आम्ही काहीच करत नाही, कुणीतरी हे आमच्याकडुन करवुन घेतंय..!
कठपुतळी च्या खेळात कठपुतळी ला टाळ्या मिळतात, कौतुक होतं… पण या सर्वाचा कर्ता करविता कुणालाच दिसत नाही..!
तसंच आमचंही, आम्ही फक्त रंगमंचावरच्या कठपुतळ्या… कर्ते करविते तुम्ही सर्वजण आणि एक अदृश्य शक्ती… आमचा आपणांस साष्टांग नमस्कार!!!
आमच्याच घरात काही वाहन आलंय असं समजुन मनिषाने या गाड्यांची रस्त्यावर पुजा केली… जमलेल्या सर्वांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या, लगोलग वस्तुही विकत घेतल्या…
या दोघांचे हात जोडलेले, यांनाही उठुन सर्वांना अभिवादन करायचं होतं, पण उठणार कसं? अपंग पायांनी केव्हाच साथ सोडलीय..!
या दोघांनाही भरभरुन बोलायचं होतं, पण आज शब्दांनीही साथ सोडली होती…
डोळ्याला लागलेली धार… डोळ्यातल्या पाण्याचा थेंब न् थेंब तुम्हां सर्वांना जणु हेच सांगत होता: आभार… आभार… आभार..!
Leave a Reply