हि बाब आहे इंग्रजांच्या काळातली!
एक समाज होता… आधीपासुनच असुधारीत, अप्रगत!
कुणीच यांना आपलंसं केलं नाही, गावात स्थान दिलं नाही, कायम गावाबाहेर ठेवलं.
इंग्रंजांनीही यांच्यावर बेधडक “चोरटे” आणि “दरोडेखोर” म्हणुन शिक्का मारला.
यानंतर यांना नोकरी तर सोडाच पण शिक्षणही महाग झाले.
या समाजाला चोर समजण्याची ही प्रथा आजतागायत आहे, यांच्याकडे अजुनही चोर म्हणुनच पाहिलं जातं.
सर्व सोयीसुविधांपासुन हा समाज आज २०१९ मध्येही वंचित आहे!
कुणी रस्त्यात उन्हातान्हात दगडं फोडतंय तर कुणी विहीरी खणतंय, कुणी रस्त्यात काही विकतंय तर कुणी भीक मागतंय..! पण शिकत कुणीच नाही, नोकरी / व्यवसायात तर जवळपास कुणीच नाही.
यांच्यातल्या एकाही पिढीने शाळा पाहीली नाही. कुणी असेलच शाळा शिकलेलं तर लाखात एखादं..!
यांना कुणी जगुच दिलं नाही. यांच्या आयुष्याचा तमाशा केला, त्यावेळच्या परिस्थितीने!
वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिल्यामुळे मुलामुलींची नावं काय ठेवायची असतात हे ही या बिचाऱ्यांना माहीत नसे.
व्यवहारात आपण ज्या वस्तु वापरतो, बघतो त्यांची नावं ऐकुनच (वापरुन नव्हे) यांनी आपल्या मुलामुलींची नावं ठेवली.
पुस्तक्या, भाक-या, जंगल्या, इमारत्या, चपल्या, सायकल्या, झंप-या, डोंग-या, झाड्या, झुडप्या, बिल्डिंग्या, विमान्या, चाद-या… ही नावं आहेत या समाजातील मागच्या पिढीची…
का बुवा यांना साधं नाव देखील मिळु दिलं नाही, त्याकाळच्या परिस्थितीने..!
बंड केलेल्या एका पिढीतील लोकांची नावं पिस्तुल्या, बंदुक्या आणि तलवा-या अशीही आहेत…
केवळ नावावरुनही यांच्या मनातला कल्लोळ जाणवतोय!
काही वेळा शब्द शांतच असतात… दंगा होतो आठवणींत!
अशीच आठवणींचं बोचकं घेवुन फिरणारी, या समाजातली माणसं (???) मला भेटतात, रस्त्यात भीक मागत!
यांना भेटल्यावर, जुन्या जखमांची खपली काढली की जखमेतुन रक्त येतच नाही, वाहतं फक्त डोळ्यातुन पाणी…
यांच्या जखमा कोरड्या पडलेत… रक्त आधीच कुणीतरी शोषुन घेतलंय..!
कशा होणार या जखमा ब-या?
अन्याय भोगण्याचा या समाजाने जल्लोष केला, या जखमा या अन्यायाचंच प्रतिक आहेत, पुरावे आहेत..!
सरळ असणा-या खिळ्यांवरच हातोडीचा दणका पडतो, वाकड्या खिळ्यांकडं कुणी ढुंकुनही पहातही नाही, हि वस्तुस्थिती आहे..!
आलाच आहात तर बसा, हे जितकं सहज म्हटलं जातं, तितकंच सहज, होताहेत पोरं तर होवु देत; असं म्हटलं जातं या समाजात..!
एकेकाला ६ – ६ / ८ – ८ पोरं…
यांचं पालन पोषण आपल्याला करावं लागेल याचा या आईबापांना गंधच नसतो. पिढ्या न् पिढ्या भीक मागत जगल्या (कि मेल्या?) त्यात आमची ४ – ६ ची भर पडली तर काय बिघडलं?
काय उत्तर द्यावं त्यांच्या या प्रश्नाला?
यांचा संसार म्हणजे फाटकी बोचकी, त्यात फाटकी कपडे आणि सोबत जन्माला घातलेली फाटक्याच नशिबाची पोरं..!
असंच एक कुटुंब मला ३ – ४ महिन्यांपुर्वी भेटलं होतं. आई आणि बाप दोघेही आपापल्या धुंदीत!
मी इथे येतो, त्यांचं ६ – ७ वर्षाचं पोरगं मला मामा म्हणतं… मी आलो की मला येवुन बिलगतं… माझा पेन मागतं, माझ्याजवळची कागदपत्रे निरखुन पाहतं, मी कसा लिहीतोय हे बारकाईनं बघतं, माझी बॅग चाचपुन पाहतं… का कोण जाणे पण या पोराचा मला लळा लागला!
मला याने एकदा वही पेन मागितला, या वस्तु देतांना म्हटलं, “क्या करेगा ये लेके?” त्याने हसत उत्तर दिलं होतं “मई पडिंगा… मेरकु लिकनेका हय..!”
मी कुतुहलानं म्हटलं, “पढ लिखके क्या करेगा…” शुन्यात बघत तो म्हणाला होतो, “मेरकु इनिसपेक्टर बननेका हय..!”
त्याचं त्या वेळचं शुन्यात बघणं, मला छेदुन गेलं… बाणाप्रमाणे घुसलं..!
मी ठरवलं, मला मामा म्हणणा-या या पोराला आपण शिकवायचं…
याच्या आईबापाजवळ मी विषय काढला, त्यांनी अक्षरशः रस्त्यात “धिंगाणा” घातला होता..!
घालणारच… कारण लहान मुल म्हणुन सहानुभुतीने याला भीक जास्त मिळते, त्या भीकेवर हे ऐष करतात… पोराला शिकायला पाठवला तर इकडे भीक कोण मागेल?
यानंतर, मला तिकडे त्यांनी यायची बंदी घातली…
यावरुनच मी या मुलावर इनिसपेक्टर नावाने ब्लॉग लिहीला होता.
त्याच्या शिक्षणात त्याचे आईबाप हेच मुळ अडसर होते, यांना कसं पटवुन द्यावं हा मला मोठा प्रश्न होता..!
नंतर नंतर तर मी गेल्यावर यांनी या पोराला लपवायला सुरुवात केली…
आता सगळेच मार्ग खुंटले!
खुप दिवसांनंतर यांच्याच घरातला एक ज्येष्ठ सदस्य मला भेटला, समजुतदार वाटला. आयुष्याचे ६० – ७० उन्हाळे पावसाळे यांनी पाहिले असावेत.
मी यांचा विश्वास संपादन केला…
म्हटलं बाबा, तुमची काय इच्छा आहे? तुमच्या नातवंडांनी पण भीक मागत जगावं? आणि भीक मागतच मरावं का?
पांढरी दाढी खसाखसा खाजवत ते म्हणाले, “इच्छेचं काय वो? इच्छा कुणाची संपती काय? मानुस जित्ता आस्तो तवा तर इच्छा धरतोच पन मेल्यावर पन स्वर्गात जायाची इच्छा धरतो..!”
“मानसाचं काय घेवुन बसला हो?
मानुस म्हंजे आस्तंय तरी काय..?”
बाबांच्या या वाक्यांनी माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं…
“खरंच माणुस म्हणजे नेमकं काय..?”
माणसाचं कसं असतं ना? जमिनीवर असतांना आभाळात घिरट्या घालायची ओढ असते त्याला, आभाळाला हात लावले म्हणजे आपण यशस्वी झालो असं वाटतं यांना…
पण आभाळात घरटं बांधता येत नाही, घरटं जमिनीवरच बांधलं जातं, आणि या घरट्यात येण्यासाठी पुन्हा मातीला पाय लावावेच लागतात हे ज्याला कळलं तो खरा यशस्वी माणुस!
इच्छा धरणारापेक्षा, एखाद्याची इच्छा पुर्ण करणारा श्रेष्ठ असतो, तो खरा माणुस..!
कुठं काय हरायचं, हे कळलेला फकिर हाच खरा सिकंदर ठरतो, हरुनही जिंकलेला फकीर म्हणजे खरा माणुस..!
जो खवळलेल्या समुद्रावरही स्वार होतो, पण वेदनेच्या एका अश्रुपुढे नतमस्तक होतो तो माणुस..!
वेद नाही समजले, वेद नाही वाचता आले… पण ज्याला वेदना समजली… तो खरा माणुस!
प्रशंसा आणि खुशामत यात एक फरक आहे… प्रशंसा “माणसाच्या कामाची” होते… खुशामत “कामाच्या माणसाची” होते..! खुल्या दिलानं प्रशंसा करतो तो खरा माणुस..!
थाप तोंडावर नाही, खुल्या दिलानं पाठीवर मारतो तो खरा माणुस…
पोट कसंही भरतं, जो कुणाचं काळीजही प्रेमानं भरवुन टाकतो, तो खरा माणुस..!
असो!
यानंतर, ब-याच दिवसांनी बाबांकडे विषय काढला, “बाबा, पोरान्ला शिकवुया का?”
बाबांनी खाली मुंडी घालत जमिनीवरची काटकी उचलली, आधी त्यानं दात कोरले… मग हळुहळु एक एक बाजुने काडी मोडत शुन्यात बघत राहिले…
आमचंही आयुष्य या काटकीप्रमाणेच हळुहळु मोडत गेलंय, हे सुचवायचं असेल का यांना यातुन?
पुर्ण काटकी मोडुन झाल्यावर, हळुहळु नजर वर करत ते म्हणाले…
“शीकून काय व्हयील डाक्टर? नवकरी मीळंल का? शीकल्यावर काय घावंल?”
मी विचार करुन म्हटलं, “शिकल्यावर घावणार काईच नाइ बाबा… उलटं लय काय गमवावं लागंल..!”
पत्ते खेळताना अचानक डाव उलटावा आणि वैतागानं आपण पत्ते आपटुन फेकुन द्यावे, तशा इतकावेळ हातात मोडुन ठेवलेल्या काड्या बाबांनी रस्त्यावर वैतागानं फेकुन दिल्या…
म्हणाले, “काय बोलताव डाक्टर..? काय बी बोलताव तुमी… समदं गमवायचंच हाय तर, ही भीकच बरी हाय की…”
लुंगीची गाठ आवरत, तोंडात बीडी सरकवत ते उठत बोलले…
म्हटलं, “बाबा बसा..!”
आता त्यांचा माझ्यातला इंटरेस्ट कमी झाला होता… तरीही दातात बिडी धरुन ते बसले… जळक्या काडीला हातानंच विझवलं…
दुःख्खं सोसुन बधीर झालेल्या मनाला भाजेल कसं?
बाबांकडं बघत मी म्हटलं, “बाबा नीट ऐका ध्यान देवुन…” बाबांना बाबांचाच होवुन समजावणं गरजेचं होतं..!
“बाबा, खरंच शिक्षणानं मिळत काईच नसतंय, उलटं लई काई गमवाय लागतंय…”
“आपली पोरं शिकली तर आपल्या म्हागं चोर / दरोडेखोर शब्द लागलाय त्यो गळुन पडंल… गमवावा लागंल…”
“आपल्याला लोकं गुलाम समजत्यात ती गुलामगिरी गळुन पडंल… गुलामगिरी गमवावी लागंल…”
“आपल्याला भिकारी म्हणत्यात… आपल्या हातातनं भीकेचा कटोरा गळुन पडंल… आपल्याला भिकारपण गमवावं लागंल…”
“डोक्यावर झिप-या वाढल्यात पोरांच्या, त्या गमवाव्या लागतील… तिथं भांग येईल…”
“खांद्यावर नुसतंच मुंडकं व्हतं रिकामं, ते गळुन पडंल आणि त्याजागी डोकं येईल विचार करणारं…”
“चालुन टाचांचं कातडंपण झिजलंय, झिजलेलं हे कातडं गळुन पडंल, पायात नवा बुट आसंल… ह्यो नवा बुट घालुन, समोर येइल त्यो डोंगर पार करायची ताकद आपल्याला मिळंल…”
“आपल्या पोरींच्या अंगावरलं फाटकं परकर पोलकं जावुन, तीच्या अंगावर पोलिसांची प्यांट दिसंल, आपल्या पोरीच्या कंबरेला पोलिसाचा पट्टा आसंल… तीच्या हातात काठी आसंल..!”
“हीच काठी तुमचा आधार बनंल आणि अन्यायाच्या टाळक्यात बसंल..!”
“अंगावर मळ साठलाय लय वर्षाचा, त्यो धुवुन निघंल… गमवावा लागंल… गावकरी म्हणुन आपल्याला मान आसंल…”
“शिक्षणानं नोकरी मिळती का न्हायी म्हायत न्हाय… पण स्वाभिमानानं भाकरी मिळंल…”
“बाबा, आपल्याला भुक लागली म्हणुन आपुन खातो ही प्रकृती…”
“दुस-याचं ओरबाडुन घेतलं तर ती विकृती…”
“पण स्वतःला भुक लागलेली असतांना दुस-या भुकेल्याला घास भरवणं ही झाली संस्कृती..!”
“शिक्षणानं आपल्यातली हि विकृती गळुन पडंल बाबा…”
“आपल्यातला नको तो भाग गळुन पडंल… आणि उरेल फक्त मुर्ती बाबा…”
“ही आपली मुर्ती मग आपण पुजायची न्हाय बाबा… जपायची..!”
“पुजण्यामध्ये फक्त भाव असतो, स्वार्थ असतो, मागणं असतं… भक्ती असते जपण्यामध्ये..!”
सारं ऐकुन, बाबांनी तोंडातली पेटती बिडी टाचेनं रगडुन विझवली…
मी विचार करायला लागलो, आतापर्यंत जपलेल्या जुन्या बुरसट विचारांना त्यांनी टाचेखाली बिडी समजुन रगडलं असेल का?
आता बिडी विझली होती… साहजीकच धुर कमी झाला, हवा स्वच्छ झाली, कोंडमारा कमी झाला… बाबांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला…
हो, मला दिसलं ते बाबांच्या डोळ्यात..!!!
सुरकुतलेल्या गालांवरुन आता डोळ्यातलं पाणी मोकाट फिरु लागलं… त्याला पुसत ते म्हणाले: “कळलं मला डाक्टर, आमची पोरं शिकवा तुमी..!”
“त्यानला कोरडा भाव नको, भक्ती शिकवा..!”
“नुसतंच शिक्षण नको, आमच्या पोरान्ला संस्कारबी शिकवा…”
“संस्कृती – विकृती, मला कळत न्हाय… पन या समद्यातनं मात्र आमच्या पोरांमदनं मानुस नावाची मुर्ती घडवा..!”
“मी हाय तुमच्यासंगट, पोरांचं आयबाप कसं ऐकीत न्हाईत मी बगतो, न्हाईच आयीकलं तर पायताणानं हाणतो..!”
मी हसलो, एक टप्पा मी जिंकला होता!!!
यानंतर मी माझ्या भाषेत आणि बाबांनी त्यांच्या भाषेत, भीक मागणा-या लहान मुलांच्या आईबापांना समजावुन सांगायला सुरुवात केली…
आज मला सांगायला अभिमान वाटतोय की, गेल्या दोन तीन महिन्यांच्या या समजावणीनंतर या समाजातली “सहा” मुलं शिक्षणासाठी तयार झालीत… मनापासुन!!!
यांच्यातल्या एका मुलाच्या आईला आणि मला मामा म्हणणा-या माज्या भावी “इनिसपेक्टरला” घेवुन मी पुणे जिल्हा बाल कल्याण समिती गाठली.
या ऑफिसात आल्यावर जाणवतं… इथे फक्त “माणसंच” आहेत… आणि ते नुसतं “काम” नाहीत करत तर “सेवा” देतात…
अशा या सेवेलाच पुजा म्हणत असावेत का..?
ऑफिसमध्ये श्रीमती बिना हिरेकर मॅडम आणि त्यांचे इतर सहकारी यांनी सर्व ऐकुन घेवुन, या सहाही मुलांची राहणे, खाणे-पिणे आणि शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी स्विकारली!
कोणत्या शब्दांत या सर्व अधिकारी वर्गाचं ऋण व्यक्त करु… कळत नाही!
माझे हे सहाही भाचे येत्या जुन महिन्यापासुन शाळेत जातील, होस्टेलला राहतील..!
बघु, सुरुवात तर केलीय, ज्योत पेटवलीय… मशाल होण्याची वाट पाहतोय!
ऑफिसमधुन परतताना हा छोटा मला म्हणाला, “मामा, भुक लगी हय…”
आम्ही जवळच्या छोट्या हॉटेलात गेलो… आईला सोडुन हा माझ्या मांडीवर बसला..!
खावुन झालं, बील देवुन बाहेर पडतांना म्हणाला….
“मय जब बडा होयेंगा ना, तब तु बुढ्ढा मामा होयेंगा, मै तेरकु फिर इसी हाटिल मे लावुंगा, तब तु मेरी मांडी पे बैठना… तब तु खाना और बील मै भरेंगा..!”
मला यावर काय बोलावं समजेना…
डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी मी मान वळवली…
या चाणाक्ष पोरानं ते ही ओळखलं असावं…
म्हणाला, “उदर कायकु देक रहेला हय…बोल ना मामा..?”
याला काय सांगु?
मी भरल्या डोळ्यांनी, दिवसाउजेडी स्वप्नं पाहत होतो…
अजुन काही वर्षांनी, म्हातारपणामुळं थकलेला, वाकलेला एक डॉक्टर, याच हॉटेलात येवुन बसलेला असेल, त्याच्याबरोबर असणारा एक तगडा जवान “इनिसपेक्टर” म्हणुन त्याच्या समोर बसलेला असेल…
“बुढ्ढ्या” मामाला तो काहीबाही खाण्याचा आग्रह करत असेल…
हॉटेलातुन उठतांना, हा बुढ्ढा डॉक्टर, काठी शोधत, धडपडत उठण्याचा प्रयत्न करेल…
आणि तेव्हढ्यात कुणीतरी या बुढ्ढ्या डॉक्टरला, मजबुत हाताचा आधार देत सावरत म्हणेल…
“काठी कायकु रे मामा, मै हुं ना इधर…!!!”
Touching n emotional may they all learn n able to live like humans