नमस्कार,
भेटल्यावर लोक मला विचारतात ; डॉक्टर, तुम्ही हे काम कधी करता? — महिन्यातुन एक तास? दोन तास? आठवड्यातून एकदा? नेमकं काय करता वगैरे वगैरे…
खरं सांगु..?
आठवड्यातून एकदा आणि दोनदाच करायचं हे कामच नव्हे!
एखाद्याचा विश्वास संपादन करायचा तर त्या भेटीत सातत्य हवं… त्याशिवाय भिक्षेक-यांचं मत परिवर्तन करणं कसं शक्य होईल!
एखाद्याला वेळ ठरवुन देतात, तसं आपण देव देवतांनाही वार वाटुन दिलेत.
सोमवार दिलाय शंकराला, मंगळवार देवीला, बुधवार-चतुर्थी असेल तर गणपती, गुरुवारी साईबाबा, गुरुदत्त – स्वामी समर्थ, शुक्रवारी अल्लाह आणि शनिवारी शनी आणी मारुती!
ज्या दिवशी ज्या देवाचा वार; त्यादिवशी भक्तांची गर्दी तीथं जास्त, आणि भक्त जीथं जास्त तीथं भीक मागणारांचीही गर्दी जास्त!
म्हणुन भिक्षेक-यांना रेग्युलर भेटण्यासाठी, वर सांगितलेल्या त्या –
त्या देवाच्या वाराप्रमाणे ठरवुन, दररोज (सोमवार ते शनीवार) ११ ते ३ वाजेपर्यंत मंदिर / मस्जिद / दरगाह / चर्च बाहेर ते जिथे मागायला बसले आहेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. (हल्ली तर कब्रस्तानातही जायला सुरुवात केल्येय)!!!
३ – ४ मोठ्या बॅगात आख्खा दवाखाना भरुन मोटरसायकल वर घेवुन मी फिरत असतो.
हे सर्व घेवुन मंदिरं – मस्जिद च्या बाहेर थांबायचं…
जिथे जागा मिळेल तिथे बॅग ठेवायची, आणि प्रत्येकाजवळ जावुन त्याची विचारपुस करायची.
काही आजार आहेत का बघायचं…
सुखदुःख्खं शेअर करायची…
हसण्यासारखं असेल तर हातावर टाळ्या देत, थट्टा मस्करी करत हसायचं…
दुःखद प्रसंगी त्यांच्या रडण्यात सामिल व्हायचं… त्यातुन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायचा..!
रस्त्यावरच मग केस पेपर तयार करायचा, औषधं द्यायची, ड्रेसिंग करायचं, आणखीही काहीबाही रस्त्यावर आपल्याला जे जमेल ते सारं करायचं, हाताबाहेर असेल तर ऍडमिट करायचं…
हे सगळं – सगळं करण्याचा हेतु हा की…
यांच्याबरोबर नाती निर्माण करणे!
माझ्यावरचा विश्वास वाढवणं..!
ख-या गरजु भिक्षेक-यांना शोधुन काढुन लागेल ती सर्व मदत करणं…
धंदेवाईक भिका-यांना शोधुन साम, दाम, दंड, भेद या मार्गाने भिकेपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करणं…
या सगळ्या प्रक्रियेत मी गरजुंना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो… त्यांचं भीक मागण्याचं नेमकं कारण काही सापडतंय का हे पाहतो… सापडलेल्या कारणांवर माझ्या परीने तोडगा काढायचा प्रयत्न करतो…
भिक्षेकरी ते कष्टकरी या दरम्यान असलेला खड्डा बुजवण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करतो…
हे सर्व करत असतांना त्यांच्यात आणि माझ्यात एक छान निरागस नातं तयार होतं…
कुणी मला मुलगा समजतं, कुणी नातु, कुणी जावई, कुणी काका तर कुणी मामा म्हणतं… आणखीही बरीच नाती मला मिळतात.
वेड्यासारखं ही लोकं माझ्यावर प्रेम करायला लागतात, या तयार झालेल्या नात्यांचा मी मग एकेदिवशी फायदा घेतो… यांच्याच फायद्यासाठी!
यांना म्हणतो, “का गं तु मला मुलगा म्हणती आणि रस्त्यात भीक मागती?”
“मला नातु म्हणता बाबा तुमी, आणि रस्त्यातच भीक मागता?”
“शोभतं का हे तुम्हांला?”
“डॉक्टरचे आई – वडील – आजी – आजोबा असे रस्त्यात भीक मागतात का..?”
“माझ्याशी नातं पण लावता, वर भीक पण मागता… फुकट औषधं पण घेता, लोकांकडनं लाचार होवुन भिका पण घेता… श्शी… मला तुमची लाज वाटते..! तुम्हांला स्वतःची नाही वाटत?”
“जावु दे; उद्यापस्नं येणारच नाही मी… मला नको तुमची नाती..!”
“बसा भिकच मागत..!”
“आजपासुन मी मेलो तुम्हांला असं समजा…”
“भीक मागुन मिळालेल्या पैशात श्राद्ध घाला माझं…आपल्या या नात्याचं!”
नाती पक्की झाल्यावर एके दिवशी मी मुद्दाम हा भावनिक तिढा घालतो, त्यांना टोकेरी बोलतो..!
टोक असणा-या गोष्टीच घुसतात खोलवर… आरपार…
बोथट गोष्टी घुसत नाहीत, फक्त घाव करतात, यावरच माझा विश्वास आहे!
आरपार घुसुन एक घाव दोन तुकडे करावेत या सातारी प्रवृत्तीचा मी आहे…
अर्धवट गोष्टी करुन एक ना धड भाराभर चिंध्या करायला सांगितल्यात कुणी?
असो, तर नुसतं टोकाचं टोकेरी बोलुन मी थांबत नाही, नंतर मी यांच्याशी अबोला धरतो..!
हो… एक ट्रिटमेंटचा भाग म्हणुन..!
थोडक्यात काय तर गट्टी फु..!!!
खरं सांगु..? परक्या माणसाच्या चार शिव्या लागत नाहीत, पण आपल्या प्रेमाच्या माणसाचा अबोला मात्र टोचतो – बोचतो – लय जोरात लागतो!
हे प्रत्येक माणसाबाबत सत्य आहे!
“अबोला” हे भयंकर अस्त्र आहे, याला धार नसते… तरीही खुप तीक्ष्ण असतं..!
धार असणं आणि तीक्ष्ण असणं दोन्ही वेगळ्या बाबी आहेत.
धार असणारी शस्त्रं कापतात… तोडतात!
तीक्ष्णं असणारी शस्त्रं टोचतात..!
आपल्याला तोडायचं नाहीये, चिमटा घेण्याइतपत फक्त टोचायचंय…
डॉक्टरच्या इंजेक्शन प्रमाणे. तीक्ष्ण सुई टोचते… पण आजारही बरा करते..!
तसंच, अबोला हे अस्त्र वापरायचंय… टोचायचं जरुर, पण औषध भरुन!
टोचलं तर पाहीजे, पण जखम नाही करायची!
आणि हो या अस्त्राचा वापर फक्त “आपल्या” माणसांवरच होतो बरं का ..!
आपल्या अबोल्याने कुणाला त्रास झाल्यास बेशक समजावं… हेच ते आपलं माणुस..!!!
आणि हो, हे अस्त्र वापरतांना मात्र एकच लक्षात ठेवायचं… ताणायचं… ताणायचं… पण, तुटु द्यायचं नाही..!
तर, हे जालिम अस्त्र मी वापरतो…
आधीच म्हटलं तसं, माझ्या या अबोल्याने परक्यांना काहीच फरक पडत नाही, ते माझ्याकडं ढुंकुनही पहात नाहीत…
आर्रे ज्जा… छप्पन येतात तुज्यासारखे… हा भाव असतो यांच्या वागण्यात…
हे आपोआपच माझ्याही मनातनं वजा होतात..!
पण मला खरोखर आपलं समजणारी काही म्हातारी माणसं मात्र डोळ्यात पाणी घेवुन जवळ येतात… छातीवर डोकं ठेवतात… शर्टाची बाही, फाटेपर्यंत ओढुन विचारतात… “तु बोलनार हायेस का न्हायी त्ये शेवटचं सांग? नसंल”
सुरकुतलेल्या मातीवर मग अस्ताव्यस्त पाऊस पडायला लागतो…
याच पावसात उगवलेला प्रत्येक अंकुर मला म्हणतो, “तु सांगशील ते करतो, पन सोडुन नको जावुस..!”
बास, हेच हवं असतं मला..!!!
निःशस्त्र या लढाईत मी एक एक “माणुस” टिपुन जिंकतो…
आणि जिंकल्यावर मात्र अबोल्याचं हे अस्त्र मी मग तिथंच टाकुन देतो…
या अस्त्राने जिंकलेलं हे माणुस मग माझं होवुन जातं, कायमचं..!
“बसुन भीक मागताय ना? बसुन फुलं विका – फुलं मी देतो.”
“बसुन भाजी विका – भाजी मी देतो.”
“बसुन रुमाल / स्कार्फ विका – रुमाल / स्कार्फ मी देतो.”
“पाय नाहीत? व्हिलचेअर देतो – व्हिलचेअरवर बसुन वस्तु विका.”
“ATM मशीनबाहेर वॉचमन लागतात – बसुनच काम आहे – कराल?”
“सोसायटीत मुलं सांभाळायचं काम आहे – कराल?”
“हॉटेलात पोळ्या करायचं, भाजी निवडायचं काम आहे, बसुनच – कराल?”
मी पर्याय देत राहतो…
आणि आमच्यातलं नातं टिकवण्यासाठी “माझी” झालेली ही माणसं मग कामं करायला तयार होतात…
एक भिक्षेकरी मग एक कष्टकरी होतो… माणुस होतो! गांवकरी होतो..!
*गेल्या तीन वर्षांत ५३ आजी आजोबा याच अस्त्राने जिंकलीत… आता हे लोक काम करतात, सन्मानानं जगतात…*
भेटणारे लोक मला पुढे विचारतात, “अहो, आम्ही पण या भिका-यांना सांगतो काम करा म्हणुन… आमचं का ऐकत नाहीत मग ते..?”
कसं ऐकतील ते तुमचं? का ऐकावं यांनी तुमचं?
जरा विचार करुन पहा…
आपण कुणाचं ऐकतो..? ज्यांच्यावर आपला विश्वास आहे त्यांचं..!
मग तो आपला मित्र असेल, मैत्रिण असेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, वडील असतील किंवा आणखी कुणी…
इथं नातं नसतंच महत्वाचं… महत्वाचा असतो तो विश्वास!
एखाद्यावर विश्वास असेल तरच आपण विश्वास ठेवतो ना त्याच्यावर?
तुमच्यावर विश्वास बसेल असं नातंच तुमच्यात आणि त्यांच्यात तयार होत नाही… मग या बिगर विश्वासावर ते तुमचं का ऐकतील? कसं ऐकतील?
डॉक्टर फॉर बेगर्स या नात्याने मी फक्त ही नाती तयार करतो…
त्यांच्या आणि माझ्यात विश्वास निर्माण करतो, किमान तशी परिस्थिती तयार करतो..!
आणि हे नातं आणि विश्वास तयार झाल्यावरच ते माझं ऐकतात.. तोपर्यंत नाही..!
किती वेळ लागतो हो डॉक्टर, हे नातं निर्माण व्हायला…? त्याही पुढे जावुन लोक मला विचारतात…
नातं हे गणित आहे का? कसं सांगणार मी याचं ऊत्तर?
पण एक कळलंय…
माझ्यातला मी पणा सोडला…
तु हा तु नाहीसच… मीच आहे तुझ्यात हे एकदा स्वतःला समजलं…
तुला लागलंय, पण वेदना मला होताहेत, हे समोरच्याला जाणवुन दिलं…
की मगच नाती तयार होतात…
वेळ किती लागेल माहित नाही… नातं तयार होतं हे मात्र पक्कं ..!
फक्त भिक्षेक-यां बाबतच नाही, वैयक्तिक आयुष्यातही हाच नियम लागु पडतो, नाही का???
एक सांगु? आपल्याला वेद नाही समजले तरी चालेल, वेद वाचता नाही आले तरी काहीच बिघडत नाही… पण… कुणाची तरी “वेदना” समजुन घेता यायला हवी..!
ज्याला ही “वेदना” समजली तो खरा “वैद्य”..!
मी आणि मनिषा असेच वैद्य होण्याचा प्रयत्न करतोय..!
खरं सांगतो, वेदना समजुन घेणारा असा “वैद्य” होण्यास कुठल्याही डिग्री आणि डिप्लोमाची गरज नाही…
एक हृदय असलं तरी पुरे… बाकी सारं झुठ..!!!
Leave a Reply