अं… हो, हाच तो अब्दुल..!
याला पोलिओ झाला होता… पायात जीव नाही… पाटाला चाकं लावुन गेल्या २० वर्षांपासुन भीक मागतो… कँपातल्या सेंट अँथनी चर्चजवळ…
हां… ही अब्दुल शेजारी भीक मागत उभी आहे ती आसिफा… वय असेल चाळीस एक वर्षे… ही अब्दुल ची बायको… हां बरोब्बर, बेगम..!
हा जो बाजुला तरणा २० वर्षाचा पोरगा दिसतोय ना…
भीक मागत, वयानुसार थोडी मस्ती करत, दादागिरी करत उभा आहे, तो आसिफ… अब्दुलचा मुलगा..!
आणि ती… तिकडे… अहो तिकडे… हां… तीच! ती बसल्येय ना एक गोड मुलगी, तीचं नाव परवीन..!
हिचं वय असेल १७ वर्षे… ही पण अब्दुलचीच मुलगी…
तीच्या मांडीवर बाळ पाहिलं..! हां… एकच वर्षाचं आहे ते… हो… ते परवीनचंच..!
तीचं म्हणे लग्न झालं होतं… (???) आणि नव-यांनं सोडलंय तीला..!
तर हे पाच लोकांचं कुटुंब मुळचं “अक्कुबाई पाटोळी” नावच्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं..!
सध्या मुक्काम पोस्ट पुण्यातला रिकामा असेल तो फुटपाथ..!
या नावाचं गाव मी उभ्या जन्मात पहिल्यांदाच ऐकलं होतं, सात आठ महिन्यांपुर्वी..!
या कुटुंबाला मी भेटलो सात आठ महिन्यांपुर्वी..!
अमिताभ बच्चनचा मी जबरदस्त फॅन…
त्यांच्या एका पिक्चरमध्ये पाटावर बसुन भीक मागणारं एक कॅरेक्टर होतं… त्याचंही नाव अब्दुलच..!
आमच्या या अब्दुलने हा पिक्चर १० – १२ वेळा पाहिलाय…
गंमत अशी, की हा अब्दुलही बच्चन साहेबांचा फॅन…
बस्स, अमिताभ बच्चन… हा एव्हढा एकच धागा पकडत या अब्दुलची आणि माझी “जान पैचान” झाली..!
हा अब्दुल मला भेटला, कि गंमतीनं मी विचारायचो, “क्युं मियाँ, बच्चन साब मिले के नहीं..!
तो मिश्किल पणे म्हणायचा, “आवो डॉक्टर, बच्चन सायेब आत्ताच येवुन गेले, म्हणाले, डॉक्टर दिसत नाहीत कुठे ? माझा सलाम सांग डॉक्टरांना..!”
आम्ही मनमुराद हसायचो..!
मी म्हणायचो, “क्या अब्दुलभाई… कैसे हो..!”
“हां… डॉक्टर मस्त आहे मी..!”
“सलाम आलेकुम अब्दुल भाई…”
यावर तो “वालेकुम अस्सलाम” म्हणण्याऐवजी “नमस्कार डॉक्टर साहेब” असं म्हणायचा..!
एक लक्षात आलं ?
मी हिंदीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो मराठीत देतो..!
मला नेहमी या गोष्टीचं नवल वाटायचं…
मग मी याला मुद्दाम छेडायचो…
“क्युं भाई, अब्दुल बेगम कैसी है तुम्हारी..!”
“तुमी गोळ्या दिल्या डॉक्टर, बरी आहे ती आता…”
“अच्छा और तुम्हारी बेटी? परवीन..! कहीं दिख नही रही है वो..!”
“हां, आसल ना डॉक्टर, बाळाला घेवुन तिकडं बसली आसंल…”
मी हिंदीत “सवाल” करतो, हा मराठीत “उत्तर” देतो..!
मला खुप नवल वाटायचं…
एकदा धाडसाने मी त्याला विचारलं हिंदीतुनच, “भाई, मै हमेशा तुमसे हिंदी बोलता हुँ, तुम हमेशा मराठी में जवाब देते हो, ऐसा क्युं..?”
तो हसला… त्याने अर्थातच मराठीत उत्तर दिलं…
जे उत्तर दिलं, त्यानं मी हेलावुन गेलो…
तो म्हणाला, “माझ्याशी बोलतांना तुम्ही हिंदीत बोलता म्हणजे मला…, “अब्दुलला” मान देता… Respect देता..!”
“मी पण त्याचं उत्तर, मराठीत देवुन “तुम्हाला” मान देतो…”
“मान जसा घ्यावा तसा द्यावा सुद्धा, नाही का डॉक्टर..!”
Give and Take Respect…
या वाक्याचं जगात इतकं सुंदर उदाहरण दुसरं शोधुन सापडणार नाही..!
तेव्हापासुन मी या माणसाकडे ओढला गेलो…
याची आसिफा बेगम माझी बहिण झाली… आणि परवीन आणि आसिफ हि तरणी पोरं मला मामु म्हणतात..!
परवीन तर तीच्या एक वर्षाच्या मुलाला… मी आलो की उठवते, आणि म्हणते “नाना (आजोबा या अर्थाने) आया देक तेरा… दुद नयी पियेंगा तो सुई मारेंगा… चल दुदु पीले…”
या वयात कुणी मला आजोबा म्हटलेलं मुळीच आवडलं नसतं एरव्ही…
पण परवीनच्या मुलाचा “नाना” व्हायला मला आवडतं…
पेशंट सोडुन या पिल्लाचा मी आजोबा होवुन जातो, कळत नसतांनाही त्याला गोष्टी सांगत राहतो, रस्त्यावरच!
चर्च समोरच, फुटपाथवर या पिल्लाचा जन्म झाला म्हणुन या पिल्लाचं नाव अब्दुल ने “येशु” ठेवलंय..!
“त्या” येशु ची आई मेरी… “या” येशुची आई परवीन..!
नावं काही असोत, आईला नाव नसतंच… आई नावाची एक वृत्ती असते, प्रवृत्ती असते..!
ती कधी “मेरी” च्या रुपात येते तर कधी “परवीनच्या”, तर कधी “यशोदेच्या”..!!!
जगात कुणीही सोबत नसतांना आहे ईथेच मी तुझ्यासोबत … म्हणते ती आई..!!!
तर..,
हा अब्दुल, याच्याकडे पुर्वी स्वतःचे टेंपो होते… पण परिस्थिती आणि जवळच्यांनी दगा दिला… एका रात्रीत रस्त्यावर आला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या छोट्या गावात कसं होणार म्हणुन नशीब काढायला पुण्यात आला…
अपंग अब्दुलला कुणी नोकरी दिली नाही, हा माणुस पायाने अधु असुनही टेंपो चालवतो यावर कुणी विश्वास ठेवला नाही… “न जाणो, या बाबाने टेंपो कुठं धडकवला तर केव्हढ्याला पडेल?” या विचाराने कुणी त्याला दारातही उभं केलं नाही…
आख्ख्या कुटुंबाचं पोट एकट्या अब्दुलच्या अपंग पायावर उभं होतं…
या अधु पायाला ते झेपत नव्हतं…
आणि मग कुणीतरी सल्ला दिला, “जा… चर्च के सामने भिख मांग… पेट तो भर जायेगा…”
तेव्हापासुन आजपर्यंत १५ – २० वर्षे चर्चसमोर आख्खं कुटुंब घेवुन हा भीक मागतो..!
खरंतर अब्दुल हा अत्यंत कष्टाळु, पण परिस्थितीने त्याला गुलाम बनवलं…
कुणीच याला हात दिला नाही, जवळ केलं नाही, समाजाने याला कधी स्विकारलंच नाही…
फुलपाखरु सुद्धा ख-या फुलांवरच बसतं…
कागदाचं फुल कितीही आकर्षक असलं तरी फुलपाखरु त्यावर कधीच बसत नाही..!
कारण ख-या फुलांतच मध असतो, खोट्या फुलांत तो कुठुन येणार ?
मध नसलेल्या ख-या फुलाचीही किंमत मग कागदाच्या कस्पटासमान होते…
किंमत असते मधाला… तुमचं “फुल” असणं महत्वाचं नसतंच..!
अब्दुल असाच..!
बिन मधाच्या कागदाच्या फुलासारखा!
लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात… मावळतीच्या नाही…
मी अब्दुलला नेहमी म्हणायचो, “मियाँ तुममे गाडी चलाने का हुनर है… कुछ काम करो, ड्रायव्हर कि नौकरी दिलाने कि कोशिश करता हुँ… करोगे ? कुछ काम करोगे तभी कुछ हो पायेगा…”
तो नुसताच निष्प्राण हसायचा…
त्याचं ते निष्प्राण हसणं मला टोचायचं…
दरवेळी माझं हेच म्हणणं आणि त्याचं ते निष्प्राण हसणं..!
एक दिवस तो आला, म्हणाला, “डॉक्टर, मी काम करावं अशी तुमची इच्छा आहे ना ?”
“हो…”
“मग मला एक टेंपो विकत घेवुन द्याल..!”
यावेळचं बोलणं निष्प्राण नव्हतं… त्यात ठिणगी होती..!
“ट्…ट्…टेंपो..! विकत ? मी ..! कसं..! अब्दुल… ???”
मला काही सुचेना… तो असं काही मागेल असं वाटलं नव्हतं मला…
चार महिन्यांपुर्वी बोललेली त्याची वाक्यं रोज माझ्या कानात घुमायची…
टेंपो घेवुन दिला तरी हा काय करेल त्या टेंपोचं दिवसभर एकच विचार..!
रस्त्यानं एकदा जाताना असाच एक टेंपो पाहिला, टेंपोच्या मागच्या भागात modification करुन टेंपोचा मालक बर्गर तयार करुन विकायचा..!
इथला धंदा झाला की गाडी घेवुन पुन्हा दुस-या एरियात… भारीच की..!
अच्छा, आपणही असाच टेंपो विकत घेवुन मागच्या भागाला modify केलं, एक छोटं दुकानच तयार केलं, आतुन स्वयंपाकघरात असते तशी वस्तु ठेवण्यासाठी मांडणी बनवली… तर हा अब्दुल एक चालतं दुकानही चालवु शकेल या टेंपोतुन..!
इथं व्यवसाय झाला की निघाला दुस-या एरियात… झक्कास..!
अब्दुल हे ऐकुन हरखला…
आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीत बोलत मला म्हणाला होता, “अल्लाह की कसम डॉक्टर साहब, ये आपने मुझे करके दिया तो जींदगी में वापस भिख नही मांगुंगा..!”
“करोगे ना मदद..!”
कळवळुन विचारलेल्या त्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे हिंदीतही नव्हतं आणि मराठीतही..!
सगळा मिळुन चार-पाच लाखाच्या घरातला खर्च करणार कसा?
मी भिका-यांचा डॉक्टर ..!!!
यातल्या माझ्या नावापुढच्या “भिकारी” या शब्दाची प्रकर्षानं मला जाणिव झाली..!
दोन आठवडे मी चर्चजवळ फिरकलोच नाही…
काय तोंड दाखवायचं अब्दुलला..?
माझ्या भिकारी असण्याची जाणिव, मीच किती वेळा करुन द्यायची त्याला..?
मी जायचंच बंद केलं…
पण, मग आठवायची, “भैय्या” म्हणत हातात हात घेणारी आसिफा…
मला पाहुन, हातात तुटकी चप्पल घालुन, एका हाताने रस्ता ढकलत, पाटावरुन सरपटत माझ्याकडे जीवाच्या ओढीनं येणारा अब्दुल…
मला मोटरसायकल वर बघुन, “अय… मामु आया…” असं लहान पोरांगत ओरडणारी परवीन आणि आसिफ…
आणि माझ्या सुईला घाबरुन दुदु पिणारं ते “येशु” नावाचं बाळ..!
सगळं सगळं आठवायचं..!
मी अगतिक होतो… इच्छा असुनही काहिच करु शकत नव्हतो…
काय करु…काय करु…काय करु..??
वाटायचं, आपण मंदिरात जावुन प्रार्थना करत नाही म्हणुन देवाने चिडुन आपल्यावर अशी वेळ आणलीय का ?
कि मी मशिदीत जावुनही कधी चादर चढवली नाही म्हणुन अल्लाह रागवला आहे ?
कि कधी चर्चमध्ये गुडघे टेकुन क्रुसाचं चुंबन घेतलं नाही म्हणुन येशु रुसला आहे ?
मी आतापर्यंत कुणाला धीराचे शब्द देणं यालाच प्रार्थना समजलो देवा…
थंडीनं गारठलेल्याच्या अंगावर शाल टाकणं, यालाच चादर चढवणं असं समजलो मी या अल्लाह…
कोसळणा-या म्हाता-या हातांनाच मी क्रुस समजुन चुंबन घेतलं My dear Jesus…
मग मी मंदिरात मशिदीत आणि चर्चलाच यायला हवं हा तुमचा अट्टाहास का..??
मला माहीत नाही, पण विचारलेल्या या प्रश्नांची आपोआप उकल झाली…
जोरदार पाऊस यावा आणि आभाळ पुन्हा स्वच्छ व्हावं तसं झालं…
सोहम ट्रस्टला सर्व सहृदांनी आशिर्वाद रुपी दिलेल्या देणग्या, सोहमच्या शिक्षणासाठी साठवलेले थोडे पैसे, एक दोन मित्रांनी मदत म्हणुन दिलेली रक्कम, आणि सर्वात महत्वाचं… चर्च मध्ये येणारे, अब्दुलवर माझ्यासारखंच प्रेम करणारे एक दानशुर व्यक्ती (यांचा वाटा खुप मोठा…) या सर्वांच्या सहकार्यातुन Piaggio Appe या कंपनीचा नवा कोरा टेंपो आम्ही अब्दुलसाठी विकत घेतला..!
शोरुम मधुन चर्चसमोर टेंपो आणला…
गाडीसमोर गुडघे टेकले…
ज्या रस्त्यावर गाडी उभी होती, त्या रस्त्यावर माथा टेकवला आणि गाडीपुढे आपोआप हात जोडले गेले…
याला लोटले तीन महीने…
पण त्या दिवशी माझी प्रार्थनाही झाली, नमाझही पढला… आणि Prayer सुद्धा झाली..!
गाडी आली, माझा तर विश्वासच बसेना..!
यानंतरचा टप्पा, गाडीचा जो हौदा असतो, तिथंच दुकान तयार करायचं..! गाडी modify करायची..!!!
अर्थात यालाही पैसे हवेच होते…
पुन्हा जमलेल्या देणग्या, मनिषाचा खुप वर्षांपुर्वी केलेला एक छोटा दागिना कामास आले…
बर्गर विकणा-या गाडीवाल्याकडे जावुन, एक बर्गर खात खात मी त्याची गाडी निरखायचो…
एका बर्गर च्या बदल्यात मी त्या माणसाची आख्खी गाडी डोळ्यांनी चोरली होती…
आणि मग फॅब्रिकेटरला चित्रं काढुन दाखवत, अब्दुल कडुन Approve करुन घेत घेत माझ्या स्वप्नातली ती गाडी तयार करुन घेतली… नव्हे, आज तयार झाली..!
नवनिर्मितीचा आनंद काय असतो… काय सांगु शब्दांत… ?
आईला बाळ झाल्यावर, तीला आई झाल्यावर कसं वाटत असेल… तस्संच आई झाल्यागतच वाटलं मला..!
झाडाला पहिलं फळ आल्यावर झाडाला काय वाटत असेल..! ते झाडच झाल्यासारखं वाटलं मला..!
कुणीतरी कधीतरी चघळुन थुंकुन टाकलेल्या बी ला, पहिल्या पावसांत अंकुर फुटल्यावर काय वाटत असेल ?
आज मला मी बी झाल्यासारखं वाटलं..!
आज माझ्या या कुटुंबाला घेवुन आम्ही गाडी बघायला गेलो…
मी, अब्दुल, आसिफा, आसिफ, परवीन आणि येशु..!
गाडी पाहुन प्रत्येकाच्याच डोळ्यात आसवं आली…
कुणालाच शब्द फुटत नव्हते, प्रत्येकजण डोळ्यांत पाणी घेवुन एकमेकांकडे मुक नजरेनं पहात होता आणि नेमका याचवेळी परवीनच्या हातातला “येशु” हसत होता..!
परवीनच्या हातातल्या या “येशुचा” आणि चर्चमधल्या त्या “येशुचा” चेहरा सारखाच का भासावा मला आज ?
शेवटी गाडीची पार्टी अब्दुल देणार असं ठरलं…
आम्ही परत चर्चकडे आलो…
जीथं अब्दुल भीक मागायला बसतो, तिथंच आम्ही सर्वजण रस्यात मांडी घालुन बसलो…
आमची पार्टीची लगबग सुरु होती…
रस्त्यावरच पेपर अंथरले…
आसिफने चुरमुरे, फरसाण, कांदा, मिरची, खारे शेंगदाणे विकत आणले…
परवीन बाळाला सांभाळत प्लास्टिकच्या पिशवीतुन चहा घेवुन आली, सोबत पाच प्लास्टिकचे ग्लासही..!
“नानाकु चाय पिलायेंगा आज मेरा येशु”, असं काहीसं बोलत ती आमच्यात बसली…
आसिफाने भेळ तयार केली…
अब्दुल रस्त्यावर अंथरलेले पेपर सावरण्यात व्यस्त होता…
आणि मी…?
मी नुसताच पहात होतो, माझ्या जिव्हाळ्याच्या या माणसांची तगमग… माझ्यासाठी चाललेली..!
कसं असतं ना ? हे माझे कुणीच नाहीत तरीही खुप काही आहेत…
उजेडात तर सर्वच दिसतात, पण अंधारातही जी दिसतात ती नाती..!
दुष्मन होवुन जिंकण्यापेक्षा, जो दोस्त होवुन, स्वतःहुन हरतो ती दोस्ती..!
रस्त्यात राहुनही, जी पावसाच्या एका थेंबाने सुगंधीत होते ती खरी माती..!
ज्याच्याजवळ हि असली माती आहे, त्याला अत्तराची काय किंमत… अरे ह्याट्ट… या असल्या अस्सल मातीवर हज्जारो अत्तरं कुर्बान!!!
मी जायला उठलो…
अब्दुल गहिवरला…
“डॉक्टर, मी आता इथंच व्यवसाय करणार…”
“जो एखादा धंदा करतो त्याला शेठ असं बोलतात इथं लोक…”
“आज जीथं भिकारी म्हणुन २० वर्षं भिक मागीतली त्याच जागेवर मला पण लोकं आता शेठ म्हणतील…”
“मी आज एका गाडीचा मालक झालो…”
“मी आज एका दुकानाचा मालक झालो…”
“अल्लाह आपको खैरीअत बक्षे…”
रडतच त्याने मला मिठी मारली…
मी हसत म्हटलं, “अब्दुलशेठ, अभी फेंके हुए पैसे नही उठाना… याद है ना ?”
“बच्चन साब ने पहले ही बताया है..!”
तेवढ्यातुनही तो हसला..!
तिकडुन आसिफा आली, म्हणाली… “ऐ भैय्या, तुने आमर आकबर अँथनी फिलिम देकी है क्या…?”
म्हटलं, “हो… त्याचं काय..!”
“तेरा नाम आबिजीत, मेरे मरद का नाम आबदुल और ये अँथनी चरच के सामने हम भी भीक मांगते थे…”
“अब हुआ ना आबिजीत आबदुल अँथनी..!”
हे बोलुन ती हसायला लागली…
खरंच की मी हा विचारच नव्हता केला
अभिजीत अब्दुल अँथनी..!!!
मी हसतच गाडीला किक मारली…
तेव्हढ्यात आसिफा परत धावत आली, हातात हात घेतला, म्हणाली, “मेरकु सग्गा भाई नही हय, तु सग्गे से भी ज्यादा निकला रे…”
मी निघतांना अब्दुल, आसिफा, आसिफ, परवीन सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी होतं..!
एकटा तो खट्याळ “येशु” गालातल्या गालात हसत होता…
तितक्यातच अल्लाह हु अकबर ची अजान स्पिकरवरुन ऐकु आली…
आणि कुठुनतरी घंटानादही झाला…
या निनादात आज अभिजीत अब्दुल अँथनी जन्माला आला..!
अब्दुलला गुरुवारी १३ जुन ला सायंकाळी टेंपो द्यायचा मी ठरवतोय…
मी विचार करत होतो, कुणाच्या तरी हस्ते ही गाडी अब्दुलच्या ताब्यात द्यावी…
आसिफा ने हा प्रश्न सोडवला…
म्हणाली, “भैय्या, मेरकु मां बाप नही हय… तो तेरे मां बापच मेरे बी हुये ना… येक दीन मिला ना उनसे…”
आणि मी ठरवलं… ही गाडी अब्दुल आणि आसिफा ला माझे आईवडिल डॉ. पी. डी. सोनवणे आणि सौ. भारती सोनवणे यांच्याच हस्ते द्यायची..!
सेंट अँथनी चर्च, चार बावडी पोलीस स्टेशनजवळ, सेंट व्हिन्सेन्ट स्कुलजवळ कँप, पुणे या ठिकाणी गुरुवारी १३ जुन रोजी सायं ६ वाजता गाडीची पुजा करुन अब्दुल आणि आसिफा यांच्या ताब्यात गाडी देणार आहोत, जमल्यास यावे!!!
Leave a Reply