आमंत्रण..!

अभिजीत अब्दुल अँथनी या नावाने एक ब्लॉग लिहिला होता.

एका अपंग माणसाची जिद्द कशी त्याला स्वतःच्या पायावर उभं करु शकते याचं जिवंत चित्रीकरण या ब्लॉगमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे..!

अब्दुलला नुसताच टेंपो दिला नाही…

तर फुटपाथवर झोपणा-या अब्दुलच्या कुटुंबाला ताडिवाला रोडवर एक छोटं घर भाड्याने घेवुन देणार आहे! एकदा सेट्ल झाल्यावर पुढचं सारं काही तोच करेल…

त्याच्या मुलाला, आसिफला, पुढील आठवड्यात हातगाडी देत आहोत, कालच ही हातगाडी बुक करुन झालीय. या गाडीवर आसिफ छत्र्या आणि पावसाळी साहित्य विकेल…

एकुण काय माझी हि रस्त्यावरची आख्खी फॅमिली खुष आहे..!

मी आणि मनिषा त्याहुन जास्त..!!!

पण…पण…अब्दुलला आता एक चिंता सतावते, तो म्हणतो, “इतकी वर्षे भिकारी म्हणुन लोकं मला ओळखतात, आता समाजातले लोक मला स्विकारतील का..!”

“ताडिवाला रोडला रहायला गेल्यावर, आजुबाजुचे लोक आम्हांला स्विकारतील का..!”

“समाजातले लोक आमच्याकडनं वस्तु विकत घेतील का..!”

त्याला मी एव्हढंच सांगितलंय, “भावा, समाजातली खुप मोठी मोठी माणसं तुझं अभिनंदन करायला येणार आहेत…”

“तुला जर यांनी स्विकारलं नसतं… तर हे लोक तुला भेटायला आले असते का?”

“भिक्षेकरी होतास तेव्हा तुला भेटायला / अभिनंदन करायला कुणी येत होतं का..? नाही, मग आजच का येत आहेत..?”

“तर तुझ्यातल्या कष्टक-याला ते भेटायला येत आहेत…”

“अपंग असुनही पायावर उभा राहिलास… त्या जिद्दीला सलाम करायला ते येत आहेत…”

“तु भीक मागणं सोडलंस, स्वाभिमानानं जगायची शपथ घेतलीस त्या स्वाभिमानाला नमस्कार करायला येत आहेत…”

“तु आता भिक्षेकरी नाहीस, माझ्या स्वप्नातला गांवकरी झालास, त्या गावक-याला भेटायला येत आहेत..!”

हे ऐकुन त्याचा आत्मविश्वास वाढलाय!

कसं आहे, नुसतं पंख देवुन उपयोग नाही, सोबत उडण्याची जिद्दही द्यावी लागेल..!

आम्ही पंख दिलेत… उडणं तुमच्याकडुन शिकेल तो..!

म्हणुन; आपण पुण्यात असाल, सहज शक्य असेल तर जरुर या..!

आपण त्याच्याशी नुसतं बोललात तरी, समाजाने मला खरंच स्विकारलंय ही त्याची खात्री पटेल..!

बस्स एव्हढ्याचसाठी आपणांस हि कळकळीची विनंती..!!!

माझ्या आयुष्यातलं हे खुप मोठं पाऊल आहे…

मी कुणावर तरी खुप विश्वास ठेवतोय, तो अब्दुलकडुन मोडला जाणार नाही याची खात्री आहे..!

हे पाऊल उचलण्यासाठी मनिषा सोहम आणि सर्व कुटुंब तर सोबत होतेच, परंतु तुम्ही सर्वजण सोबत होतात म्हणुन हे शक्य झालंय… ऋण कसं व्यक्त करावं..!

माझी बहिण दिप्ती… “तुझ्यात जीव रंगला” मधील “चंदा”..!

मी तिलाही विनंती केली, “अब्दुलला भेटायला, माझं रस्त्यावरचं दुसरं कुटुंब पहायला तु येशील?”

ती चट्कन हो म्हणाली..!

मी म्हटलं, “अगं बाई, एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित रहायची तुझी “बिदागी” मला परवडणार नाही… मी पडलो भिका-यांचा डॉक्टर..!”

ती म्हणाली, “अब्दुल मला राखी बांधेल ना? मग झालं तर…”

अँथनी चर्चसमोर, अब्दुल दिप्ती ला राखी बांधेल यापेक्षा मौल्यवान बिदागी कोणती..!

सेंट अँथनी चर्च, चार बावडी पोलीस स्टेशनजवळ, कँप, पुणे.

गुरुवार दि. १३ जुन सायंकाळी वाजता !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*