केवळ माहितीसाठी..!!!

“अभिजीत अब्दुल अँथनी” नावाने लिहिलेल्या अब्दुलला टेंपो उर्फ चालते दुकान टाकुन दिलंय…

चहा तसेच तत्सम वस्तुंची विक्री तो करेल, यासाठी लागणाऱ्या वस्तु विकत घेण्याची तयारी सुरु आहे, असो!

अब्दुलचं काम पुढील आठवड्यात सुरु होईलच…

याचा मुलगा आसिफ उनाडक्या करत, फुकट वेळ वाया घालवत, आईबापाला भीक मागायला मदत करायचा…

या आसिफलाही कामाला तयार केलंय..!

हाताने ढकलायची नविन हातगाडी याच्यासाठी करुन घेतली आहे.

या हातगाडीवर पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्र्या विकायला त्याला तयार केलं आहे.

पावसाळ्याच्या मध्यावर, भाजलेल्या / उकडलेल्या शेंगा आणि कणिस विकायला लावणार आहोत.

पावसाळा संपल्यावर तो भाजी विकेल.

पहिला टप्पा म्हणुन शुक्रवारी (जुम्मा) २१ जुन रोजी आसिफला आधी नविन हातगाडी देत आहोत.

यानंतरच्या टप्प्यात विक्रीयोग्य वस्तु देणार आहोत.

मी कळवेनच..!

दोघंही बापलेक आता कामाला लागतील… आमचा फादर्स डे आशा रितीने हॅप्पी झाला..!!!

त्या दिवशी रस्त्यावरच मांडी घालुन आसिफशी गप्पा मारत असतांना, माझ्यावर प्रेम करणारे एक काका मला कानाजवळ येवुन बोलले, “डॉक्टर, असे रस्त्यातच बसता, बरे दिसत नाही, गाडीवर नेता येईल अशी फोल्डिंगची खुर्ची आणुन देवु काय..!”

मी काकांचं प्रेम समजु शकतो, पण कसं सांगु यांना..?

खुर्चीचा मोह सोडायला आयुष्यातली १५ वर्षे खर्ची घातलीत…

अधांतरी आणि लटकणा-या आयुष्यात आत्ताशी कुठं पाय जमिनीवर टेकलेत…

आत्ताशी तर जमिनीवर आलोय…

आता पावसात भिजायचं…

मग रुजायचं…

मग उगवायचं…

आणि स्वतः उगवता उगवता… दुस-यालाही जगवायचं..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*