एक भिक्षेकरी गृहस्थ, वय खुप नाही, रस्त्यावरच तपासलं, अत्यंत वाईट अवस्था! तपासण्या केल्या… रक्तातलं हिमोग्लोबीनचं प्रमाण २.५ !
१९ वर्षांत २.५ हिमोग्लोबीनचा “जिवंत” पेशंट प्रथमच पहात होतो…
मेलेल्या माणसाचं हिमोग्लोबीनसुद्धा यापेक्षा जास्त असतं…
उचललं, आणि ऍडमिट केलं…
तो जाणार याची सर्वांनाच ग्यारंटी..!
तो ऍडमिट असतांनाच त्याच्या डेथ सर्टिफिकेट विषयी चर्चा सुरु झाली..!
त्याला म्हटलं, “बरा झाल्यावर काम करशील का ?”
खालमानेनं म्हणाला, “मी जगणार का पण… ? माझं रक्त २.५…”
म्हटलं, “अंगात फक्त रक्त कमी आहे तुझ्या, रग नाही..!”
“रक्ताचा आकडा थोडा उतरलाय… रक्ताचा रंग नाही..!”
“ब्लड ग्रुप ‘बी पॉझिटीव्ह’ आहे तुझा… त्या ग्रुपला जाग..!”
“२.५ हा आकडा आहे फक्त…”
“आकड्याकडे लक्ष नको देवुस…”
“कारण आकडे आले कि हिशोब आला… हिशोब आला… की जमाखर्च आला… जमाखर्च आला कि गणित आलं… गणित आलं कि व्यवहार आला..!”
“आयुष्याचा व्यवहार करायचाच नाही…”
“कारण शेवटी बाकी कितीही उरली तरी समाधानी कुणीच नसतं..!”
“आपण बुद्धीबळातल्या घोड्याप्रमाणं २.५ पावलं टाकत का होईना, पण खेळायचं..!”
“या डावात जिंकलास तर एक ‘जीत’ तुझ्या नावावर… चिअर्स..!”
“हरलास तर एक ‘अनुभव’ तुझ्या नावावर… तरीही चिअर्सच..!”
“दोन्हीत फायदा आपलाच..!”
“जिंकल्याचा माज नाय करायचा आणि हरल्याचा शोक नाय करायचा..!”
“फक्त एक ध्यानात ठेवायचं, या डावात जी चुक केली, ती पुढल्या डावात नाय करायची..!”
“दरवेळी नविन चुक केली तरी हरकत नाही… किमान त्यापस्नं आपल्याला काही शिकायला मिळतं…”
“पण ज्या चुकीमुळं आपण डाव गमावला, तीच चुक पुन्हा करणं याला माफी नाही..!”
“दरवेळी नविन चुका कर, त्याच त्या चुका मात्र पुन्हा पुन्हा करु नकोस दोस्ता..!”
“आणि मी हे तुला ठणकावुन सांगु शकतो; कारण, जिंकण्यापेक्षा हरण्याचा अनुभव मला जास्त आहे..!”
“अरे, कुणी ‘पुरलं’ तर तिथ्थंच उगवायचं… आणि कुणी ‘पेरलं’ तर त्याला जगवायचं..!”
“एव्हढंच लक्षात ठेव!”
तो फक्त पहात राहिला…
आता त्याला न्यायला आलेला मृत्यु पायात घुटमळत होता…
असहायपणे गुदमरत तो म्हणाला, “काय करु मी आता..?”
म्हटलं, “बघतोस काय लेका ? बिडी विझवल्यागत टाक कि पायाखाली त्याला चिरडुन..!!!”
त्यानं पायाखाली चिरडलं होतं मृत्युला…
२.५ घरं खेळत खेळत तो डाव जिंकला..!
आज त्याला घेवुन दवाखान्यातुन बाहेर पडलो… टेचात..!
डेथ सर्टिफिकेटचे कोरे कागद डॉक्टरांच्या टेबलवर वा-यानं फडफड करत होते…
त्याच्याच हातात ते कागद दिले…
त्याने माझ्याकडं बघितलं…
म्हटलं, “बघतोयस काय दोस्ता… अरे तुझं डेथ सर्टिफिकेट याच्यावरच लिहीलं जाणार होतं…”
“टाक की फाडुन तुझ्याच हातानं, तुझंच डेथ सर्टिफिकेट..!
त्वेषानं त्याने ते फाडले… आणि उडवले आभाळात, गुलाल उधळावा तसे…
हो, गुलाल उधळावा तसंच… चांगभलं ..!!!
हेच कागदाचे कपटे थोड्या वेळानं त्याच्याच पायात पडले, निपचीतपणे… अलगद..!
या डेथ सर्टिफिकेटच्या कपट्यांना पायाखाली तुडवत आम्ही हॉस्पिटलातनं निघालो…
एखाद्या विजयी वीराप्रमाणे..!
त्याने माझ्याकडं हसुन पाहिलं… मी ही हसलो..!
शेजारुन एक रिक्षा गेली…
रिक्षात मोठ्ठ्यानं टेपवर गाणं लागलं होतं, “ऐ जिंदगी, गले लगा ले..!!!”
Leave a Reply