आज्जी..!!!

पर्वती पायथ्याजवळ मागत असणा-या तीन आजारी आज्ज्यांना, सोमवारी मी स्वतः तुम्हाला तपासणीसाठी मोठ्या डॉक्टरांकडे घेवुन जाईन असा वायदा केला होता.

सोमवारी सकाळी ९.30 ला अमुक ठिकाणी थांबा मी येतो असं सांगुन आलो होतो…

त्याप्रमाणे आज सोमवारी त्यांना घेण्यासाठी निघालो खरा… पण वाटेत एक फोन आला, आवाज अनोळखी…

समोरील व्यक्ती म्हणाली, “डॉक्टर, शिवाजीनगर मधल्या ज्या आजींना तुम्ही तपासायला येता, काल त्या पडल्या आहेत, उठता येत नाही, आम्ही माणुसकी म्हणुन सरकारी दवाखान्यातुन X-Ray काढलाय… आजी खुप विव्हळतेय, तुम्हाला फोन लावायला सांगितलाय तीने, लवकर याल?”

मला कळेना… दोन्हीकडे जाणं गरजेचं… शिवाजीनगर आणि पर्वती दोन विरुद्ध टोकं..!

हो ना करत शिवाजीनगर च्या आज्जीकडे गेलो… तीची वेदनेनं होत असलेली तडफड पाहुन वाटलं, बरं झालं आधी इकडेच आलो…

X-Ray पाहिला, उजव्या कमरेच्या हाडाचा पार भुगा झाला होता… विटेचा होतो तसा..!

दगडापेक्षा वीट मऊ ना..!

आणि आजीला आयुष्यात एकदाही “दगड” होताच आलं नाही..!

तीला ऍडमिट करण्यासाठी, मोडलेल्या पायानंच कसंबसं रिक्षात घातलं…

तोपर्यंत, माझ्यासमोरच दुस-या एका आजीने अक्षरशः डोळे पांढरे केले… श्वास कोंडला… जबरदस्त धाप लागली… मला नेमकं कुणाकडं बघावं कळेना…

घेतलं हिलासुद्धा रिक्षात…

“डॉ. कलशेट्टी” वैद्यकीय जगतातलं विश्वसनीय नाव! माझे ज्येष्ठ स्नेही..!

यांच्या रास्तापेठेतल्या समर्थ हॉस्पिटल ला दोघींना ऍडमिट केलं…

डॉक्टर्स या दोघींना ICU मध्ये सेट्ल करण्याच्या गडबडीत आणि मी नातेवाईक म्हणुन फॉर्म भरण्याच्या गडबडीत..!

दोघींना बरेच दिवस हॉस्पिटलला ऍडमिट रहावं लागणार हे एकंदर चर्चेतुन कळलं होतं..!

मधल्या वेळेत त्यांच्या दोन वेळच्या डब्ब्याची सोय केली… मेडिकल स्टोअरला जावुन, “जे लागेल ते मेडिसीन द्या, बिलं मी भरणार आहे” हे सांगुन झालं… दोघींना धीर देवुन झाला… मावशा आणि सिस्टर्सना “काळजी घ्या, मी येतच राहीन” हे सांगुन झालं..!

कमरेचं हाड मोडलेल्या मावशीच्या खुब्याचं हाड बदलुन तिथे “स्टिलचा खुबा” टाकावा लागेल…तरच ती उठेल… नाहीतर..!

डॉक्टर म्हणाले ते खरंच होतं..!

मी आवंढा गिळला…

लाखाच्या वरचं हे ऑपरेशन..!

मला कन्सेशन मिळेलच…

पण दुसरीही आजी ICU मध्येच आहे… तीलाही बरेच दिवस ठेवावं लागणार…

दोघींचा खर्च किती येईल..!

मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर अंदाजे  आकडेमोड केली…

खिशाचं, हॉस्पिटलचं आणि कॅल्क्युलेटरचं “गणित” काही केल्या जुळेना…

म्हटलं, जावुदे, ज्यानं मला पर्वतीला न जाता शिवाजीनगरला जाण्याची बुद्धी दिली, तो करेलच काहीतरी, शेवटी त्याचीही जबाबदारी आहेच की काही..!

पर्वती..? बाकड्यावर निवांत टेकुन बसलेला मी ताड्कन् उठलो… आपण या दोघींच्या नादात पर्वतीला गेलोच कुठे..!

बापरे, आत्ता १२ वाजलेत, मी १० लाच पोचणार होतो तिकडे, आणि त्या ९ पासुनच वाट पहात बसल्या असतील… माझी वाट बघुन आज्ज्या थकुन जातील… पण मी हॉस्पिटल सोडणार कसं..!

भुवड ताईंना फोन केला, “तुम्ही आज्ज्यांना आणाल?” तर नेमक्या त्या पुण्याबाहेर ..!

ऐनवेळी कुणाला सांगु..!

मोबाईल मधली कॉन्टॅक्ट लिस्ट गडबडीनं काढली… डॉ. राहुल गोंधणे… नुकताच डॉक्टर झालेला हा मुलगा… नेहमी म्हणतो, “सर कायतरी काम सांगा ना?”

राहुलला फोन लावला, “राहुल… आज्ज्यांना आणायला जमेल?” मी काकुळतीनं बोललो…

“सर मी गावाकडं आलो होतो, पुण्यालाच येतोय, ट्रेनमध्ये आहे… 15 मिनिटांत पुणे स्टेशनला पोचतो आणि आणतो त्यांना…”

तो बिचारा हो म्हणाला…

पण पुणे स्टेशनला तो येणार.. नंतर पर्वतीला जाणार, आणि त्यापुढे  आज्ज्यांना घेवुन परत रास्ता पेठेत येणार… कसं जमायचं..?

पर्याय नव्हता… मी “हो” म्हणालो…

बरोब्बर दोन तासांनी राहुल तीनही आज्ज्यांना घेवुन माझ्यासमोर हजर…

मी त्याचे हात धरले… खरंतर पायच धरायला हवे होते..!

यातल्या एका आजीला खुप त्रास होता, ती सकाळी ९ ते २ पर्यंत माझी रस्त्यावरच वाट पहात होती…

मला समोर बघुन ती चिडली… धापा टाकतच ती मला बोलली…

“तुला काय लाज हाय का..! आमाला ९ पस्नं कशाला बलीवलंस? येता येत न्हाई तर वायदा कशाला करतु? आमी काय मान्सं न्हाईत का..!” वैगेरे वैगरे…

मी तीच्या बडबडणा-या तोंडावर माझा तळहात दाबुन धरला… तीला जवळ घेतलं… आणि म्हटलं… “म्हातारे, गप, आगं बाकीच्या पण आज्ज्या होत्या… आणि…”

माझा हात झटक्यात उडवुन लावत ती म्हणाली, “तोंडावर हात दाबतु? आता काय जीव्वं मारशील का काय..!”

माझ्या या म्हातारीचा माझ्यावरचा राग जातच नव्हता..!

शेजारी उभी असलेली, मला इतकावेळ अदबीनं सर म्हणणारी केरळी सिस्टर… तीला हे प्रकरण वेगळंच वाटलं असावं…

आश्चर्याने मला ती  म्हणाली, “Who is that lady..! How she can behave like this with you doctor?”

तीला म्हटलं, “She is my grandmother, sister..!”

“Oh is it..!”

वरपास्नं खालपर्यंत आज्जीला आश्चर्याने न्याहाळत ती बोलली..!

आज्जी इंग्रजीतलं आमचं हे संभाषण ऐकुन अजुन चवताळली…

“काय म्हन्ती रं तुला ही सटवी?” म्हणत आजी पुढे आली… केरळी सिस्टर तीचा आविर्भाव पाहुन पळुन गेली…

शेवटी तीला बाकावर बसवुन, सकाळपासुन झालेला प्रकार सांगितला, हात जोडुन म्हटलं, “म्हातारे माफ कर… असं असं झालं बघ..!”

तीच्या डोळ्यात अश्रु तरळले… “व्हय रं लेका… तुला माजंबी आयुक्ष लागुंदे”, म्हणत तीनं कडाकडा बोटं मोडली..!

या आज्ज्यांचं प्रेम हिच खरी माझी ताकद… बाकी सारं शुन्य!

डॉक्टरांनी या ही तिघींना तपासलं आणि प्रेमानं माझ्याशी भांडणा-या आजीला ICU मध्ये भरती केलं…

इतर दोघींना औषधी देवुन रवाना केलं..!

आधीच्या दोन, आताची एक… एकुण तीन पेशंट… तिघींचे आजार गंभीर..! तिघी ICU मध्ये..!

मी पुन्हा मोबाईलमधलं कॅल्क्युलेटर काढलं… गणितं जुळत नव्हतीच, अर्थातच..!

तिघींनाही आज समर्थ हॉस्पिटल, के. ई. एम हॉस्पिटल जवळ, रास्ता पेठ पुणे इथं ऍडमिट केलंय..!

पुढचं नक्की काय होणार?  कसं होणार? तिघी नीट होणार का? बिलं भागणार का?

आज आत्ता या क्षणी मला खरंच माहीत नाही..!

पण एक नक्कीच माहित आहे, जे होईल ते चांगलंच होईल..!

आणखीही एक माहित आहे, माझ्यावर प्रेम करणा-या आज्ज्यांचा आशिर्वाद पोकळ नाही..!

ज्या आज्ज्यांचा प्रेमाचा हात माझ्या तोंडावरुन फिरतो, तो हात मला तोंडघशी कधीच पाडणार नाही..!!!

म्हातारे असले तरी खुप ताकद आहे त्या सुरकुतलेल्या हातात..!

माझा आणि मनिषाचा मनोमन नमस्कार, या सुरकुतलेल्या हातांना… आणि झिजलेल्या त्या पायांनाही..!

काय लिहावं अजुन..?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*