कबड्डी… कबड्डी… कबड्डी…!!!

आयुष्य कसं कबड्डी सारखं झालंय..!

समोरुन कुणीतरी अंगावर चाल करुन येतं आपल्याला नामोहरम करायला…

आपण आपल्या लोकांचे हात धरुन साखळी बनवुन समोरच्या संकटापासुन स्वसंरक्षण करण्याचा प्रयत्न करतो…

कधी समोरचा बेधडक अंगावर येतो… आपण मागं सरकतो…

कधी आपण आक्रमक होवुन त्याला मागे ढकलण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो… तो ही मागं सरकतो…

या झटापटीत त्याने आपल्याला स्पर्श करुन मधल्या रेषेला हात लावला की आपण “आऊट”, खेळातुन बाद!

बरं हा समोरचा किती जणांना स्पर्श करुन बाद करेल हे कुणालाच माहीती नसतं…

एकावेळी हा किती जणांना “आऊट” करेल याचा अंदाज नाही!

आपल्याला आऊट करण्याआधी जर मुसंडी मारुन त्याला पकडुन ठेवलं… मधल्या रेषेला हात लावु दिला नाही तर मात्र तो “आऊट”… खेळातनं बाद!

आता त्याला आऊट करायचं कि आपण खेळ सोडायचा..?

समोरच्याला जर आऊट करायचं असेल, नामोहरम करायचं तर मात्र आपल्या गड्यांशी आपला मेळ हवा…

स्वतः आऊट न होण्याची काळजी घेत आपल्यासोबतचा आपला गडी आऊट न होवु देणं, तशी काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं!

त्याहुन महत्वाचं म्हणजे आपल्या गड्याला आपण त्याची काळजी घेतोय, स्वतःबरोबरच आपण त्यालाही जपतोय हे त्यालासुद्धा प्रकर्षानं कळायलाच हवं..!

त्यासाठी प्रत्येकवेळी बोलुन दाखवायलाच हवं असं नाही…

काळजी ही शब्दांतुन व्यक्त होत नसते… ती व्यक्त होत असते, आपल्या वागण्यातुन!!!

आपल्यासोबत असणा-या, आपल्या सोबत जगणाऱ्या “आपल्या” गड्यांची काळजी घेत खेळलं की जिंकायची शक्यता वाढते…

मग ती कबड्डी असो कि आयुष्य!

“आऊट” झालोच चुकुन कधी, तर आपल्यामागं हळहळणारं कुणी आहे याचा आनंद जिंकण्यापेक्षा जास्त!

जिंकल्यावर आनंद साजरा करायला आपलं कुणीही सोबत नसणं यापेक्षा मोठं दुःख्खं नाही…

हरल्यावर सांत्वनासाठी का होईना… पण आपलं कुणी सोबत असणं यात खरं सुख!

कधी जिंकायचं यापेक्षा कुठं हरायचं हे कळणं जास्त महत्वाचं..!!!

आपल्या असण्यानं कुणाला तरी त्रास होतोय हा आपला खरा पराभव..!

आपल्या नसण्यानं कुणाला तरी त्रास होतोय ही खरी जीत..!

असो,

अशा कुणीच सोबत नसणाऱ्या, जवळचं कुणीही नसणाऱ्या तीन आज्यांच्या आयुष्याची कबड्डी सुरु होती…

यांच्याकडे, यांच्याबाजुनं खेळणारं कुणीच नव्हतं..!

या तिघीही आपापल्या रिंगणात एकट्याच..!

समोरुन जबरदस्त आक्रमक चाल व्हायची…

आता आजी “आऊट” होणार… तीला “खेळ” सोडावा लागणार असंच सर्वांना वाटायचं…

प्रत्येकवेळी कबड्डीत ओढलेल्या त्या आडव्या मृत्युरेषेपर्यंत जावुन त्या परत यायच्या…

कसं कोण जाणे मलाही माहित नाही, पण या खेळात कुणीतरी मला या आज्ज्यांचा “भिडु” म्हणुन ओढलं…

मला जमेल तसं मी तीनही आज्ज्यांच्या बाजुनं खेळलो..!

मृत्युरेषेपर्यंत पोचलेल्या या आज्यांनी कमाल केली..!

तिघीही जिद्दीनं खेळल्या…

इतक्या जिद्दीनं कि, प्रतिस्पर्धी आता निघुन गेला, जाताना याच प्रतिस्पर्ध्यानं तीनही आज्यांच्या जिद्दीला प्रणाम केला..!

मी आणि माझ्या तीनही आज्ज्या, आम्ही खेळ जिंकलो..!

आम्ही आता हि कबड्डीतली आडवी मृत्युरेषा पुसुन टाकलीय… या रेषेचं नाव आजपासुन जीवनरेषा..!

तिघी जाताना म्हणाल्या, “चल तुज्या संगट आमचा फुटु काड…”

“का? फोटो कशाला?”

“ल्येकाबरुबर फुटु नगो का? त्येवडीच आटवन बाळा..!”

“आज ना उंद्या जायाचंच… गेल्यावर आमची आटवन तरी काडशील फुटु बगुन..!”

“आमी गेल्यावर भित्तीला टांग…” पदराआडुन एक आज्जी हसत म्हणाली!

फोटो काढला नी म्हटलं, “म्हातारे, ह्यो फुटु, मी भित्तीला न्हाय टांगनार… ह्यो फुटु माज्या मनात आडकलाय आन् त्यो तित्तंच -हायील मी मरुस्तवर ..!”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*