आपल्या माहितीस्तव सादर..!!!

काल भिक्षेक-यांच्या पुढच्या बॅचची डोळ्यांची ऑपरेशन्स झाली.

कुणाला चष्मा, कुणाला नुसतीच औषधं… आणखीही बरंच काही!

आजपावेतो, २०० भिक्षेक-यांच्या ऑपरेशनचा टप्पा आपणां सर्वांच्या आशिर्वादानं केव्हाच पार करुन झालाय…

यात लेले हॉस्पिटलच्या डॉ. वैभवी रावळ मॅडम आणि सर्व स्टाफचा मोठा वाटा!

त्याहुन मोठा वाटा, श्री. भुवड बाबाभुवड ताई यांचा, संपुर्ण डोळ्यांचा विभाग हे एकहाती सांभाळतात, आणि यांच्यावर सारं सोपवुन मी निर्धास्त!

आपणां सर्वांचाच मी ऋणी आहे!!!

परवा एका कार्यक्रमात एका संस्थाचालकांची भेट झाली, सहज बोलता बोलता म्हणाले, “किती ऑपरेशन केलेत..?”

मी आमचा आकडा सांगितला, म्हणाले… “बास, एव्हढेच..?”

“आम्ही ५००० च्यावर डोळ्यांची ऑपरेशन केलीत..!”

खरंय, केली असतीलही यांनी एव्हढी ऑपरेशन्स..!

यात तुलना नाही, पण यानिमित्ताने एक विचार डोक्यात आला…

सर्वसामान्य शिकलेल्या माणसाला डोळ्यांचं महत्व कळतं, ते सुशिक्षित असतात, त्यांना ऑपरेशनची तारीख, फॉलोअप, ऑपरेशननंतर घ्यायची काळजी हे सर्व कळतं…

शिवाय ते स्वखर्चाने दिलेल्या वेळी, सांगितलेल्या स्थळी येतात..!

भिक्षेक-यांचं तसं नाही…

डोळ्याची तपासणी करुन घेवु, ऑपरेशन करावं लागेल नाहीतर आंधळे व्हाल, हे त्यांना पटवायलाच दोन महिने जातात आमचे.

त्यानंतर ऑपरेशन ठरलं, तर अनंत अंधश्रद्धा आणि गैरसमज आड येतात…

कुणी म्हणतं, “भुल देवुन किडन्या काढतील”, कुणी म्हणतं, “भुल देवुन आमचं रक्त काढुन घेतील”, कुणी म्हणतं, “अमका देव कोपेल”, कुणी म्हणतं, “ऑपरेशन मध्ये आमचा जीव गेला तर?”

हातापाया पडुन एखादं दुसरं कुणीतरी ऑपरेशन किंवा तपासणीला मग तयार होतं..!

एव्हढं केल्यावर, इतर लोकांना वाटतं, हा डॉक्टर भिक्षेक-यांच्या इतका मागं लागलाय ऑपरेशनसाठी, म्हणजे याचा निश्चित काहीतरी फायदा असणार… काय बोलावं मी?

एव्हढ्यातुन झालंच ऑपरेशन तर डोळ्याची काळजी रस्त्यावर कशी घ्यायची हे सांगतांना जीव मेटाकुटीला येतो…

ऑपरेशन नंतर किमान ५ वेळा यांना तपासायला आणावं लागतं, ते ही एका ठरावीक वेळेतच…

हे लोक काही एका जागेवर थांबलेले नसतात…

मग त्यांना शोधा… गाडीत बसवा…

आणि आणा हॉस्पिटलला…

झालं काम, की परत एकेकाला हाताला धरा… आणि जीथुन आणलंय तिथं परत नेवुन सोडा..!

बरं यांना तारीख, वार काहीच कळत नाही..! मग?

एखाद्या ठिकाणी अमुक तारखेला थांबा हे सांगायचं कसं..?

मग कॅलेंडर बघायचं… त्यातल्या अमावस्या, पौर्णिमा किंवा धार्मिक सण शोधायचे आणि त्याआधारे त्यांना तारीख द्यायची…

म्हणजे, अमावस्येच्या आधीच्या गुरुवारी अमक्या ठिकाणी थांब, पौर्णिमा झाल्यावर तीन दिसांनी तमक्या ठिकाणी थांब…

ईद च्या आधी दोन दिवस इथं ये… दसरा झाला कि बरोब्बर चार दिसांनी तुझं ऑपरेशन…

चतुर्थी च्या आधीचा एक दिवस, चतुर्थी नंतर बरोबर पाच दिसांनी जायचंय आपल्याला, ज्यादिशी एकादशी हाय त्याच दिवशी हित्तंच थांब… आळंदीवरनं वारी सुटली की दोन दिसानं जावु, पंढरपुरला वारी पोचल्यावर दोन दिसानं पलीकडं थांब… हुश्श..!!!

हे असं सगळं करत करत आमची वरात शेवटी डोळे तपासणीला आणि ऑपरेशनला येते..!

खुप धावपळ होते… त्रास होतो…

पण…
जेव्हा यांना दिसायला लागतं, तेव्हा मात्र याच आज्ज्या गालावरनं हात फिरवतात, न चाचपडता जिन्याच्या पाय-या उतरतात… समाधानानं सांगतात, “आता भारी दिसायला लागलंय”, तेव्हा वाटतं, यार जग जिंकलं आपण ..!

एक आज्जी प्रेमानं मागच्या महिन्यात म्हणाली, “मरायच्या आधी मला तुला खड्याची आंगठी करायची हाय… घालशील ना?”

मी हसलो होतो…

सहज वाटलं कित्येक खडे धुळ खात वर्षानुवर्षे रस्त्यावर पडलेले असतात, त्यांना कुणी विचारत नाही..!

काही खडे धान्यात असतात, यांनाही काही किंमत नसतेच, वेचुन वेचुन यांना फेकुन देतात…

पण काही खड्यांचं नशीबच वेगळं…

हे खडे एखाद्या दागिन्यात ऐटीत जावुन बसतात… यांची किंमत वाढते..!

असो!

रस्त्यात पडलेले… वेचुन वेचुन फेकलेले खडे हेच आमचे दागिने…

दागिन्यातले खडे आमचे नाहीतच, कारण ते कितीही किंमती असले तरी आशिर्वाद देत नाहीत..!

आपण “किंमती” आहोत, या “भावात”… त्यांचं “मोल” ते स्वतःच कमी करुन घेतात..!

याऊलट, फेकलेल्या आणि पडलेल्या खड्यांना वेचुन उराशी धरलं कि ते आशिर्वाद देतात…

व्यवहारात अशा खड्यांना किंमत नसतेच… तरीही त्यांचं मोल जास्त असतं…

बाजारात ते महाग नसतात तरीही ते मौल्यवान असतात..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*