श्रीमंती..!!!

बरोब्बर मागचा शनिवार! नेहमीच्या मंदिरात गेलो होतो… माझ्यावर विशेष माया करणारी, अत्यंत वयस्कर अशी नेहमीची आजी मात्र इथं दिसली नाही. ही खुप आजारी…

बाकीच्यांना विचारलं, “आज्जी कुठंय..?”

“ती लय आजारी हाय, म्हणुन म्हागल्या आटवड्यापस्नं आलीच न्हाय, दिसलीच न्हाय… हाय जीवंत का गेली… कुणास ठावं?”

या वाक्यांनी मलाच धस्स झालं..!

तिथल्याच एका आजीला आजारी असलेल्या, न आलेल्या त्या आजीचं घर दाखवण्यासाठी विनंती केली… आता या आजीचा चालायचा प्रॉब्लेम… अंतर दुर… रिक्षावाला येईना…

शेवटी आजीला मागे बसवलं बुलेटवर… लहान मुलाप्रमाणे ती मला घट्ट पकडुन बसली…

मला सोहमची आठवण आली… आता ताडमाड वाढलाय, पण लहान असतांना असाच पकडुन मागे बसायचा…

मी आजीकडे मागं वळुन नीट बसलेय की नाही ते पाहिलं…

आजीला बघुन मला सोहमची आठवण आली..!

अत्यंत बकाल झोपडपट्टीत आम्ही शिरलो, वाट काढत एका शेडजवळ थांबलो…

६ बाय ६ चं पत्र्याचं शेड..!

आजी मुटकुळं करुन पडली होती… शेजारी स्टोव्ह, त्याच्याजवळच शिळ्या भाकरीचे तुकडे, एक कळा गेलेलं पातेलं, एक जुनाट ताट, एक चेंबलेला तांब्या, आणि एक पावसानं भिजलेली काडेपेटी..!

“या काडेपेटीत आता जाळ निर्माण करायची ताकद उरली नव्हती… परिस्थितीनं भिजुन गेली होती… काडेपेटीत पन्नास काड्या होत्या, पण एकाही काडीला गुल नव्हतं… एकही कामाची नाही… आयुष्याचंही असंच काहीसं होतं ब-याचवेळा!!!”

त्याच शेडमध्ये मोरी, तुंबलेलं पाणी… आणि हे कमी म्हणुन वरच्या पत्र्यातुन पावसाचं गळणारं पाणी…

याच्याच बाजुला देव्हारा… आतला देव केविलवाणा!

मला बघुन आजी कण्हत कुंथत उठली,… मला घरात पाहुन गडबडली… तीचा विश्वासच बसेना…

मी भिजलेल्या जमिनीवर तीच्या जवळ बसलो…

ती अवघडली… मला बसायला टाकायला काही सापडतंय ते हातानं चाचपु लागली… “तीच्या हाताला काहीच लागलं नाही… शेवटपर्यंत ..!”

मी घरात आलेला पाहुन प्रेमानं, मायेनं म्हातारीनं गालावरुन पाठीवरुन हात फिरवला… कडाकडा बोटं मोडली..!

मी तपासुन औषधं दिली..!

सर्व अवस्था पाहुन माझ्या डोळ्यात पाणी आलं… मी कुणाला पैसे देत नाही, तरीही खिसे चाचपले… सगळे मिळुन ८७० रुपये मिळाले…

मी डोळ्यातलं पाणी लपवत सर्व पैसे आजीच्या मुठीत कोंबले आणि निघालो…

तीने ते पैसे कपाळाला लावले… वाकुन हात लांब करुन देव्हा-याला लावले आणि मला परत बोलवत म्हणाली… “ह्ये घे बाळा..!”

मला कळेचना… इतक्या बिकट परिस्थितीत पैसे कुणाला नको असणार? पण ती परत करत होती…

मी म्हटलं, “आगं तुलाच खर्चाया दिलेत, आसुदे..!”

वरच्या पत्र्यातुन पाणी गळायचं आता थांबलं होतं… पण आता पाऊस तीच्या डोळ्यात होता..!

हातानं परत जवळ बसवत म्हणाली, “आज माजा लेक माज्या घरी आला पयल्यांदा…”

“हे पैशे तु घे आन् तुज्या बायकु आन पोराला कायतरी घिवुन दे… म्हणावं आज्जीनं दिल्यात…”

डोळ्यातला पाऊस पुन्हा सुरु झाला..!

मला बोलताच येईना…

ती म्हणाली, “मानुस आजारी आसलं की त्याला औशदाची न्हाय, आपल्या मानसाची गरज आसती…”

“तु आज औशद बनुनच आलास माज्यासाठी माज्या झोपड्यात..!”

“मला कुणीच न्हाय आसं वाटुन माजा जीवसुदा जात नव्हता… वाटायचं आपण बेवारशीच मरणार…”

“पण आता आसं न्हाय वाटत, मलाबी लेक हाय… मरताना आनंदानं मरीन आता…” असं म्हणत फाटक्या पदरानं तोंड झाकलं…

भोकं पडलेल्या त्या पदरातुनही, तीचा चेहरा दिसतच होता…

“चेहरा पुर्ण झाकेल एव्हढाही पदर कुणाच्या वाट्याला येवु नये..?”

मी जायला उठलो… तीने खांद्यावर हात ठेवला… म्हणाली, “नीट जा… बाहेर पाऊस लय हाय…”

पुन्हा गालावरनं हात फिरवत म्हणाली, “भिजु नगंस, आजारी पडशील..!”

“रेनकोट हाय ना? नसंल तर आता जे पैशे देत हुतास, त्यात एक रेनकोट तुलाच विकत घे..!”

काय बोलु मी..?

एव्हढी दानत येते कुठुन? इतकी माया येते कुठुन?

मी आवंढा गिळत… काही न बोलता तीच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला…

आणि पावसात चिंब भिजत गाडीवर बसलो…

या पावसात मला भिजवायची आता ताकद नव्हती, मी आजीच्या पदराखाली आधीच चिंब झालो होतो…

मला आजारी पाडण्याची या पावसात धम्मक नव्हती… आज्जीनं मायेची कवचकुंडलं माझ्या पदरात टाकली होती…

आज्जीनं दिलेले ८७० रुपये बायको पोरासाठी नीट सांभाळत मी घरी निघालो…

एरव्ही पैशाची एव्हढी “किंमत” कधीच जाणवली नाही..!

झोपड्यात ती आज्जी नव्हे, तीची श्रीमंती नांदत होती..!

श्रीमंती वस्तुत नसतेच, ती असते मनात..!

एका श्रीमंत आज्जीला भेटुन, मी ही श्रीमंत झालो..!

1 Comment

  1. सर तुम्ही व तुमचे कार्य खूप मोठे आहे , डॉक्टरांना देव मानले जाते परंतु तुमचे स्थान तुमच्या कार्यामुळे देवाहून हि मोठे आहे. आजच्या काळात रुग्णांना पैसे कमावण्याचे साधन मानणाऱ्या डॉक्टरांना तुमच्या द्वारे एक चांगला संदेश मिळेल अशी अपेक्षा आहे . पुन्हा एकदा तुमच्या कार्याला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published.


*