माहितीसाठी सविनय सादर..!!!

आजचा दिवस पहाटे पाचलाच सुरु झाला…

यांत…

  • श्वास घेता न येणा-या मुलाचं ऑपरेशन, आज डॉ. मिलिंद भोई सर यांनी अत्यंत यशस्वी रित्या पार पाडलं.

या ऑपरेशननंतर, या मुलाचे सर्वच त्रास निघुन जातील!

मुलगा अत्यंत ऊत्तम स्थितीत असुन, डिस्चार्जनंतर आपल्या गावी जावुन कामाला लागेल.

त्याचा श्वास चालु झालाय आणि आमचाही जीव जणु भांड्यात पडलाय..!

या मुलाचा हा त्रास कायमचा गेला..!!!

  • हाताचा ऍक्सिडेंट झालेल्या मुलाच्या Plastic Surgery या ऑपरेशन साठी अनेकानेक तपासण्या व इतर वैद्यकीय बाबींची गरज होती.

आज अखेर या सर्व बाबी पुर्ण झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत ऑपरेशन होईल.

पुर्ण हात बरा व्हायला अजुन एक महिना लागेल.

याच्यासाठी हॉटेल मध्ये एक जॉबही पाहुन झालाय.

हॉटेल मालक माझे ज्येष्ठ स्नेही आहेत! पगाराबरोबरच कपडालत्ता, राहणे व जेवण याचीही सोय ते या मुलास मोफत करुन देणार आहेत.

या सहृद माणसाला माझे प्रणाम!

ख-या अर्थानं याला आयुष्यात हात मिळेल!

आज हा म्हणाला, “बरं झालं, माझा ऍक्सिडेंट झाला… आता कामाला लागेन, नाहीतर भिकारी म्हणुनच मेलो असतो..!”

हे ऐकुन वाटलं, चला… सगळेच ऍक्सिडेंट मारणारे नसतात… काही तारणारेही असतात..!

  • या सोबतच आज सर्वात महत्वाचं म्हणजे… एक तीशीचा अपंग मुलगा खडकी, सांगवी या भागात भिक मागतो.

या मुलास संपुर्ण cover केलेली, वस्तु विकण्यासाठी हँगर व रॅक्स असलेली व्हिलचेअर आज दिली…

हा ही मुलगा आजपासुन कामाला लागला, याहुन आनंद कोणता..?

याचे पाय काहीच कामाचे नाहीत पण याच्या कामाला नक्कीच आता पाय फुटतील…

वेगळ्या अर्थानं का होईना… पण, हा, “पायावर” उभा राहील..!

या सर्वांत माझा सहकारी मदतनीस विक्रम हाळंदे याने या सर्व कामात तहानभुकेची तमा न बाळगता खुप महत्वाची भुमिका पार पाडली… याचं विशेष अभिनंदन!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*