बंधन आणि स्वातंत्र्य

१५ ऑगस्ट..!

यावेळी स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन दोन्ही एकाचवेळी..!

दोन्ही सण जल्लोषात साजरे झाले, व्हायलाच पायजेत!

पण या शब्दांकडं जरा नीट पाहिलं कि या शब्दांची गंमत वाटते…

स्वातंत्र्य… म्हणजे मुक्तता..!
बंधन… म्हणजे मर्यादेत असणं..!

दोन्ही एकाच दिवशी!

मुक्त असणं आणि बंधनातही असणं, खरंतर दोन्ही परस्पर विरोधी शब्द वाटतात, तसे ते आहेतही, अर्थातच!

पण आणखी थोडा याच शब्दांचा विचार केल्यावर जाणवतं…

खरंच निव्वळ स्वातंत्र्य मनाला आनंद देईल? मुक्त असतांनाही, थोडं बंधन हवंच..!

हे बंधन नसेल तर माणुस वहात जाईल कुठेही, फरशीवर सांडलेल्या पाण्यासारखा… दिशाहिन..!

आणि नुसत्या बंधनालाही अर्थ नाही… नात्यात थोडा सैलसरपणा हवाच कि… नाहीतर हे बंधन जोखड होईल, बोजड होईल..!

बंधन असं असावं, ज्यामुळं सुरक्षित वाटावं… भिती नाही..!

हे बंधनही सुखकारक असावं, वेदना देणारं नाही!

म्हणुनच राखीला “धागा” असतो, दोरखंड नाही!

थोडक्यात काय, स्वातंत्र्यातही थोडं बंधन असावं आणि बंधनातही थोडं स्वातंत्र्य ..!

किती..?

अहो, चिमुटभर मिठाएव्हढं..!

त्याशिवाय स्वातंत्र्य आणि बंधन, दोन्हीला चव नाही!

एक खरं, नुसतंच स्वतंत्र असणं हे ही खुप त्रासदायक असतं…

अशा प्रकारच्या स्वातंत्र्यात बंधनंच आयुष्य सुसह्य करतात..!

माझ्यापुरतं बोलायचं तर, ही एक आजी..!

मुलं बाळं बघत नाहीत, ती स्वतंत्र राहते फुटपाथवर ..!

ती जेवली काय न् न जेवली काय… कुणीच तीला विचारत नाही… म्हणजे ती इथंही स्वतंत्रच

मागच्या आठवड्यात हिच्या मुलाने नदीत उडी घेतली… गेला..! तो ही आयुष्यापासुन स्वतंत्र झाला..!

उपाशी पोट, गालावरल्या सुकलेल्या सुरकुत्या आणि हाताच्या काड्या झालेले हातपाय घेवुन ही बसलेली असते फुटपाथवर…

नाही म्हणायला, खांद्यावरचा फाटका पदर फडफडत असतो वा-यानं… हाच तीचा झेंडा… ती स्वतंत्र असल्याचं प्रतिक..!

तीच्याकडं जन्माचा दाखला नाही… म्हणजे कागदोपत्री तीचा जन्मच नाही…

जो जन्मलाच नाही, त्याचा मृत्यु तरी कसा होणार..? म्हणजे याही अर्थानं ती स्वतंत्र!

गर्दीत राहुनही समाज तीला आपलं म्हणुन स्विकारत नाहीत… भिकारी म्हणुन स्वतंत्र नजरेनं तीच्याकडे पाहतात…

खरंतर इतकं स्वातंत्र्य असतांनाही आजी सुखी नाही… का?

कारण या स्वातंत्र्यात बंधन नव्हतं कुठलंच..!

घर सोडतांना कुणी प्रेमाची शपथ घालुन, बाहेर पडण्याच्या तीच्या निर्णयाला कुणी बंधन घातलं असतं तर?

दारावरच हात आडवा लावुन तीच्या पायात कुणी प्रेमाचं बंधन घातलं असतं तर..?

म्हातारी आज बाहेर नसती!

पण हे बंधन तीला कुणी घातलंच नाही…

कारण जीवघेणं स्वातंत्र्य तीची वाट पहात होतं..!

हे असलं स्वातंत्र्य धड जगुही देत नाही आणि मरुही!

ज्यात बंधनच नाही ते स्वातंत्र्य काय कामाचं..?

परवाच कुठंतरी वाचलं…

एकाने विचारलं, गाडीला ब्रेक का असतात..?

सर्वांनी सांगितलं, गाडी थांबवण्यासाठी..!

मुळीच नाही…

गाडीला ब्रेक असतात ते गाडीला वेग देण्यासाठी ..!

आपली गाडी योग्य त्या जागेवर, आपण म्हणु तिथे थांबणार आहे याची खात्री असल्याशिवाय, माणुस गाडी पळवेलच कशी?

ज्या गाडीला ब्रेकच नाहीत, त्यात कोण बसेल?

ब्रेक हे या गाडीला असलेलं बंधन… ते आहेत म्हणुन वेग आहे!

आपल्यावर कुणाचं तरी प्रेमाचं बंधन आहे याची जेव्हा जाणिव होते त्याचवेळी आयुष्याचं आयुष्य होतं… त्याला वेग येतो..! नाहीतर सगळंच ठप्प ..!!!

गाडीचा प्रत्येक पार्ट जर सुट्टा केला, स्वतंत्र केला तर त्याला गाडी कोण म्हणेल..?

याच पार्ट्सना जेव्हा एकमेकांच्या बंधनात अडकवलं जातं तेव्हाच ती गाडी तयार होते..!

आपल्या सभोवताली असणारी नाती, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, माया ही सर्व सुट्टे पार्टच आहेत, जेव्हा या पार्ट्सना आपणच जोडुन ठेवु, एकमेकांत अडकवुन ठेवु… बंधनात गुंफुन ठेवु तेव्हाच तयार होतं आयुष्य ..!

सोन्याचा एक मणी समोर असला तरी त्याला मणीच म्हणतात… “माळ” नाही..!

आणि अशा एका मण्याचा काही उपयोग नसतो… अनेक मणी धाग्यात बांधुन माळ तयार होते, आणि मग तेव्हाच लोकं ती गळ्यात घालतात..!

इथं मणी नसतोच महत्वाचा… त्या मण्यांना बंधन घालणारा धागा महत्वाचा..!

तर, स्वतंत्र जगण्याला असा एक धागा हवा, जो बंधन घालेल, आयुष्याला गती देईल, माणुस म्हणुन जोडुन ठेवेल..!

असंच बंधन तुटलेली एक आज्जी…

१५ ऑगस्ट ला भेटली… सर्वांसाठी स्वातंत्र्यदिन… पण हिचा मात्र “स्वातंत्र्यदीन”..!!!

आजार आणि वेदनांनी व्याकुळ!

सर्व तपासण्या करुन आज १७ ऑगस्ट ला तीला ऍडमिट केलंय..!

काही दिवसांतच ती या जगापासुन स्वतंत्र झाली असती..!

पण तीला जावु द्यायचं नव्हतंच आम्हाला!

म्हणुन आज आम्ही तीला बंधन घातलंय… पुन्हा जगायला भाग पाडलंय..!

तीला “जाण्यापासुन” रोखलंय..!

आजार आणि वेदनेपासुन तीला आता स्वातंत्र्य मिळेल..!

यावेळच्या १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य आणि बंधन या दोन्ही बाबी आम्ही वेगळ्या अर्थानं जगलो..!

यावेळचा १५ ऑगस्ट आम्ही अशा पद्धतीने साजरा केला..!

ती आजी आजारांपासुन स्वतंत्र झाली… तीला पुन्हा जगण्याच्या बंधनात अडकवलंय..!

आम्ही फक्त धागे..!!! बंधनात बांधणारे..!!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*