माहितीसाठी सविनय सादर..!

 

  • आज २२ तारखेस रस्त्यावरील रोजच्या कामाव्यतिरीक्त आणखी ८ भिक्षेक-यांच्या डोळ्यांच्या तपासण्या व ऑपरेशन झाले.

यांत भुवड बाबा आणि ताई यांनीच एकहाती बाजु सांभाळली, नेहमीप्रमाणेच!

या आठही लोकांना हळुहळु स्वच्छ दिसायला लागेल..!!!

जातांना एका आज्जीनं बळंबळं माझ्या खिशात चिल्लर नाणी टाकली…

डोळे मिचकावत म्हणाली… “भुक लागली आसंल, वडापाव खा एक..!”

एक आणि दोन रुपयांची ती नाणी मी मोजली, बरोब्बर पंधरा रुपये होते… एका वडापावचे!

“आज्जी, अगं कसं सांगु तुला..? हे पंदरा रुप्पय, आयुष्यंभर पुरतील, माझ्या भुकेला!”

  • प्लास्टिक सर्जरी झालेला मुलगा खडखडीत आहे, आणखी १४ दिवस हॉस्पिटलमध्ये
    ऍडमिट रहावं लागणार आहे.
  • असाच पूर्वी पायाला जखम झालेला, आणि आता पायाला सेप्टिक झालेला आणखी एकजण..! यालाही कुणी हात लावायला तयार नव्हतं…

गेल्या पंधरा दिवसांपासुन हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करुन, विविध तपासण्या करुन याचाही पाय जागेवर आणलाय, अन्यथा याचाही पाय कापायचाच सल्ला दिला होता.

याला एकट्याला कुठेही न सोडता, विक्रम याच्या दिमतीला असतो!

  • “बंधन आणि स्वातंत्र्य” या लेखात उल्लेख असलेली, मागच्या आठवड्यापासुन ऍडमिट असलेली आज्जी..!

जीवन मरणाच्या रेषेवरुन तीही परत आली आहे.

सर्व बिलं भरुन, आज तीलाही डिस्चार्ज दिला. तीची तब्येत छान आहे.

सहज तीला म्हटलं, “महिन्याला किती मिळतात तुला भीक मागुन..?”

म्हणाली, “४०० रुपये..!”

सुन आणि ही आज्जी एकत्र राहतात एका झोपडपट्टीत..!

“आज्जी, सुनबाई सांभाळत नाय का?”

“संबाळती की..!”

“मग भीक का मागायची?”

“आवो, ती पन काम करती…”

“मी रोज नाय मागत… दर गुरवारी फकस्त मागती, चार गुरवारचं मिळुन मला म्हैन्याला सादारन ४०० रुप्पय मिळत्यात…”

“थोडं माजं, थोडं तीचं आसं मिळुन त्यात चालवायचं घर..! काय करायचं..?”

महिन्याच्या ४०० रुपयांसाठी माणसाला “आत्मसन्मान” गमवावा लागतोय इथं!

आहे त्यांच्याकडं खुप आहे; नाही त्यांच्याकडं काहीच नाही..!

कधी दरी मिटणार ही? कळत नाही..!!!

हिला कुठली योजना सांगावी तर कागदपत्रं नाहीत…

काम कर म्हणावं तर पुर्ण थकलीय..! काम करण्याच्या पलिकडे आहे…

वृद्धाश्रमात ठेवावं, तर सुनेला एकटीला सोडण्याची हिची इच्छा नाही…

काय करावं हिचं कळत नाही..!

तरी हिला मी म्हणालो, “महिना ५०० रुपये तुला इतर मार्गानं मिळाले तर घरात बसशील का भीक न मागता?”

ती हो म्हणालीय..!

पण, दरमहा असे ५०० रुपये तीला मिळवुन देणार कसे?

माणुसकी म्हणुन माझ्याजवळचे पैसे जरी मी तीला दरमहा दिले तरी वेगळ्या अर्थानं ही सुद्धा एकप्रकारची भिकच की..!

आपण कुणाला काही द्यावं आणि कायम त्याने आपल्यावर अवलंबुन रहावं ही झाली “भीक”..!

पण असं काहीतरी करावं, आणि समोरच्याने स्वावलंबी व्हावं हि झाली “मदत”!

भीक नाही आपल्याला मदत करायचीय ..!!!

पाय खेचायचाच असेल तर जरुर खेचावा, पण डोंगर चढणा-याचा नाही, तर पाण्यात बुडणा-याचा!

कुणालातरी धक्का जरुर द्यावा पण पाडण्यासाठी नाही… त्याला आणखी वेगानं धावण्यासाठी..!

गोष्ट तीच असते, पण आपण ती कशी वापरतो आणि आपला हेतु काय आहे, यावर तीचं मोल ठरतं!

एकुण या परिस्थितीत, आज्जीवरचा फोकस काढुन आता सुनबाईला टार्गेट करणार आहे!

सुनबाईला फावल्या वेळेत, घरबसल्या करता येईल असं काही काम देवुन ५०० रुपये अथवा त्याहुन जास्त पैसे दरमहा मिळावेत यासाठी सर्व मदत करणार आहे..!

अट एकच, म्हातारी परत भीक मागतांना दिसायला नकोय..!

बघु, भिकेचा हा “साप” ही मरेल आणि माझी “लाठी” ही तुटणार नाही!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*