घराघरांत गणपती मखरांत विराजमान झाले…
मी भिक्षेकरी रुग्णांना हॉस्पिटलच्या खाटांवर ऍडमिट केले…
माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
कुणी गणपतीची पुजा केली, कुणी आरती…
आम्ही भिक्षेक-यांची सेवा केली…
आम्ही ना पुजा करु शकलो, ना आरती…
कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
कुठे ढोल वाजताहेत, कुठं ताशा…
रुग्णांचं हृदय वाजत राहो… बंद न पडो इतकीच
आम्हांस आशा…
आम्ही ढोल बडवलेच नाहीत…
हृदयाची टिकटिक ऐकत राहिलो… जगण्याचं तुणतुणं वाजवत राहिलो…
कारण माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
हजारो समया पेटल्या असतील गणपतीपुढे आज…
आम्ही भिक्षेक-यांच्या घरात फक्त एक ज्योत चेतवु शकलो…
मुळीच खंत नाही याची, कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
पंचपक्वान्नांच्या नैवेद्याचा सडा पडला असेल गणपतीपुढे…
आम्ही घरातली पुरणपोळी आणि मोदक, हॉस्पिटलातल्या सगळ्या रुग्णांना खिलवुन आलो…
गणपतीला नैवेद्य आम्ही दाखवलाच नाही…
कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
आशिर्वाद घेण्याच्या लायनीत गणपतीपुढे चेंगराचेंगरी आणि हमरीतुमरी झाली असेल आज…
सुरकुतलेला हात आमच्या डोक्यावरुन फिरला…
“सुखी -हा बाबा…” असं प्रत्यक्ष देव त्यांच्या मुखातुन बोलला…
मग गणपतीला आशिर्वाद आम्ही मागितलाच नाही…
कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
कुणी देवात भाव पाहिला… आम्हाला माणसातच तो घावला…
पीडीतांच्या सेवेतुन मंदिर मशिदीत जायला आम्हाला वेळच मिळाला नाही…
आम्ही मंदिर मशीदीत शेवटपर्यंत नाहीच गेलो..
तुटक्या झोपड्यांतच आम्ही दंगलो…
कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
जो सर्व ठिकाणी पुजला जातो… गणला जातो तो “गणपती”…
ज्याला सर्वत्र तुच्छ समजलं जातं… कुणीही यांची कशातही गणना करत नाहीत… ते आहेत “ना-गणपती”
आम्ही या “ना-गणपती” ची पुजा मांडल्येय… गणपतीची नाही ..!
याबद्दल मी “गणपती” ची माफी मागणारच नाही…
कारण, माझ्यासाठी दोन्ही एकच की..!
Leave a Reply