माहितीसाठी सविनय सादर..!!!

अं.. हो… हाच तो… जो पुर्वी रस्त्यांत मागायचा…

हाच तो… ज्याची दाढी पोटापर्यंत वाढली होती आणि केस कमरेपर्यंत… दाढी आणि केसांतही जटा असणारा हाच तो..!

हाच तो… ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता, आणि उजवा हात सेप्टिक होवुन हत्तीच्या पायापेक्षाही मोठा झाला होता..!

हाच तो… ज्याला भिक्षेक-यांनीही आपल्यात सामावुन घेण्यास नकार दिला होता… कुजत चाललेल्या हाताचा वास, त्या बिचाऱ्यांनाही सहन होईना!

हाच तो… ज्याला सर्वांनी हात कापायचा सल्ला दिला होता… आणि मग भकास मनाने ज्याने कित्येक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला..! मरण येत नाही म्हणुन नाईलाजानं जगणारा हाच तो!

हाच तो… ज्याला जगण्यानं छळलं होतं… आणि मरण ही कुशीत घेत नव्हतं..!

हाच तो… ज्याच्या हाताची प्लास्टिक सर्जरी झाली… ज्याच्यासाठी आम्ही सर्वांनी ३४ दिवस झुंज दिली तो हाच तो..!

कधीही बरा न होणारा हात… आत्मविश्वासानं आज याच हातानं तो शेकहँड करतो… तो हाच तो..!

मेडिकल सायन्सला चॅलेंज करणारा हाच तो… ज्याला निसर्गानंही साथ दिली तो हाच तो!

हो… हो… हाच तो… जो आता हळुहळु माणसांत आलाय… अंतर्बाह्य बदललाय…

जो नविन आयुष्य दुस-याला आधार देण्यास तयार झालाय तो हाच तो..!

“डॉक्टर, भिक्षेक-यांच्या तुमच्या रोजच्या कामात मला घ्या… पुढच्या आयुष्यात या लोकांसाठी मी ही तुमच्याबरोबर मरेपर्यंत काम करेन…” असं म्हणणाराही हाच तो!

या मुलाची जिद्द, विक्रमचे कष्ट, तुमच्या दुवा आणि डॉ. धनराज गायकवाड यांची दवा… या सर्वांतुन हे फलित मिळालं..!

याला आधीचा आणि नंतरचा असं दोन्हीवेळेला पाहणाऱ्या लोकांनी, याचं हे बदललेलं रुप पाहुन माझं नी मनिषाचं खुप कौतुक केलं..!

खरं सांगु? या कौतुकाचे धनी आम्ही नव्हेतच…

आम्ही फक्त माध्यम आहोत..!

वायरमन आहोत, एक तार दुस-या योग्य त्या तारेला जोडणारे..!

पायवाटेनं चालुन जात, एखाद्यानं शिखर सर केलं तर, पायवाटेनं म्हणु नये, “बाबा तु माझ्यामुळे शिखर सर केलंस..!”

पायवाट हि यशाचा एक भाग असु शकेल… पण पुर्ण यश त्या पाऊलवाटेचं नसतंच..!

आम्ही ती पायवाट आहोत..!

असो, या मुलासाठी आता नोकरी शोधतोय..!!!

शिक्षण नाही, पण सुसंस्कृत आहे!

लिहीता येत नाही, पण प्रामाणिक आहे!

वाचता येत नाही, पण विश्वासु आहे!

मला माहीत आहे…

सुसंस्कृतपणा, प्रामाणिकपणा आणि विश्वासु हे असले “दुर्गुण” अंगी असणाऱ्याला जगणं – जगवणं कठीण आहे सध्याच्या काळात…

पण बघु करतोय आम्ही प्रयत्न..!!!

शांताबाई शेळके यांना एकाने विचारलं होतं…

“आभाळ” आणि “आकाश” यांत फरक काय? दोन्हींचा अर्थ एकच की..!

त्या म्हणाल्या होत्या…

“जे भरुन येतं ते आभाळ..!
न दिसणारा पाऊस यांत लपलेला असतो..!!! यातले ढग पाण्यानं भरलेले असतात, आणि कुणाची तरी तहान भागवायला आतुरही ..! हे आभाळ…!!!

आणि जे कोरडं असतं ते आकाश..! नुसतेच रिकामे ढग..!!! यांना कुणाशी ना सोयर ना सुतक… जे कधी बरसतच नाही ते आकाश..!!!

आमचा हा मुलगाही पुर्वी “आकाश” होता…

त्याचं “आभाळ” कधी होईल याची आम्ही वाट पाहतोय..!

बघु, येणारा पावसाळाच ठरवेल!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*