तो बोलतो,
काळीज पिळवटून टाकणारं
तो लिहितो,
हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून
त्याचं काम,
ज्याच्यापुढं नतमस्तक व्हावं असंचं
त्याच्याबद्दल लिहीताना आणिबाणी असल्यासारखी स्थिती होते शरीराची. पण, कुणीतरी त्याच्याबद्दल लिहिणारच आहे. किंबहुना अनेकांनी लिहीलंही असेल. मग, माझीच अशी अवस्था का होते? दर वेळी तो त्याच्या पोस्ट मला पाठवित असतो. पण, त्याच्या पोस्टला उत्तर देण्याचं धाडसं होत नाही. आणीबाणीत जसे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसे त्याच्याबद्दल लिहिताना होतं. शरीर थंड होतं. कुठून सुरवात करावी अन् कशी करावी याचा संभ्रम मनात निर्माण होतो. तरीही हे धाडस…
तो अवलिया पुण्यात डॉक्टर आहे. डॉक्टर तसे बरेच आहेत समाजात. वेगवेगळ्या पध्दतीनं उपचार करणारे… पण हा आहे भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर. ज्यांची समाजाकडून नेहमीच हेटाळणी होते, अशा भिक्षेकऱ्याना हा आपलसं करतो, त्यांच्यावर उपचार करतो, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतो. नोकरी – धंदा उपलब्ध करुन देऊन त्यांचं पुर्नवसन करतो.
किती लिहावं त्याच्याबद्दल. त्याचं नाव आहे डॉ. अभिजीत सोनवणे…
वयानं, अनुभवानं, सर्वच बाबतीत श्रेष्ठ. तरीही त्याचा उल्लेख एकेरी करतो. कारण तो नात्यानं दादा आहे. सख्खे किंवा नात्यातला नसला तरी समाजबंधूच म्हणा ना हवं तर. परवा त्याची पुण्यातल्या एका कार्यक्रमात भेट झाली. नुसती भेट नाही. गळाभेटच… बोलता बोलता त्यानं एका व्यक्तिकडं अंगुलीनिर्देश केला. अर्थात त्या व्यक्तिला त्याची कल्पनाही नव्हती. “हे दादा तुला भेटायला मुंबईतून आलेत.” त्यानं त्या व्यक्तिला सांगितलं.
मध्यंतरी डॉ. अभिजीतनं एक पोस्ट टाकली होती. एका भिक्षेकरी मुलाची… आई वडिल, भाऊ बहिण असं कुठलंही सख्खं नातेसंबध नसलेल्या त्या मुलानं कंटाळून भिक मागण्यास सुरवात केली. चारचौघे भिक्षेकरी त्याचे मित्र झाले. त्याच्यात तो रमू लागला. पण, एके दिवशी त्याला अपघात झाला. टॅम्पोत अडकून फरफटत गेला. जखमा झाल्या. त्यावर उपचार नाही, जखमा चिघळत गेल्या. पंढरीची वारी सुरु होती. त्या वारित खायला-प्यायला मिळेल म्हणून हा पठ्ठा त्या वारीत सामील झाला. पण, अंगावरच्या जखमा असह्य झाल्या होत्या. अखेर जीवन संपवावं म्हणून त्यानं वारीत असतानाच उस्मानाबादजवळ एका नदीपात्रात उडी घेतली. इतके दिवस वारीत असूनही कुणाचं लक्ष गेलं नाही. पण, आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर मात्र सगळे त्याच्या मदतीला धावून आले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यावेळी त्यानं शरीरावर झालेल्या जखमांना कंटाळून आणि परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं…
ही केस डॉ. अभिजीतकडे आली. म्हणजे अशा केसेसच्या शोधातच डॉ. अभिजीत असतो. त्या व्यक्तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले गेले. एक हात संपूर्ण सोलला गेला होता. त्यात एक एक इंचाचे असे मोठाले किडे वळवळत होते. डॉ. अभिजीत सांगत होता. ते ऐकूनच मळमळत होतं. नुसतं ऐकूनच इतकी शिसारी येत होती. तर, प्रत्यक्षात डॉ. अभिजीत कसं काम करत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. पुढचं काही लिहित नाही…
डॉ. अभिजीतनं त्याचं ऑपरेशन केलं. साडेचार लाखांचा खर्च झाला. आता ती व्यक्ती पुर्णतः बरी झाली. त्यालाच डॉ. अभिजीत सांगत होता, “हे दादा तुला भेटायला मुंबईतून आलेत…” हा, अशिक्षित आहे. पण, त्याला वाचता येतं, इंग्रजी समजतं… अक्षरांची ओळख पटते. आणि महत्वाचं म्हणजे.. त्याला आता शिक्षण घ्यायचं नाही, नोकरी करायची नाही, धंदा करायचा नाही, पुन्हा त्या भिक्षेकरी आयुष्यात जायचं नाही.. त्याची एकच इच्छा आहे. तो म्हणतो, “मला आता तुम्ही जे काम करता ते काम करायचं. आजारी लोकांची सेवा करायची आहे.”
डॉ. अभिजीतचं बोलणं मध्येच तोडत म्हणालो, “आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असतील. यापुढेही मिळतील. अनेकांना नोकऱ्या दिल्यास, व्यवसाय निर्माण करुन दिलेस. पण, अशी तळमळीनं इच्छा व्यक्त करणारा हा पहिला कार्यकर्ता तुला मिळाला हीच तुख्या कामाची सर्वात मोठी पावती…”
त्याला दुजोरा देत डॉ. अभिजीत म्हणाला, “होय.. आतापर्यंत मी जे काही केलं ते सारं त्याच्या शब्दांपुढे फिके आहे. आपल्या एका कामामुळे एक व्यक्ती समर्पित भावनेनं आपलं काम पुढे नेण्यास तयार होते हीच माझ्या कामाची सर्वात मोठी पोचपावती आहे.”
क्षणभर आम्ही दोघेही पाणावल्या डोळ्यांनी त्या व्यक्तिकडे पहात होतो आणि तो तो मात्र आपल्या कामात गुंतला होता…
त्या व्यक्तीसारख्या किमान शंभरहून अधिक भिक्षेकऱ्याना डॉ. अभिजीतनं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. कुणाला नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या, कुणाला व्यवसाय उभा करुन दिला. शस्त्रक्रिया करुन कित्येकांचे प्राण वाचविले. त्याची समाजसेवा ही आगळी वेगळी अशीच आहे. पुण्यात सोहम ट्रस्टच्या माध्यमातून आणि मित्रपरिवाराच्या सहकार्यानं त्याच हे काम सुरु आहे. अव्याहतपणे सुरुच असेल. एक परिपुर्ण पुस्तक होईल असं त्याचं आणि वहिनी डॉ. मनिषा सोनावणे यांचं आयुष्य आहे. म्हणून तर त्याच्याबद्दल लिहीताना आणीबाणीसारखी स्थिती होते.
महेश पवार
९९८७२६९४७६
Leave a Reply