अर्थात्…
भिक्षेक-यांच्या कलावस्तुंचं प्रदर्शन..!!!
“पिल्लु” या नावानं काही महिन्यांपुर्वी एक ब्लॉग लिहिला होता..!
एक अपंग व्यक्ती… जीला मनगटापासुन पुढे हातच नाहीत, बोटं नाहीत, अशी व्यक्ती नाईलाजानं भीक मागायची मुंबईत..!
याला पुर्णतः भिकेतुन बाहेर काढलं, आणि याच्यासाठी नोकरी शोधायला सुरुवात केली…
पण या “बोटं” नसलेल्या माणसाला आधाराचं “बोट” मिळेल तर शप्पथ!
या व्यक्तीला चित्रकलेचा छंद होता, बोटं नसुनही..!!!
म्हणुन, मग आम्ही या छंदालाच प्रोफेशन करायचं ठरवलं..! जगण्याचं साधन बनवायचं ठरवलं..!
मागच्या सहा महिन्यांपासुन याच्याकडुन चित्रं काढुन घेतली… आम्ही ती फ्रेम केली… आणि तीचं प्रदर्शन मांडायचं ठरवलं..!
वेदनेचा बाजारच म्हणा ना!
हा बाजार मांडायचा कुठं..?
P.N.GADGIL and Sons LTD (भारतातील प्रख्यात ज्वेलरी शॉप – बहुतांश हिंदी / मराठी सिनेमात यांचीच ज्वेलरी असते… उदा. देवदास आणि असंख्य …) चे मालक मा. अजितकाका गाडगीळ म्हणाले…
“अभिजीत, माझी आर्ट गॅलरी घे आणि मांड तुझा बाजार… हवे तेव्हढे दिवस..!”
केव्हढा हा दिलासा..!
तर या अपंग पिल्लाच्या चित्राचं प्रदर्शन आपण मांडतोय…
१७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ ते ८ या वेळेत.
P.N. GADGIL & SONS LTD, AUNDH, NEAR RELIANCE MALL, PUNE – Phone – 020- 25881555, 25881556
या ठिकाणी..!
अपंगांना दिव्यांग का म्हणतात? हे मला पडलेलं कोडं… हल्लीच सुटलं..!
निसर्ग जेव्हा हात, पाय, डोळे अथवा अन्य अवयवातली ताकद काढुन घेतो.. त्याचवेळी दुसरी “दिव्य” अंग असलेली ताकद त्यांना देतो..!
असाच हा माझा मुलगाही दिव्य शक्ती असलेला “दिव्यांग”..!
बोटं नसतांना, तांब्या उचलु शकत नाही आपण, आणि हा बोटं नसतांनाही देखणी चित्रं काढतो… हे दिव्यच नाही का?
कही जीद पुरी,
कही जरुरत अधुरी…
कही सुगंध नही,
फिर भी बने कस्तुरी..!
तसंच हे रानातलं फुल उमलु पाहतंय..!
हा मला परवा म्हणाला, “सर, माझी चित्रं कुणी घेतील का..? मी यशस्वी होईन का हो..?”
त्याला म्हटलं, “बाळा, चित्रं जास्त खपणं आणि तुला नोकरी मिळणं म्हणजे यश नाही..!”
“आधीपेक्षा आपल्यात जास्त सुधारणा होणं म्हणजे यश!”
“आपण माणसासारखं जगणं, म्हणजे यश..!”
“आणि, आपण माणुस आहोत, हे कपाळावर लिहुन फिरायचं नसतं…”
“त्यासाठी हृदयावर गोंदुनच घ्यावी लागते माणुसकी बाळा!”
“आयुष्यात एकच लक्षात ठेव, वर चढणा-याचे पाय ओढण्यात, एखाद्याला खाली पाडण्यात शौर्य नसतं…”
“ओढायचेच असतील तर खाली पडलेल्या माणसाचे हात ओढ, त्याला उठुन उभं कर..!”
“नुसतीच हवा होवुन जगु नकोस, जमलं तर एखाद्याचा श्वास बनण्याचा प्रयत्न कर..!”
“शर्यतीत भाग घेवुन, जीवतोड मेहनत केलीस आणि हरलास तरी ती जीत आहे..!”
“पण शर्यतीत भागच नाही घेतलास, तर ती फार मोठी हार आहे..!”
“गंमत अशी की, जिंकल्यावरही लोकं गळ्यात “हारच” घालतात रे बाळा!”
“तेव्हा “हार” या शब्दाचं टेन्शन घ्यायचंच नाही!”
“हार घ्यायचा तो गळ्यात… मनात नाही!”
असो!
तुम्ही याल न् प्रदर्शन पहायला..?
भिक्षेक-यांनी तयार केलेल्या इतरही शोभेच्या वस्तु आम्ही मांडलेत प्रदर्शनामध्ये!
तुम्ही प्रदर्शनात येवुन काहीच “खरेदी” केली नाही तरी चालेल… पण, याच्या पाठीवर कौतुकाची एक थाप द्या..! तुमचा प्रेमाचा एक शब्द द्या..! तुमच्या मायेचं दान द्या..!
यामुळं गहाण टाकलेला स्वाभिमान आम्हाला पुन्हा “विकत” घेता येईल..!
माझ्यावर निस्सिम प्रेम करणारे माझे गुरु, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, “मा. विठ्ठल जाधव सर” आणि “मा. सौ. विद्याताई जाधव”, ज्येष्ठ चित्रकार तसेच अध्यक्षा, शांतीदुत परिवार, तसेच ज्येष्ठबंधुसमान, माझे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि समाजसेवी आदरणीय “मा. ज्ञानेश्वर तापकीर सर” , PNG चे मालक, माझे आश्रयदाते “मा. अजितकाका गाडगीळ सर” यांचे शुभहस्ते १७ तारखेला या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहोत.
आणखी एक…,
या भीक मागणा-या व्यक्तीस माणसांत आणण्यास मी एकटा मुळीच जबाबदार नाही..!
हेमंत भोये या माझ्या मित्रानं, याला भीक मागतांना पाहुन, माझ्याशी बोलुन याला माणसांत आणलं..!
अस्मिता जावळे या बहिणीसमान ताईनं, भीक मागणं सोडल्यापासुन ते आजपर्यंतचा याचा राहण्या खाण्याचा खर्च केला..!
मनीष जैन या माझ्या बंधु तुल्य मित्रानं, चित्रकारीतेसाठी लागणारं सामान विनासायास पुरवलं..! याला व्यवसायाचं आणि जगण्याचं गणित शिकवलं..!
जीव तोडुन, या तिघांनी… याला अन्न, वस्त्र आणि निवारा दिला..!
याला माणसांत आणण्याचं खरं श्रेय या तिघांचं..!
मी फक्त या मोत्यांची माळ गुंफत गेलो..!
मी आपला नाममात्र नेहमीप्रमाणेच..!!!
हल्ली माणसं पहायला मिळत नाहीत..!
या प्रदर्शनामध्ये मी या तीन माणसांच्या “माणुसकीचंही” प्रदर्शन मांडलंय!
याल ना..?
आमच्या या प्रवासात सहभागी व्हायला..!
चला आमच्यासह… भिक्षेकरी ते कष्टकरी व्हाया चित्रकारी, या प्रवासाला..!!!
Leave a Reply