सहज मनातलं..!!!

१५ ऑगस्ट २०१५ ला जॉब सोडुन मी भिक्षेक-यांचा डॉक्टर म्हणुन काम सुरु केलं.

सप्टेंबर २०१९ पासुन कामाचं चौथं वर्ष चालु झालं..!

माझ्या या कामाचा लेखा जोखा मी नेहमीच आपणांसमोर मांडत आलो…

या तीन वर्षात आम्हांला या कामासाठी ५०० च्या वर पुरस्कार मिळाले, त्याहुन जास्त सत्कार झाले..!

आजपर्यंत या पुरस्कारांविषयी मी कुठेही काही जास्त बोललो नाही, किंबहुना आम्ही ते गुपचुप जावुन स्विकारले, ब-याचवेळा नाकारलेही..!

माझ्या रोजच्या संपर्कात असणारे लोक मला जरा चिडुन विचारतात, “आम्हांला का नाही सांगितलं? आम्ही आलो असतो की कार्यक्रमाला..!”

मनापासुन सांगु..?

मला किंवा मनिषाला या कामासाठी पुरस्कार मिळणं हे खरंच भुषणावह आहे का?

एका वंचित समाजासाठी आम्ही काम करतो हे ठिक आहे, पण आज २१ व्या शतकातही समाजातला एक घटक अजुनही वंचित आहे, आणि त्यासाठी कुणालातरी आजही काम करावं लागतं, यात गौरवास्पद ते काय?

लोक अभिमानानं सांगतात… “हा भिक्षेक-यांचा डॉक्टर आमच्या बिल्डिंग मध्ये राहतो”, कुणी म्हणतं “आमच्या कॉलनीत राहतो”, कुणी म्हणतं “पुण्यात राहतो”, कुणी म्हणतं “महाराष्ट्रात राहतो..!”

यांत अभिमान काय वाटायचा आहे..?

मला तेव्हा आनंद होईल, जेव्हा लोक अभिमानानं म्हणतील… “आमच्या बिल्डिंग मध्ये, कॉलनीत, महाराष्ट्रात काय आख्ख्या भारतातही भिक्षेक-यांचा डॉक्टर नाही..!”

“कारण आमच्याकडे कुणी भिक्षेकरीच नाही..!”

असो..!

याआधीच्या पुरस्कारांविषयी बोललो नाही पण आज मात्र आवर्जुन सांगणार आहे..!

मला मुलासमान समजणारे, अतिव प्रेम करणारे आदरणीय ज्ञानेश्वर तापकिर म्हणजेच भाऊ आणि बा. ग. केसकर, यांना माझ्या या कामाचं प्रचंड कौतुक!

यांच्या अतिव प्रेमामुळे आम्हाला आणखी एक विशेष पुरस्कार जाहिर झाला…

तोही पुजनीय, थोर शास्त्रज्ञ, आदरणीय रघुनाथ माशेलकर सर यांचे हस्ते..!

अर्थातच कार्यक्रम चार दिवसांपुर्वी होवुन गेला..!

सरांना आपण भेटणार, विशेष पात्रता नसतांनाही आपण त्यांच्या शेजारी बसणार, बोलणार… यात किती कवतिक वाटलं शब्दांत कसं सांगु..?

थरथरत्या हातांनी मी पुरस्कार स्विकारला…

मनिषा येवुच शकली नाही, ती भिक्षेक-यांच्याच एका कामात अडकली होती… “पुरस्कार तु घे, मी थांबते इथंच…” असं म्हणणा-या तीचा अभिमान वाटला मला!

पुरस्कार देताना,पाठीवर हात ठेवुन, जवळ घेत माशेलकर सर मला म्हणाले, “You are doing fantastic job my boy, I am proud of you!”

मी म्हटलं सर, “हिमालय पाहण्याची माझी खुप इच्छा होती… आता आपणांस भेटुन ती आज पुर्ण झाली!”

जमिनीकडे बघत, हसुन त्यांनी उलट माझंच आणखी कौतुक केलं..!

मी म्हटलं सर, “आजच्या काळातही मला हे करावं लागतंय…”

ते अत्यंत मायेनं म्हणाले, “It’s alright my boy..! It’s a Social Disease… and I am happy, somebody is doing this work..!”

हे म्हणत जेव्हा मला त्यांनी कवेत घेतलं, तो क्षण अविस्मरणीय..!

कोण म्हणतं, सुर्याच्या जवळ कुणीच जावु शकत नाही?

मी तर या सुर्य देवाला आलिंगन देवुन आलो… दिपुन गेलो आणि पावन झालो!

असे आणखीही अनेक सुर्य आहेत…

माझे आदर्श… गाडगेबाबा, कलाम सर आणि बाबा आमटे..!

यांना कधीच मला भेटता येणार नाही, हि जन्मोजन्मीची खंत!

पण त्यांचे विचार अजुन जिवंत आहेत, हे समाधान..!

आदरणीय डॉ. प्रकाश आमटे व आदरणीय डॉ. सौ. मंदाकिनी आमटे हि नावंही अशीच..!

आकाशगंगेतल्या तेजस्वी ता-यांसारखी..!

ज्यांना पाहुनही जीवनाची दिशा बदलुन जावी..!

दिपस्तंभ म्हणुन आजही ते पाय रोवुन उभे आहेत..!

फलटण येथील नामांकित जोशी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रसाद जोशी सर या भल्या माणसाने यावर्षी आदरणीय डॉ. प्रकाश आमटे व आदरणीय डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते एक पुरस्कार आम्हांस द्यायचं ठरवलंय..!

चला, म्हणजे चंद्राची शितलता घेवुन आलेल्या या चंद्रालाही भेटण्याची, बोलण्याची मला नी मनिषाला संधी मिळणार..!

या चंद्राच्या शितल “प्रकाशाचा” एक थेंबही आम्हांस जन्मभर पुरेल..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*