माई… सिंधुताई सपकाळ!!!

लहान पोरगं… ल्हान आसतंय तवा, दिवसभरात जे काय हुयील ते आपल्या मायला सांगतंय!

आन् मंग हिच माय पोराला जवळ घिवुन दृष्ट काढते… कौतुक करते… ज्यांनी आपल्या पोराला तरास दिला त्यांच्या नावाने बोटं मोडते..!

यात ते ल्हान ल्येकरु सुखावतंय..!

मी वर्षातनं दोनदा… माझी गा-हाणी माझ्या मायपुढं गातो…

माझी माय, श्रीमती सिंधुताई सपकाळ!

आज माईंना नेहमीसारखंच भेटायला गेलो, मी नी मनिषा!

केलेल्या कामाचा आढावा दिला… भलं बुरं सर्व काही सांगितलं… सल्ला घेतला… झालेल्या चुकांबद्दल माफी मागितली..!

अर्थातच, जे चांगलं झालं असेल त्यावर माझी ही माय डोक्यावरनं हात फिरवुन कडाकडा बोटं मोडते, कवतिक करते… दृष्ट काढते!

मी कुठं “नापास” झालो असेन, माझं कुठं चुकलं असेल, तर ती धीर देते, समजावुन सांगते..!

माई म्हणते, “असु दे बेटा, चुकतो तोच माणुस! माझे यजमान एके काळी चुकले होते… मला त्यांनी एकटं सोडलं होतं.. मी तावुन सुलाखुन निघाले… पण त्याचमुळे ही ‘माई’ आज तुझ्यासमोर आहे..!”

“ते चुकले नसते तर आज मी हजार लेकरांची ‘माई’ झाले असते का?”

“माझ्या ‘माई’ होण्याचं सर्व श्रेय मी माझ्या यजमानांना देते..!”

माझ्या अंगावर सर्रकन काटा आला…

माई म्हणते, “झालेल्या चुकांना सावरायचं असतं बेटा, त्यातुनही चांगलं काही निष्पन्न होतंय का पहायचं..!”

“दुध फाटलं तर रडत नाय बसायचं… त्याचं पनीर बनवायचं..!”

मी पहात राहीलो..!

म्हटलं, “माई, कशी आहेस..?”

म्हणाली, “कशी असणार रे बाळा..? आपलं आयुष्य काय रे..?”

“दुस-याच्या तालावर ताल धरायचा आपण… तु काय… नी मी काय..!”

“दिलं कुणी दान तर जगवायचं दुस-याला..! नायतर मरणंच की रे!”

खरंच आहे..!

“भाषण शिवाय राशन नाही रे बेटा…”

मी भानावर आलो..!

माई आजही वणवण फिरते…

लेकरांना जगवण्यासाठी! आजही ती प्रवास करते, जागोजागी व्याख्यानं देते…

जमा झालेला निधी मुलं आणि गाई यांच्या “चा-यासाठी”…

आज तीचं वय काय? ती रोज ५०० किमी प्रवास करते… आजही… कारण गरज आहे! पोरं जगायला हवीत… गायी जगायला हव्यात!

माईनं भाकड गायी सांभाळायला सुरुवात केलीय…

कसाई पण ज्या गाई नाकारतो, त्या भाकड गाई माझी ही माई सांभाळते… स्वतः उपाशी राहुन!

अशाच एका गायीनं तीच्यावर ऊपकार केले होते, काही वर्षांपुर्वी … या ऊपकाराची माई परतफेड करतेय..!

काय म्हणावं… गायी सांभाळणा-या या माईला?

“माई, पाय कसाय तुझा?”

“दुखतोय रे बेटा अधुन मधुन चालायचंच..!”

“दे पाय, मी चोळुन देतो…”

“नको रे बाळ, तु एव्हढा डॉक्टर झालास… माझे पाय चोळणं बरं दिसत नाही बेटा..!”

मी आणि मनिषाने हसत पाय हातात घेतले. हसत म्हटलं, “पोराच्या हातात आईचा पाय असणं, याहुन मोठा दागिना कोणता मिरवायचा आम्ही..?”

माई हसली, दोघांच्या डोक्यावर मायेनं हात ठेवले…

“माई, आता तुझे आशिर्वाद मिळाले… मला कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही!”

ती माऊली म्हणाली, “अरे मला देवत्व देवु नकोस..! मनिषा च्या रुपानं तुला देवी लाभलीय… तीची साथ नसती तर काम करु शकला असतास का?”

खरंच आहे, नसतोच करु शकलो..!

“मला देवत्व देवु नकोस… दुस-यासाठी झटणारा प्रत्येक हात ईश्वराचा असतो बाळा..!”

खरंय माई… आयुष्यंभर आपण कुणाकडनं काही तरी घेतच असतो…
जन्म घ्यावा लागतो दुस-याकडुन… मरतांना जाळुन किंवा पुरुन घ्यावं लागतं, ते ही दुस-याकडुनच!
मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा हि सुद्धा दुस-याकडुनच घ्यावीच लागते..!

आणि आयुष्यंभर आपल्याला वाटतं मी ते कमावलंय..!

घेताना “एकचजण” आनंदी होतो… देतांना दोघेही आनंदी होतात… घेणारा नी देणाराही!

म्हणजे “घेण्यापेक्षा”, “देण्यात” दुप्पट सुख आहे …

आणि माई, तु कायम देत राहिलीस..! तु खरी जगलीस..!!!

“नाही रे बेटा… मी कुणाला काय दिलंय याचा विचारच करत नाही. असा जर मी विचार करायला लागले तर माझ्यात अहंभाव निर्माण होईल..!”

“आयुष्यातला यातनांनी मला संपवलं नाही, पण या अहंभावाने मी संपुन जाईन..!”

“मी जेव्हा दुःख्ख भोगत होते तेव्हा फक्त ‘सिंधुताई’ होते…”

“या भोगण्याला मी जगणं मानायला लागले म्हणुन मी ‘माई’ झाले..!”

“दुःख्ख… दुःख्ख… म्हणत भोगायचं..? की अरे ह्याट्ट… म्हणत याच दुःखाला लाथ मारुन जगायचं… ज्यानं त्यानं ठरवावं..!”

मी या माऊलीकडे पहात राहिलो..!

माईचे पाय माझ्या हातात होते..! जणु मी पृथ्वी तोलली होती..!

“माई निघु..?” आम्ही विचारलं..!

“येत जा बेटा, अधुन मधुन..!”

दारातनं परत येत, माईचा हात हाती घेत म्हटलं…

“कुठे यायचं मी माई तुला भेटायला..?”

“मी स्वतःला जेव्हा जेव्हा भेटतो, त्यावेळी तुझी भेट होतेच माई..!”

“कारण, तुला अंतरंगात घेवुन तुझ्याच छायेखाली राहतोय मी..!”

“कुठं दुःख्ख दिसलं की तु दिसतेस..!”

“याचकांसाठी जे मी काम करतोय… ते तुझेच तर हात आहेत..!”

“कुणासाठी माझ्या डोळ्यातुन अश्रु वाहतात… ते डोळेही तुझे… आणि अश्रुही तुझेच..!”

“ज्या भावनेनं मी काम करतोय, ती भावना तुच आहेस..!”

“ज्या मनातुन हि भावना उत्पन्न होते… ते मनही तुच आहेस..!”

“मला स्वतंत्र आस्तित्व कुठंय माई..?”

“मी म्हणजे तुच आहेस… माझं जगणं, फक्त उधारीवर..!”

“माझ्याकडं असलेले हात, मन, डोळे, हृदय… मी तुझ्याकडनंच उसनं घेतलंय..!”

“माझं हे उधार खातं तुझ्याकडं कायम ठेव, एव्हढीच माझी प्रार्थना माई..!”

माईंच्या डोळ्यात अश्रु तरळले..!!!

महापुरात पोहणं एकवेळ सोप्पं… डोक्यावर पाण्याचा हौद वाहुन नेणंही एकवेळ सोप्पं…

पण माईंच्या या एका अश्रुंचं वजन मला पेलवलं नसतं..! माझी तेव्हढी पात्रताही नाही..!

आम्ही निघालो… माईंनी दिलेल्या विचारांची शिदोरी डोक्यावर घेवुन..!

माईंच्या या विचारांना एक “वजन” होतं… हा “भार” नव्हता… “बोजा” नव्हता..!

या विचारांना एक “मुल्य” होतं… ज्याची कशातच “किंमत” होवु शकणार नाही..!

बाहेर पाऊस पडत होता… आणि इकडे आमच्या मनात पालवी फुलली होती..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*