राम – रहिम..!!!

पुण्यातलाच एक गजबजलेला भाग..! घरं – बंगले – दुकानं आणि मध्येच कचरा टाकायची एक जागा, काहीसा उकिरडा वाटावा असा..!
याच ठिकाणी ब-याच जुन्या पुराण्या, रया गेलेल्या ऑटो रिक्षा एकमेकांना खेटुन उभ्या राहिलेल्या दिसतात.
या खेटुन उभ्या असलेल्या, रंग उडालेल्या जीर्ण रिक्षा पाहुन मला आयुष्याच्या उतारावर लागलेले आजी आजोबा संध्याकाळी एकत्र गप्पा मारायला घोळक्यानं जमतात ती आठवण येते..!
आयुष्य जगुन झाल्यावर, जीर्ण झाल्यावर, घरातुन उपरं झाल्यावर, काय गप्पा मारत असतील हि माणसं? हा मला कायम पडलेला प्रश्न..!
जुनं वैभव आठवुन त्यातच रमतात ही माणसं, या आठवणींवरच जगतात ही माणसं..!
तसंच या रिक्षांचंही असावं का? आपलं जुनं वैभव, गमती जमती आठवत… एकमेकींशी सुखदुःख्खं शेअर करत असतील का या जीर्ण झालेल्या रिक्षा..?
मला तर या जीर्ण रिक्षांना पाहुन सुरकुत्यांच्या जाळ्यात वेढलेल्या, कमरेतुन पार वाकलेल्या आज्ज्याही दिसतात..!
यांनी आयुष्य जगलं असेल की भोगलं असेल? त्यांनाच माहीती..!
जगणं आणि भोगणं… दोन्हीत फरक आहे..! आनंद जगायचा असतो… सजा भोगायची असते… ज्यांना असे आनंद गवसले ते जगले… इतरांनी मात्र केवळ ते भोगले… एखाद्या सजेसारखं..!

अशाच एका जीर्ण रिक्षात अंगाचं मुटकुळं करुन कुणीतरी झोपलेलं असायचं..! कायम..!!!
कधीही कुठल्याही वेळेला गेलो तरी ती व्यक्ती त्या जीर्ण झालेल्या रिक्षात असायचीच..!
आजुबाजुला टाकलेला कचरा कम मिनी उकिरडा… दुर्गंध या शब्दालाही लाज वाटेल असा दर्प… त्यावरच ही जीर्ण शीर्ण मोडकळलेली रिक्षा… आणि बाराही महिने रिक्षाच्या आत दिसणारं हे मुटकुळं..!
एकदा मनाची तयारी करुन, या उकिरड्यात जायचं ठरवलं, आणि गेलो..!
मोडकळलेल्या रिक्षाजवळ आल्यावर, बोचक्यासारखं काहितरी दिसलं… मी धीर करुन या बोचक्याला हलवलं… बोचक्यातुन हालचाल झाली… आणि बोचक्यातुन चक्क आधी डोकं बाहेर आलं, नंतर हात आणि नंतर संपुर्ण शरीर..!
एक थकलेले, जीर्ण झालेले, मोडकळीला आलेले म्हातारबाबा होते ते..!
बोचक्यातनं पण माणसं बाहेर येतात ..?
इतके दिवस आईच्या पोटातनंच बाळं बाहेर येतात असा माझा गैरसमज होता… इथं चक्कं बोचक्यातनं माणुस बाहेर आला..!
आईच्या पोटातनं बाळ बाहेर यावं हि नैसर्गिक प्रवृत्ती… आणि बोचक्यातनं पण माणसं बाहेर यावीत… ही सामाजिक विकृती..!

“बाबा… काय हे..? कोण तुम्ही..?? इथं कसे..?”
मी आश्चर्यानं विचारलं.
“तु-म-चं …ना-व …का-य..? तु-म्ही को-ण..?”
अडखळलेल्या शब्दांनी अगदी क्षीण आवाजात मलाच त्यांनी उलट विचारलं..!
त्यांनी उच्चारलेल्या १० – ११ शब्दांनीही त्यांना धाप लागली… बोबडं आणि अडखळत बोलत होते ते..! बोलतांना जीभ वळतच नव्हती..!
अच्छा, यांना अर्धांगवायु – Paralysis आहे तर..!

हे या रिक्षात कसे? कोणाचे कोण आहेत हे? नेमकं घडलंय काय? एक ना शंभर प्रश्न मला पडले..!
मी माझं नाव सांगितलं… आणि जुन्या फाटक्या बोचक्यात हात घातला… बोचकं उचकटत गेलो आणि हा माणुस तसतसा मला घावत गेला..!
श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकीच याचं एक नाव..!
आई वडिल, एक भाऊ आणि हे… सुटसुटीत चौकोनी कुटुंब!
सलीमभाई नावाच्या एका ऑटो रिक्षा कन्सलटंट कडे हे नोकरीला लागले. जुन्या रिक्षा खरेदी विक्रीच्या व्यवसायात सलीमभाईंना हे मदत करायचे… सलिमभाईंनी यांना कधी नोकर समजलेच नाही..!
मित्राप्रमाणेच यांना ते वागवायचे..!
मस्त चाललं होतं… घरात लग्नाची बोलणी चालु होती… अशातच वडिल देवाघरी गेले..!
हे बाबा तरुण वयातच कोलमडुन पडले… पुन्हा कसेबसे उठले..!
आईला आधार देत देत सावरले… थोडंसं सावरलंय म्हणतानाच, आईने मध्येच हात सोडला… आणि बाबांनी धीर..!
एक पंख असताना पक्षी जगु शकतो… पण दोन्ही पंख छाटल्यावर जगायचं कसं..?
कालांतरानं भाऊ वेगळा राहु लागला..!
माणसं आधी एकत्र येतात… आणि नंतर दुरावतातच..!
हे डोक्यात फिट्ट बसलं..!
आपणही लग्न करुन मुलं, बायको आपल्या अवती भोवती गोळा करणार… आणि नंतर ते कधीतरी दुरावणारच… या दुराव्याचं दुःख पुन्हा वाट्याला यायला नको, म्हणुन यांनी लग्नच केलं नाही..!
सलिमभाईंबरोबर हातानं काम सुरु होतंच…
पण मन मोकळं करायला कुणीच नव्हतं…
ते बंदिस्त झालं होतं… नुसतीच घुसमट!
मन आणि छत्री मोकळेपणानं उघडली तरच त्यांचा उपयोग, नाहीतर नुसतंच ओझं..!
याचा व्हायचा तोच परिणाम झाला…
आधी ब्लड प्रेशर वाढलं आणि कालांतरानं अर्धांगवायुचा झटका आला..!
आता बोलणं बंद… चालणं बंद… आणि त्याचबरोबर कामही बंद..!
जगायचं कसं..?
जवळचं कुणी शिल्लक नाही. वारंवार आत्महत्येचा विचार यायचा… पण मार्ग आणि संधी सापडत नव्हती..!

कसं असतं ना, आयुष्यात काहीवेळा मार्ग सापडतात… पण संधी नसते…
जेव्हा संधी सापडते, तेव्हा मार्गच शिल्लक नसतो..!
किती पराधीन असतं सर्वच… जगणंही आणि मृत्युही..!
मेल्यावर स्वर्ग दिसतो कि नाही माहित नाही…
पण जिवंतपणी या बाबांच्या नशिबी नरक आला होता…
पण याही परिस्थितीत सलिमभाईंनी यांची साथ सोडली नव्हती..!
सलिमभाई गेल्या कित्येक वर्षांपासुन या बाबांना दोनवेळचं जेवण आणि नाष्टा देतात, कपडे देतात, कसलंही काम न करता यांना पगार देतात..!
मी मेल्यावर माझे अंतिम संस्कार सलिमभाईंनीच करायचे आहेत..!
बाबा अडखळत पण ठासुन सांगतात..!!!
हि रिक्षाही सलिम भाईंचीच, कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी ती विकली नाही…
हीच रिक्षा, या बाबांना आधार देते उनपावसापासुन..!
एक जीर्ण झालेलं, मोडकळीला आलेलं यंत्र… एका जीर्ण झालेल्या माणसाला आधार देतंय..!
बाबांनाही, हि रिक्षा म्हणजे बाळाच्या डोक्यावर पदर पसरुन उभी असलेली त्यांची म्हातारी माय दिसते..!
सजीव आणि निर्जीव यांचा अभुतपुर्व असा संगम झालाय इथं..!
यंत्राला सलाम करु..?
की सलिमभाईंना दुवा देवु..?
देवाची पुजा करु..?
कि अल्लाहची इबादत करु..?
कि बाबा आणि सलिमभाईंच्या मैत्रीला दाद देवु..?
बाबांच्या दुःखाला आह… म्हणु..?
की बाबांच्या कृतज्ञतेला वाह… म्हणु..?
काय करु… काय करु..?
अशावेळी काहीच करायचं नसतं आपण… फक्त नतमस्तक व्हायचं..!

बरोब्बर मागच्या शुक्रवारी १ नोव्हेंबर ला मी सलिमभाईंना गाठलं..!
“अस्सलामआलेकुम सलिमभाई!”
“नमस्कार!”
“बोला साहेब, काय हवं..?”
ग्राहक समजुन अस्खलित मराठीत त्यांनी विचारलं..!
मी त्यांचा हात हातात घेत म्हटलं, “मला जे हवं होतं ते मला मिळालंय… विज्ञानानं मला माणुस शिकवला… आणि तुम्ही माणुसकी!”
मी बाबांविषयी मला सर्व समजलंय आणि तुम्हाला मनापासुन नमस्कार करण्यासाठी आलोय असं सांगितलं..!
“वो तो मेरा फर्ज था… हम सभी अल्लाह के बंदे है… इन्सान इन्सान की मदद नही करेगा तो और कौन करेगा..?”
“आज उसपे जो गुजर रही है, अगर वो मेरेपे गुजरी होती तो वो भी मेरे लिए यहीं करता, जो आज मै उसके लिए कर रहां हुँ…”
माझ्या डोळ्यात पाणी तरळलं..!
एखाद्यावर टाकलेला विश्वास किती मोठा असु शकतो..?
मी डोळ्यातलं पाणी आवरत म्हणालो, “आप में मुझे अल्लाह दिख रहे है… उनकी सुरत आपसे अलग नही होगी…”
हातातुन हात सोडवत ते म्हणाले… “अरे ना साब, हम सभी लोग यहीं पे गलती करते है..!”
“इन्सान में अल्लाह और भगवान ढुँढने के बजाय, इन्सान मे इन्सान ही देखना चाहिये… एक इन्सान दुसरे को इन्सान समझे… उसके साथ सुख दुख बांटे… इसी का नाम पुजा है… इसीको इबादत कहते है…”
मी शहारलो… खरंच आहे हे..!
सलिमभाई अशा प्रकारची पुजा प्रत्यक्ष जगत होते..!
“जो खुद के लिए जीता है… वो उम्र काट देता है… जो दुसरों के लिए जीता है… वो ही जिंदगी जीता है…”
मी डोळे मिटुन ऐकत होतो…
“डाक्टरसाब…”
मी भानावर आलो.
“एक बिनती करुं आपसे..?” यावेळी सलिमभाईंचे हात जोडलेले आणि डोळ्यात पाणी होतं..!
मी शरमुन म्हटलं, “हात नका जोडु, सांगा ना काय ते”
ते म्हणाले, “आजकल एक चिंता मुझे सतायी जा रही है…मेरी भी उमर हो रही है, मेरे बाद इसका क्या होगा..?”
“अल्लाह करे, इसके पहले, मै ना मर जाऊं … मेरे बाद इसको कोई नही है देखनेवाला…”
हे बोलतांना या माणसाच्या डोळ्यानं दगा दिला…
इतका धीरगंभीर माणुस ओठ मुडपुन लहान मुलासारखा रडायला लागला..!
माझ्या अंगावर काटे आले..!
म्हटलं, “मी काय करु, सांगा सलिमभाई..?”
“आप किसी आश्रम मे इसको रखलो… मरते समय मुझे गम नही होगा, की इसको रस्ते पे छोडके मै आगे चला आया… आपसे ये काम होगा तो बोलो…”
म्हटलं, “थोडा वक्त दे दो सलिमभाई, बात ऐसी है की आजकल बुजुर्ग लोग घरमें नही रहते, वृद्धाश्रम मे ही रहते है…इसी वजह से घर खाली पडे है और वृद्धाश्रमोंमे जगह नही है…”
“मेरे पास अपना कुछ नही है, जिनके पास ऐसे आश्रम है, उनसे पुछना पडेगा…”
सलिमभाईंचा मी निरोप घेतला!

बाबांकडे परत आलो, झालेलं सर्व सांगितलं… म्हटलं, “याल का सोबत कुठं सोय केली तर?”
त्यांनी कसेबसे हात जोडण्याचा प्रयत्न करत त्याच बोबड्या बोलीत होकार कळवला..!
त्यांनाही सलिमभाईंच्या अंगावर ओझं नव्हतंच टाकायचं..!
जातांना पुन्हा एकदा बाबांनी मला नमस्कार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला…
नमस्कारासाठी हाताचे दोन्ही तळवे ते समोरासमोर आणुन टेकवण्याचा प्रयत्न करत होते… शरीरावर नसणाऱ्या कंट्रोलमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते… दोन तळवे एकमेकांना टेकवण्यासाठीही त्यांना कष्ट पडत होते…
मी गाडीवरुन उतरुन, त्यांचे तळवे एकमेकांना टेकवुन देताच… ते त्याच बोबड्या बोलीत बोलले “न-म-स्का-र सा-ये-ब!”
माझ्या डोळ्यातल्या पाण्यांनी या नमस्काराला सलामी दिली!
मधला एक आठवडा वृद्धाश्रम शोधण्यात गेला..!

डॉ. नंदा शिवगुंदे, या ताई भोगाव, जि. सोलापुर येथे एक आधार केंद्र चालवतात. मला त्या भाऊ समजतात… नव्हे, मी आहेच त्यांचा भाऊ. मी सर्व परिस्थिती सांगुन हक्कानं त्यांना या बाबांना सांभाळण्याची विनंती केली.
एका क्षणातच त्यांनी, “हो दे पाठवुन बाबांना शुक्रवारी ८ नोव्हेंबरला … मी माझी गाडी पाठवुन देते”, असं सांगितलं..!
धन्यवाद ताई! तुझे ऋण मी कसे फेडायचे..?
तुझ्या रुपानं आजपासुन बाबांना घर तर मिळेलच, पण एक “माय” ही मिळेल!
आज ८ नोव्हेंबर शुक्रवारी, बाबांना ताईंच्या छत्राखाली सुपुर्द करतोय..!

आत्ता या तारखा पाहतांना माझ्या लक्षात आलं…
मी सगळ्यात पहिल्यांदा बाबांना भेटलो ती तारीख २५ ऑक्टोबर, शुक्रवार!
सलिमभाईंना भेटलो ती तारीख १ नोव्हेंबर, शुक्रवार!
ताईंनी बाबांना आणायला सांगितलं ती तारीख ८ नोव्हेंबर, शुक्रवारच!
एक अल्लाहचा बंदा..! मित्राची चांगली सोय करण्याचा मनात विचार करतो… अजमेरच्या दरग्यात मित्राचं आयुष्य वाढावं याची दुवा करतो… आणि त्याची ती दुवा कबुल होते सुद्धा..!!!
ती ही शुक्रवारीच!!!
हा केवळ योगायोग कि… कुणीतरी रचलेली क्रिडा..?

सलिमभाई आणि बाबांना, आज जायचंय आपल्याला ही बातमी सांगण्यासाठी मी आणि मनिषा सकाळीच गेलो…
बाबांचं रुप आम्ही पालटलं होतं…
पांढराशुभ्र पायघोळ पायजमा, फिकट निळा नेहरुशर्ट, लेदरची नविन चप्पल, तुळतुळीत केलेली दाढी, डोक्यावर गांधी टोपी, आणि मुखावर गोड हास्य..!
माझ्या आजोबांना मी कधी पाहिलं नाही, बहुतेक असेच दिसत असावेत..!
मी आणि मनिषाने त्यांना नमस्कार केला..!
आशिर्वाद देण्याऐवजी, डोळ्यात पाणी आणत त्यांनीच उलट आम्हाला नमस्कार केला… मी ही छबी कॅमे-यात टिपली… मनात जपली..!
“अच्छा सलिमभाई… येतो..!”
डोळ्यातल्या पाण्यानंच त्यांनी आम्हाला निरोप दिला..!
चलो कभी कभी हम भी इन्सान बन जाय…
हो कभी ऐसे ऐ मालिक…
कभी मंदिर में हम दीप जलायें… और मस्जिद रोशन हो जाय..!!!
आमेन..!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*