Gynaecomastia गायनेकोमास्टिआ..! शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषांना होणारा हा विकार!
यात पुरुषांच्या छातीत फुग्याप्रमाणे गाठ यायला लागते. ब-याच वेळा हे आपोआप बरं होतं, काहीवेळा औषधोपचार कामी येतात, नाहीच तर मग सर्जरी करावी लागते.
काहीवेळा काहीजणांची फुग्यासारखी छातीवरली ही गाठ तशीच राहते, वाढत राहते, मोठी होत जाते.
दिसायला हे बेढब दिसतं, आणि ज्याला हे झालंय त्या पुरुषाचं मानसिक खच्चीकरण व्हायला लागतं..!
१५ दिवसांपुर्वी एका आजीशी गप्पा मारत होतो. गप्पांचा विषय नातवापर्यंत आला.
“डाक्टर, माज्या नातवाला काय औशीद मिळंल का? येड्यावानीच करतंय वो ते” डाव्या हाताचा पंजा हनुवटीवर टेकवत ती म्हणाली.
“वय काय त्याचं? शाळेत जात नाही?” औषधांचे डब्बे बॅगेत भरता भरता मी विचारलं.
इकडं तिकडं बघत, कुणी ऐकत नाही याचा कानोसा घेवुन, डोक्यावरला पदर नीट करत, माझ्या कानाशी येवुन काहीतरी गुपीत सांगितल्यागत म्हणाली, “हिकडं कान करा… आवं तुमाला सांगते…”, म्हणत तीने माझ्या कानाशी खुसपुस सुरु केली…
तीच्या एकंदर बोलण्यावरुन, मला कळलं ते असं…
तीच्या नातवाला सहावीत असताना, छातीवर गाठ आली. गाठ ही अशी फुग्याएव्हढी… मी ओळखलं, हाच तो गायनेकोमास्टिआ!
सुरुवातीला लाजुन याने घरी काही सांगितलं नाही, आणि जेव्हा घरच्यांना समजलं, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं…
नंतर नंतर घरातले लोकही याला हसायला लागले..!
शाळेतली मुलं याला पोरगी पोरगी म्हणुन चिडवायला लागले… वयानं मोठ्या असणाऱ्या काही मोठ्या मुलांनी तर आता तुला बाळ पण होणार असं याच्या डोक्यात बिंबवलं…
शाळेतल्या मुली याच्याकडे चोरुन बघत, आपापसांत कुजबुजत, फिदीफिदी हसायच्या, एकमेकींना टाळ्या द्यायच्या..!
हा डिप्रेशन मध्ये गेला. नववीत शाळा सोडली याने. त्यानंतर घराबाहेरही पडणं पुर्ण बंद केलं याने. आतल्या आत कुढत राहिला एकटाच..!
“मलाच हे असं का?” याचा विचार करत राहिला.
लक्ष द्यायला, याच्याशी बोलायला घरातल्यांनाही वेळ नव्हता. अशी तीन वर्षे गेली…
विनाउपचाराने ही गाठ दिवसेंदिवस वाढायला लागली. आता हळुहळु आपण बाई होणार असं त्याला वाटायला लागलं. तो हैराण व्हायचा…
घरातल्या लोकांनी आधार देण्याऐवजी, “पुरुषासारका पुरुष तु, पन काय बाईगत वागतुस?” अशी वाक्य येताजाता अंगावर फेकल्यानं, हा मोडुन पडायचा, ढासळुन जायचा..!
“पोराला आता येणी फणी कराय शिकवा… गंध पावडर टिकली बी आना”, शेजारच्या बाया, तोंडाला पदर लावु लावु हसत, याच्या आईला टोमणे मारायच्या.
शेजारचे बापये, जाता येता सहज याच्या वडिलांना म्हणायचे, “आता जावाई शोदा बगा…हि..ह्हि..ह्ह्ही..!”
काही चुक नसतांना या मुलाच्या मनाची अवस्था कशी झाली असेल, याच्या अंदाजानंही अंगावर काटे येतात.
समाजातल्या असल्या काही नाठाळांचा रिकामटेकड्यांचा राग येतो.
हा आयुष्याला वैतागला… दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला… दोन्ही वेळा चुकुन वाचला!
पण पुर्ण ढासळुन गेला होता…
याला चिडवणारं सगळं जग याला नकोसं झालं… दिसेल त्याला मारायला जायचा, शिव्या द्यायचा…
झालं… एकेदिवशी याच्यावर शिक्का बसला, “येडा..!”
सगळेच आता त्याला येडा म्हणु लागले… समजु लागले…
खरंच, कुणी केला याला येडा..?
त्याच्या आजुबाजुला असलेला प्रत्येक घटक जबाबदार आहे, या मुलाचं खच्चीकरण करण्यात!
प्रत्येक मुलाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, तु पुरुष म्हणुन जन्मला आहेस… तु उच्च स्थानी आहेस… स्त्री कनिष्ठ असते हेच बिंबवलं जातं.
या मुलाच्या बाबतीतही हेच घडलं… आपण “पुरुष” आहोत याचा अहंकार बाळगत असताना, आपण स्वतःच आता “स्त्री” होणार… स्त्री..?
म्हणजे मी पुरुष राहणार नाही..?
बस्स, डिप्रेशनचं मुळ कारण हे!
लहानपणापासुन पुरुष – स्त्री हा भेदभाव याच्या मनात कोंबला गेला नसता तर हा डिप्रेशन मध्ये गेला नसता.
स्त्री – पुरुष दोघेही समसमान आहेत, यात उच्च – नीच असं काहीच नसतं… हे याच्या डोक्यात भिनवलं असतं… तर आलेलं डिप्रेशन यानं पचवलं असतं..!
परंतु, अपवाद वगळता समाजात आजही पुरुषालाच उच्च स्थान दिलं जातं. स्त्रीला कमी लेखलं जातं.
साधे उल्लेख करतानाही, “त्या ‘माणसाकडुन’ या ‘बाईने’ भाजी घेतली.”
किंवा “हा ‘माणुस’ त्या ‘बाईचा’ भाऊ आहे”… असं बोललं जातं.
या वाक्यात “माणुस” हा शब्द पुरुषासाठी वापरला जातो… मग प्रश्न पडतो, बाई ही “माणुस” नाही का?
लहानपणापासुनच नकळतपणे हेच बिंबवलं जातं… पुरुष म्हणजे माणुस!
उच्च, छान ते सर्व पुरुषांचं… हलकं सलकं ते सर्व स्त्रियांचं..!
मोठ्या ताटाला “ताट” म्हणतात, पण छोटं ताट असलं की त्याला “ताटली” म्हणतात…
मोठ्या ढोलाला “ढोल” पण जरा बारीक ढोलाला “ढोलकी” म्हणतात…
मोठी घंटा ही “घंटा” पण आकार कमी झाला की होते “घंटी”…
हाताच्या पंजावरचं महत्वाचं बोट “अंगठा”, पुरुषवाचक! पण त्यातल्या त्यात कमी महत्वाची ती “करंगळी”, स्त्रीवाचक!
कुणीतरी बेमालुमपणे खुप पुर्वीच हे रुजवलंय!
स्वतःच्या पुरुषत्वाचा खोटा अहंकार मिरवणा-या लोकांनी या मुलाला तुझ्यासारख्या “पुरुषाची” आता “बाई” होणार हे डोक्यात घालुन “येड” केलं… नव्हे याचा मानसिक खुन केला.
पुरुष प्रधान संस्कृतीची पाळंमुळं फक्त पुरुषांत नाहीत, स्त्रियांतही रुजवण्यात या संस्कृतीच्या समर्थकांना यश आलंय.
“थांबा हं, मालकांना विचारुन सांगते…” सर्रास ऐकु येणारं हे वाक्य..! यातले मालक कोण? तर नवरोबा!
नव-याला विचारुन सांगण्यात गैर काहीच नाही, पण त्यांना मालक समजायचं आणि स्त्रियांनी स्वतःच गुलामगिरी पत्करायची?
बायकोनं नव-याला अहोजाहो बोलवायचं, त्याच्या अनुपस्थितीत आमचे “हे” म्हणुन संबोधायचं…
आणि यांचे “हे” त्यांना अगं तुगंच करणार… चुकलं तर आई बहिणही काढणार…
दोघांनी एकमेकांना मान देत अहो जाहो तरी म्हणावं किंवा अरे तुरे तरी करावं..!
पुरुषाला मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे, जन्मजात मिळालेल्या अधिकारांमुळे आणि स्त्रियांना मिळणाऱ्या हिणकस वागणुकीमुळे मुलींना जन्मालाच न घालणं लोक पसंत करत आहेत.
आणि म्हणुनच माझा मित्र, डॉ. गणेश राख, स्त्री जन्म या विषयावर जीव तोडुन काम करत आहे!
नंतर मी या मुलाला भेटलो.
एक अतिशय संवेदनशील असा हा मुलगा! मानसिक रित्या खचलेला! (कि खचवलेला?)
आधी माझ्याही अंगावर आला, शिव्या दिल्या..!
साहजीकच होतं ते… ज्या समाजाने त्याचं जगणं बदनाम केलं होतं, त्याच समाजातुन मी आलो होतो.
त्याला आपलंसं करण्यात बरेच दिवस गेले.
गायनेकोमास्टिआ विषयी त्याला यु ट्युब आणि गुगलवर उपलब्ध असलेली माहीती दाखवली. समजावुन सांगितली.
गायनेकोमास्टिआ पुर्ण बरा होतो, आणि बरा करण्यात मी तुला शंभर टक्के मदत करणार आहे, हे सांगितल्यावर अक्षरशः ढसाढसा रडला तो!
“मी मरायचा विचार करत होतो डॉक्टर…” तो हुंदके देत म्हणाला.
“तु मरायचं तर नाहीसच, पण बरा झाल्यावर काम करायचं. मस्त तो-यात जगायचं येड्या… आज्जी सारखी भिक नाही मागायची…” मी डोळे मिचकावत आजीकडे पहात बोललो.
“कायपण काम द्या, मी तयार आहे”, डोळे पुसत अंतःकरणापासुन त्यानं उत्तर दिलं..!
बरेचसे विचार त्यानं एका कागदावर लिहिले होते… मला त्याने ते कागद दाखवले… आत्महत्येविषयीचा मजकुर होता तो…
मी म्हटलं, “थांब या कागदाचे पतंग करुन आपण दोघंपण उडवु”
यावर टाळी देत तो दिलखुलासपणे हसला होता…
इतकं सुंदर हसु मी यापुर्वी पाहिलं नव्हतं.
आज हे सर्व सांगण्याचा हेतु हा की, आजच या मुलाचं ऑपरेशन एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये करुन घेत आहोत
उद्यापासुन, नव्हे अगदी आत्तापासुन, त्याला हव्या असणाऱ्या रुपात तो जगायला लागेल… येडा म्हणुन नाही… तर एक जबाबदार नागरीक म्हणुन!
ख-या अर्थानं, या मुलाचा जीव वाचवण्यात तुम्हीही वाटेकरी आहातच… तुम्ही सोबत नसतात तर मी तरी एकट्यानं काय केलं असतं..?
तेव्हा याचं हे माणसांत येणं हे तुम्हालाच समर्पित..!
हॉस्पिटलमधुन निघताना त्याचा हात हाती घेवुन म्हटलं, “झोप आता, उद्या परत येतो”
तो बोलला काहीच नाही. फक्त हसला… आणि उशीवरची मान त्यानं वळवली… बंद पापण्यातुन वाहणारे अश्रु खुप काही सांगत होते..!
हो, लिहायला प्रत्येकवेळी लेखणीच हवी असं नाही…
समजायला प्रत्येकवेळी शब्दच हवेत असंही नाही..!
“मनाचा कान” केला की सगळं ऐकु येतं..!
Great. Thanks for your work. Congratulation. Keep it up. We will help for such good work.