एका तरी “माणसाला” मदतीचा हात देवु, साथ देवु, उभं करु … म्हणत २०१५ साली “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणुन माझा प्रवास सुरु झाला!
नुसतंच शरीर आणि माणुस यात फरक आहे!
ज्या शरीरात मन आहे तो माणुस , हि आपली मी माझ्यापुरती केलेली व्याख्या!
Allopathy, Homeopathy, Naturopathy या सर्व पॅथी शरीरं बरी करतात… माणुस नाही! माणसाचं मन नाही..!
माणसाचं मन बरं करायचं असेल, मनाला उभारी द्यायची तर त्यासाठी वेगळी पॅथी वापरावी लागते…
आणि ती म्हणजे Empathy आणि Sympathy!
आणि हो, या पॅथी वापरण्यासाठी, कोणत्याही क्वालिफिकेशनची गरज नाही, माणसानं “माणुस” असणं एव्हढीच अट!
या विचारांची शिदोरी घेवुनच हा रस्ता चालायला सुरुवात केली २०१५ पासुन..!
२०१९ हे कामाचं चौथं वर्ष! पहिल्या अडीच वर्षात अनंत अडचणी झेलल्या..!
रस्त्यावर काम करत असताना पोलीसांची माझ्यावर असलेली संशयी नजर (कित्येक वेळा पोलीसांनी संशयीत म्हणुन चौकशीला चौकीत बोलावलं होतं, उलट सुलट तपासणी केली होती), रिकामटेकड्या लोकांच्या अनावश्यक चौकशा, टोमणे आणि खुद्द भिक्षेकरी समाजाचा माझ्यावर असलेला अविश्वास!
यामुळे मी शंभरदा मोडुन पडायचो..!
भिक्षेक-यांना पुर्वी वाटायचं मी पोलीसांचा खबरी आहे, हा आपल्याला पोलीसांत पकडुन देईल, यामुळं कुणीच मला “भीक” घालत नव्हतं…
उलट हेच भिक्षेकरी लोक मला हाकलुन द्यायचे… यातले काही उर्मट लोक तर अंगावर थुंकलेही आहेत..! काहींनी चपला दाखवल्या आहेत..!
पुर्वी मला वाटायचं बायका “चपलाहार” म्हणतात तो हाच असावा..!
या सगळ्यातुन पडत पुन्हा उठलो, यात मनिषाची खंबीर साथ आणि आईवडिलांच्या धीराच्या शब्दांचा मोलाचा वाटा!
हळुहळु तुमचीही साथ मिळत गेली, भिक्षेक-यांचाही विश्वास कमवला, नव्हे त्यांच्याच कुटुंबातला एक झालो..!
ज्याला हाकलुन दिलं, त्याच व्यक्तीला त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणुन स्विकारलं! आणि मी ते मनापासुन निभावलंही!!!
यानंतर खरा प्रवास चालु झाला…
वैद्यकीय उपचार देत, जोडीने प्रेमाची, मायेची देवाण घेवाण करत, हळुहळु, “काम कर गं माई”, “काम करा वो कायतरी बाबा”, “शाळा शीक गं बाई, नको मागु भीक” असं म्हणत मी ही यांच्यापुढं पदर पसरायला सुरुवात केली..!
एप्रिल २०१८ ला पहिल्या व्यक्तीने माझ्या पदरात झुकतं माप टाकलं, भीक मागणं सोडलं, काम सुरु केलं… यांचं नाव रविंद्र शिंदे!
यांना अनंत आजार होते, सप्टेंबर २०१९ ला यांना त्रास झाला, ऍडमिट केलं, सारं काही करुनही मला सोडुन गेले..!
मुलगा म्हणुन मी यांच्यावर रीतसर अंत्यसंस्कारही केले..!
एक बाप गेला माझा..! सावरायला वेळ लागेल मला अजुन खुप!
आयुष्यात पयल्यांदाच घडलेल्या गोष्टीचं कवतिक कुणाला नसतंय?
असो, तर एक दोन तीन असं बालवाडीतल्या पोरागत एकेक आकडे सर करत पुनर्वसनाची संख्या मागच्या आठवड्यापर्यंत ५९ वर गेली!
मागच्या तीन महिन्यांपुर्वी एक तरुण स्त्री भेटली.
हिला पोरं पाच, पोलिओमुळे अपंग, नवरा आहे पण त्याच्या “एवडुल्या” पगारात ७ डोकी पोसायची कशी? म्हणुन ही भिक मागते..!
ती भीक मागत असतांनाच, एकदा मीच तीच्यापुढं पदर पसरला; म्हटलं, “बायो, काम करशीन का?”
पुढचे काही दिवस तीचा भाऊ होण्यात गेले, मग पोरांचा मामा झालो, मग तीच्या नव-याचा मेहुणा झालो..!
एके दिवशी, अधिकारानं तीचा कान धरुन सांगितलं, “आता तु डॉक्टरची बहिण झालीस… तुला हे शोभत नाही, आणि मलाही!”
“भीक बीक नाटक बंद… गुपचुप काम करायचं… नायतर फटके खाशील..! क्काय? कळतंय का सांगितलेलं..?”
थोरला भाऊ म्हणुन जीवापाड प्रेम करत असलेल्या भावाची ही मागणी ती नाकारुच शकली नाही..!
इमिटेशन ज्वेलरी विकण्याचा पुर्वी तीचा व्यवसाय होता, चांगला अनुभवही आहे.
शिवाय अपंग म्हणुन हातगाडी चालवण्याचा हिच्याकडे परवाना ही आहे.
हाच धागा पकडुन, उद्या २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हिला आपण एक हातगाडी देत आहोत. सोबत विक्रीसाठी इमिटेशन ज्वेलरीही!
सेंट व्हिन्सेन्ट स्कुलजवळ, सेंट अँथनी चर्च समोर, कँप, पुणे येथे दुपारी १२ वा आपण या सर्व बाबी तीला हस्तांतरीत करणार आहोत.
मागच्या वेळच्या चारही हातगाड्या इतरांना इथेच दिल्या होत्या, लोक विचारतात… “डॉक्टर, हाच स्पॉट का निवडता? काही गुपीत आहे का?”
तर महोदय, गुपीत बिपीत काहीच नाही… हातगाडी तयार करण्याचा कारखाना या स्पॉट पासुन अगदी जवळ आहे.
या हातगाड्या, कारखान्यापासुन मी स्वतःच ढकलत आणत असतो… माझा ढकलण्याचा त्रास जरा कमी व्हावा, एव्हढाच निखळ स्वार्थ!
हां, तर पुनर्वसनाचं खरं झालेलं माझं हे “साठावं” स्वप्नं! म्हणजे माझी साठीच… नाही का?
माझ्या या धाकट्या बहिणीच्या भिक्षेकरी म्हणुन सुरु झालेला प्रवास, कष्टकरी या स्टॉपवर येवुन थांबलाय..!
इथुन हिचं विमान टेक ऑफ करेल..! आभाळात भरारी घेईल..!
याल?
माझ्या या बहिणीच्या पंखात बळ भरायला?
तीला शुभेच्छा द्यायला?
तीला आशिर्वाद द्यायला..?
या, आम्ही वाट पाहतोय..!
प्रेषक –
“ती” चा भाऊ – अभिजीत!
Leave a Reply