आपल्या माहितीकरीता सविनय सादर..!!!

आपल्या माहितीकरीता सविनय सादर..!!!

  1. “पिल्लु” नावाच्या ब्लॉग मधील कोपरापासुन हात नसलेल्या मुलाच्या चित्रांचं प्रदर्शन १७ – २० ऑक्टोबर दरम्यान भरवलं होतं. प्रदर्शनातुन मिळालेल्या रकमेतुन भाजीपाला विक्रीसाठी एक दुकान भाड्याने घेतलंय, तसंच राहण्यासाठी एक रुम. दोन्हींचे डिपॉझीट व विक्रीयोग्य माल खरेदी करण्यात या निधीचा वापर झाला. योग्य अशा मुलीशी लग्न करुन हा मुलगा आपल्या पत्नीसह कल्याण येथे व्यवसाय करत सुखाने संसार करत आहे.
  2. “आपा” नावानं लिहिलेल्या ब्लॉग मधल्या आपास पत्र्याचं घर बांधुन दिलं होतं. शेवटी “कोबा” म्हणजेच Flooring चं काम राहिलं होतं, या flooring चं कामही २१ नोव्हेंबर ला पुर्ण झालं. व्यवसायासाठी हिला अगोदरच हातगाडी दिली होती. पुण्यात मुंढवा येथे घराजवळ हातगाडीवर रोजच्या गरजेच्या गोष्टी ती विकते. चारही मुलं शाळेत जात असुन, आपल्या मुलांसह ती सुरक्षित निवा-याखाली आनंदाने आणि स्वाभिमानानं जगत आहे.
  3. “राम-रहिम” या ब्लॉग मधील सलिम चाचांनी सांभाळलेल्या, रस्त्यावर बेवारस जगणाऱ्या (?) बाबांना आदरणीय नंदाताई शिवगुंदे यांच्या निवारा केंद्रात ठेवलं आहे. नंदाताईंच्या मातृतुल्य पंखांखाली बाबा अतिशय सुखासमाधानात रहात आहेत.
  4. “येडं” नावानं लिहीलेल्या गायनेकोमास्टिआ झालेल्या मुलाचं ऑपरेशन झालंय. पुर्णतया तो नॉर्मल झालाय. मानसिक असंतुलनातुन १०० टक्के बाहेर आलाय, येत्या काही दिवसात त्यालाही व्यवसाय सुरु करुन देवुन, स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करणार आहोत.
  5. “माझी साठी” या ब्लॉग मध्ये लिहिलेल्या अपंग ताईला हातगाडी घेवुन दिलीय. तीला अनुभव असलेल्या इमिटेशन ज्वेलरी विक्री व्यवसायासाठी लागणारी इमिटेशन ज्वेलरी पुढील आठवड्याभरात देत आहोत.
  6. या व्यतिरिक्त रोजची रस्त्यावरील रुग्णतपासणी व काम करा म्हणुन करत असलेले counselling नित्यनेमाने सुरु आहेच.

नेहमीप्रमाणेच, यात माझं एकट्याचं श्रेय जवळपास नाहीच.

“जगन्नाथाचा रथ” म्हणुन ओढणा-या समाजातल्या अनेक सहृद “भाविकांचे” हात या रथास लागले आहेत, हे श्रेय त्या सर्व भाविकांचं!

मी यांना भाविकच म्हणतो..!

माणुसकी लाच देव समजुन, माणुसकीची भक्ती करणाऱ्या या सर्वांना भाविक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं..?

“भिक्षेकरी ते कष्टकरी” या माझ्या दिंडीत सामिल झालेले आपण सर्वच माझ्या दृष्टीने वारकरी आहात..!

या प्रत्येक वारक-यांस माझा साष्टांग नमस्कार!

वारी नेमकी कोणत्या दिशेला आणि कुठं चाललेय? कुठं भरकटत तर नाही ना? हे दिंडीत सामिल असलेल्या प्रत्येक वारक-यांस कळावं, एव्हढाच हे updates देण्यामागं उद्देश असतो!!!

आणखी एका आजीचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. ही आजी आहे ७० – ७२ वर्षाची. स्वतःची प्रकृती नाजुक. तरी मला रोज माझे पेशंट कुठं ऍडमिट आहेत ते विचारते. स्वखर्चाने हॉस्पिटल मध्ये येते, दिवसभर पेशंटच्या उशा पायथ्याला बसुन पेशंटचं डोकं आणि पाय चोळुन देते. पेशंटच्या मनाला उभारी येईल अशा अनुभवाच्या सकारात्मक गोष्टी सांगुन रंजन करते..! आणि संध्याकाळी घरी जावुन पुन्हा दुस-या दिवशी सकाळी हजर होते…

काय म्हणावं या सेवावृत्तीला?

काय म्हणावं तुम्हां सर्वांच्या दातृत्वाला?

मी आणि मनिषा नतमस्तक आहोत आपणां सर्वांपुढे..!

देव आहे की नाही माहीत नाही, पण तुमच्या रुपानं आम्हाला देवमाणसं मात्र नक्कीच भेटली..!

आमच्या साष्टांग नमस्काराचा स्विकार व्हावा हि विनंती!

आपला स्नेहांकित,
अभिजीत

1 Comment

  1. Good. I salute to your work. I want to ask you one question , ” some beggers are such that they really a type of mentally challenged and or very slow learner etc. then how you handle such cases? Also I would like to talk to you regarding your this social work on phone. Should I call, what is good time to talk to you? I wish that your work should get over very soon, as you wish.

Leave a Reply

Your email address will not be published.


*