Updates..!

मला आपणांकडुन शारीरीक – आर्थिक – मानसिक मदत मिळते आहे! सोहम ट्रस्टचे आपण सर्व “सन्माननीय सभासद” आहात, हेच मी आजवर समजत आलोय, म्हणुन करत / करणार असलेल्या कामाचा हा आढावा आपल्या माहीतीसाठी सविनय सादर…

वैद्यकीय

  1. तीन धडधाकट कमावण्यायोग्य मुलं असतांनाही भीक मागावी लागणारी एक मावशी, काही आजाराने भयंकर अस्वस्थ होती. अथर्व हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे इथे कालपासुन तीला ऍडमिट केलंय. आज प्रकृती स्थिरस्थावर असुन लवकरच पुर्ण बरी होईल. तीन पोरं आहेतच आधीची, मी चौथा झालो..! हि संधी मला तुमच्याचमुळं मिळाली, ऋणी आहे तुमचा!
  2. चिंचवड च्या ३ आज्ज्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे, पुढील आठवडाभरात भोसरी येथील डोळ्यांचे सुप्रसिद्ध डॉक्टर, माझे मित्र डॉ. समीर रासकर यांचेकडे सर्व ऑपरेशन्स करवुन घेत आहोत. लवकरच “नजरेला”… “नजर” देण्याचं यांना बळ मिळो!
  3. १७ वृद्धांची डोळे तपासणी करुन, ४ वृद्धांच्या डोळ्यांचे ऑपरेशन लेले हॉस्पिटल येथे पार पडले. सर्वचजणांना उत्तम दृष्टी प्राप्त झाली आहे. कष्टकरी होण्याचा “दृष्टिकोन” मिळण्याची आता वाट पाहतोय…
  4. मध्यमवयीन ३ महिलांना गंभीर असे स्त्री आजार आहेत. तिघींचेही ऑपरेशन सांगवी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, माझे मित्र डॉ. अजय यादव यांच्या पारस हॉस्पिटलमध्ये, सांगवी पुणे येथे पुढील आठवड्यात करणार आहोत.
  5. याशिवाय रोजची रस्त्यावरील तपासणी व उपचार सुरुच आहेत.

पुनर्वसन

  1. दोन अपंग आजोबा भिक मागायचे. दोघेही व्हिलचेअर घेवुन व्यवसाय करण्यास तयार आहेत. दोन्ही व्हिलचेअर पॉप्युलर सायकल मार्ट, नाना वाड्याजवळ, बुधवार पेठ येथुन विकत घेतल्या आहेत. यापैकी एक व्हिलचेअर रॉबिनहुड आर्मी, पुणे यांनी डोनेट केली आहे. या दोन्ही व्हिलचेअर्सना आपण व्यवसायास उपयुक्त होतील व रस्त्यावर राहणाऱ्या या दिव्यांग आजोबांना उन वारा पावसापासुन निवारा मिळेल अशा पद्धतीने ऑटो रिक्षाप्रमाणे मॉडिफाय करत आहोत. उदा. रिक्षांना असते तसे डोक्यावर छप्पर व आजुबाजुला जाळी, तसेच आतमध्ये विक्रीयोग्य वस्तु ठेवण्यासाठी छोटे रॅक्स, वस्तु अडकवण्यासाठी हुक्स इ. इ.
    या रिक्षा कम् व्हिलचेअर वर बसुन ते हातरुमाल, शेंगदाणे, फुटाणे, वेफर्स, फुगे अशा वस्तु विकतील. व्हिलचेअर अर्पण करण्याविषयी सविस्तर पुन्हा कळवेनच, आज दोन्ही व्हिलचेअर्सना मॉडिफाय करण्यासाठी दिले आहे.
  2. आणखी दोघांना फिरुन पेन विकण्यासाठी तयार केलंय (घोड्यावर बसवलंय). खरंतर हे तयार नाहीत. यांना भिकेतुन ऍव्हरेज रु. १५० प्रतिदिन (सकाळी ९ ते सायं ७) मिळतात. आपण यांना ५० पेन देत आहोत, यांनी तो रु. ५ ला एक विकल्यास रु. २५० मिळतील, अर्थात १०० पेन विकले तर रु. ५०० प्रतिदिन!

पण यांच्या डोक्यात अजुन हे गणित बसत नाहीय, म्हणुन एक प्रयोग करत आहोत.
यांना सांगितलंय, अर्धा वेळ भीक मागा, अर्धा वेळ पेन विका. ज्याच्यात कमी कष्ट आणि जास्त पैसे आहेत ती गोष्ट नंतर तुम्ही निवडा.

अर्थात् , यांनी पेनविक्री हा व्यवसाय निवडावा यासाठी आपण सुरुवातीला पडद्यामागुन काम करणारच आहोत. शिवाय “या वयातही जगण्यासाठी काम करावं लागतंय… काम करु पण भीक मागणार नाही”, अशा आशयाचा बोर्ड तयार करुन यांच्या हाती देणार आहेत, जेणेकरुन लोक ५ रु. भीक देण्याऐवजी ५ रुपयांचा पेन घेतील!

दिवसभर तोंड वेंगाडुन, याचना करुन १५० रु. भीक म्हणुन घेण्यापेक्षा ४ – ५ तासात ३५० – ४०० रु. सन्मानानं मिळवणं केव्हाही चांगलं… हे यांच्यात रुजवायचंय!
नवग्रह मंदीर, शनिवारवाड्याजवळ येथे ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आपण प्रत्येकी ५० असे पेन देणार आहोत. बघु… गाजराची पुंगी वाजली तर वाजली..!

  1. नदीकाठी राहणारी एक मावशी. मागल्या पुरात हिचं घर वाहुन गेलं. ७ लोकांचं हे कुटुंब सध्या उघड्यावरच राहतंय. (या कुटुंबातला एक सदस्य मानसिक रुग्ण आहे.)
    काडी काडी जमवुन पुन्हा घरटं बांधण्यासाठी ७० टक्के गोष्टी घरातल्या सर्वांनी मिळुन जमवल्या आहेत. अडलंय शेवटच्या ३० टक्क्यांत… या ७० टक्के गोष्टी जमवेपर्यंत सर्वांच्याच तोंडाला फेस आलाय, सर्वांनीच आशा सोडलीय.
    आपणां सर्वांच्या वतीनं या ३० टक्क्यांची मदत या कुटुंबास आपण वस्तुरुपांत करत आहोत. (पत्रा, लोखंडी बार इ. इ.)
    आपल्या ३० टक्के आधारावर कुटुंब १०० टक्के उभं राहणार असेल तर काय हरकत आहे? शिवाय कुटुंबातल्या तरुण व्यक्तींना घर झाल्यावर स्वयंरोजगार करण्यासाठीही तयार केलंय..!

शैक्षणिक

  1. “भीक नको बाई… शीक..!” या उपक्रमांतर्गत, भिक्षेक-यांच्या ३ मुलांना पुढील आठवड्यात शालेय वस्तु (सॅक इ.) देणार आहोत.

वरील सर्व बाबींना लागणाऱ्या सर्व गोष्टींच्या तरतुदींची पुर्तता झाली आहे, किंबहुना पुर्तता केल्याशिवाय मी पुढे जात नाही आणि कोणाला काही कळवतही नाही.

हि पुर्तता आजवर आपण केलेल्या शारीरीक, आर्थिक, मानसिक मदतीमुळेच करु शकलो.

आता आपले फक्त आशिर्वाद आणि शुभेच्छा मात्र हव्यात..!

केवळ आपल्यामुळेच मला यांच्या कुटुंबातला एक सदस्य बनण्याची संधी मिळाली, आम्ही ऋणी आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*