२ डिसेंबर च्या सोमवारी रोजच्या कामात असतांना साधारण ११ वाजता एका ताईंचा, माझ्या एक ज्येष्ठ स्नेही, यांचा फोन आला.
“अरे, एक नंबर पाठवलाय तुला, फोन कर त्यांना, रस्त्यात पडलेल्या एका बाबांविषयी बोलायचंय त्यांना.”
त्या दिवशी पुनर्वसनासंदर्भात खुप कामं ठरवली होती, कुणाशी बोलायलाही वेळ नव्हता, पण ताईंच्या आग्रहाखातर लावला फोन…
“हॅलो डॉक्टर, अहो एक बाबा आहेत, खुप वर्षांपासुन ते निराधार फिरतात, गेल्या काही महिन्यांपासुन आमच्या घरासमोरच झोपतात, मी जमेल तशी मदत करतेच आहे, पण त्यांना इथुन ‘उचलुन’ कुठंतरी ठेवा ना..!’ पलीकडुन एक मॅडम बोलल्या…”
मला हे दिवसभरात असे अनंत कॉल येतात. लोक ट्रेनमधुन / बसमधुन/ कारमधुन जातांना , रस्त्यावर पडलेल्या कुणालातरी बघतात आणि अचानक यांना मायेचा उमाळा येतो… घरी जावुन, मस्त कॉफी पीत, मला ऑर्डर सोडतात, “ओ डॉक्टर अमुक तमुक बाबा याठिकाणी पडले आहेत, त्यांना त्वरीत ‘उचला’!”
असं “उचला” म्हणणा-यांचे दोन प्रकार असतात… एक तर आमच्या घरासमोर ही घाण नको, किंवा दुसरं म्हणजे दया येते म्हणुन!
पण, उचला म्हणणं आणि तसं कुणालातरी उचलुन दुसरीकडं ठेवणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही.
हा काही दगड नव्हे… तो मी उचलला आणि ठेवला दुसरीकडे..! माणसंच असतात ही..!!!
मुळात माझ्याकडं कुणाला असं ठेवण्याची सोय नाही, शिवाय एखाद्या व्यक्तीला त्या जागेवरुन दुसरीकडे हलवणं यात अनंत कायदेशीर बाबी असतात. अन्यथा कुणीही कुणालाही कुठेही घेवुन जाईल, यातुन काहीही बेकायदेशीर घटना घडु शकते… शिवाय ती जर महिला असेल तर गोष्टी आणखी किचकट असतात.उद्या या महिलेचं काही भलं बुरं झालं तर याची जबाबदारी कुणाची?
बिनधास्त फोन करणारी हि मायाळु मंडळी ऐनवेळी जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीत. “मी येतो तिकडे, तुम्ही माझ्यासोबत याल का?” म्हटल्यावर झुरळागत झटकुन टाकतात मला ही so called मायाळु मंडळी..!
यांना वाटतं, “डॉक्टर हि तुमची जबाबदारीच आहे!” जणु काही ही मंडळी रस्त्यात पडलीत ती केवळ आणि केवळ माझ्याचमुळे..!
कायद्याच्या चौकटीत राहुन काम करावं या भावनेने त्या परिसरातील पोलीस स्टेशनच्या परवानगीने हे सारं करावं लागतं. यात त्या व्यक्तीविषयी, स्वतःविषयी सर्व कागदपत्रं पोलीस स्टेशनला सादर करुन, या व्यक्तीला हलवण्यामागे तुमचा “हेतु” नेमका काय हे सिद्ध करावं लागतं, त्याचे पुरावे द्यावे लागतात. हेतुबाबत पोलीसांची खात्री झाली तर ते परवानगी देतात. या परवानगी शिवाय एखाद्या व्यक्तीस माणुसकीच्या नावावर हलवलं तरी गुन्हा दाखल होवु शकतो!
मुळात ज्या व्यक्तीला दुस-या ठिकाणी हलवायचं आहे, त्या व्यक्तीची तुमच्याबरोबर येण्याची *मनापासुन तयारी* हवी..!
पोलीसांनी परवानगी दिली असेल, पण जर खुद्द त्या व्यक्तीची तुमच्याबरोबर येण्याची तयारी नसेल, आणि तरीही त्या व्यक्तीस आपण तिथुन त्याच्या मर्जीविरुद्ध हलवलं तर “अपहरणाचा” गुन्हाही दाखल होवु शकतो..!
यानंतर वृद्धाश्रम किंवा निवारा केंद्र शोधुन, त्यांच्या चालकांना विनंती करावी लागते. त्यांचेही काही नियम असतात, आपण घेवुन जाणार असलेली व्यक्ती जर त्यांच्या नियमात बसत नसेल तर ते स्पष्ट नकार देतात.
या व अशा अनंत बाबी सुरळीत पार पडल्या तर त्या व्यक्तीची सोय आपण दुसरीकडे करु शकतो, अन्यथा नाही!
आम्हाला बरेच फोन येतात, प्रेमळ आवाजात, या व्यक्तीला उचला म्हणुन गळ घातली जाते… पण फोन करणाऱ्यांना या सर्व बाबींची कल्पना नसते…
सरासरी रोज किमान ५० फोन येतात… “यांना उचला, त्यांना हलवा” म्हणुन..! कसं शक्य आहे मला इतक्या सा-यांची सोय करणं?
“तुम्ही याल ना सोबत? याकामी कराल का मदत प्रत्यक्ष?” म्हटल्यावर माझा राग येतो यांना…
यातुन अनेकजणांची मी नाराजी ओढवुन घेतली आहे… पण माझा नाईलाज आहे..!
तरीही या सर्व दिव्यांतुन पार पडत, अनंत लटपटी खटपटी करत १६ लोकांना सुरक्षित स्थलांतरीत करु शकलो यात समाधान आहे.
निवारा केंद्र चालविणा-या माझ्या या स्नेह्यांशिवाय मी नसतो करु शकलो हे स्थलांतर, त्यांना माझा प्रणाम!!!
तर, या फोनवर बोलणा-या मॅडमनाही हेच सर्व समजावुन सांगितलं. त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या, गडबडीत होत्या…
“नाही… नाही… काहीही करा, पण त्या बाबांना आजच्याआज इथुन हलवा”
मॅडमना म्हटलं, “उद्या येवुन बाबांना बघुन जातो मॅडम, मी आधी बाबांशी बोलतो, त्यांची तयारी आहे का बघतो, मग काय ते ठरवु!”
“नाही… नाही… आजच या बाबांना हलवायचं आहे, प्लिज डॉक्टर काहीही करा”
काहीही करा म्हणजे लोकांना वाटतं, माझ्याकडे काहीतरी सुपर पॉवर आहेत!
“अहो, पण ते बाबा तयार आहेत का?”
“हो डॉक्टर, ते तयार आहेत हो, ती काळजी नका करु…तुम्ही या ना लवकर… प्लिज आजच प्लिज…”
मध्येच माझ्या या ज्येष्ठ स्नेह्यांचाही फोन येवुन गेला, “बघ रे बाळ, कर ना काहीतरी आजच…”
पर्यायच नव्हता!
“आज सायं ४:३० ला येतो”, असं सांगुन दिवसभरातली ठरवलेली अत्यंत महत्वाची कामं सोडुन, १२:३० ला घरी आलो. आजोबांची जुजबी माहिती घेवुन पोलीसांना लागणारी, वृद्धाश्रमात लागणारी सर्व कागदपत्रं जमवण्यात ४ वाजले. “तुमच्याचकडे आणतो बाबांना आज”, म्हणुन एका वृद्धाश्रमाला गळ घातली.
माझा सहकारी, दिपकला सांगितलं, “दिपक ६ च्या ट्रेनने सोलापुरला जायचंय बाबांना घेवुन आजच! ५ वाजता अमुक ठिकाणी या.”
घाईघाईने गाडी चालवत, गाडीवरनंच इकडे तिकडे फोन करत, बोलावलेल्या जागी गेलो. हे ठिकाणही माझ्यापासुन दुर …
मी पोचलो, पाहिलं तर बाबांची अवस्था खरंच वाईट होती, वाईट वाटलं..!
मॅडम अजुन पोचल्याच नव्हत्या, त्यांची इतर मित्रमंडळी मात्र होती.
दिपक आणि आम्ही सर्वांनी मिळुन नवे कपडे त्यांना घातले, तयारी केली सर्व निघायची…
“दिपक रिक्षा बोलवा, ६ ची ट्रेन मिळायला हवी”, मी गडबडीनं बोललो.
“कुठं नेताय मला?”, बाबांनी गरजत बॉम्ब टाकला…
“म्हणजे? त्या मॅडमनी तुम्हाला काही सांगितलं नाही बाबा?”
“सांगितलं सर्व, पण मी मान्यता दिलेली नाही अजुन..!”, ते पुन्हा गरजले…
“अहो बाबा, तुमची उत्तम सोय करत आहोत आम्ही, चला उठा”, मी दंडाला धरुन त्यांना उठवु लागलो.
“माझं भलंबुरं ठरवणारे तुम्ही लोक कोण? मला इथुन हलवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? चालते व्हा इथुन…”, बाबांनी हातातली पाण्याची बाटली माझ्यावर उगारत अतिव रागाने बोलले.
माझा चेहरा पाहण्यालायक झाला असावा… बघ्यांची माझ्यावर रोखलेली नजर बरंच काही सांगुन गेली…
अशा परिस्थितीत पोलीस आले असते तर त्यांनी बाबांच्या मनाविरुद्ध त्यांना हलवताय म्हणुन मलाच दोषी धरलं असतं!
मी गडबडुन जात, त्या मॅडमना फोन लावला, त्या अजुनही आल्या नव्हत्याच. “आलेच ५ मिनिटांत,” म्हणत फोन कट् झाला.
मॅडमच्या मित्रमंडळींनी बाबांना समजावण्याचा असफल प्रयत्न केला… बाबांचं म्हणणं एकच… “माझ्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?”
रास्त होतं बाबांचं हे म्हणणं… इच्छेविरुद्ध केलेली कोणतीही गोष्ट म्हणजे बळजबरी किंवा एक प्रकारचा बलात्कारच!
*बळजबरी आणि बलात्काराला कायद्यात मान्यता नाही, भले ती माणुसकीच्या दृष्टिकोनातून असली तरीही!*
मॅडमच्या बोलण्यावरुन बाबांची पुर्ण संमती आहे हे मी गृहीत धरुन चाललो होतो.
मॅडम एव्हाना आल्या… बाबांना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला… बाबा वस्सकन् त्यांच्याही अंगावर गेले… “माझ्याविषयी माझ्या परमिशन शिवाय निर्णय घेणाऱ्या तुम्ही कोण? हाकलुन द्या त्या डॉक्टरला… म्हणे सोय करतो… अरे कोण तु माझा? चल फुट्ट…”
मॅडम परत फिरल्या, जवळ येत हळु आवाजात म्हणाल्या, “सॉरी डॉक्टर, जा तुम्ही परत, नाहीत येत ते…”
परत जा, हे इतक्या सहजपणे बोललेलं वाक्यं ऐकुन माझा तोल गेला.
“मॅडम, काय खेळ लावलाय हा? दुपारपास्नं घसा फाडुन हेच मी तुम्हाला सांगतोय, बाबांची येण्यास मान्यता आहे काय ..? धडधडीत हो म्हणुन मला सांगता, वर सहज सॉरी म्हणता? तुम्हाला कल्पना आहे का… इथं सर्व कागदपत्रं तयार करुन याबाजुला ४:३० ला पोचणं किती अवघड आहे? तुमच्यासाठी सर्व आजची महत्वाची कामं सोडलीत… शंभर दगडं हलवुन, सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करुन मी तुम्ही येण्याअगोदर आलो, आज इथं पोलीस आले असते तर अपहरणाचा प्रयत्न म्हणुन गुन्हा दाखल झाला असता माझ्यावर … आणि सहजपणे सॉरी परत जा म्हणता..? काहीच वाटत नाही तुम्हाला?”
मी आणखीही बरंच काही बोललो… पण “सॉरी” या एका शब्दापलीकडे त्यांच्याकडे काही नव्हतंच..!
सगळं आवरत मी गाडीला किक मारली!
पलीकडुन बाबांनी आवाज दिला, “ओ डॉक्टर, दोन मिनिट इकडं या..!”
माझ्या अगोदरच्या रागात यामुळं आणखी भर पडली… चिडुन म्हटलं… “आता अजुन काय पायताणानं मारायचंय का बाबा? मारायचंच असेल तर या इकडं आणि मारा, चुक झाली इथं आलो ते..!”
“रागावु नका हो, या इकडे डॉक्टर…”
मी चरफडत गाडी स्टँडला लावुन त्यांच्याजवळ गेलो.
“बसा” ते ज्या बाकड्यावर अस्ताव्यस्त पसरले होते, त्यावरच मला एका कोपऱ्यात जागा देत ते म्हणाले.
“बसा हो… प्लिज… हे घ्या बिस्किट”. “पारले” च्या छोट्या पुड्यातनं दोन बिस्किटं काढुन मला देत ते बोलले.
“मी तुमचा त्रागा समजु शकतो डॉक्टर, तुम्हाला माझ्यासाठी आज खुप त्रास सहन करावा लागला, माफ करा मला. बहुतेक तुम्ही जेवलेले पण दिसत नाहीत, ७ वाजत आलेत, बिस्किटं तरी खा…”
मी आ वासुन त्यांच्याकडे पहात राहिलो.
“गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तर राग यायचाच… अहो, कळतंय मला, मी तुमच्या बापाच्याच वयाचा आहे… हं घ्या बिस्किटं… घ्या हो… धरा…” माझ्या हातात त्यांनी बिस्किटं कोंबली.
माझा राग बाबांच्या वागण्यानं पुर्ण निवळला!
“ठिक आहे, येतो मी बाबा” म्हणत मी उठायला लागलो…
“का? निघालात? मी असा का वागलो हे जाणुन घेण्याची इच्छा नाही?”, विस्कटलेला शर्ट सावरत बेफिकीरीनं ते बोलले.
मी परत बाकड्यावर कोपऱ्यात बसलो. रागाच्या भरात, कारण जाणुन घ्यायला मी विसरलोच होतो.
“Listen doctor, basically I am an Engineer. I do not have any intention to hurt you, but try to understand my situation too…”
बाबांचं अस्खलित इंग्रजी ऐकुन मी चक्रावलो… आवंढा गिळत म्हटलं… “बाबा इथं कसे तुम्ही?”
“तो समोर बंगला दिसतोय तो कुणाचा माहित आहे का?”, बाबांनी दुरवर दिसणाऱ्या बंगल्याकडं बोट दाखवत विचारलं.
“नाही बाबा..!” बंगल्याकडं टक लावुन पहात मी म्हणालो.
“मी आणि माझ्या भावानं बांधलोय तो, बंगला माझाच, माझी बायको राहते तिथे”, कुत्सितपणे हसत ते नजर वळवत म्हणाले.
“बाबा, अहो मग, तुम्ही इकडे रस्त्यावर का? मला काहीच कळत नाही. बंगला तुमचा मग का नाही जात बंगल्यात?”, मी आश्चर्यानं विचारलं.
म्हटलं, “बायको आहे ना तुमची त्या बंगल्यात? मग जात का नाही?”
“हो, माझीच बायको राहते माझ्या बंगल्यात पण माझ्या भावाबरोबर…”, कातरलेल्या आवाजात ते खाली मान घालुन म्हणाले…
मला जोरात हादरा बसला… विश्वास बसेना… काय बोलावं मी? बराचवेळ शांततेत गेला. हि शांतता तोडत तेच म्हणाले… “ते दोघे राहतात तिथे!”
“बाबा कायद्यानं तुम्ही काहीच केलं नाहीत?”
“कायदा मला बायको म्हणुन तीचा ताबा देईलही…पण तीच्या मनाचा ताबा कायदा माझ्याकडे देईल का? तीचं मनच माझ्याजवळ लागत नसेल, तर तीला घेवुन तरी काय करु डॉक्टर?” अंथरुणाची घडी घालत गहिवरत ते बोलले…
मी कादंबऱ्यात वाचलं होतं, पिक्चरमध्येही बघितलं होतं असलं काही… पण प्रत्यक्षात ज्याच्या बाबतीत हे घडलंय त्याच्या मुखातुन आज प्रथमच ऐकत होतो.
मी सुन्न झालो होतो.
“मग, भावाविरुद्ध तक्रार दाखल करा…”
“नको, तीला वाईट वाटेल…”, शुन्यात पहात ते म्हणाले.
“अहो, बंगल्यात तुमचा हिस्सा आहे तर त्या अधिकारात तुम्हाला बंगल्यात तरी राहता येईल ना..?”
“बंगल्यात जावु म्हणता डॉक्टर? आणि त्यांचा सुखानं चाललेला संसार डोळ्यांनी पाहु का? स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन सांगा…” ते आवेगानं बोलले.
मी खाली पहात निरुत्तर झालो. म्हटलं, “त्यांनी ही तुमची अवस्था केली बाबा, त्यांना धडा नको मिळायला?”
“मला कुणालाच धडा शिकवायचा नाहीय डॉक्टर, तीला या वयात त्रास नको व्हायला… बघा नं माझं वय आहे ७६ आणि तीचं ७०, भाऊ माझ्यापेक्षा मोठा, म्हणजे असेल ८० वयाचा. मी जर इरेला पेटलो तर दोघांची वाट लावेन… पण या वयात दोघं कुठं जातील..?”
या बाबांचं त्या दोघांनी वाटोळं केलं तरी हे बाबा त्या दोघांचा विचार करत होते. भावावरची ही माया म्हणु की पत्नीविषयी असलेलं निस्सिम प्रेम!
आपलं वाटोळं होवुनही, ज्यांनी वाटोळं केलं, त्यांच्यावर प्रेम करु शकतं कुणी? अजब होतं हे सारं..!
मी मनोमन बाबांना नमस्कार केला, हात हातात घेतला, काहीतरी बोलायला गेलो आणि हुंदका बाहेर पडला..!
“बाबा, मी हे समजु शकतो सारं… पण त्या बाईवर, आय मीन तुमच्या पत्नीवर तुम्ही इतकं प्रेम करता, पण तीला याची कल्पना आहे का? तुम्ही किती त्रासात आहात हे माहीत आहे का? जाणिव आहे का?” मी थोड्या गुश्श्यातच विचारलं..!
“आहे ना डॉक्टर… अहो ती रोज भाजी घ्यायला याच रस्त्यावरुन जाते…” ते भावुक होवुन एकदा रस्त्याकडे एकदा बंगल्याकडे पहात बोलले.
“म्हणजे? तीला आय मीन त्यांना माहीत आहे तुम्ही इथं आहात ते? आणि नुसती या रस्त्यावरुन जाते ती, म्हणुन तुम्ही खुश?”
“नाही हो डॉक्टर, रस्त्यावरुन ती जाते म्हणजे मी आहे की नाही हे पहायला ती येत असेल…”
‘मला रोज दुपारी कागदात पॅक करुन कुणीतरी जेवण देवुन जातं… देणा-याला मी विचारतो… “कुणी दिलंय?” तर तो म्हणतो, “माहीत नाही, वाटेत एक आजी भेटली, दुरुन तुम्हाला दाखवुन मला तुम्हाला हे द्यायला लावलंय..!”
मी अवाक् झालो हे ऐकुन..!
ओठातल्या ओठात हसत पुन्हा बाबा म्हणाले, “नाव नाही सांगितलं तरी काय बिघडतं? तीच्या हाताची चव मला कळणार नाही तर कुणाला..?”
यावेळी बाबांच्या वाढलेल्या दाढीतुन अश्रु ओघळु लागतात… मुक्तपणे… निराधार… अगदी त्यांच्यासारखे..!
मी चक्रावुन विचारलं, “बाबा, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्या चोरुन दुरुन काळजी घेतात तुमची, तर मग उघडपणे एकत्र यायला काय हरकत आहे..? पुढच्यावेळी भाजीला जाताना विचारा त्यांना…”
“डॉक्टर, मी घर सोडलं त्याला ३० वर्षे झाली. माती ओली असते, तेव्हाच तीला आकार देता येतो, इतक्या वर्षात ही माती घट्ट ढेकुळ होवुन बसलीय. काय आणि कसा आकार देणार आता? शिवाय आता भावाला उतारवयात तीची ‘बाई’ म्हणुन नाही पण काळजी घ्यायला ‘आई’ म्हणुन गरज लागेलच ना, तो सोडणार नाही सहजी तीला, आमच्या दोघांच्या भांडणात त्रास फक्त तीलाच होणार, मला नाही त्रास द्यायचा तीला”, ते ठामपणे म्हणाले.
बापरे, प्रेम काय असतं… किती टोकाचं असु शकतं..? कल्पनेच्या पलीकडचं..!
हे असं प्रेम करणारा हा माणुस, असं मन लाभलेला हा माणुस, रस्त्यावर राहणारा, याला सुदैवी म्हणु की याची साथ सोडणा-या त्या बाईला दुर्दैवी म्हणु?
गुलाबाचे काटे कायम गुलाबाला जपतात, पण लोकांना गुलाब हवे असतात… काटे नको असतात. फुलाला जपणारे हे काटे कायम उपेक्षित..! हे बाबा ही तसेच गुलाबाच्या काट्यासारखे..!
अंगावर शहारे येणं म्हणजे नेमकं काय..? हे मला यावेळी कळलं..!
“अहो बाबा, पण तुमचं काय?” मी चाचरत विचारलं.
म्हणाले, “माझं एक स्वप्न आहे… मी रोज ते उघड्या डोळ्यांनी पाहतो… एकदा तीने उघड उघड माझ्याकडे यावं, म्हणावं, ‘म्हाता-या किती दाढी वाढवलीस रे? आंघोळ करायची तुला आधीपासुन सवय नव्हतीच, अंगाचा किती वास येतोय… पण तरीही अजुन तस्साच हँडसम आहेस, मला तु अजुनही आवडतोस म्हाता-या… मी शरीरानं कुठंही असले तरी मनानं कायमच तुझ्याजवळ होते… पाय घसरला माझा तेव्हा… मला एकदा माफ कर रे… मरतांना सुखानं मरेन मी..!’
‘मग मी तीचा हात धरुन म्हणेन, म्हातारी झालीस पण माया आटवली नाहीस, शाळकरी पोरीप्रमाणं रोज चोरट्या नजरेनं बघुन जायचीस, भाजीचं दुकान काय एव्हढं एकच आहे का? पण मला बघण्यासाठी याच भाजीवाल्याकडुन भाजी घ्यायचीस ना? लब्बाड! मला डबा देवुन जगवत ठेवायचीस, दुर असलीस तरी माझी काळजी घ्यायचीस… एव्हढ्या एका गोष्टीसाठी तुमको सौ गुनाह माफ… म्हातारे माझ्या मनात काही नाही गं… मी माफ केलंय तुला..!’
‘आणि एक सांगु? अगं , तुला बायको समजण्याच्या पलीकडे मी गेलोय, मी बापाच्या वयाचा झालोय, मला मुलगी हवी होती, आपल्याला बाळ झालंच नाही…हरकत नाही… आता तुच माझी मुलगी होशील का..?’
‘मग मी माझ्या या मुलीचा हात हाती धरेन, नंतर मी तीचं कपाळ चुंबीन लहान लेकरासारखं… आणि मग ती बाबा… बाबा म्हणत माझ्या म्हाता-याच्या डोईवरल्या पांढऱ्या केसातुन हात फिरवीत राहील रात्रभर… आणि मी अत्यंत समाधानानं झोपी जाईन कायमचा… हो कायमचा तृप्त मनानं..! माझ्या नशीबी ती बायको म्हणुन नाही आली… पण मुलगी म्हणुन तरी यावी..!”
बाबांचं बोलणं संपलं होतं..!
बोलण्याच्या ओघात ते मलाच त्यांचं लेकरु समजुन माझ्या कुशीत आले होते… त्यांच्याही नकळतपणे… आणि माझ्याही!
त्यांच्या त्या आतल्या आत भेसुर रडण्यानं मी गलबलुन गेलो…
“बाबा…” मी हाक मारली!
“आं… आं…” करत गडबडुन हा बाप जागा झाला! पुन्हा वास्तवात आला… वास्तव कटु होतं..!
“सांग बेटा, मी रोज हे स्वप्नं बघतोय… ती कधीतरी येईल म्हणुन वाट पाहतोय. जर तु मला कुठं ठेवलंस तर ती मला या जन्मात भेटेल का? माझं बाळ मला भेटेल का? मी असाच मरुन जाईन… बायकोचं सुख नाही… किमान लेकीचं तरी सुख मिळु दे रे … ती येईल… नक्की येईल..!”
माझा हात धरुन ते कळवळु लागले… तडफडु लागले…
तडफडणा-या पेशंटला एखादं इंजेक्शन दिलं की तो शांत होतो… तडफडणा-या बापाला शांत करायचं इंजेक्शन मी कुठनं आणु?
त्यांच्या या रडण्यात माझं रडु मिसळलं… आणि सुरु झाला वेदनांचा जल्लोष!
ब-याच वेळानं मी म्हटलं, “निघतो बाबा आता. माझी काही मदत लागली तर सांगा.”
“काही नाही बेटा, अधुनमधुन येत जा भेटायला जमलं तर… मी जिवंत असेन तर समज, ती अजुन मला भेटली नाही, पण जर कधी मेलेला दिसलो, किंवा या जागेवर सापडलो नाही तर बेशक समज ती मला भेटुन गेली… आणि म्हातारा कायमस्वरुपी आपल्या मुक्कामी शांत मनानं गेलाय..!”
“देवाच्या घरी नव्हे… देवाच्या बंगल्यावर! या देवाच्या बंगल्यात मात्र आम्ही दोघेच असु… मी आणि मला न झालेली ही मुलगी..!”
ते उठले… आणि सगळं आवरुन निघाले…
आपल्या बायकोला माफ करणा-या, भावाला त्रास न देणा-या, बापाचं मन घेवुन मनातल्या मनात बायकोला “मुलगी” म्हणुन जपणा-या या बाबांना मी मनोमन नमस्कार केला..!
It is unbelievable. Thanks for writing for readers. God bless you.
काय लिहू?
अजब आहे