हे नुसतं असं बोलुन माणसं गोड बोलली असती, एकमेकांवर प्रेम करायला लागली असती तर युद्धंच झाली नसती, दंगली पेटल्या नसत्या.
तीळ आणि गुळ हि प्रतिकं आहेत. नातं तीळासारखं स्निग्ध असावं आणि गुळासारखं गोड असावं.
मनापासुन आपल्या बोलण्यात आणि वागण्यात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा असेल तर खरंच नाती किती घट्ट होतील.
हिच स्निग्धता आणि गोडवा संपलय सध्या नात्यातल, म्हणुन तर ती तट्तट् तुटताहेत. आईबाप आणि आजीआजोबांना म्हणुन तर घर सोडावं लागतंय.
माझ्यासारखा ‘भिका-यांचा डॉक्टर’ जन्माला यावा, ही या समाजाला भुषणावह गोष्ट आहे का? कुठं चाललोय आपण?
कुठं गेली नात्यातली ही स्निग्धता आणि गोडवा?
खरंच आणणार आहोत आपण नात्यात स्निग्धता आणि गोडवा? कि दिसेल त्याला येड्यासारख्या तीळ आन् गुळाच्या कोरड्या वड्या वाटत बसणार आहोत ? बरं या बाजारच्या वड्यात तीळ किती आन गुळ किती आसंल ? आसंल का नसंल ? ह्ये बी म्हाईत नसतंय.
आपण मात्र त्या वाटत राहतो कोरडेपणाने का तर फक्त परंपरा जपायची म्हणुन.
परंपरा असंही सांगते, मेलेल्या माणसाला मेल्यावर खांदा द्यावा, मग आपल्याला पुण्य मिळतं. मेलेल्या माणसाला खांदा देवुन पुण्य मिळवण्यापेक्षा जे जीवंत आहेत आणि ज्यांना आपल्या हातांचा आधार हवाय अशांना हात देवुन पुण्य मिळवलं तर?
वर्षातनं एखाद दिवशी गावभर तीळगुळाच्या दोन वड्या वाटत बसण्यापेक्षा, घरातच वडिलांना, “काय बाबा कसे आहात ?”, “आई अगं किती काम करशील, बस की जरा.”
म्हातारी माणसं घरात असतील तर, “आजोबा गोळ्या घेतल्या? पाणी आणुन देवु ?”, “आज्जी… अगं कशाला उठतेस ? सांग ना काय पाहिजे, मी आणतो ना!”
आपल्या या कणभर वाक्यांनी त्यांना मणभर तिळगुळ मिळेल.
रस्त्यात भेटलेल्या झाडुवाल्या आजीला सहज जाता जाता, “आजी या वयातही किती काम करता हो ? तुमच्यामुळं आमचा हा परिसर छान होतो. खुप खुप थँक्यु गं आजी.” एव्हढंच बोलुन बघा आणि यावेळी आजीचे डोळे पहा. सा-या जगातली माया या डोळ्यात दिसेल. सुरकुतलेले हात पट्कन आशिर्वादासाठी पुढं येतील.
एव्हढ्या तीन वाक्यांनीच ती देवी पावेल. कसला करता नवस आणि काय लायनी लावता दर्शनबारीत? देव इथ्थंच आहे यांच्यात.
आपलं कुणी दवाखान्यात ऍडमिट असेल तर झक्क मारत आपण डबा घेवुन जातो जेवणाचा. कुठल्याही हॉस्पिटलच्या एखाद्या जनरल वॉर्डात आपलं कुणीच ऍडमिट नसतांना कधी जातो आपण ?
“श्शी… कायतरीच काय अभद्र बोलता?”
असं कपाळावर आठ्या आणुन बोलण्यापेक्षा, एखादवेळी एखाद्या हॉस्पिटलात एखाद्या खाटेवर ऍडमिट असणाऱ्या आजोबाला, त्याची काळजी करत बसलेल्या म्हातारीला, पोरगं जगंल का न्हाई याची काळजी करत डोक्याला हात लावुन बसलेल्या त्याच्या आईला कोरभर हो फक्त कोरभर भाकर देवुन,”ऐ अगं काहीही होणार नाही तुझ्या पेशंटला. आयुष्यभर सगळ्याचं चांगलंच केलंस. उठ तुझं पण काही वाईट होणार नाही. चल खावुन घे. उठ.”
ओळखीची ना पाळखीची ती माऊली, तुम्हांकडे पाहुन उभारी घेते. पुन्हा लढायला तयार होते. इतकी व्याकुळ होवुन ती तळमळीनं आशिर्वाद देते. असा आशिर्वाद घेतलाय कधी कुणाचा ?
१२ वर्षे हिमालयात जावुन तपश्चर्या करुनही देव पावत नाही. पण ती माऊली साक्षात दर्शन देते.
देव प्रसन्न होवुन साक्षात प्रकट होतो, माणसाच्याच रुपात. खोटं वाटतं? करुन पहा.
वाटेतल्या कुत्र्याला एखादा घास देवुन तर बघा, माया काय असते ते पुढच्यावेळी त्याच्याच डोळ्यात पहा.
हे सारं करण्यात कमीपणा वाटण्याचं कारण नाही कारण हे करायलाच खुप ताकद लागते.
एखाद्याला पाडायला जेव्हढी ताकद लागते त्यापेक्षा जास्त, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते मग ताकदवान कोण? पाडणारा की उठवणारा?
‘फोटो’ चट्कन कुठेही कधीही काढता येतो, वेळ लागतो ‘इमेज’ तयार करायला.
आपण फोटोमध्ये नुसतंच माणुस म्हणुन ‘दिसायचं’? की माणुस म्हणुन इमेज तयार करुन खरोखरच ‘असायचं’? आपणच ठरवायचंय.
तीळगुळ वाटण्यात गैर काहीच नाही पण जसे ते हातात असतात तसे ते मनातही असु द्यावेत!
एकच दिवस नाही, रोज, रोज.
Leave a Reply