अन्नपुर्णा

सादर प्रणाम!

आजचा विषय थोडा वेगळा आहे!

“डॉक्टर फॉर बेगर्स” या माध्यमातून भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा पुरवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करत आहोत, हे आपण जाणताच.

रस्त्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास, अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं.

हॉस्पिटलमध्ये दरवेळी रुग्णाच्या जेवणाची सोय होईलच असं नसतं. अशा वेळी शेजारच्या हॉटेल / मेस मधून किंवा स्वतःच्या घरातून डबा आणून रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकांची जेवणाची सोय करावी लागते.

मी ज्यावेळी पेशंटच्या वॉर्ड मध्ये माझ्या भिक्षेकरी रुग्णासाठी जेवणाचा डबा घेऊन जात असतो, त्यावेळी त्याच वॉर्ड मध्ये अनेक असे लोक दिसतात की जे अत्यंत गरीब आहेत. यांच्याजवळ कुणीही नातेवाईक नसतो त्यांच्यासाठी डबा घेऊन येणार कुणीच नसतं…

मातीतला ओलावा झाडाची मुळं धरुन ठेवतो… नात्यातला गोडवा नाती जपुन ठेवतो!

पण या नात्यांतच व्यवहार सुरु झाले की, नुसताच बाजार भरतो! हल्ली चार माणसं, एका विचाराने, एकाच दिशेने चालायला लागली की समजावं, पाचव्याला खांद्यावर घेवुन, त्याला ती “पोचवायला” निघाली आहेत!

असो…

मी जेव्हा माझ्या एखाद्या ऍडमिट असणा-या भिक्षेक-यांसाठी डबा घेऊन जात असतो त्या वेळेला हे निराधार लोक खाटेवर पडल्या पडल्या, मान वळवुन मेलेल्या नजरेनं माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात… “आम्हालाही यातलं थोडंफार काही मिळेल का?” अशी ही त्यांची नजर मला टोचते बोचते… मग, पुढच्यावेळी येतांना मी अशा इतर रुग्णांसाठीही काहीबाही घेवुन जायचो.

पण, दवाखान्याच्या पाय-या उतरतांना विचार करायचो, आज भिक्षेक-यां व्यतिरीक्त मी आणखी पाचदहा जणांना जेवण दिले, पण अजुन असे याच दवाखान्यात कितीजण असतील ज्यांना जेवणाची गरज आहे, पण त्यांना ते मिळत नाही, डबा आणणारं यांचं कुणी अस्तित्वातच नाही!

शिवाय माझा भिक्षेकरी रुग्ण डिस्चार्ज झाल्यावर मी परत इथे येणार नाही… आज ज्यांना मी डबा दिला… माझं इथं येणं थांबल्यावर नंतर ते ही उपाशीच राहणार!

मी अशा या अत्यंत गरीब असणाऱ्या, निराधार असणा-या परंतु भीक मागत नसणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरुपी काहीही करू शकत नाही, यामुळे दरवेळी हतबल होतो.

भीक मागणाऱ्या समाजासाठीच संस्था पूर्णपणे काम करेल, असं मीच माझ्यावर कायदेशीर बंधन घालून घेतलं आहे. यामुळे मनात इच्छा असूनही भीक न मागणाऱ्या, परंतु खरंच गरीब आणि निराधार असणाऱ्या समाजासाठी मी काहीच करू शकत नाही, याची बोच मनाला कायम लागलेली असते. फार काही नाही, परंतु जे गरीब आणि निराधार लोक रुग्णालयात ऍडमिट आहेत, त्यांना जेवणाचा डबा तरी आपल्याला देता यायला हवा, असं मला नेहमी वाटतं. ऑक्सिजन वाचून पेशंट गेला, वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून पेशंट दगावला, वेळीच उपचार न मिळाल्यामुळे पेशंट गुदरला हे आपण नेहमीच ऐकतो.

पण सर्व उपचार चालू असताना, ऑक्सिजन मिळत असताना, रक्ताची कमतरता नसताना, केवळ अन्न मिळाले नाही म्हणून तडफडुन एखादा पेशंट देवाघरी गेला हे ऐकुन त्रास होतो … आजची हि शोकांतिका आहे! हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या, या भीक न मागणाऱ्या गरीब आणि निराधार समाजालाआपण दररोज किमान जेवण तरी देऊ शकतो का? याचा मी डॉ. मनीषा , माझी पत्नी, हिच्यासोबत सतत विचार करत असे.

डॉ. मनीषा, शिवाजीनगर, पुण्यामध्ये एक छोटं क्लिनिक चालवते, काही आयुर्वेदिक उत्पादने घरच्या घरी तयार करून ती क्लिनिकच्या माध्यमातून विक्री करते, याशिवाय योग क्लासेस घेते. या सर्वातून जे पैसे मिळतात त्यातून माझ्या कुटुंबाचं पोट पाणी चालतं. घर चालवण्यासोबतच, तीला वरील बाबीतून जे पैसे मिळतात त्यातुन, महिन्यातुन तीला जमेल तितकी रक्कम, ती भिक्षेकरी समाजाच्या पुनर्वसनासाठी मला देत आहे.

संस्थेला मिळणारा निधी (डोनेशन) मी भिक्षेक-यांव्यतिरिक्त कुणासाठीही वापरू शकत नाही ही माझी मुळ अडचण! आणि ऍडमिट असणाऱ्या, भीक न मागणा-या परंतु गरीब आणि निराधार लोकांना डबा देणं ही माझी गरज!! या अडचण आणि गरजेचा कुठेही ताळमेळ बसेना!

एके दिवशी डॉ मनीषा मला म्हणाली, “भिक्षेक-यांसाठी सोहम ट्रस्टला, समाजातले दानशूर लोक आर्थिक मदत करतच आहेत, मी माझ्या मिळकतीचा वाटा जो काही भिक्षेकरी समाजासाठी वापरण्यास तुला देत आहे, तो आता थांबवला आणि हा वाटा भीक न मागणारे गरीब आणि निराधार लोक, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि केवळ अन्नावाचून तडफडत आहेत अशांसाठी वापरला तर?”

तीच्या या वाक्यामुळे माझ्या डोक्यातला तिढा सुटला!

ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालय, रास्ता पेठ पुणे!

माझं वैद्यकीय शिक्षण मी याच रुग्णालयातून पूर्ण केलं. विद्यार्थी दशेत मी इथं पाच वर्ष शिकत होतो. या रुग्णालयात उच्चभ्रू लोक तर उपचारासाठी यायचेच, परंतु धर्मार्थ (चॅरीटेबल) असल्यामुळे अत्यंत गरीब आणि निराधार लोक उपचार घेण्यासाठी इथे जास्त प्रमाणात येत असत. वैद्यकीय शिक्षण घेत असताना, या रुग्णालयात विद्यार्थी म्हणून काम करत असताना, मी या गरीब आणि निराधार लोकांची दुःख्खं खूप जवळून पाहिली आहेत. या रुग्णालयाने मला वेद नाही, पण वेदना वाचायला शिकवले, डॉक्टर म्हणून घडवले आणि माणूस म्हणून संस्कार केले! आईच्या पोटी “माकड” म्हणून जन्मलो, पण… “माणूस” म्हणून माझा पुनर्जन्म याच रुग्णालयात काम करत असताना झाला!

आणि म्हणून, या अर्थाने हे रुग्णालय म्हणजे माझी आई आहे, असं मी समजतो.  २००० साली या दगडावर डॉक्टर म्हणून शिक्का बसला त्याला आज बरोबर २१ वर्षे पुर्ण झाली! या २१ वर्षांमध्ये या रुग्णालयाची, आपल्या आईची कधीही, कोणतीही सेवा मी करू शकलो नाही, याची बोच मनात कायम आहे…

असो, तर मनिषाच्या वाक्यांनी माझ्या मनातला तिढा सुटला!

ती जो निधी सोहम ट्रस्ट च्या माध्यमातुन भिक्षेक-यांसाठी देत होती, तोच निधी आता भीक न मागणाऱ्या आणि निराधार अवस्थेत अन्नावाचून रुग्णालयात तडफणाऱ्या लोकांच्या जेवणासाठी ती देणार आहे. जे मी करू शकलो नाही… उद्यापासून ती ते करणार आहे!!!

ती सोहमची आई होतीच… माझीही आई झाली… आणि भीक न मागणाऱ्या लोकांची अन्नपूर्णा झाली!

आता एकूण ठरलं आहे ते असं…

१. डॉ. मनिषाचे योग क्लासचे एक बँक अकाउंट आहे, त्या अकाउंट वर इथुन पुढे सोहम ट्रस्टच्या खात्याऐवजी, दर महिन्याच्या शेवटी तीला जमेल ती रक्कम ती आता या योग क्लासच्या अकाउंटवर टाकत जाईल. ( हिशोब रहावा, पारदर्शकता रहावी यासाठी! )

२. ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालय, पुणे येथील एक वॉर्ड, जीथे निराधार रुग्ण ऍडमिट असतील तो वॉर्ड आम्ही दत्तक घेणार आहोत.

३. याच महिन्यात डॉक्टर होऊन २१ वर्ष झाली, याचं औचित्य साधून, जीला आई समजलं, त्या संस्थेचे ऋण फेडण्यासाठी या वॉर्डमधील २१ रुग्णांच्या दररोजच्या जेवणाची सोय दिनांक १ मे पासून डॉ मनीषा अन्नपूर्णा म्हणून करणार आहे.

४. डॉ मनिषासाठी हा कुठलाही प्रकल्प नाही…ती म्हणते, “इथून पुढचं हे आयुष्य आहे माझं!”

खात्यावर असणाऱ्या पैशाची उपलब्धता लक्षात घेऊन, सुरुवातीला एकच हॉस्पिटल आणि २१ लोकांचं रोजच जेवण… मनीषाने सुरुवातीचा हा आकडा ठरवला आहे…

मी तिला न राहवून विचारलं, “अगं, वैयक्तिक रित्या आयुष्यभर हे करायचं म्हणतेस… जमेल ना आपल्याला?”
यावर ती म्हणाली, “काही करायचं असेल तर मार्ग सापडतो आणि काहीच करायचं नसतं तेव्हा कारणं सापडतात… बघु सुरुवात तरी करु!”

आता यावर मी काय बोलणार?

आपल्याला जेव्हा काही लागतं, टोचतं, बोचतं त्यावेळी आपल्याला होणाऱ्या त्रासाला “वेदना” म्हणतात…
परंतु दुस-याला, जेव्हा काही लागतं, टोचतं, बोचतं, त्यावेळीही आपल्याला होणाऱ्या “संवेदना” म्हणतात!

या संवेदनशील अन्नपुर्णेला माझा सलाम आणि शुभेच्छा!

Bank Details for Annapurna

Account Name: Manisha Institute of Yogic Science
Type                 : Current
Bank Name     : Canara Bank, Aundh Pune
Account No     : 5342 1010 0029 17
IFSC Code      : CNRB0015342

(B नंतर दोन शुन्य आहेत)

Paytm/Phone Pay: 8308315494

Kindly inform us, once you donate

आपण देणार असलेल्या देणगीला सध्यातरी टॅक्स ची सूट नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*