सप्रेम नमस्कार!
“डॉक्टर फॉर बेगर्स” या प्रकल्पातून भीक मागणा-या व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाते, परंतु ज्यांचे रोजचे हातावर पोट आहे असा मजूर वर्ग, केटरिंग व्यवसायात काम करणारे वाढपी, भांडी घासणारे, सजावट करणारे, आचारी व इतर काम करणारे शिवाय कोणतेतरी छोटे व्यवसाय रस्त्यावर चालवणारा वर्ग यांच्या हाताचं काम सध्या थांबलं आहे आणि म्हणून रोजचा मिळणारा पैसा थांबला आहे. उपजीवीकेचं कोणतंही इतर साधन आणि मार्ग नसल्यामुळे यांच्याही कुटुंबाची सध्या वाताहत सुरू आहे.
हि सर्व मंडळी शक्यतो पुण्याबाहेरच्या गावाहून जगण्यासाठी इथे आलेली आहेत. जगण्यानं छळली गेलेली ही माणसं, सुटका होण्यासाठी मरणाची वाट बघत सध्या रस्त्यावर याचना करत उभी आहेत.
आपण रुढार्थानं ज्यांना भिक्षेकरी म्हणतो, ते हे नव्हेत… अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते या अवस्थेत आहेत. एका रात्रीत रंकाचा राव होतो, तसा रावाचा रंकही होतो… ख-या अर्थानं आजच्या परिस्थितीनं हे शिकवलं.! आणि यामुळे सध्या रस्त्यांवर अशा अचानक उतरलेल्या, पिचलेल्या मंडळींमुळे भिक्षेक-यांचा अचानक फुगवटा निर्माण झाला आहे असं दिसुन येतंय.
अशा रूढार्थाने भिक्षेकरी नसलेल्या परंतु याचना करावी लागणाऱ्या लोकांसाठी काय करावे हा विचार करत असताना डॉ. मनीषा सोनवणे हिला या लोकांना रोज जेवु घालण्याची कल्पना सुचली. आणि हा उपक्रम आम्ही २९ एप्रिल रोजी सुरू केला, या उपक्रमांला अन्नपूर्णा असं नाव दिलं. डॉ. मनीषा तीला मिळणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च करणार आहे.
खरं तर हा प्रकल्प आम्ही “स्वान्त सुखाय” या उक्तीनुसार सुरू केला आहे, स्वतःच्या समाधानासाठी सुरु केला होता, परंतु याची माहिती आपल्यापैकी बर्याच जणांना समजल्यानंतर हा उपक्रम वैयक्तिक राहीलाच नाही. आपणांपैकी बऱ्याच सहृदांनी संपर्क साधून या प्रकल्पाला मदत करण्यास सुरुवात केली आहे.
आपलं ऋण कसं फेडावं या विचारात सध्या आहोत.
नेहमीच पुनर्वसनाचा विचार करत असल्यामुळे, आपण मोफत जेवण देवुन एका हाताने एका व्यक्तीला सावरत आहोत, तसंच दुस-या हाताने एखाद्या कुटुंबालासुद्धा सावरावं, त्यांनाही यानिमित्तानं व्यवसाय मिळवुन द्यावा, या विचारानं, ज्यांच्या खानावळी सध्या बंद आहेत, जे सध्या अडचणीत आहेत, अशा खानावळ चालविणा-या, माहितीतल्या खानावळ चालकांकडुन डब्बे विकत घेत आहोत.
एका व्यक्तीला मोफत जेवण देऊन एका हाताने त्याची भूक भागवताना दुसऱ्या हाताने ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यांना व्यवसायाची संधी देऊन सावरणे हा अन्नपूर्णा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. “स्वार्थातून परमार्थ” या संकल्पनेवर हा प्रकल्प चालु केला आहे.
भुकेल्याला जेवण देणे हा “परमार्थ” आणि ज्यांचे व्यवसाय ठप्प आहेत, जे सध्याच्या काळात कोलमडुन पडले आहेत, त्यांना हात देऊन उठवणे, त्यांचं पुनर्वसन करणे आणि आख्ख्या कुटुंबाच्या चेह-यावरचा आनंद समाधानानं बघणं हा स्वार्थ!
सध्याचा काळ ओसरल्यानंतर, सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर, रस्त्यांवर असे जेवण देणे बंद करून रुग्णालयात निराधार आणि निराश्रित म्हणून उपचार घेणाऱ्या सर्व लोकांना आजन्म हे अन्नदान सेवा देणार आहोत.
भुकेला हाच देव… अन्नदान हीच पूजा! या भावनेतुन हा उपक्रम सुरु केला आहे.
भविष्यकालिन योजना
- अन्नपूर्णा प्रकल्पातून भीक न मागणाऱ्या व्यक्तींना आणि रुग्णांना अन्नदान करणे.
- नाटक कंपनीत काम करणारा एक कलाकार मला या याचना करणाऱ्या मंडळींमध्ये सापडला. अतिशय उमदा असणारा हा कलाकार सध्या कुटुंबासह अडचणीत आहे. वाटेल ते काम करण्याची त्यांची तयारी आहे याच्यासाठी काम शोधत आहे.
- याव्यतिरिक्त “डॉक्टर फॉर बेगर्स” या प्रकल्पात भीक मागणा-या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे या व्यतिरिक्त आणखी जे समोर येईल ते…
मे महिन्यात माझ्या पुढे आणखी काय काय वाढले आहे याची मलाही सध्यातरी कल्पना नाही… जे समोर येईल त्याला आपल्या साथीने तोंड देण्याची तयारी ठेवली आहे.!
आपल्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा हा आढावा आपणासमोर सविनय सादर!!!
(sohamtrust या नावे असलेल्या फेसबुक पेजवर वरील संदर्भांचे प्रातिनिधीक फोटो उपलब्ध करुन दिलेले आहेत.)
Leave a Reply