एखाद्या आईला आपलं बाळ जसं प्रिय असतं, तसा आमचा हा अन्नपूर्णा प्रकल्प आमच्यासाठी प्रिय आहे…
या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण एका हाताने गोर गरीब, गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण देत आहोत, तर दुसऱ्या हाताने आपण काही व्यक्तींना व्यवसाय देत आहोत. समाजाने केलेल्या मदतीचा आढावा समाजाला देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून या आठवड्यातील आढावा आपल्या माहितीसाठी सादर करतोय.
२९ एप्रिल रोजी सुरू केलेला हा प्रकल्प…
किमान २१ डबे आपण गोरगरिबांना दररोज देऊन त्यांची भूक भागवू शकू का? आपल्याला जमेल का?? २८ एप्रिल पर्यंत आम्हाला हा प्रश्न छळत होता…
आज ९ मे २०२१…
पुरते दहा – अकरा दिवस सुद्धा झाले नाहीत. सांगायला खुप आनंद होतोय, की आजच्या नऊ तारखेला आम्ही हा आकडा ५०० इतका गाठला आहे. रोज ५०० लोकांना आपल्या माध्यमांतून आपण जेवण देत आहोत.
यात आमचं वैयक्तिक कर्तुत्व काहीही नाही, हा आपणां सर्वांचा मोठेपणा आणि दानशूरपणा! आपले हात यात लागले म्हणुनच, इथवर आम्ही येवु शकलो, याचं सारं श्रेय आपणांस!!!
कोणत्याही भल्यामोठ्या केटरिंग व्यवसाय करणाऱ्या एखाद्या कंपनीला डब्यांची ऑर्डर देणे, निवांत बसुन फक्त देखरेख ठेवणं, आम्हाला सहज शक्य होतं आणि सोपंही! परंतु माझी अर्धांगिनी, डॉ. मनिषा सोनवणे, जीने या प्रकल्पाची जबाबदारी स्विकारली आहे, तीला असं वाटत होतं की, या प्रकल्पांतर्गत भुकेल्याला अन्न देतानाच तळागाळात असणा-या, ज्यांचे व्यवसाय थांबले आहेत, ज्यांचा रोजगार गेला आहे अशांना पुन्हा रोजगार मिळवुन देता आला पाहिजे.
आणि म्हणुन पहिल्या टप्प्यात आम्ही समाजातील ज्या महिला “खानावळ” या व्यवसायाच्या माध्यमातून संसाराचा गाडा “एकाकी” झुंज देवुन चालवीत होत्या, मुलाबाळांचे शिक्षण करत होत्या, परंतु आताच्या या काळात हा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. ज्यांना कुणाचीही विशेष साथ नाही अशा या महिलांना या प्रकल्पातुन हात द्यायचा आम्ही ठरवलं.
याच प्रवासात काही दिव्यांग व्यक्ती भेटल्या… जे शरीरानं अधु असले तरी मनानं अधु नव्हते. पडुनही उठुन उभं राहण्याची त्यांची जिद्द होती. आम्ही यांनाही बोट द्यायचं ठरवलं. आणि इथुन ख-या अर्थानं आमचा प्रवास सुरु झाला.! आम्ही या महिलांना आणि दिव्यांग व्यक्तींना विश्वास दिला, खानावळ पुन्हा सुरु केल्यास, त्यांच्याकडुन डबे विकत घेण्याचं वचन दिलं. सुरुवातीला १० डबे दररोज (रु. ४० प्रती डब्बा) घ्यायला सुरुवात केली.
आता सोमवार दि. १० मे पासुन, यांच्याकडील डब्यांची संख्या वाढवत आहोत. या सर्वांकडुन आता आपण दहाऐवजी २० डबे दररोज विकत घेणार आहोत. एकुण हिशोब पाहता प्रत्येकाच्या खात्यावर, महिना अखेरीस रु. २०,०००/- इतकी रक्कम जमा होईल.
एक कुटुंब सावरायला आता नक्कीच मदत होईल.
Win – Win Situation यालाच म्हणत असावेत!
एका हाताने गोरगरिबांना मोफत जेवण देतो आहोत, तर दुसऱ्या हाताने अनेक कुटुंबांना व्यवसाय देवुन स्वाभीमानानं जगण्याची ताकद देत आहोत. निधीची उपलब्धता लक्षात घेवुन, भविष्यात अशा आणखी अनेक एकाकी झुंज देणाऱ्या महिला आणि दिव्यांग व्यक्तींना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
याशिवाय समाजातील अनेक दानशूर मंडळी आणि संस्था आम्हास रेडीमेड डबे आणुन देत आहेत. श्री. कीर्तीभाई ओसवाल, श्री. प्रशांतजी गुंजाळ, श्री. विकासजी रुणवाल, श्री. शेखरजी काची, सौ. संगीता रासकर यांच्या माध्यमातुन ओळख झालेल्या, समाजाची सेवा घडावी या भावनेनं, कोथरूड मधील एका सोसायटीतल्या सौ. मोहिनीताई दिघे आणि ग्रुप आम्हास डबे पोहोचवत आहेत, अगदी रोजच्या रोज!
शिवाय आपण सर्व सहृदय मंडळी, डबे विकत घेण्यासाठी आम्हास निधी देत आहात. या जन्मात आपलं सर्वांचं ऋण आमच्याकडून फिटणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.
याव्यतिरिक्त मला सांगायला आनंद होतो की GMBF, ग्लोबल केअर्स हा दुबईमध्ये असणाऱ्या, समविचारी “माणसांचा” एक ग्रुप … महाराष्ट्रातल्या मातीचं ऋण फेडण्यासाठी या सर्व मंडळींनी आपल्याला तिथुन हात आणि साथ द्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातल्या तळागाळातील महिला आणि दिव्यांग व्यक्तींचा व्यवसाय वाढावा आणि त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी एक हात द्यावा, आमच्या या विचाराशी सहमत होवुन शारीरीक आर्थिक आणि मानसीक दृष्टीने हा ग्रुप आमच्याशी जोडला गेला आहे. आकाशात उंच भरारी घेत असताना, पाय जमिनीवर ठेवणाऱ्या GMBF, ग्लोबल केअर्स, दुबईमधील या ग्रुपला आमचा साष्टांग नमस्कार!
डब्यांची सोय झाली परंतु गरजुंपर्यंत ते रोज जाणार कसे? पोचवणार कोण?
भरपूर शिक्षण आहे परंतु काम धंदा, नोकरी नाही! घेतलेलं शिक्षण, नोकरी मिळवुन देत नाही म्हणुन हताश झालेली काही तरुण पोरं… “कोणता झेंडा घेवु हाती?” म्हणत लाठ्या, काठ्या आणि प्रसंगी तलवारी घेवुन कुणाच्यातरी मागं दिशाहिन अवस्थेत फिरणारी ही पोरं! डिग्री चा कागद एका हातात घेऊन दुसऱ्या हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत पसरवायची… यातील काही तरुणांना गाठलं… तुकडे करणाऱ्या तलवारीपेक्षा जोडणारी सुई खूप मोठी असते याची त्यांना जाणीव करुन दिली. कुणाच्या तोंडातला घास काढुन घ्यायला ताकद लागत नाही… एखाद्याला घास भरवायला मनगटात ताकद असावी लागते… हे त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं. अंगात नुसतीच रग आणि धग असुन चालत नाय दोस्ता… अंगातली हि रग आणि धग वापरायची कशी? हे कळायला हाताची मुठ नाही, अंगात मुठीएव्हढं काळीज पण असायला लागतंय… याची त्यांना जाणिव करुन दिली.
माझा विचार पटलेल्या काही तरुणांना मग आपण हे डबे वाटण्याचं काम दिलं आहे! हातातल्या तलवारी आणि मनातला राग टाकून देऊन यांनी गोरगरिबांना डबा पोचवणं सुरू केलं आहे… आपण यांना या प्रकल्पात समाविष्ट करून महिन्याचा पगार सुरू केला आहे. ज्यांनी एकेकाळी दहशत पसरवली आज ते गोरगरिबां मध्ये जेवणाचे डबे नाही, प्रेम वाटत फिरत आहेत! गोरगरिबांना वाकून नमस्कार करत, त्यांच्या हातात “जेवण” देवुन स्वतःचं “जीवन” बदलण्याचा प्रयत्न करत आहेत… प्रसंगी घास भरवत आहेत. हा प्रसंग ज्या ज्या वेळी मी रस्त्यावर पाहतो… त्या त्या वेळी डोळ्यात पाणी आल्यावाचुन रहात नाही.!
अशाप्रकारे पुणे आणि चिंचवड परिसरात १८ ठिकाणी जवळपास ४०० लोकांना आपण दुपारचं जेवण देत आहोत.
राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा या हॉस्पिटलच्या बाहेर आमची ही तरुण मुलं संध्याकाळी थांबतात आणि हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक आणि रस्त्यावरील गरजू लोक अशा जवळपास १०० लोकांना रात्रीचे जेवण देत आहोत. अशाप्रकारे, रस्त्यावर / फुटपाथवर असणाऱ्या, जेवण तयार करण्याची कोणतीही सोय नसणाऱ्या जवळपास पाचशे लोकांना आपण तयार जेवण देत आहोत.
या व्यतिरीक्त ज्या कुटुंबांकडे जेवण तयार करण्याची काहीतरी सोय आहे, अशा कुटुंबांना मात्र आपण शिधा देत आहोत. यात गव्हाचे पीठ (गहू नाही कारण दळण कुठून आणणार?), तूर डाळ, तांदूळ, बेसन चे पीठ (किमान पिठलं करून खाता यावं यासाठी) तेल, साखर, चहा पावडर इत्यादी गोष्टी एकत्र करून त्याचे एक ग्रोसरी किट तयार करुन देत आहोत. आपण दिलेल्या निधीतून आम्ही हा शिधा (ग्रोसरी किट ) विकत घेऊन ३० गरजू लोकांना रोज देत आहोत. याव्यतिरिक्त समाजातील अनेक सहृदय मंडळी आम्हास हे ग्रोसरी किट तयार करुन आणून देत आहेत. एकूण काय समाजच, समाजाच्या मदतीला धावून येत आहे, आम्ही फक्त समन्वयाचे काम करत आहोत.
या संपूर्ण प्रकल्पावर डॉक्टर मनिषा सोनवणे देखरेख करत आहेत. प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ८३०८३१५४९४.
एका बाजूला भुकेल्यांना अन्न देऊन दुसऱ्या बाजूला एकाकी झुंज देणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती आणि भरकटलेली तरुण मंडळी यांच्याही हाताला काम देण्याच्या आमच्या या प्रयत्नात आपलेही मोलाचे योगदान आहे. अन्नपूर्णा प्रकल्प हा नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, हे प्रत्येकाला येऊन पाहणं शक्य होईलच असं नाही आणि म्हणूनच आपल्याला या प्रकल्पाची दिशा समजावी, यासाठी आपल्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाचा आजचा हा आढावा आपणास सविनय सादर
आताची परिस्थिती सुद्धा बदलेल थोडा संयम ठेवायला हवा… पण संयम ठेवणं म्हणजे परिस्थिती बदलण्याची नुसती वाट पाहत निष्क्रिय बसणं नव्हे… तर परिस्थिती बदलेपर्यंत, आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी सतत काहीतरी प्रयत्न करत राहणे! आपल्या साथीने आणि साक्षीने हा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवणार आहोत.
सादर प्रणाम!
Leave a Reply