अन्नपुर्णा प्रकल्प.
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक…
आज आदरणीय छ. संभाजी महाराजांची जयंती…
आज रमजान ईद…
आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती…
सर्वच अर्थाने अत्यंत पवित्र असा हा दिवस!
आज अनेकांच्या मनात, या दिवसाचं औचित्य साधून “जल्लोष” सुरू असणार आहे! असायलाच हवा!
परंतु समाजात आज अशीही माणसं आहेत ज्यांनी सध्याच्या काळात आपलं जवळचं कुणीतरी गमावलं आहे, ज्यांची नोकरी गेली आहे, जवळचे नाते संबंध आता दूर गेले आहेत… यातली अनेक मंडळी आज रस्त्यावर उपाशी आहेत… यांच्या मनात मात्र “आक्रोश” सुरू असणार आहे! यांना किमान आपण जेवण तरी देऊ, या विचाराने अन्नपुर्णा हा प्रकल्प सुरू झाला आणि २१ डब्या पासून सुरू झालेला हा प्रवास आज ७५० डब्यांवर येऊन पोहोचला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण एकूण ७५० जणांना रोज जेवू घालत आहोत… आपण म्हणजे “आपण” सर्वजण!!! ७५० हा नुसता आकडा नाही आमच्यासाठी, ७५० जीव आहेत ते!
अन्नपूर्णा प्रकल्प सुरू केल्यानंतर, खोटं वाटेल अशा अनेक करूण गोष्टी आम्ही पहिल्या. आम्हाला घरात राहणारी माणसं माहित आहेत, रस्त्यावर चालणारी माणसं माहित आहेत, चंद्रावर पोहोचलेली माणसं सुद्धा माहित आहेत, स्मशानात एखाद्याला पोचवण्यासाठी जाणारी माणसं माहीत आहेत… पण स्मशानाच्या बाहेर… दिवसभर उगीचच रेंगाळणारी माणसं माहीत आहेत का? रात्रंदिवस स्मशानाबाहेर उगीचच ताटकळणारी माणसं माहित आहेत का? या कामानं अशी माणसंही आम्हाला माहित झाली… एकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने खाली मान घालून सांगितलं, की अंत्यसंस्कार करण्याच्या वेळेस अनेक लोक “गेलेल्या” व्यक्तीचे, आवडीचे पदार्थ घेऊन येतात आणि ते गेलेल्या व्यक्तीच्या शेजारी ठेवतात. अंत्यविधी झाले की लोक निघून जातात आणि आम्ही मग ते पदार्थ खातो!
सांगताना त्याच्या डोळ्यात पाऊस होता… भर उन्हाळ्यात! आणि माझ्या अंगावर शहारे, ते ही भर उन्हाळ्यात!
भूक मग ती कोणतीही असो वाईटच… ही भूक… कधी शरीर विकायला लावते, तर कधी मन! ही कधी मारायला लावते तर कधी मरायला! अन्नपूर्णा प्रकल्पाच्या दिवसाची सुरुवात, आम्ही स्मशानाबाहेर ताटकळत थांबलेल्या, भुकेनं तडफडणाऱ्या माझ्या या भावंडांना आधी जेवू घालून मग करतो! आमच्या दिवसाची सुरुवात स्मशानापासूनच होते! आयुष्याच्या शेवटी प्रत्येक जण इथेच येणार आहे… मग सुरुवात इथुनच केली तर काय बिघडलं? आपल्या मदतीने आम्ही आता शेवटापासून सुरुवात केली आहे!
रोज ७५० लोक म्हणजे ७५० जेवणं… प्रत्येकाच्या हातात नेऊन डबा द्यायचा… तेही आमचं नेहमीच भीक मागणाऱ्या लोकांचं काम सांभाळून… खूप ओढाताण होते, दमछाक होते!
पण दिवसाच्या शेवटी, जेवुन तृप्त झालेली माणसं पाहिली की सगळी दमछाक आणि ओढाताण विसरायला होतं! आणि, सुख म्हणजे नक्की काय असतं? हे दिवसाच्या शेवटी समजतं!
सध्या दुबईत असणारे माझे मित्र, श्री. प्रसाद दातार यांच्या माध्यमातून जीएमबीएफ ग्लोबल केअर्स, दुबई, यांच्या उपक्रमाने आम्हाला हात दिला. ७५० पैकी आजच्या घडीला २७५ डबे रोज आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होत आहेत. हे जेवणाचे डबे आम्ही ७ महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांच्याकडून विकत घेत आहोत. आणि गरजुंना मोफत देत आहोत. म्हणजे ७ व्यक्ती नव्हे तर, ७ कुटुंबांना जीएमबीएफ ग्लोबल केअर्स, दुबई, यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण व्यवसाय देत आहोत.
याव्यतिरिक्त इनरव्हिल क्लब, बाणेर हिल्स, भुसारी कॉलनी कट्टा या नावाने सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक ताईंचा एक ग्रुप, सौ. रचनाताई प्रशांत गुंजाळ, ज्येष्ठ बंधुतुल्य श्री. विकासजी रुणवाल आणि श्री. कीर्ती भाई ओसवाल, प्रांजलताई ओसवाल, आणि हर्षल गिराड, एकम सेवा, प्रितीताई गोगटे आणि श्री. राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून आम्हास मोफत डबे मिळत आहेत. ही माणसं कोणत्याही अपेक्षे शिवाय आम्हाला मदत करत आहेत.
याव्यतिरिक्त ज्यांच्याकडे अन्न शिजवून खाण्याची काही सोय आहे, अशा लोकांना आणि माझ्या खराटा पलटण मध्ये काम करणाऱ्या आज्यांना आम्ही शिधा (Grocery Kit) देत आहोत.
लायन श्री. रमेशभाई शहा यांच्या माध्यमातून सौ. ज्योतीताई भंडारी, श्री. महावीरभाई शहा, सौ. मुग्धाताई मिलिंद फाटक, श्री. जयंत देशपांडे, फादर श्री भाऊसाहेब संसारे, सौ. हर्षाताई भंडारी या माझ्या जवळच्या मंडळींनी हा शिधा (Grocery Kit)आम्हास उपलब्ध करून दिला आहे.
याशिवाय नाव न सांगण्याच्या प्रेमळ अटीवर आणि धमकीसह अनेक सहृदय मित्र मंडळी यांनीही शिधा दिला आहे. वर नाव घेतलेल्या व्यक्तींनी प्रत्यक्ष डबे अथवा शिधा दिला आहे. परंतु शिधा आणि डबे घेण्यासाठी माझ्या आणि मनीषाच्या अत्यंत जवळच्या सहृद व्यक्तींनी आम्हास निधी प्राप्त करून दिला आहे. या सर्वांची नावे लिहिण्याची माझी मनापासून “मनीषा” आहे… परंतु ही नावे मी लिहायला लागलो तर फुलस्केप ची किमान पन्नास पाने भरतील… आणि केवळ त्यामुळे आर्थिक मदत देणाऱ्या मंडळींचे नाव लिहिण्याचा मोह आम्हाला नाईलाजाने आवरावा लागत आहे. आम्ही दोघेही यासाठी आपली मनापासून माफी मागत आहोत!
परंतु ही सर्व नावं आमच्या आणि ज्यांना हे जेवण आणि रोजगार मिळाला आहे, त्यांच्या हृदयावर कायमची कोरलेली राहतील याची मला खात्री आहे! कारण, ज्या माझ्या बंधू आणि भगिनींनी आम्हाला आर्थिक मदत केली आहे, त्या आर्थिक मदतीतून आम्ही आणखी ७ महिलांना व्यवसाय दिला आहे, याशिवाय भरकटलेल्या ३ मुलांना रोजगार दिला आहे. अशाप्रकारे जीएमबीएफ ग्लोबल केअर्स यांच्या मदतीतून ७ आणि आपणा सर्वांच्या आर्थिक मदतीमधून १०, अशा एकूण १७ लोकांची कुटुंबं आपल्या सर्वांच्या या निधीवर जगत आहेत.
आपणा सर्वांना आमचा साष्टांग नमस्कार आहे, तो कृपया स्वीकार करावा!
मोफत जेवण रस्त्यावरच्या लोकांना तर देताय… पण रस्त्यावरचे लोक अन्न खाऊन रस्त्यावर फेकतील… त्या कच-याचं काय करणार? असा एक “पुणेरी” प्रश्नही अनेकांनी विचारला. आपणांस माहितच असेल, भीक मागणा-या लोकांची एक टिम तयार केली आहे. ज्यांना मी गुरु मानतो ते आदरणीय श्री. गाडगेबाबा, यांच्या कामाच्या प्रेरणेतुन या टिमला खराटा-पलटण असं नाव दिलं आहे. जीथे हा कचरा होतो, तीथे आमच्या खराटा-पलटण च्या माध्यमांतुन दर शुक्रवारी सफाई सुद्धा केली जाते. याबदल्यात या टिमला ग्रोसरी किट आणि मानधन दिलं जातं. म्हणजे सफाई भी… आणि त्यांची कमाई भी!
अशा प्रकारे वरुन आपण सर्वजण आम्हाला मदत करत आहात तर खालुन आम्ही तळागाळातल्या लोकांची अशी साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय… एकानं केलेलं काम दुस-याला पुरक ठरावं! महिला आणि दिव्यांग व्यक्तींना डबे तयार करण्याचा रोजगार – गरजुंना मोफत अन्न – डबे वाटणाऱ्या बेरोजगार मुलांना पगार – आणि कचरा वेचणा-या खराटा-पलटणला काम केलेल्या दिवसाचं मानधन! प्रत्येक गोष्टीत आम्ही रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला!
आज अक्षय्य तृतीया!
आज दिलेले दान अ-क्षय असते, असं समजलं जातं… आणि याचमुळे आमच्याकडील आजच्या मदतीचा ओघ प्रचंड वाढला. आम्हाला मिळालेल्या मदतीतून आज आपण शब्दशः एक हजार लोकांना जेवू घालू शकलो! आजच्या जेवणात काय नव्हतं? आज जेवणाबरोबर लाडू होता, शिरा होता, बासुंदी होती, जिलेबी होती, मुगाची खिचडी होती… एक हजार लोकांच्या जेवणालाच जर “सहस्त्र भोजन” म्हणत असतील, तर होय; आम्ही आपल्या मदतीने आणि दरिद्री नारायणाच्या साक्षीने आजच्या अक्षय्य तृतियेला “सहस्त्र भोजन” घातलं!
माझी आजी माझ्या अत्यंत जवळची… कै. लक्ष्मीबाई धर्माजी सोनवणे! खमकी बाई ,आख्या गावात हिचा त्या काळी दरारा होता… माझ्या आजीला म्हणे एकदा स्वप्नं पडलं, आणि त्या स्वप्नात तिच्या देवाघरी गेलेल्या वडिलांनी तिला सांगितलं की तुला जेव्हा नात / नातु होईल, त्या नातवंडाच्या रूपाने मी पुन्हा जन्म घेईन. यानंतर नातू म्हणून मी “दिवटा” जन्माला आलो… ती भोळी भाबडी बाई मलाच तिचा बाप समजू लागली. झालं, मला रान मोकळं मिळालं! लहानपणी मी तीच्या या गैरसमजुतीचा खूप फायदा (गैर) घेतला…
कुणापुढे न झुकणारी ही माझी म्हातारी माझ्यापुढे मात्र गोगलगाय होऊन जायची… “काय रं आबी” म्हणत अदबीने माझं सर्व ऐकायची, खेड्यातल्या माझ्या लहानपणीच्या वास्तव्यात मी खुप “उद्योग” करायचो आणि माझी हर एक चूक ती पोटात घ्यायची! सगळे लोक तिला गावात अदबीने मामी किंवा काकू म्हणायचे… मी तिला डायरेक्ट “ऐ लक्षे”, म्हणुन हाक मारायचो… कारण मी बाप होतो ना तीचा! गावातल्या आयाबाया यावरुन आजीला बोलायच्या, “काय बया द्वाड कार्टं हाय मेलं तुजं मामी…, आज्जीला नावानं हाक मारतंय… आमच्या वक्ताला आसलं लाड न्हवतं बया, हान की दोन दणकं…”
यावर माझी आजी या आयाबायांना पायताण दाखवित म्हणत असे, “माजा बाप हाय त्यो… मला नावानंच हाक मारनार, खबरदार पुन्यांदा बोलशील तर…” बोटं मोडत या आयाबाया मग निधुन जायच्या… बाकी कुठेही मला स्थान नव्हतं परंतु आजीच्या मनात मात्र माझी किंमत होती! तीच्या सहवासातले लहानपणीचे दिवस मी हृदयात कोरुन ठेवले आहेत, तो हळवा कप्पा आहे माझा!
माझं लग्न झाल्यानंतर ती मला एकदा म्हणाली होती, “आबी, आता तुला एकांदं प्वार झालं मंजी मी पणजी हुयीन, ज्या दिशी मी पणजी हुइन त्या दिशी एक हजार गोरगरिबाला मी जेवू घालनार हाय.” अशा एक हजार लोकांना जेवू घालण्यास “सहस्त्र भोजन” असे म्हणतात, हे मला नंतर समजलं. राजे महाराजे यांच्या काळात चालणारा हा प्रकार! माझ्या आजीची एवढी मोठी ऐपत नव्हती, परंतु ती बोलून गेली होती, मायेनं! ज्या दिवशी सोहम, माझा मुलगा जन्माला आला, त्या दिवसाच्या आधीच मात्र ती आम्हाला सोडून गेली… पणजी म्हणून मिरवण्याच्या आधीच ती मला सोडून गेली, तो दिवस होता अक्षय्य तृतीयाच!
बरोब्बर एकोणीस वर्षे झाली आज… पणजी होऊन सहस्त्र भोजन घालण्याचं तीचं स्वप्न अधुरं राहिलं, कायमचं! पण आज एकोणीस वर्षांनंतर हा दिवस परत फिरुन आला! आज खऱ्या अर्थाने आपण १००० गोरगरीबांना आजच जेवू घालून “सहस्त्र भोजन” आपोआप संपन्न झालं… काहीही ठरवुन केलं नाही. १००० हा आकडासुद्धा आम्हाला दिवसाच्या शेवटी समजला! माझ्या गेलेल्या या म्हातारीची सहस्त्र भोजन घालण्याची इच्छा आज एकोणीस वर्षानंतर पूर्ण झाली… की तीने करवून घेतली?
ती सुद्धा बरोबर अक्षय तृतीयेलाच?
या सहस्त्र भोजनाची इच्छा तीची…यात हात तुम्हा सर्वांचे… आणि हे घडवून आणणारे माध्यम मी, मनीषा आणि प्रत्यक्ष सोहम?
ही योजना कोणाची? तुमची? की निसर्गाची? की या गोरगरीबांची? की मला, मनीषाला आणि सोहमला दुरून प्रेमानं पहात असणाऱ्या माझ्या “लक्षीची”?
मला कळत नाही… खरंच मला काहीच कळत नाहीय!
अक्षय्य तृतिया, दि. 14 मे, शुक्रवार 2021.
Leave a Reply