अन्नपूर्णा प्रकल्प… मे महिन्याची गोळाबेरीज!

देव भुकेल्यात आहे… नैवेद्य अन्नात आहे… आणि पूजा अन्नदानात आहे!

या भावनेने सुरू केलेला अन्नपूर्णा प्रकल्प!

डॉक्टर होऊन एकवीस वर्षे झाली, यानिमित्ताने सध्याच्या कठीण परिस्थितीत आपणही किमान २१ लोकांना जेवू घालू, या भावनेने सुरू केलेला हा यज्ञ! आज महिन्याच्या अखेरीस सर्व गोळा बेरीज करताना लक्षात आलं की, या संपूर्ण मे महिन्यामध्ये… २१ नव्हे, २२ नव्हे, ५० नव्हे, १०० नव्हे, ५०० नव्हे तर तब्बल २१३७५ लोकांना “आपण” या उपक्रमातून जेवण दिलं आहे.

“आपण” म्हणजे “आम्ही” या अर्थाने नाही म्हणत मी, “आपण” म्हणजे “आपण सर्वजण”!

यात नोकरी गेलेला मजूर वर्ग होता, हमाल वर्ग होता, टपरी व्यावसायिक होते, त्यांचे कुटुंबीय होते, फुटपाथवर आकाशाच्या छताखाली राहणारे कच्चे-बच्चे होते, प्रेता जवळचं खाद्य मिळावं म्हणून लपून-छपून स्मशाना बाहेर थांबणारे काही लोक होते!
ही झाली माणसं!
याव्यतिरिक्त रस्त्यावर बेवारस आणि भुकेल्या अवस्थेत फिरणारे अनेक मुके जीव सुद्धा होते. गाय, कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर यांनासुद्धा पोटभर जेवू घातलं, पाणी पाजलं… आम्ही कोणातच भेदभाव केला नाही! भेदभाव करण्याचं कारणच नव्हतं… त्यांना चार पाय असतात आणि आपल्याला दोन इतकाच काय तो फरक! बऱ्याच वेळा मला माणसात रानटी पशु दिसतो आणि कित्येक वेळा जनावरांमध्ये माणुसकी दिसली आहे… असो, यावर पुन्हा कधी तरी… सध्या तो विषय नाही!
असो!
महिनाभरात २१३७५ जेवणं हा आकडा मी मोठ्या कौतुकाने सांगत असलो, तरी या आकड्याचं श्रेय आमचं एकट्याचं नाही! शिवाय या आकडेवारी मध्ये मुक्या जीवांचा समावेश केलेला नाही… आकड्यात रमतो ती आपण माणसं, बिचार्‍या मुक्या जीवांना या आकड्याचं काय कौतुक?
तर… सांगत हेच होतो की, या आकड्याचं श्रेय आमचं एकट्याचे नाही! माझे जवळचे मित्र, श्री. प्रसाद दातार यांच्या सहकार्याने GMBF Global Cares, Dubai यांच्या मदतीने ५७७५ लोकांना, या महिन्यांमध्ये आपण जेवू घालू शकलो. याव्यतिरिक्त माझे बंधूसमान मित्र कीर्तीभाई ओसवाल आणि त्यांची कन्या कु. प्रांजल ओसवाल यांच्या माध्यमातून १५०० लोकांपर्यंत जेवण पोचलं. भुसारी कॉलनीमधील महिला वर्गाने, प्रत्येकीने एक या प्रमाणात संपूर्ण महिन्यात १३०० लोकांना जेवण दिलं. सौ. रचना ताई गुंजाळ आणि श्री. प्रशांतसर गुंजाळ यांनी आमच्या माध्यमातून, श्री. शेखर काची यांच्यामार्फत, आज पर्यंत चिंचवड परिसरात ९०० भुकेल्यांना जेवू घातले. माझे गुरुबंधू श्री. विकासजी रुणवाल यांच्या प्रेरणेने हे साध्य झाले.

याव्यतिरिक्त, आपण सर्वांनी आर्थिक स्वरूपात जी मदत केली आहे त्या मदती मधून आम्ही १२००० डबे या महिन्याभरात विकत घेतले. ज्या महिला आयुष्यात एकाकी झुंज देत आहेत… खानावळ हा ज्यांचा व्यवसाय होता, आणि आता तो पूर्ण बंद पडला आहे, आणि त्यामुळे ज्यांच्या जीवनाची वाताहत झाली आहे, अशा ताईंकडून आपण हे डबे विकत घेतले आहेत, यात काही दिव्यांग सुद्धा आहेत…

बेरोजगार मुलांना डबे वाटपाच्या कामावर ठेवून त्यांना पगार सुरू केला आहे. आणि जे भुकेले आहेत, असे रस्त्यावरचे किंवा ससुन आणि नायडु रुग्णालयात ऍडमिट असणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यापर्यंत हे डबे पोचवले आहेत.

आम्ही आपणा सर्वांचे मनापासून ऋणी आहोत. आर्थिक मदत देणाऱ्या सर्व सहृदांचे नाव लिहिण्याची माझी खूप “मनिषा” आहे… परंतु अतिविस्तारभयास्तव मी ते नाईलाजाने टाळत आहे!

याव्यतिरिक्त, ज्यांच्याकडे अन्न शिजवून खाण्याची व्यवस्था आहे अशा जवळपास एक हजार लोकांना आपण शिधा म्हणजेच गोसरी किट या महिन्यात दिले आहेत. माझे ज्येष्ठ स्नेही, श्री. मनिष बदियानी यांनी १२ किलो सेंद्रीय हळद दिली आहे, श्री. चंद्रकांत गाडगे यांनी १२, श्री. महावीर शहा यांनी १५, लायन श्री. रमेश शहा यांच्या माध्यमातून सौ. ज्योती भंडारे यांनी ५०, सौ. मुग्धा मिलिंद फाटक यांनी श्री. जयंत देशपांडे यांच्या हस्ते ३७ ग्रोसरी किट दिले आहेत. आम्ही आपले ऋणी आहोत. हे ग्रोसरी किट विकत घेण्यासाठी सुद्धा अनेक सहृदांनी आम्हाला आर्थिक मदत दिली आहे. आमचं दुर्दैव, की या सर्वांची नावं आम्ही लिहू शकत नाही! देणाराचे हात हजारो… फाटकी आमची झोळी… अशी आमची गत झाली आहे!

एका विशिष्ट श्रद्धेपोटी आम्ही हे काम करीत आहोत… श्रद्धा हृदयात असावी लागते, जिभेच्या टोकावर नाही! सर्व आणि सर्वांना पुनश्च साष्टांग नमस्कार करून ही गोळाबेरीज आपल्या पायाशी समर्पित करीत आहोत!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*