मे महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

सप्रेम नमस्कार!

काही लोक आयुष्यात असतात! काही लोकांमुळे आयुष्य असतं.!! तर, काही लोक हेच आयुष्य असतात!!! आपलं ही स्थान आमच्या मनात हेच आहे. आपल्याच मदतीने अनेक आयुष्यं सावरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून या कामाचं सर्व श्रेय आपणास सविनय सादर…

भिक्षेकरी ते कष्टकरी

 • १पर्वती येथे साधारण ७५ वर्षे वयाचे एक अंध आजोबा. देवाच्या दारात मरणाची भीक मागत बसलेले असतात. १ मे रोजी यांना एक वजन काटा घेऊन दिला आहे, ज्या ठिकाणी ती भिक मागायचे त्याच ठिकाणी आता ते वजन काटा घेऊन बसतात.

लोक वजनकाट्यावर “वजन” करुन यांना पैसे देतात… यामुळे आजोबांच्या आयुष्यातला “भार” कमी झाला आहे.

 • येरवडा परिसरात असेच भीक मागणारे आणखी एक आजोबा. १० मे रोजी यांनाही एक वजन काटा घेऊन दिला आहे ते सुद्धा आता वजन काटा घेऊन बसतात.

योग्य ठिकाणी आपलं “वजन” वापरुन कुणाचातरी “भार” हलका करता येतो तर…

 • पतीचा कोणताही आधार नसलेली एक ताई. घरात तीन लहान मुलं आणि सदासर्वकाळ आजारी असणारी वयोवृद्ध सासू. दोन-तीन ठिकाणी छोटी-मोठी कामं करते, पण मिळणाऱ्या पैशात घर चालत नाही, मग उरलेल्या वेळात ती भीक मागते.तीला आता अन्नपूर्णा प्रकल्पात समाविष्ट करून घेतलं आहे. घरात जेवण तयार करायला लावून तिच्याकडून आपण रोज जेवणाचे डबे विकत घेत आहोत.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रेताशेजारी ठेवलेले पदार्थ खायला मिळावेत म्हणुन काही माणसं स्मशानाबाहेर ताटकळत उभी असतात. हे डबे तीला या स्मशाना बाहेर उपाशी असलेल्या लोकांना द्यायला लावले आहेत. रोज ५०० रुपये या ताईला मिळतील अशी व्यवस्था केली आहे. भविष्यातही तीचं हे काम कायम राहावं याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच वेळा आत्महत्येची भाषा करणारी ही ताई… आता स्मशाना बाहेरील लोकांना “जेवण” नव्हे… नव्हे… “जीवन” वाटत फिरत आहे, वाटता वाटता जगायला शिकली आहे. ज्या ज्या वेळी मला ती भेटते, त्या त्या वेळी “दादा, दादा” म्हणत माझा हात पकडते, डोळ्यातून अश्रू घळाघळा ओघळत असतात.

ती भेटलेला प्रत्येक दिवस मग माझ्यासाठी भाऊबीज होऊन जातो!

 • एका झोपडपट्टी शेजारी एक दिवशी भिक्षेकरी तपासात होतो. त्यातलीच एक मावशी म्हणाली, “मी हीतंच या झोपडपट्टीत -हाते… घरी चला की… फुडल्या म्हैन्यात पोराचं लगीन हाय… चला की घरी दोन मिन्टं…”तीने खूप आग्रह केल्यानंतर, तीच्या त्या पाच बाय पाच च्या झोपड्यात गेलो.

होणारा नवरदेव दोन गुडघ्यांच्या मध्ये डोकं घालून झोपड्याबाहेर शांत बसला होता. एरवी “लगीन घर” म्हटलं की दिसतो तो जल्लोष… परंतु इथं मात्र होती स्मशानशांतता!
मी तीला खुणेनेच विचारलं, “काय झालं?”
ती म्हणाली, “आवो, डाक्टर लगीन ठरलं, पन पोराची होती तीबी नोकरी गेली, रिवाज हाय म्हणून लगीन करायचं… माज्या भावाचीच पोरगी केलीया पण दोन्ही घरात खायाला विष सुद्धा नाही… पन आता लगीन तरी कसं मोडायचं?”

दुसऱ्या दिवशी येऊन दोन्ही घरात दोन महिने पुरेल इतका किराणा देऊन आलो. मावशीच्या डोळ्यात पाणी आलं… पत्र्याच्या रिकाम्या डब्यात मी आणलेले डाळ-तांदूळ असं साहित्य ती ओतायला लागली… पत्र्याच्या डब्यात काहीही ओतताना एक विशिष्ट आवाज निर्माण होतो. हा आवाज मला सनई चौघड्यापेक्षाही मधुर वाटला…

आता, पोराच्या तोंडावर अख्खा मांडव फुलला होता… डब्यातली तांदूळ उचलून मी त्या भावी पती-पत्नीच्या डोक्यावर अक्षता म्हणून टाकल्या आणि हसत हसत निघालो. मागून त्या मुलीच्या मुसमुसण्याचा आवाज आला, मी मागं वळून पाहिलं. मुलगी माझ्याकडे पाहून रडत होती, जाताना तीने मला टाटा केलं… जणु सासरी सोडायला आलेल्या बापाला ती निरोप देत होती… मी ही हात हलवून सर्वांना निरोप दिला. जाताना माझी पावलं सुद्धा जड झाली होती… काय करणार?

नकळतपणे मी वधूपिता झालो होतो ना!

 1. रस्त्यावर मला अनेक लोक दिसतात ज्यांच्या डोक्यावर भयंकर केस वाढले आहेत चेहऱ्यावर दाढी पसरली आहे. स्वच्छता गृहात आंघोळ करण्यासाठी पैसे मोजावे लागतात, म्हणून अंघोळी च्या नावाने बोंबच! अशावेळी अनेक आजार निर्माण होतात… किमान दाढी आणि कटिंग तरी करणे अत्यंत आवश्यक होऊन बसतं.

मी हा व्यवसाय करणाऱ्या अनेकांना, “तुम्ही या लोकांची दाढी-कटिंग करून द्याल काय?” असं विचारलं… परंतु प्रत्येकाने नकार दिला. शेवटी मीच शेव्हींगचं सामान आणून बॅगेत ठेवलं आहे. खुप गरज भासते तेव्हा रस्त्यांत दाढी कटिंग सुद्धा करावी लागते…

नुकताच मला भीक मागत असणारा एक मुलगा भेटला, तो पूर्वी हेअर सलून च्या दुकानात काम करायचा. त्यालाही काम हवं होतं… आता त्याला हाताशी धरून रस्त्यावर बसलेल्या माणसांची दाढी कटिंग करायचं काम दिलं आहे. त्याचा रोजचा पगार आपण देणार आहोत. हाताला काम नसल्यामुळे याला नैराश्य आलं आहे. काही दिवसांत हा पैसे कमवण्यासाठी चो-या मा-या करणार हे स्पष्ट दिसत होतं. पण त्याला दिलेलं काम तो आता सेवाभावनेनं करायला लागलाय.

वाहणाऱ्या पाण्याला बांध घातला की ते “संथ” होतं… आणि भरकटणा-या मनाला बांध घातला की “संत”!

वैद्यकीय

 • घातवार या ब्लॉग मध्ये लिहिलेल्या आजीला, तीच्या झोपडपट्टीत जाऊन मलम पट्टी करून औषध गोळ्या देत आहे. दर वेळी गेलो की हातावर काही-बाही खायला ठेवते. “तुला लई आयुक्षं लागून दे”, असा ती आशीर्वाद देते आणि दरवेळी माझा वाढदिवस साजरा होतो…
 • आणखीही एक आजी. तिला कधीही बरे न होणाऱ्या प्रकारचे आजार आहेत यामुळे कोणत्याही हॉस्पिटलला तीला ॲडमिट करून घेत नाहीत. या आजीचीही तपासणी घरी जाऊन सुरू आहे. कोणत्याही क्षणी ती जाऊ शकते… तीचं घर म्हणजे ती झोपू शकेल इतकीच जागा! या जागेत दुसरा माणूस उभा सुद्धा राहू शकणार नाही.
  “आज तु आलास बाबा… फुडल्या खेपेला तु मला दिसशील का नाही माहित नाही…”

तीची ही वाक्यं काळीज भेदून जातात… आयुष्य खरंच क्षणभंगुर आहे!

 • एक आजोबा फुटपाथवर झोपले असता मध्यरात्री भुकेल्या कुत्र्यांनी येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायाचे पंजे कुत्र्यांनी डोळ्यादेखत तोडून खाल्ले.कोविड च्या रणधुमाळीत यांना कोणत्याही हॉस्पिटलने थारा दिला नाही. याविषयी मागे कधीतरी लिहीलेलं होतं. धनवंतरींना स्मरून, रस्त्यावरच सर्व ट्रीटमेंट सुरू केली. कित्येक दिवसांच्या प्रयत्नानंतर आज ती जखम बरी झाली आहे. पायाचे पंजे नसले तरी, हाताचे पंजे तरी शिल्लक आहेत या उमेदी वर बाबा जगत आहेत.

मावळुन पुन्हा उगवतो तो सुर्य… आणि मरुनही पुन्हा जन्माला येते ती आशा… उमेद!

 • ४. शनिवार वाड्याच्या एका बाजूला एक पूल आहे. पंधरा दिवसातल्या एका शनिवारी मी या पुलावर भिक्षेकरी तपासत बसलेला असतो. पुलाच्या खाली लोक वस्ती आहे याच ठिकाणी एक भलामोठा कचऱ्याचा ढीग साठलेला असतो. २९ तारखेच्या शनिवारी मी याच पुलाच्या कट्ट्यावर होतो. तेवढ्यात तिकडून कोणीतरी पळत आला आणि मला म्हणाला, “डॉक्टर, पुलाखालच्या कचऱ्यात काहीतरी हालतंय… तुम्ही बघा की येवून!”

“आसंल रे एखादं कुत्रं नाहीतर मांजर कच-यात… आता कुत्र्या मांजराला हाकलायला काय डॉक्टरला उठवतो का काय…?” कोणीतरी त्याला हटकलं…
“तसं नव्हं… कच-यात मला माणसागत कुणीतरी दिसतंय!”

मग कुतुहलानं मी उठलो, पुलाखाली वाकून बघितलं… उकीरड्याचा ढिग साठला होता. पुलाचा कठडा आणि उकिरड्यामध्ये किमान वीस फुटाचा अंतर असावं. नीट पाहिल्यानंतर जाणवलं कचर्‍यातून एक मानवी हात बाहेर आला आहे. काही भिक्षेकर्यांना घेऊन पुलाखालच्या कचऱ्यावर आम्ही आलो आणि बघितलं तर एक उघडा माणूस बेशुद्धावस्थेत कच-याखाली दबुन गेला होता. भिक्षेकर्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं. चादरीची झोळी करून त्याला कसंबसं वर पुलापर्यंत घेऊन आलो. अर्धवट बेशुद्ध असलेल्या त्याच्याकडून माहिती मिळाली ती अशी…

२८ तारखेला रात्री हा पुलावर बसला होता बसल्याजागी डुलकी लागली… रात्री साधारण १२ ते १ च्या दरम्यान हा पुलावरून डायरेक्ट त्या कचऱ्यात पडला. पुढचं काय झालं त्याला आठवत नाही… याचा अर्थ असा की काल रात्रीपासून २९ तारखेच्या दुपारच्या दोन वाजेपर्यंत तो तिथे बेशुद्धावस्थेत पडून होता. २० फुटांवरून तो कचऱ्यात कोसळला. सकाळी कचरा टाकणाऱ्या लोकांच्या लक्षात हे आलं नाही, नकळतपणे त्या व्यक्तीच्याच अंगावर सर्वजण कचरा टाकत गेले आणि हा कचर्‍यात दबुन गेला.

चुकुन हे लक्षात आलं नसतं, तर तो गुदमरून तिथेच गेला असता. उठणंही त्याला शक्य झालं नव्हतं कारण शरीराची अनेक हाडं मोडल्याचं स्पष्ट दिसत होतं. बोलण्याचंही त्राण त्याच्यात नव्हतं तो ओरडणार कसा?

२९ तारखेलाच दुपारी तीन वाजता सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं आहे. इतक्या उंचीवरून पडून सुद्धा केवळ हाड मोडण्यावर निभावलं… नाही तर, इतक्या उंचीवरुन पडुन एखाद्याचा मृत्यू झाला असता… मग हा वाचला कसा? कचऱ्यावर पडल्यामुळे याच्या डोक्याला इजा झाली नाही. कचरा गोळा करणारा हा इसम… आज याच कचऱ्यानेच त्याचे प्राण वाचवले होते…

कोण कुणाचे पांग कसे, कुठे आणि कधी फेडेल हे सांगता येत नाही हेच खरं!

 • बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर १००० पेक्षा जास्त भीक मागणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे रस्त्यावर याचना करणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार केले. ६०० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे इत्यादी दिले आहेत. या व्यतिरीक्त त्यांना आपण शरीरावर कोणत्याही प्रकारचं फंगस (Fungus) जमा होवु नये यासाठी अत्यंत उच्च प्रतीचा मेडिकेटेड साबण स्वच्छतेसाठी देत आहोत.

भोक्ता ते दाता

वेगवेगळ्या प्रसंगी लोक रक्तदान करत असतात. रक्तदानाविषयी अनेक संस्था जागृती घडवत आहेत.  माझे ज्येष्ठ बंधू समान आदरणीय श्री. विठ्ठलरावजी जाधव सर, माजी तुरुंग महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, यांनी स्थापन केलेल्या शांतीदूत परिवार या संस्थेतर्फे सध्याच्या काळात एक हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रक्तदान करावयास लावले. सरांना माझा प्रणाम!

त्यांच्याच पावलावर पाऊल म्हणून मी भीक मागणाऱ्या लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयुष्यभर लोकांनी आपल्याला “भीक” देऊन जगवलं आता रक्त देऊन समाजाला आपण “दान” देऊयात; आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होऊयात! हा विचार त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भिक्षेकरी समाजाला माझा हा विचार पटला.

आज अखेर मरणाशी झुंज देणाऱ्या समाजातील ६४ जणांचे प्राण माझ्या भीक मागणाऱ्या समाजाने केलेल्या रक्तदानामुळे वाचले आहेत, हे सांगायला मला विशेष अभिमान वाटतो. भीक मागणारा समाज माझ्याबरोबर ब्लड बँकेत येऊन रक्तदान करतो, ही जगातली पहिलीच घटना असावी… भीक मागतांना आढळलेल्या, सर्व जाती, धर्म आणि लिंगाच्या व्यक्ती रक्तदान करत असतांना, बाटलीत थेंबथेब जमा होणाऱ्या रक्ताच्या रंगाकडे मी दरवेळी खुप बारकाईनं बघतो…

कुठल्याही “अँगलने” पाहिलं तरी दरवेळी मला ते एकाच रंगाचं, म्हणजे लालच दिसतं!!!

भीक नको बाई शीक…

 • या महिन्यात कोणतीही शैक्षणिक गरज समोर आली नाही, परंतु सध्याचा काळ लवकर संपुष्टात यावा शैक्षणिक संस्था सुरू व्हाव्यात अशी मनोमन इच्छा आहे!

इतर…

 • गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेली महिलांची खराटा पलटण बॅच दर शुक्रवारी म्हणजे ७, १४, २१ आणि २८ मे रोजी संपन्न झाली. आम्ही जिथे जिथे अन्नदान करतो तिथे तिथे थोडाफार कचरा हा होणारच, महिलांची खराटा पलटण हा कचरा दर वेळी साफ करत आहे. बॅच मधील प्रत्येक महिलेला दरवेळी मानधना बरोबरच शिधा आणि जेवण याव्यतिरिक्त लागणाऱ्या इतर संसारोपयोगी वस्तू दरवेळी घेऊन देत आहेत.

Future Plan

 • अन्नपूर्णा प्रकल्पातून भीक न मागणाऱ्या व्यक्तींना आणि रुग्णांना अन्नदान करणे.
 • ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असा एक वर्ग आणि भीक मागणारा माझा नेहमीचा वर्ग माझ्याकडे काही काम मागत आहे अशा लोकांसाठी काम शोधणे.
 • याव्यतिरिक्त “डॉक्टर फॉर बेगर्स” या प्रकल्पात भीक मागणा-या लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणे या व्यतिरिक्त आणखी जे समोर येईल ते… आपल्या साथीने तोंड देण्याची तयारी ठेवली आहे!

आपल्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा हा आढावा आपणासमोर सविनय सादर!!!

आम्ही केवळ साक्षीदार !!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*