प्रिय बाबा,
साष्टांग नमस्कार!
बाबा… अहो बाबा… झोपलात की जागेच आहात? अहो, मी इकडुन बोलतीये आईच्या पोटातून…
मला माहितीये, रात्र खुप झालीये आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय, मला जन्माला घालायचं की… मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं.?
बाबु… बाबा मी तुम्हाला प्रेमानं बाबु म्हणु.? म्हणुद्या की हो… बाबु! बाबु, खरं सांगू मला यायचंय हो तुम्हाला भेटायला… इतके दिवस आईच्या पोटात झोपले आता बाबु, तुमच्या कुशीत झोपायचंय मला… मला ना, श्वास घ्यायचाय हो बाबा.. फक्त एक श्वास!
बाबा परवाचं आईबरोबरच तुमचं बोलणं मी ऐकलंय… मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही…
आणि मुलगी जन्माला आली तर?
बाबु… नकोय मला गादी… मी तुमच्या मांडीवरच झोपेन ना… नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नकोत मला… मी खेळेन बाई तुमच्याशीच बाबा…
बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टी फू करणार नाही बरं… बाबु… तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला… पण दाढी टोचली तरी मी अज्जिबात रागावणार नाही… बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरुन घरी आलात ना, की दारामागुन मी भ्भ्वाँव करीन हां तुला… पण तुम्ही घाबरायचं हां बाई… नायतर आमी नाय खेळणार ज्जा…
आई चहा करुन आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईन हां… बाई गं… कपाळावरचे केस कुठं गेले बाबुड्या.? टकलु हैवान झाले आहात नुसते! आँ… आईग्ग्ं… गालगुच्चा नाही घ्यायचा हां आमचा… गाल दुखतात आमचे… नाहीतर मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे… बघा मग ह्हां… सांगुन ठेवते!
आणि हो, बाबा… परवा माझ्या मैत्रिणींसमोर सारख्खं ठमाकाकु… ठमाकाकु म्हणुन चिडवत होतात ना मला.? थांबाच आता, तुमच्या ऑफिसातले लोक घरी आले ना की, त्यांच्यासमोर मी पण तुम्हाला ढेरीपॉम… ढेरीपॉम… म्हणुन चिडवेन…
ढोलुराम पळायला जात जा की जरा! काय म्हणालात.? हो, मी मुलगी म्हणुन जन्मले तरी तुमची आई म्हणुनच जगेन!
पण मला जन्माला तरी येवु द्या बाबा…
बाबा तुम्हाला वेणी घालता येते का हो? नाही.? कसा रे तू बाबड्या!
बरं भांडीकुंडी तरी खेळता येतात का.? नाही.?
बाई गं… काहीच कसं करता येत नाही तुम्हाला.?
मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय .?
आता लंगडी घालता येते का म्हणून अज्जिबात विचारणार नाही मी या ढेरीपॉमपॉमला… ढोलुराम कुठले! भातुकली तरी खेळता येते का बाबा तुम्हाला.? मी असं ऐकलंय, की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो… आपला हा पण खेळ बाबा आता अर्ध्यावरच मोडेल ना बाबा.?
बोला ना बाबा, गप्प का?
बाबा, तुम्ही आणि आई मला देवाघरी रहायला पाठवणार आहात ना? का? मी मुलगी आहे म्हणुन.? मुलगी असणं दोष आहे का बाबा? तुमची आई, पण एक मुलगीच आहे ना!
बाबा, देवाचं घर कसं असतं हो.? तीथं आई-बाबा पण असतात की आईबाबांना नको असणा-या माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात.?
सांगा ना बाबा, तुम्ही गप्प का?
बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी रहायला का पाठवताय? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का? मी ना बाबा, आपल्या मनीमाऊ सारखी कॉटखाली झोपुन राहीन एकटीच, तुम्हाला आणि आईला मी कध्धी कध्धी त्रास देणार नाही बाबा… मला नका ना पाठवु देवाघरी… प्लीज बाबु!
बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही… आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही… खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण यातलं एकही खरं होणार नाहीये.
मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो, पण मला काय माहित… जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात ते, कायमचं!
आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे. आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा.? पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला बाबा?? फक्त एकदाच लाडानं कपाळावरुन हात फिरवाल बाबा.?
बोला ना बाबा, वेळ खुप कमी आहे माझ्याकडे… रात्र संपत चालली आहे… बोला ना बाबा… बोला ना… बापरे… बोलता बोलता सकाळ झाली… तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा.? आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील…
तुम्ही हे बघू शकाल का बाबा?
फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमाकाकुला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डॉक्टरकाका… बाबा तुम्ही सहन करू शकाल हे.?
बाबा, हे डॉक्टरकाका, मला आणि आईला घेवुन कुठे चालले आहेत.? कसले कसले आवाज येताहेत इथं बाबा… मला भिती वाटत्येय… आईला थांबवा ना… या डॉक्टर काकांना थांबवा ना… बाबा थांबवा ना यांना प्लीज…
डॉक्टरकाका, तुम्ही तरी ऐका… मी माझी बाहुली देते तुम्हाला… हवं तर माझ्याकडची सर्व चॉकलेट्स देते… पण आईबाबांपासुन दुर नका ना करु मला काका…
बाबा, तुम्ही माझा हात नका ना सोडु… प्लीज बाबु… सांगा ना या डॉक्टरकाकांना… आई, तु तरी सांग ना… तु गप्प का.?
असह्य वेदना होत आहेत बाबा मला…
बाबा मला वाचवा… बाबा मला वाचवा… बाबा… बाबा… बाबु… बाबड्या! बाबा रडताहात तुम्ही? आता नका रडु… गेले मी केव्हाच तुमच्यामधुन…
तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत, तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार, लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कध्धी कध्धीच सापडणार नाही बाबा, दारामागुन आता तुम्हाला भ्भ्वाँव करायलासुद्धा मी येवु शकणार नाही… आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कध्धीच हरवायला येणार नाही बाबा… तुम्ही जिंकलात बाबा कायमचे!
तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे, आभाळात… तुम्हालाही तेच हवं होतं ना.? जाऊदे बाबा, आता मला कसलाही त्रास होत नाहीय, कसली ही वेदना नाही, संवेदना सुद्धा नाही… मी या पलीकडे गेले आहे. सारं कसं शांत शांत झालंय बाबा…
आता शेवटचा… अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल.?
आता फक्त एकदा एकदाच कुशीत घेउन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल?
चिडवा ना बाबा…प्लीज… शेवटचं… मी नाही रागावणार तुमच्यावर!
देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठे म्हणा!
तुमचीच जन्माला न आलेली,
अभागी ठमाकाकु!!!
Leave a Reply